Friday, October 6, 2017

सामान्य माणसाच्या समृद्धीचा विचार व्हावा


    सध्या जगभरात भारताच्या जीडीपी आणि वाढत्या आर्थिक विषमतेवर प्रसिद्ध लेखक थॉमस पिकेटी आणि लुकास चँसेल यांनी लिहिलेल्या शोधनिबंधाची जोरदार चर्चा सुरू आहे. या शोधनिबंधावर आर्थिक-सामाजिक विश्लेषकांकडून अभ्यास सुरू आहे. आपल्या देशात मात्र या निष्कर्षावर अजिबात लक्ष दिले जात नाही,ही दुर्दैवी गोष्ट म्हटली पाहिजे.बिकेटी आणि चँसेल यांच्या शोधनिबंधाचा सारांश असा की, भारतात 1980 नंतर झालेल्या सुधारणांचा बहुतांश लाभ समृद्ध लोकांनाच झाला आहे. आर्थिक सुधारणांच्या काळात समाजात असमानता वेगाने वाढत आहे.1980 च्या अगोदरच्या तीन दशकांमध्ये असमानता कमी येत होती.पण 1980 नंतर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वेगाने वाढत गेली. अशा परिस्थितीत विविध आर्थिक, सामाजिक संशोधनामध्ये देशातील गरीब आणि सामान्य माणूस यांच्या आनंदासाठी अधिक रोजगारासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे भारतातले गरीब आणि सामान्य लोक समाधानकारक परिस्थितीत नाहीत. संत्य्क्तअ राष्ट्रद्वारा घोषित वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-2017 मधील 155 देशांच्या यादीत भारत देश 122 व्या क्रमांकावर आहे.भारत मागे राहण्याच्या प्रमुख कारणांमध्ये गरिबी, आरोग्य,शिक्षण या क्षेत्रात भारतात समाधानकारक कामगिरी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

     जागतिक बँकेनेदेखील नव्या अभ्यास पाहणीत भारतातील 46 टक्के जनता दारिद्ˆय रेषेच्या खालचे जीवन जगत असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, देशातले  केवळ सात टक्के श्रमिक लोक पेन्शन योजनेच्या कक्षेत येतात. अर्थतज्ज्ञांचे मत असे की, सरकारने विकास दर वाढवण्याबरोबरच गरिबांच्या कल्याणासाठी काही नव्या योजनांवरही लक्ष द्यायला हवे आहे. या दिशेने सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजना अर्थात पंतप्रधान सुलभ वीज घर-घर या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेनुसार केंद्र सरकार ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील सर्वच वंचित घरांपर्यत मार्च 2019 अखेर वीज देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.2017 पासून सरकारने आपली नीती ज्याप्रकारे ग्रामीण भारत आणि गरीब लोकांवर केंद्रित केली आहे, त्यानुसार त्याचा लाभ सामान्य लोकांना मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
     सरकार गरिबांसाठी शौचालय बनवण्याबरोबरच गरीब महिलांना गॅस सिलेंडर मोफत देण्याचा प्रयत्न वेगाने करत आहे.नव्या आरोग्य कार्यक्रमानुसार आता आरोग्यावर सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) च्या 2.5 टक्के रक्कम खर्च करण्याचे उदिष्ट ठेवले आहे.त्याचबरोबर देशातल्या 80 टक्के लोकांवर उपचार सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत करण्याचे लक्ष्यदेखील ठेवण्यात आले आहे. निश्चित स्वरुपात देशातील लोकांची सामाजिक संरक्षण,गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा समाधानक बनवण्याची आवश्यकता आहे. शिक्षण आणि आरोग्यावर आपल्या देशात फारच कमी पैसा खर्च केला जात आहे. यात आणखी वाढ होण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून निवास, वीज,आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी अल्प मोबदल्यात उपलब्ध झाल्यास दारिद्ˆय रेषेखालील अथवा सामान्य माणूस निश्चित स्वरुपात समाधानी राहण्यास मदत होणार आहे.
     सामान्य माणसाच्या कमाईतला सर्वात मोठा हिस्सा सार्वजनिक सेवा, आरोग्य सुविधा आणि शिक्षण यावर खर्च होत आहे. पाणी,जल, वायू प्रदूषणाच्याबाबतीत देशात मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. त्याचबरोबर बदललेली जीवनशैली यामुळे नवनवे आजार अस्तित्वात येत आहेत. त्यामुळे आरोग्यावर फार मोठा पैसा खर्च होत आहे. या विविध कारणांमुळे चांगले जीवन स्तर आणि अन्य आवश्यक गरजा पूर्ण करण्याबाबत देशातले लोक मागे आहेत. वास्तविक वाढत्या आर्थिक विकासाने कोट्यवधी भारतीयांमध्ये चांगल्या जीवनाची महत्त्वाकांक्षा जागवली आहे. जर अशा परिस्थितीत देशातल्या कोट्यवधी लोकांना उपयुक्त सामाजिक संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण सुविधा मिळत नसतील तर त्यांच्यामध्ये निराशा वाढत जाणार आहे. ही निराशा सगळ्यांसाठी घातक ठरणार आहे. सहजासहजी मिळत नसेल तर लोक लुबाडून घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. सध्या असे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे देशातील लोक सुखी, समाधानी राहावेत,यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. देशात अशा परिस्थितीत असे नवे आर्थिक वातावरण आणि अशी नवी आर्थिक रणनीती विकसित करण्याची आवश्यकता आहे,जी रोजगार, सामान्य माणूस आणि गरिबांच्या समृद्धीवर केंद्रित असेल.

