Sunday, July 2, 2017

वर्षा सहलींची मौजमस्ती

     शेतकरी जसा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात असतो, तसाच पर्यटकदेखील वर्षा वर्षावाची प्रतीक्षा करीत असतो. कधी एकदा पाऊस पडतो आणि आपण वर्षा सहलीला निघतो, असे त्याला झालेले असते. उन्हाळ्यातल्या तापलेल्या, शिणलेल्या शरिर,मनाला थंडावा देण्यासाठी पर्यटक उतावीळ झालेला असतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की,त्याचा बेत वर्षा पर्यटनासाठी सुरू होतो. मुंबई,पुणे आणि कोकण भागातला माणूस यासाठी सज्ज झालेला असतो, मात्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला माणूसदेखील  त्याकडे आपोआप ओढला जातो.अलिकडच्या काही वर्षात पावसाळी पर्यटनाची टूम चांगलीच वाढली आहे. त्यामुळे हिवाळी सहलींपेक्षा बरेच जण पावसाळी सहलीला प्राधान्य देतात. या सहलींमुळे  लोणावळा-खंडाळा, माथेरानसह भिवपुरी धबधबा, सोलनपाडा धरण, बदलापूरचा कोंडेश्वर, खारघरचा पांडवकडा, माळशेजघाट, खोपोलीतील झेनिथ धबधबा, पनवेल जवळचा गाढेश्वर, पालघर येथील धरणे आणि धबधब्यांवर गर्दी वाढू लागली आहे.
 माथेरान: माथेरान म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अलौकिक ठेवा. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. एक- दोन वेळा माथेरानला जाऊन आल्यानंतर पुन्हा माथेरानला कशासाठी जावे, असा जर प्रश्न पडला असेल तर माथेरानच्या रानवाटा तुडवत माथेरान पाहण्याचा अनोखा आनंद घ्यायला, हेच उत्तर आहे. माथेरानचे जंगल जैव विविधतेने संपन्न आहे. माथेरानच्या डोंगर द-यातून ट्रेक करताना याचा अनुभव येईल. डोंगर द-यांमधून कोसळणारे धबधबे, -याचे मंजूळ संगीत, हे सारे माथेरानचे निसर्ग वैभव आहे. माथेरानच्या गर्द झाडीला आणि विविध पक्षी-प्राणी निरीक्षणाला पावसाळ्यात येतात. त्यातच पिसरनाथ मंदीर तलाव पावसाळ्यात तुडुंब भरल्यावर हे दृश्य पाहण्यासारखे असते. माथेरानच्या कुशीत पावसाळ्यात धबधबे-ओहोळांमध्ये डुंबण्याचा आनंद प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय सांगताच येत नाही. मात्र, माथेरानच्या पायथ्याशी असलेले टपालवाडी हे नाव जरी अपरिचीत असले तरी पावसाळी धबधब्यांमुळे ते पर्यटकांना खुणावत आहे. नेरळ स्थानकापासून जवळच असल्याने पर्यटक याला पसंती देतात.
कोंडेश्वर :जांभवली गावाच्या पलीकडे कुंडली नदीच्या उगमापाशी कोंडेश्वर महादेवाचे देऊळ आहे. तीनही बाजूंनी उंचावलेल्या डोंगरात पाण्याच्या नैसर्गिक कुंडापाशी महादेवाचे देऊळ आहे. कोंडेश्वराच्या गाभार्यात देवाचा पंचमुखी मुखवटा आहे. बाहेर जुन्या काळातील उंच दीपमाळ आहे. आवारात जुनी शिल्पे आहेत. कोंडेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांना बदलापूर स्थानक गाठावे लागते. बदलापूरपासून 5 किमी अंतरावर असल्याने स्थानिक आणि पर्यटकही आकर्षित होतात. कोंडेश्वर देवस्थानावरून हे नाव पडल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षात या ठिकाणीही पर्यटकही वाढत असले तरी अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. कोंडेश्वरला जाण्यासाठी बदलापूर पूर्वेतून वाहने मिळतात.
सोलनपाडा :कर्जत तालुक्यातील नव्याने प्रसिद्धीस येत असलेले आणि भिमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी असलेले सोलनपाडा धरण आकर्षक बंधाऱयामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून पर्यटकांचे सर्वात जास्त आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. गतवर्षी मुंबईतील तरुणांना जीव गमवावा लागल्याने तहसीलदारांनी या ठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. मात्र, यंदा पुन्हा गर्दीचा सर्वाधिक ओघ सोलनपाडयांकडेच असेल हे निश्चित.
