एकोणिसाव्या
शतकाच्या पूर्वार्धात जे प्रबोधनपर्व सुरू झाले, त्या
पूर्ण प्रबोधनपर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत. महाराष्ट्राचा सामाजिक आणि धार्मिक
सुधारणांचा इतिहास लिहिताना शाहू महाराजांचे नाव घेतल्याशिवाय आपणाला पुढे जाताच येत
नाही. जसा वारकर्यांच्या मुखामध्ये
‘ग्यानबा-तुकारामांचा’ नामघोष
असतो तसे सामाजिक समतेचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मुखात
‘फुले-शाहू-आंबेडकर’
हा जयघोष असतो. उणेपुरे 48 वर्षे इतकेच आयुष्य लाभलेल्या शाहू महाराजांचे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे
कार्य अजोड आहे. शाहू महाराजांनी राज्यसूत्रे हाती घेतली,
त्यावेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते.त्यांच्या
आयुष्यातील सुमारे 28 वर्षांची कारकिर्द समाजकार्याची आहेत आणि
ती तितकीच महत्त्वाची आहेत. सुरुवातीला त्यांनी संस्थानाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक
परिस्थितीचा अभ्यास करून त्यात कशा कशा सुधारणा घडवून आणायच्या यावर त्यांनी भर दिला.
तसेच शेती, शिक्षणसंस्था, उद्योगधंदे यात कसे बदल करायचे याचे आडाखे बांधले व विनाविलंब प्रत्यक्ष कार्यास
वाहून घेतले.
एकीकडे इंग्रज सरकारची संस्थान
बरखास्त करण्याची टांगती तलवार तर दुसरीकडे लोकांना न रुचणार्या सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणणे,
अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. शाहू महाराज
शिक्षणप्रेमी होते. त्यांनी आपल्या समाजसुधारणांचा केंद्रबिंदू
शिक्षणप्रसार मानला. त्यांनी त्यांच्या संस्थानातील ग्रामीण भागात शाळा वाढविल्या. गोरगरिबांची, बहुजनांची मुले शिकू लागली. पुढे उच्च शिक्षणासाठी ती कोल्हापुरात येऊ लागली. त्यांच्या
राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून
महाराजांनी सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी वसतिगृहे काढली. एवढी
वसतिगृहे त्या काळात महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात नव्हती. शिक्षणाशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही हे महाराजांनी ओळखले होते.
म्हणून 1916 साली त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
महाराजांना दलित समाजाबद्दल
विशेष प्रेम होते.जातीभेदामुळे
आणि अस्पृश्यतेसारख्या रूढीमुळे समाज दुभंगला आहे हे त्यांनी जाणले. ही रूढी घालविण्यासाठी फक्त भाषण करून किंवा ग्रंथ लिहून भागणार नाही हे ते
ओळखून होते. त्यासाठी प्रत्यक्षकृतीची गरज होती. ती कृती त्यांनी स्वतःपासून सुरुवात करून केली. त्यांनी
गंगाराम कांबळे या सेवकाला स्वतः भांडवल पुरवून हॉटेल काढायला लावले. एवढेच करून महाराज थांबले नाहीत तर ते स्वतः गंगारामच्या हॉटेलमधील चहा पीत
आणि सोबत्यांनाही पाजीत. हे सर्व कोल्हापूरवासीय उघड्या डोळ्यांनी
पाहात. प्रत्यक्ष राजाच शिवाशिव पाळत नाही. जातीभेद मानत नाही. यातून हळूहळू लोकांची भीड चेपली आणि
तेही गंगारामच्या हॉटेलमधील पदार्थांवर ताव मारू लागले. महाराज
हे कर्ते सुधारक होते. अस्पृश्यांची आर्थिक स्थिती सुधारावी,
त्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या जीवनात आनंद
निर्माण व्हावा म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी सरकारी नोकरीत मागासलेल्या लोकांसाठी 50 टक्के आरक्षणाची
घोषणा केली. हे क्रांतिकारक पाऊल होते. ते महाराजांनी उचलले. एवढेच नव्हे तर त्याचे समर्थन केले.
विरोध करणारांना सप्रयोग त्याची आवश्यकता पटवून दिली. सुप्रसिद्ध चरित्रलेखक धनंजय कीर यांनी ‘राजर्षी शाहू
छत्रपती’ या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे की,
‘खरोखर बुद्धानंतर भारतात राजर्षी शाहू हाच एक असा राजा होऊन गेला की,
जो हरिजन, गिरीजन यांच्या पंक्तीस प्रेमाने,
निर्भयपणे व उघडपणे जेवला.