Wednesday, October 4, 2017

प्रशासकीय सेवेत का यायचे?

     अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाणार्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या स्पर्धा देणार्यांची संख्याही कमालीची वाढली आहे.यातून क्लासेसवाल्यांची दुकानदारी तर मस्त चालली आहे.पण जी मुलं अथवा मुली स्पर्धा परीक्षा देण्याकडे वळली आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र बर्याचदा अंधानुकरण होत असल्याचे दिसत आहे. कुठलेही ध्येय-धोरणे निश्चित न करता मला अधिकारी व्हायचं आहे, असे म्हणून ही मंडळी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागली आहेत. भारतीय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत कशासाठी जायचे,याचे उत्तर यांच्याकडे नाही.या ठिकाणी मान-सन्मान मिळतो आणि महत्त्वाचे म्हणजे भरपूर पगारासह अन्य मार्गाने अर्थात भ्रष्ट मार्गाने रग्गड पैसा मिळतो,हीच लालसा त्यामगे अधिक दिसत आहे. अर्थात सगळेच असे करत नाहीत. काहींची भूमिका ठाम आहे. त्यांना आपल्याला प्रशासकीय सेवेत का जायचे आहे, याचे सकारात्मक आणि ठाम उत्तर आहे.मात्र अशी मुलं फारच थोडी आहेत.
     प्रशासकीय अधिकार्याने मनात आणले तर बर्याच गोष्टी बदलू शकतो.याची आपल्या समाजात खूप उदाहरणे आहेत. अशा लोकांची आता गाथाच ऐकायला मिळत आहे. काही लोकांनी तर यातून नवाच बिझनेस सुरू केला आहे. जागोजागी व्याख्यानांना जाऊन त्यांनी आपले मानधन रुपाने खिसे भरायला सुरुवात केली आहे. काहींनी आपल्या आयुष्याच्या संघर्षाची कथा पुस्तकरुपाने मांडून त्यातूनही पैसा छापायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांना याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र देशसेवा, समाजसेवा याचा विचार प्रामाणिकपणे होणार आहे की नाही? एवढे मात्र खरे की, एकदा का तुम्ही त्या पदावर पोहचलात ई,मग मागे वळून पाहण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने सहज धन-दौलत,संपत्ती वैगेरे मिळत राहते.पण त्याच्यापुढे आपण विचार करणार आहोत की नाही? खरोखरच काही तरुणांना किंवा जे सध्या सेवेत आहेत,त्यांना समाज,देशाची काळजी आहे. संपूर्ण समाजावर परिणाम होईल असा निर्णय घेण्यासाठी किंवा अशा एखाद्या निर्णय प्रक्रियेचा भाग होण्यासाठी आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचे आहे किंवा आलो आहे, अशी म्हणणारी आणि तसं वागणारी माणसं आहेत. बोले तैसा चाले।त्याची वंदावी पाऊले॥ असे म्हटले आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा सचिव ही पदे फार मोठे अधिकार असलेली असतात.त्या अधिकारांचा वापर कशासाठी करता हे फार महत्त्वाचे आहे. काही पोलिस अधिकार्यांनी अवैध धंदे बंद केले,काहींनी बालविवाह रोखले तर काहींनी प्रशासन अगदी स्वच्छ केले. मग ते स्वच्छतेत असेल किंवा भ्रष्टतेत असेल. कायद्याचा वापर कसा,कुठे करायचा याचे ज्ञान असल्यास फार चांगली कामे होऊ शकतात. समाज बदलण्यास मदत होते.
     काहीजण सांगतात, वेगवेगळे प्रसंग अशा महत्त्वाच्या पदावर असताना अनुभवावयास मिळतात. अशा प्रसंगी स्वत:च्या सर्व संवेदना जागृत ठेवून काम करावे लागते. कार्यालयीन कामकाज करताना वेगळी परिस्थिती असते. त्या वेळी कामाची म्हणोन एक पद्धत बसलेली असते. त्याचे नियम असतात. त्याचे पालन केले तरी कामे व्यवस्थित होतात. पण काहीजण तसे करत नाहीत.त्यामुळे कामे होत नाहीत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. असे नाही केले तर सिस्टीममधील दोष वाढत जातात.त्यामुळे कार्यालयीन कामे करताना काही गोष्टी निश्चित केल्या पाहिजेत.
     इथे काम करतील त्याला उत्तेजन व नाही करणार त्यांना शिक्षा हे सूत्र उपयोगाला पडते.आपल्याला कशापद्धतीने काम करायचे आहे आणि काय साध्य करायचे आहे, याचे भान आपल्या हाताखालील लोकांना यायला हवे आहे. त्यांना आपला हेतू स्पष्ट करून सांगितला पाहिजे. सिस्टीम बदलताना त्रास होतो. मात्र अधिकार्यांनी ठरवले तर यात बदल होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण या सेवेत येताना समाज आणि देशसेवा हे निश्चित केले आहे, त्यादृष्टीने किंवा त्या दिशेने वाटचाल चालू राहायला पाहिजे.दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाले पाहिजे, असे फक्त म्हणून चालत नाही तर त्या दिशेने आपण स्वत: कृती करणे महत्त्वाचे असते. आणि तसे केल्यावर तुमच्या सहकार्यांना तुमच्याबरोबर यावेच लागते, नव्हे सहकारी येतातच.
     मनात सकारात्मक आणि चांगली भूमिका ठेवून या क्षेत्रात आल्यास त्याचा आपल्या देशाला आणि समाजाला चांगला उपयोग होणार आहे.प्रशासन अधिकारी हे पद जितके मानाचे आहे,तितकेच ते जोखीमचे आहे. आज या पदावरची माणसे लाच घेताना सापडतात तेव्हा फार वाईट वाटते. असे वाढत राहिले तर लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही. भ्रष्टाचार बोकाळला तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.

चुका झाल्यावर काय करायचं?

     म्हटलं जातं की मनुष्य प्राणी हा चुकांचा पुतळा आहे.त्याच्या हातून चूक होणार नाही तर कुणाच्या हातून होणार? परंतु, चुका झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती जो सुधारतो,तोच जीवनात यश प्राप्त करू शकतो.त्यामुळे चूक झाली म्हणून घाबरू जायचं नाही किंवा हताश व्हायचं नाही.परिस्थितीला सामोरे जाऊन चूक का झाली, याचा अभ्यास करायचा, त्याची कारणमीमांसा शोधायची.असे केल्याने पुन्हा कधी चुका होणार नाहीत.

     चुका काही फक्त आपल्याच हातून होत नाहीत.भल्या भल्या माणसांकडून चुका होत असतात. मात्र त्यातूनच शिकताही येतं.आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,बहुतांश यशस्वी प्रॉफेशनल्सकडून कित्येकदा मोठमोठ्या चुका झाल्या आहेत.मात्र तुमच्यासाठी वाईट गोष्ट ही की ,तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागेल.जर तुमच्या चुकीमुळे तुम्हाला कंपनीतून काढून टाकले तर तुम्हाला नवीन नोकरी शोधावी लागेल. शिवाय संबंधित एम्प्लॉयरला झालेल्या गोष्टी साँगाव्या लागतील. जर तुम्हाला मोठी चूक करूनही कंपनीतून काढून टाकले नाही तरी तुमची गमावलेली विश्वसनीयता मिळवण्यासाठी तुम्हाला मोठ्या जोमाने काम करावे लागणार आहे.
 चिल होऊ नका 
कित्येकदा तुम्ही चुका करता मात्र आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल या भितीने ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगत नाही.पण ज्यावेळेला लोकांना तुमची चूक समजते तेव्हा तुम्ही यात मोठं असं काही घडलं नाही, असा आभिर्भाव आणता आणि तसे वागता. चुकीचे कारण तुम्हाला अगोदरच माहीत होते. यामुळे तुमच्या कलीग्जला वाटते की, तुम्हाला परिणामांची काळजी नाही आणि तुम्ही सच्चा माणूस नाही.तुमचा टीम लिडर निर्णय घेईल की ,तुमच्यात निर्णय क्षमता नाही आणि तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही.तथ्यांना दुर्लक्ष करून तुम्ही चूक सुधारण्याची संधी गमावून बसता.
 पाय जमिनीवर हवेत 
विचार करा की , सगळ्यात वाईट परिस्थिती काय असणार आहे.जर तुम्ही तुमच्या क्लायंटला चुकीचा ई मेल गेला असेल तर त्यामु़ळे कंपनीला मोठे नुकसान होऊ शकते का ? तुमच्या करिअरवर काय परिणाम होणार आहे? तुमच्या  प्रतिष्ठा किंवा नोकरीवर परिणाम होणार आहे का?एकदा का तुम्ही सगळ्यात वाईट परिस्थितीसाठी तयार होता तेव्हा तुम्ही प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम करू शकता.यामुळे तुम्ही कंपनी आणि स्वतःची रिकवरी करण्यासाठी काम करू शकता.
 हायपर ऍक्ट करू नका 