चिंचोटी धबधबा :पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड स्थानकापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावानजीकचा चिंचोटी धबधबा हे पावसाळी भटकंतीचे मुंबईकरांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण. बस आणि रिक्षाच्या सहज उपलब्धतेमुळे चिंचोटीला पोहोचणे सुकर झाले आहे. गावातूनच ओढयाच्या कडेकडेने जाणारी ठळक पायवाट तास-दीड तासात आपल्याला धबधब्याशी घेऊन जाते. वाटेतील जंगलातील हिरवाई पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहात नाही. धबधब्याच्या पोटाशी असलेल्या डोहात पोहण्याची मजा काही औरच. पण जुलअखेपर्यंत येथील कातळावर शेवाळ साचल्याने  सगळा परिसर निसरडा होतो. त्यामुळे येथे वावरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा जोर वाढून प्रवाह धोकादायक होतो. अशा वेळी डोहात उतरण्याचा मोह टाळलेलाच बरा. धबधब्याच्या वरून जाणारी एक पायवाट जंगल तुडवीत तुंगारेश्वरकडे घेऊन जाते. ट्रेकिंगचा अनुभव असलेल्यांनी हा छोटासा ट्रेक आजमवायला काहीच हरकत नाही.
तुंगारेश्वर: तुंगारेश्वर अभयारण्याच्या घनदाट वनराईत आकंठ बुडालेल्या या शिवधामाला श्रावणमासी भाविकांची ही गर्दी लोटते. त्यात मंदिराशेजारून वाहणार्या प्रवाहात ठीकठिकाणी निर्माण होणार्या छोटया-मोठया धबधब्यांची रेलचेल भिजर्या मनांना इथपर्यंत आणते. वसई रोड स्थानकापासून 7 किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटयापर्यंत शेअर रिक्षांची ये-जा सतत सुरू असते. पुढे चार किलोमीटर पायपीट करायची नसल्यास खासगी रिक्षा थेट गेटपर्यंत नेऊन सोडते. तेथून कच्च्या मातीच्या सडकेवरून जाताना दोन-तीन वेळा ओढा ओलांडताना पाय ओले करत तासाभरात आपण देवळापाशी पोहोचतो. आवारात पूजेच्या सामानाची दुकाने तसेच चहा-नाश्त्याच्या टपर्या दिसतात. या भागाचे विशिष्टय म्हणजे येथील जैवविविधता. जंगलाशी  खर्या अर्थी एकरूप व्हायचे असेल तर येथे एखाद्या जाणकारासोबत जंगलात एक फेरफटका मारावाच. अनेक प्रजातींची फुलपाखरांनी जंगल समृद्ध आहे. ट्रेकिंगची हौस भागवायची असेल तर तुंगारेश्वर ते माथ्यावरील परशुराम कुंड असा छोटा सोपा ट्रेक करता येऊ शकतो.
पेल्हार धरण: पावसाळ्यात अतिपरिचित ओढे, धबधब्यांच्या ठिकाणांवर लोटणारी तुडुंब गर्दी चुकवून आडवाटेने भटकायची इच्छा असल्यास वसई रोड स्थानकापासून 10 किलोमीटर अंतरावरील पेल्हार धरण परिसर हे योग्य ठिकाण आहे. डोंगर, हिरवळ, झरे असं नयनरम्य समीकरण जुळवून आणणारं हे एक शांत ठिकाण आहे. वसईला पाणीपुरवठा करणार्या या धरणाच्या पाठीमागील तुंगारेश्वर डोंगरातून खळाळत वाहणारे अनेक ओहोळ या धरणात येत असतात. धरणाची कमाल पातळी ओसंडून वाहणारे पाणी पाहायला बरीच गर्दी जमते. वसईत बरेच छोटे-छोटे धबधबे आहेत. त्यामुळे सध्या येथे पर्यटकांची गर्दी होताना दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या झाडाझुडपांनी आपले साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अशा हिरवळीत पिकनिकचा आनंद लुटण्याची मजाची काही वेगळी आहे. पण मुख्य धबधब्याजवळ पोहचायला जवळपास 1 तासाचे अंतर पार करावे लागते.
भवपुरी (आषाणे) धबधबा: पावसात चिंब होण्यास प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच पावसाळ्यात तरुणाईची पावले आपोआप पावसाळी पर्यटनस्थळांकडे वळतात. हिरवागार डोंगर आणि त्याच्या कुशीतून झेपावणारा दुधाळ धबधबा अंगावर झेलत तरुणाई अगदी पावसोत्सवच साजरा करत असते.. कर्जतजवळील आषाणे धबधबा हा सध्या तरुणाईचे लाडके पर्यटनस्थळ झालेले आहे. उंचावरून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यात आंनद साजरा करून तरुणाई अगदी ओलीचिंब होऊन जाते. कर्जत रेल्वे स्थानकाच्या अलीकडच्या भिवपुरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर आषाणे धबधबा आहे. भिवपुरी स्थानकापासून केवळ अध्र्या तासात धबधब्यापर्यंत पोहोचता येते. पण जाणारा रस्ता आणि सभोवतालचा परिसर हिरवागार आणि वातावरण आल्हाददायक आहेमग या धबधब्यापर्यंतचा प्रवासच मन उल्हसित करणारा आणि उत्साह वाढवणाराजसा जसा डोंगर जवळ येतो, तसतसे अनेक ठिकाणी धबधबे दिसायला लागतात. पण आषाणे गावातील मोठा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण. या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी डोंगरचढाई करावी लागते. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचले की मोकळ्या जागेत उंचावरून कोसळणार्या या धबधब्याचे पाणी झेलताना खूपच आनंददायी वाटते, पण तेवढेच भीतीदायक. धबधब्याच्या पाण्याचा मारा झेलताना समोरचे काही दिसत नाही, दोन क्षण पाणी अंगावर झेलले की त्यातून बाहेर पडावे वाटते.. पण पुन्हा हा धबधबा कवेत घ्यावासा वाटतो. या दुधाळ धबधब्याच्या ठिकाणी नाचावेसे, बागडावेसे प्रत्येक पर्यटकाला वाटते, तेथून पायच निघत नाही.
पांडवकडा : मुंबई-पनवेल हार्बर रेल्वे मार्गातील महत्त्वाचे स्थानक म्हणून खारघर ओळखले जाते. नवी मुंबईतील धबधब्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी गर्दी होत होती. सुमारे 150 मीटर उंचीवरून कोसळणारे पाणी या धबधब्याचे वैशिष्टय आहे. येथे मुख्य धबधब्याला लागूनच दुसरा एक धबधबा असून पांडवकालीन गुंफेमुळे या धबधब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काही अपघात आणि असामाजिक कृत्ये घडल्याने मागील काही वर्षांपासून या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता खारघरचा पनवेल महापालिकेत समावेश केल्याने सुरक्षा आणि सुधारणा होतील अशी पर्यटकांची अपेक्षा आहे.
लोणावळा-खंडाळा: मुंबई-पुणे महामार्गावर 625 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटतेलोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
लोणावळा पुण्यापासून 64 कि.मी तर मुंबईपासून 96 कि.मी. अंतरावर आहे.लोणावळा चिक्की आणिफजया पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरचे लोणावळा हे महत्त्वाचे स्थानक आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लोणावळ्यातून जात असल्याने तिथे रस्त्यानेही सहज जाता. महाराष्ट्रातील इतर थंड हवेच्या ठिकाणांप्रमाणेच लोणावळा येथेही निसर्गातील अनेक सुंदर ठिकाणे आणि दर्याखोर्यांमध्ये वसलेली लहानशी खेडी, गावे पहायला मिळतात. लोणावळ्यापासून साधारण साडेसहा कि.मी. अंतरावर असलेला एक सुंदर ठिकाण म्हणजे राजमाची पॉइंट जेथून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध राजमाची किल्ला आणि आसमंतातील दर्याखोर्यांचा विहंगम देखावा पाहता येतो.
सहलीसाठी लोणावळ्यातील रायवूड पार्क हे एक आदर्श ठिकाण आहे.भरपूर वृक्षराजी असलेले हे एक मोठे उद्यान आहे. उद्यानामध्ये शंकराचे एक मंदिर आहे. वळवण धरण ज्याच्या  पायथ्याशी मोठे उद्यान आहे हे सुद्धा पर्यटकांचे एक आवडीचे ठिकाण आहे.वळवण धरण सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली येथील वीज केंद्राला वीजनिर्मितीसाठी पाण्याचा पुरवठा करते. लोणावळ्यापासून 12 कि.मी.अंतरावर असणार्याड्यूक्स नोजया स्थानालाही तुम्ही भेट देऊ शकता. नाकाच्या आकाराचे हे शिखर ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावाने ओळखले जाते. हायकींग आणि ट्रेकिंग करणार्या पर्यटकांमध्येड्यूक्स नोजलोकप्रिय आहे.
टायगर्स लीप या स्थानाला टायगर्स पॉइंट या नावाने सुद्धा ओळखले जाते. या शिखर माथ्यावरून तुम्ही 650 मी.ची खोल दरी आणि कडा पाहू शकतो कि जो एक विशाल देखावा असतो.
वर्षा सहलीचा आनंद द्विगुणीत करताना काही सावधगिरी बाळगायला हवी. सेल्फी काढताना किंवा अन्य गोष्टी करताना सावध राहायला हवे. नाही तर मोठे धोके होऊन सहलीची मजाच जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत काही लोकांच्या चुकांमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सहलीचा आनंद तना-मनात घेऊन सुरक्षित माघारी फिरायचे असेल तर काही गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागेल.

No comments:

Post a Comment