शेतीच्या
क्षेत्रात ’महाराजांनी दाखविलेली प्रयोगशीलताही वाखाणण्याजोगी
होती. आजपर्यंत ज्या भागात कधीच न घेतलेली चहा, कॉफी, कोको, वेलदोडे, रबर अशी विविध पिके घेण्याचे प्रयोग करून लोकांना उत्तेजन दिले. पाण्याचे महत्त्व जाणून राधानगरी धरण बांधून घेतले. शेती मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे.
व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला तरच समृद्धी येईल, हे जाणून खास बाजारपेठ स्थापन केली. बाहेरून काही व्यापारी
मंडळींना पाचारण केले. त्यांना जागा दिल्या. पुढे कोल्हापूर ही ‘गुळाची मोठी पेठ’ म्हणून उदयास आली. त्याच्यामागे महाराजांचा दूरदर्शीपणा
होता. संस्थेने औद्योगिक सर्वेक्षण करून त्याच्या आधाराने मोठ्या
कल्पकतेने नवनवे उद्योग सुरू केले. सुगंधित औषधी तेल उद्योग,
मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग,
सुती कापड उद्योग सुरू केले. संस्थांनातील तरुण
प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवले व प्रशिक्षण झालेल्यांना संस्थानात बोलावून अधिकारपदे
दिली. मधुमक्षिका पालन उद्योगाच्या बाबतीत तर संपूर्ण देशात त्यांचे
जनकत्त्व कोल्हापूरला प्राप्त करून दिले. ‘दि शाहू छत्रपती स्पिनिंग
ऍण्ड व्हिविंग मिल्स’ ही मोठी गिरणी सुरू केली. साखर कारखाना, ऑईल मिल, सॉ मिल,
फाऊंड्री, इलेक्ट्रीक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी अशा अनेक उद्योगांचा प्रारंभ महाराजांनी केला.
प्रशिक्षित कामगार तयार व्हावा म्हणून ‘राजाराम
इंडस्ट्रियल स्कूल’ काढले. संस्थानतून निघून
गेलेल्या विणकरांना परत बोलावून त्यांची संघटना बांधली. त्यांना
मदत केली आणि धोतरे, लुगडी, चोळीखण यांच्या
उत्पादनाला ऊर्जितावस्था आणली.
स्वतः
शाहू महाराज एक कसलेले मल्ल होते. आपल्या संस्थानातील विविध
पेठांतून व गावोगावी त्यांनी तालमी उभ्या केल्या. तरुणांना व्यायामाची
गोडी लावली. साहस, बळ, एकाग्रता, कौशल्य हे गुण पणाला लावावे लागणार्या तरुणांच्यात पुरुषार्थ जागवणारे खेळ सर्वदूर वाढतील असे प्रयत्न केले.
1902 साली महाराज विलायतेला गेले. तेथे ऑलिंपिक
सामन्याची विस्तीर्ण मैदाने पाहिली. मग आपल्याही राज्यात असे
विस्तीर्ण मैदान हवे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी कोल्हापुरात
‘खासबाग’ मैदान बनवून घेतले. एकाचवेळी चाळीस ते पन्नास हजार लोक खेळाचा आनंद घेऊ शकतील असे हे मैदान तयार
करून घेतले.
महात्मा
फुल्यांचा सामाजिक समतेचा वारसा त्यांनी पुढे चालवला.
एवढेच नव्हे तर कोल्हापुरात त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
पुनर्विवाहाचा कायदा केला. गोवधबंदीचा कायदा केला.
क्षात्रजगत्गुरू पीठाची स्थापना केली. कुलकर्णी
वतने, बलुते पद्धत बंद केलीसर्व बाजूंनी विपरीत असलेल्या परिस्थितीशी
मोठ्या धैर्याने झुंज देत कालचक्राचे उलट फिरणारे काटे, सुलट
फिरवणारे राजर्षी शाहू महाराज परिवर्तनाचे उद्गाते होते. इ.स. 1894 ते 1922 या केवळ
28 वर्षांच्या कारकीर्दीत आपल्या संस्थानातील प्रजेलाच नव्हे तर संपूर्ण
देशातील जनतेला मार्गदर्शक ठरावे असे काम आपल्या हयातीत केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या असामान्य कार्यास विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment