दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेला
विद्यार्थी आमच्याच क्लासचा आहे, अशी जाहीरातबाजी करणारे क्लासवाले
काही कमी नाहीत. अगदी तालुकास्तरीय ग्रामीण भागापासून मोठ्या
शहरांपर्यंत ही फसवी जाहिरातबाजी सुरू आहे. याला कोणी पायबंद
घालत नाही. त्यामुळे क्लासेसवाल्यांची दुकानदारी अगदी जोमात सुरू
आहे. नुकतेच दहावी-बारावीचे निकाल जाहीर
झाले आहेत. त्यामुळे वृत्तपत्रातून,पॉम्प्लेटमधून
आणि चौका-चौकात लटलेल्या फ्लेक्स बोर्डवर यशस्वी मुलांची नावे
आणि त्यांना मिळालेले गुण व त्यांचा फोटो झळकत आहेत. क्लासेसवाल्यांच्या
चढाओढीमुळे यशस्वी मुलांची मात्र आपोआप प्रसिद्धी होत आहे, ही
चांगली बाब असली तरी यशस्वी विद्यार्थी हा आमच्याच क्लासेसचा विद्यार्थी आहे,
हा खोटेपणा कशाला हवा आहे? खरोखरच तुमच्या क्लासेसची
गुणवत्ता असेल आपोआपच तुम्हाला प्रसिद्धी मिळत राहते. माऊथ पब्लिसिटी
ही सगळ्यात वेगवान आणि चांगली प्रसिद्धी देण्याचे माध्यम आहे. सध्या याचीच चलती असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी
क्लासेसचा फारसा जमाना नव्हता,त्यावेळेला मुले घरीच अभ्यास करून चांगले यश मिळवत होते. त्यांच्या यशाचे श्रेय आपोआप शाळा आणि पालकांना जात होते. मात्र क्लासेसची टूम निघाली आणि यशाचे श्रेय भलतीच मंडळी घेऊ लागली.
त्यामुळे शाळा मागे पडल्या. मुलगा कुठल्या का शाळेत
असेना,पण अमुक अमुक क्लासला मुलगा आहे, असे पालक सांगायला लागले. पालकांनीच आपल्याकडचे श्रेय
या क्लासवाल्यांच्या हवाली केले. मागे चाटे कोचिंग क्लासवाले आपल्या क्लासेसची जाहीरात करण्यासाठी इतर शाळांमधील
किंवा क्लासेसमधील दहावी-बारावीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या मुलां-मुलींचे फोटो वापरत असे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार
चांगलाच गाजला होता. इतर शाळेतील किंवा क्लासेसच्या मुलांनी आमच्याच
क्लासेसमधून यश मिळवले आहे, अशी मोठी जाहीरात करत होते.
वृत्तपत्रांच्या पानभर जाहिरातींमुळे हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता.
त्यांचे क्लास मुंबईनंतर महाराष्ट्रात सुरू झाले. त्यावेळेला त्यांनी मोठी जाहिरातबाजी करून मैदान मारण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूरातील त्यांची फसवी जाहिरात उघडी पडली. आणि खरा प्रकार उघडकीस आला.
आजही हा प्रकार
सर्वत्र सुरू आहे. सध्या पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे फारच लक्ष केंद्रित केले आहे.
पाल्याच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करायला पालक तयार झाले आहेत.मात्र त्यामुळे मुले शाळा आणि क्लास यातच गुरफटून गेले आहेत.या मुलांना खेळायला संधीच मिळेनाशी झाली आहे. काही पालकांनी
तर मुलांना चांगले गुण मिळवण्यासाठी गुरुकूलसारख्या शाळांमध्ये मुले टाकली आहेत.
दिवसरात्र मुले तिथेच राहणार. त्यासाठी वाट्तेल
तेवढा पैसा खचकरायला पालक तयार झाला आहे. त्यामुळे मुले ही फक्त
मार्क मिळवणार्या शिक्षणपद्धतीत अडकली आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, कौशल्याधारित शिक्षणाला
फाटा मिळत असून बेरोजगारी वाढत चालली आहे. मुलगा,डॉक्टर,इंजिनिअर व्हावा, यासाठी
पालक त्यांच्यावर दवाब टाकत आहे.मात्र त्याच्या कलागुणांकडे दुर्लक्ष
केले जात आहे. साहजिकच गटांगळ्या खात बसतात. शेवटी पालकांना आपला निर्णय मागे घ्यावा लागतो. काही
मुले पालकांच्या अधिक अपेक्षेच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करत आहेत. हे खरे तर थांबण्याची गरजा आहे.
शाळा काय आणि क्लासेस
काय अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्याच मागे लागलेले असतात. दोघांचाही उद्देश तोच असताना मग
क्लासेसची गरजच काय? पण आपला मुलगा मागे राहायला, ही पालकांची काळजी! त्यामुळेच क्लासेसवाल्यांचे फावते
आहे. आजचा पालक गोंधळलेला आहे. त्याचा फायदा
क्लासेसवाले घेत आहेत. अभ्यासक्रम तयार करणारे जोपर्यंत अशी परीक्षा
पद्धती ठेवतील, तोपर्यंत पालक असाच गोंधळलेला असणार आहे आणि तो
लुटला जात असणार आहे. दहावी-बारावीच्या
बोर्डात अगदी टॉपर असलेले विद्यार्थी हे आपल्याच क्लासेसचे आहेत, अशी जाहिरातबाजी करून पालकांना फसवून लुबाडणार्या क्लासेसवाल्यांपासून
पालकांनी सावध राहण्याची गरज आहे. गम्मत बघा! एक मुलगी खेड्यात राहून तिथल्या शाळेत शिकून नव्वदच्या आसपास गुण मिळवते,
मात्र तिचा फोटो शहरातल्या क्लासेसवाला आपल्या जाहिरातमध्ये टाकून संबंधित
शाळेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो,हे सगळे अजबच आहे.
यात पालकांनीच सावध राहण्याची गरज आहे.जाहिरातबाजी
ही एक कला आहे. जो उद्योजक किंवा व्यावसायिक आपल्या धंद्यात अथवा
व्यवसायात 25 टक्के गुंतवणूक करतो आणि जाहिरातीवर 75 टक्के खर्च करतो, तो यशस्वी होतो, असे म्हटले जाते. जाहिरातबाजीचा जमाना आहे. आणखी एक दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिए, असे जे म्हटले जाते ते आजही खरेच आहे.
No comments:
Post a Comment