परिस्थितीला नाटकीय स्वरूपात घेऊ नका.सारखे सारखे 'सॉरी' बोलू नका.ओवर ऍक्ट टाळा. आपल्या चूकीला बरोबर समजून वारंवार क्षमा मागू नका.तुमच्यासाठी हे तुम्हाला प्रायश्चित असेल पण त्यामुळे  समोरच्याला त्याचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे.तुम्हाला तुमच्या कंपनीच्या कामावर फोकस करायला हवा आणि आपल्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा.बॉसच्या समोर दाखवा की, तुम्ही दडपण योग्य प्रकारे हाताळू शकता.
 स्वतःला माफ करा 
चूक झाल्यावर काही काळ वाईट वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही स्वतःला या परिस्थितीशी बांधून घेऊ नका.जर तुम्ही टीमसोबत मिळून एखाद्या प्रॉजेक्टवर काम करत असाल तर फ्रेश डेड्लाईनवर फोकस करा.तुम्हाला रोज आत्मग्लानीची आवश्यकता नाही.काही काळ चिंतन केल्यानंतर पुढे जा.स्वतःला चुकीसाठी माफ करा.कामावर लक्ष द्या.तुमचे सकारात्मक योगदान मनात निर्माण होणारे दुःख दूर करेल.
 शिकण्याची संधी 
आपल्या चूकीला शिकण्याची संधी समजा.एकदा का तुम्ही तात्काळ निर्णय घाल, तेव्हा तुम्ही रात्री शांतपणे झोप घेऊ शकाल.सुरवातीच्या चुकीनंतर सुधारणा करा आणि अहॉधून काढा की कोणत्या एटीट्यूड,विचार,संवाद आणि ऍक्शनच्या कारणामुळे चूक झाली आहे.मोठ्या चुका करिअरमध्ये मोठा बदल आणू शकतो.
 चुका करण्यापासून कसे दूर राहाल 
 अधिक मेहनत घ्या 
ज्यावेळेला चुका होतात तेव्हा अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवा.कामाच्या ठिकाणी सकाळी लवकर जा.कंपनीच्या अपेक्षेपेक्षा अधिक आऊटपुट द्या.असे काम करा की , जे इतर दूसरे करू इच्छित नाही.टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिक काम करा.शानदार क्वालिटीच्या कामासाठी प्रयत्न करा.आपली टीम,मॅनेंजर, आणि क्लायंटकडून आऊटपुट आणि डेडलाइनशी संबंधितकेलेली वायदे पूर्ण करा.आपली ओळख अशा माणसाची बनवा की जो समस्या निर्माण झाली तर मोठी मेहनत करतो.

सरकारची विकासाऐवजी विनाशाकडे वाटचाल?

     भारतीय जनता पक्षाचे सरकार धार्मिक, सामाजिक व आर्थिक पातळीवर देशाचा विकास करण्याऐवजी विनाशाकडे नेत असल्याचे चित्र समोर येत आहे.त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने विभाजनवादी राजकारण सुरु केले आहे. या राजकारणाचा सर्वांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सर्वधर्म समभाव व सर्व समावेशक विचार करून देशाचा विकास केला. अर्थात काँग्रेसच्या काळात प्रमाणापेक्षा अधिक भ्रष्टाचार बोकाळला.त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा मिळाली आहे. यातून देशात भाजपचा उदय झाला. लोकांनी फार मोठ्या आशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्ता दिली. मात्र गेल्या तीन वर्षात विकासाचे चित्र दिसले नाही.उलट अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागला. अजूनही करावा लागतो आहे. 

     आधार कार्ड,मनरेगा किंवा गरिबांच्या उद्धारासाठी आखलेल्या विविध योजना भाजप तथा मोदी सरकार काँग्रेसच्याच धोरणांची अंमलबजावणी करत आहे. फक्त काही योजनांची नावे बदलण्यात आली आहेत. सध्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार विकासा ऐवजी विनाशाकडे वाटचाल करीत आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. मात्र अद्यापही जनतेला अच्छे दिनची प्रतिक्षाच आहे. या शासनाने भ्रष्टाचार व काळा पैसा यासाठी नोटबंदी करीत असल्याचे सांगितले. मात्र नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. हा निर्णय पूर्णपणे फसला तरी मोदी ते मान्य करायला तयार नाहीत. जीएसटी सुध्दा चुकीच्या पध्दतीने आणला.त्यामुळे व्यापार्‍यांना व लोकांना त्याचा त्रास होत आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र अद्यापही रोजगारांचा प्रश्‍न कायम आहे. दहा लाख नोकर्‍यादेखील भाजप सरकार देऊ शकले नाही.
     या शासनाने नोटबंदी, जीएसटीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे.याचा परिणाम म्हणून की काय आज सोशल मिडियावर मोदी आणि सरकारचे समर्थन करणारी मंडळी गायब झाल्याचे दिसत आहेत.आता उलट सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यापेक्षा त्याची शंभर रुपयांकडे वाटचाल महागाईच्या आगीत तेल ओतण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या दोन रुपयाने दर उतरवण्यात आले तरी आतापर्यंत आठरा ते वीस रुपयांपर्यंत दर वाढवण्यात आला आहे, त्याचे काय?काँग्रेस सरकारच्या भ्रष्ट आणि दुबळ्या नीतीला कंटाळलेल्या लोकांनी त्यांना नाकारत मोदींच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या.विशेष म्हणजे ना भुतो ना भविष्यते, असे बहुमत दिले. मोदींच्या लाटेत आयुष्यात कधीच निवडून येऊ शकणारे खासदार, आमदार निवडून आले. असे असले तरी कुणीही याचा लाभ उठवताना लोकांनी ज्या अपेक्षेने निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले.
     राज्यातल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीलादेखील इतका विलंब लावला जात आहे आणि त्रासदायक चाळणी लावली आहे,त्यामुळे एकप्रकारची सरकार विरोधात नाराजीच दिसून येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन माहिती भरण्याचा होत असलेला त्रास, राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या थेट मंत्रालय पातळीवरून होत असलेल्या बदल्या आणि त्याचे भिजत घोंगडे यामुळे शिक्षकांना होत असलेला मानसिक त्रास त्यातच ऑनलाइन माहिती भरण्याचा भार यामुळे शिक्षक पुरता  वैतागला आहे. अंगणवाडी सेविका ,मदतनीस आणि तलाठी यांची सध्या विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जात आहेत. राज्य कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे.केंद्राचे कर्मचारी त्याचा लाभ घेत आहेत.शिवाय रिक्त जागांचा मोठा प्रश्‍न विविध विभागात सतावतो आहे. यामुळे आहे त्या कर्मचार्‍यांवर कामांचा भार वाढला आहे.त्यामुळे साहजिकच कामे वेळेत होईनाशी झाली आहेत.यातून लोकांची नाराजी सरकार ओढवून घेत आहे.
     केंद्र आणि राज्य सरकारला लोकांमध्ये चाललेला नकारात्मक संदेश नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. सरकारने देशातल्या जनतेचा कानोसा घेण्याची आवश्यकता असून त्यानुसार आपली दिशा त्यांना बदलावी लागेल.आपल्या देशात रोजगार महत्त्वाचा आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची आश्‍वासन दिले आहे.ते पहिल्यांदा पाळण्याची आवश्यकता आहे. महागाई कमी व्हायला हवी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर मनमोहनसिंह सरकार असण्याच्या काळातल्यापेक्षा निम्म्याने खाली आहेत,तरीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढत आहेत. हा सरळसाधा हिशोब न समजायला जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे का आपल्याला निवडणूक काळात फंड देणार्‍या उद्योजकांच्या घरी पाणी भरायचे,हे एकदा ठरवायला हवे.

Sunday, October 1, 2017

(बालकथा) चोकलेटसच्या बदल्यात

     शाळेच्या डाव्या बाजूला एक दुकान होतं,खंडू कॉर्नर. खंडू या दुकानात बसलेला असायचा.मुलांच्या गरजेच्या वस्तू याच दुकानात मिळायच्या.
एक दिवस हिनाने एक रबर मागितला.तो खंडूने दिला,पण त्याच्याबरोबर एक चॉकलेट दिले.हिना चकीत झाली,"हे चॉकलेट!"
खंडू हसत म्हणाला,"सुट्टा एक रुपया नाही."
हिना म्हणाली,"पण मला चॉकलेट नकोय."
खंडू तोंड बारीक करत म्हणाला," मग चार रुपये सुट्टे दे." हिनाने रबर आणि चॉकलेट घेतले आणि शाळेच्या दिशेने पळाली.
एक दिवस पुन्हा असेच घडले.हिनाने दहा रुपये दिले.खंडूने एक पेन्सील,एक शार्पनर आणि दोन चॉकलेट दिले.हिना म्हणाली,"खंडूकाका,मला चॉकलेट नकोयत."
खंडू म्हणाला,"दोन रुपये सुट्टे नाहीत."
हिना वस्तू परत करत म्हणाली,"तुम्ही नेहमी उरलेल्या पैशांच्या बदल्यात चॉकलेट देता." हिना वस्तू न घेताच शाळेला निघून गेली.
एके दिवशी मधली सुट्टी झाली होती. सगळे आपापला डबा उघडत होते,तोच रूपा रागारागात आत आली आणि म्हणाली,"  दोन रुपयांची रिफिल पाहिजे होती,पण त्यासाठी मला पाच रुपये मोजावे लागले.हे बघा,तीन रुपयांची चॉकलेटस! खंडू उरलेले पैसे देत नाहीत.बदल्यात चॉकलेटस  देतात."
बोलता बोलता इतरही काही मुलींनी  आपल्याबाबतीतही असेच घडल्याचे सांगितले. बोलता बोलता हिनानेदेखील मागे तिच्यासोबत घडलेला किस्साही सांगितला. मग हिनाने सगळ्यांना जवळ बोलावले.त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या.सगळे मोठमोठ्याने हसू लागले.सगळ्यांनी डबा खाल्ला आणि खेळायला निघून गेल्या.
काही दिवस उलटले.मग एक दिवस नुपूर,अन्सर,रणजीत,अनिकेत,उषा,नम्रता,अनिता आणि कविता खंडूच्या दुकानात येऊन थडकल्या.हिनाच्या हातात एक डबा होता.तो चोकलेट्सने भरलेला होता.हिनाने सगळे चोकलेट्स काऊंटरवर ठेवून दिले.खंडू चकित होऊन म्हणाला,"काय हे?"
हिना म्हणाली,"चोकलेट्स आहेत."
अनिकेत म्हणाला,"खंडूकाका,मोजून घ्या.बरोबर 120 आहेत.यांच्या बदल्यात 120 रुपये द्या."
अन्सर म्हणाला,"खंडूकाका, ही  चॉकलेटस तुम्हीच दिलीत आम्हाला.फक्त आम्ही गोळा केले.आता तुम्हाला परत द्यायला आलोय."
रणजीत म्हणाला,"आम्ही अगदी बरोबर सांगू शकतो की आम्ही कधी कधी आणि काय काय विकत घेतले ते! आम्ही हेही सांगू शकतो की, तुम्ही उरलेल्या पैशाँतून कधी कधी किती चॉकलेटस दिलीत."
उषा वही दाखवत म्हणाली,"हे बघा,आम्ही यात एकेका चोकलेट्सचा हिशोब लिहिला आहे."
मुलांचे बोलणे ऐकून खंडू चांगलाच बिथरला. पण उसने अवसान आणून म्हणाला,"निघा इथून!एकदा विकलेला माल परत घेतला जात  नाही. माहीत आहे ना ?"
मुलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.मुख्याध्यापिका  समोरून येत होत्या.आपल्या शाळेतल्या मुलांना पाहून त्या दुकानाकडे आल्या.हिनाने सारा प्रकार बाईंना सांगितला.तेवढ्यात खंडू मुख्याध्यापक बाईंना म्हणाला,"असं कुठं असतं का? मी ही विकलेली चोकलेटस परत घेऊ शकत नाही."
हिना म्हणाली,"खंडूकाका, आम्ही तुम्हाला कधी चोकलेटस मागितलीच नाहीत.तुम्हीच आम्हाला दिलीत.तेही आमच्या उरलेल्या पैशांच्या बदल्यात!"
मुख्याध्यापिका हसल्या आणि हिनाला म्हणाल्या," चला काही हरकत नाही.मी तुम्हाला 120 रुपये देते. तुम्ही ही चोकलेटस वर्गातल्या मुलांना वाटून टाका. पण एक लक्षात ठेवा,यापुढे तुम्ही अशा दूकानातूनच वस्तू खरेदी करा,जिथे उरलेले सुट्टे पैसे देतात.मी सगळ्याच वर्गशिक्षकांना अशा सूचना द्यायला सांगेन.आता तुम्ही इथून निघा."
हे ऐकून खंडू म्हणाला,"नका मॅडम असं करू.मी सगळे चोकलेटस परत घेतो. पण मीदेखील सुट्टे एक-दोन रुपये कोठून आणू?मलासुद्धा सुट्टे पैसे लागणारच.माझाही विचार करा."
मुख्याध्यापिका बाई विचार करत म्हणाल्या," दर महिन्याला 15 तारखेला आम्ही फी जमा करून घेत असतो.त्यात  सुट्टे पैसे अधिक असतात.ते आम्ही तुला देत जाऊ.  समस्या जिथे असते,तिथे उपायही असतो. पण लक्षात ठेव, मुलेदेखील खरं-खोटं यातला फरक जाणतात."
हे ऐकून खंडूने मान खाली घातली.120 रुपये घेऊन मुले शाळेत परतली.उषाच्या वहीत पैशांचा सगळा हिशोब होता.त्यामूळे पैसे वाटण्यात अडचणी आल्या नाहीत.


दिशाहीन समाजाला वठणीवर आणणार कोण?

     सध्या अनेकांना या देशाचे कसे होणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा होत आहे. सांगायचे कुणाला, असा सवाल त्यांच्यापुढे असून सगळेच माळेचे मणी आहेत, असा प्रत्ययही त्यांना येत आहे. घराबाहेर पडल्यापासून त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे,ज्यामुळे त्यांना देशाची चिंता वाटते आहे. रस्त्यावरून चालण्यापासून ते कार्यालयातल्या कामापर्यंत सगळीकडे त्यांना वाढत चाललेला बेजबाबदारपणा, हरवत चाललेली नीतीमत्ता, मूल्यशिक्षणाचा अभाव आणि सामाजिक जाणिवांचा विसर यामुळे आदर्शहीन बनलेल्या समाजाला आदर्शाचा पाठ कसा शिकवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. देशात सुजाण नागरिकांची संख्या दुर्मिळ होत चालली असल्याचा त्यांचा दावा असून या धक्कादायक परिस्थितीमुळे ती मंडळी अगदी कासाविस झाली आहेत.
     अशा दिशाहीन आणि आदर्शहीन समाजाला कोण चांगुलपणाची वाट दाखवणार, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. रस्त्यावरून चालताना किंवा गाडीवरून जाताना अचानक मोठमोठा हॉर्न करत तरुण पोरं मागून झपकन पुढे जातात, तेव्हा यांच्या काळजात धस्स होतं. हॉर्नच्या आवाजाने कान बधीर होतात.चक्कर येऊन खाली कोसळतोय की काय, असेच वाटून जाते. खरे तर आजच्या पिढीने दुसर्यांची काळजी करायला हवी. यासाठी स्वत: ला एक शिस्त लावायला हवी, असं त्यांना वाटतं. व्यक्तिगत व सामाजिक आरोग्य, वाहतुकीचे नियम, सावर्जनिक ठिकाणची स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन अशा किती तरी गोष्टींची काळजी घ्यायला हवी. असे करणाराच एक सजग आणि सुजाण नागरिक समजला जातो. समाज माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण समाजासाठी काय केले पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष देणारा नागरिक घडायला हवा आहे. कायद्याने घालून दिलेल्या बंधनाचे पालन प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने करायला हवे, असे त्यांना वाटते. आदर्शाच्या कल्पना काळ, परिस्थिती, देशानुरुप बदलतात. प्रत्येकाने कायद्याचे पालन करताना सार्वजनिक जीवन जगताना जे स्वत:ला हक्क आहेत ते इतरांना देखील आहेत,याची जाणीव ठेवून इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही,याची काळजी घेणारा नागरिक घडणार का, असा सवालही त्यांचा आहे.
     आपल्या लोकांना देशसेवा,भक्ती म्हणजे काय असते,याचीही जाणीव करून द्यायला हवी आहे. केवळ सीमेवर जाऊन शत्रूशी युद्ध करणे, अतिरेक्यांशी लढणे यालाच देशभक्ती म्हणत नाहीत, हे कुणीतरी सांगायला हवे आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे, देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे, वडिलधार्यांचा आदर करणे आणि स्वत:शी आणि देशाशी प्रामाणिक राहणे, ही मूल्ये जोपासली गेली तरच खर्या अर्थाने राष्ट्रभक्ती ठरणार आहे. आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्यांच्या वापर करायला शिकले पाहिजे. बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्या आहेत. त्यांचा वापर योग्यवेळी करणे अपेक्षित आहे. परंतु ही नैतिक मूल्ये सद्याच्या परिस्थितीत पाळली जात नाहीत.
     आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगल्यासाठी वापर झाला पाहिजे. म्हणजे हा वापर थेट देशासाठीच होतो, हे ध्यानात घेतले पाहिजे.भ्रष्टाचार, कामात चालढकलपणा या गोष्टी स्वत:च्या र्हासाला कारणीभूत आहेत. असेच चित्र राहिले तर भावी पिढीसाठी हे फारच वाईट, चिंताजनक असणार आहे. समाज अधोगतीला चालला आहे. तो सुधारण्याची आवश्यकता आहे, यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. चुकणार्याला सामुहिकरित्या समजावून सांगितले पाहिजे. कारण आजच्या काळात कुणाला चांगले सांगितलेले रुचत नाही. सांगणार्याचीच अवस्था वाईट होते. का सांगायला गेलो, असे काहींना झाल्याचे सांगितले जाते.
      आपले गाव, परिसर, राष्ट्र सुसंस्कृत, शीलसंपन्न वगैरे व्हावे, असा वाटणार्यांची संख्या वाढायला हवी. विवेकाने, संयमाने , दैर्याने प्रश्नांना सामोरे जाणारा नागरिक बनायला हवा आहे. तरच समजदार नागरिक तयार होतील. असे शिक्षण घराघरांतून द्यायला हवे आहे. मानवी मनावर बालपणापासून संस्कार व्हायला हवेत. याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी, असे म्हणूनच त्यांना वाटते. लहानपणी आपले पालकच आपले आदर्श असतात. ते जसे वागतील तसे मुलांवर संस्कार होतात. रस्ता ओलंडताना, सार्वजनिक स्थळी वागताना घरातील वरिष्ठ जसे वागतात, तशीच सवय मुलांना लागते. यामुले घरातूनच योग्य संस्कार ,वर्तन, सवयी लावण्यासाठी पालकांनी काळजी घ्यायला हवी, असे काहीजणांना वाटते. अर्थात हे काहीजणही फारच थोडे म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.त्यामुळेच साहजिक बहुमताचे पारडे ज्याच्याकडे त्यांचेच समाज अनुकरण करणार ना?

रावणाची प्रवृत्ती ठेचा

      दसरा. अर्थात विजयादशमी. आपल्या भारतीय संस्कृतीचा या  सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शुभ मुहुर्तांपैकी हा एक दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी नवनवीन उपक्रमांचा आरंभ करण्याकडे आपल्या लोकांचा कल असतो. पूर्वीच्या काळात शौर्य आणि महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडविण्यासाठी याच दिवशी पराक्रमी पुरुष सीमोल्लंघनास सज्ज होत असत. प्रगती आणि विज्ञानाभिमुख आधुनिक समाजव्यवस्थेत मात्र देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय पराक्रमी तरुण पृथ्वीच्या पाठीवर निर्भयपणे संचार करून बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर स्वतःबरोबर स्वतःच्या देशाच्या आधुनिक प्रगतीस मौलिक हातभार लावीत आहेत. प्रत्येकाचा अभिमान वाढविणारा पराक्रम गाजविणार्‍या भारतीय युवक-युवतींचे युरोप-अमेरिकेसारख्या प्रचंड वैज्ञानिक प्रगती व खर्‍याखुर्‍या लोकशाहीवादी समाजव्यवस्थेकडे यशस्वीरीत्या वाटचाल करणार्‍या देशातील कर्तृत्व पाहून तेथील राज्यकर्ते, समाजधुरिण आणि वैज्ञानिक देखील अक्षरशः चकित होत आहेत. युवाशक्तीचे हे सीमोल्लंघन केवळ आदर्शच नव्हे तर आधुनिक भारतामधील नव्या पिढीपुढील स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे. 

     एकिकडे अशी सकारात्मक,उत्साह देणारी गोष्ट असताना आपल्या देशात दुसर्‍या बाजूला अन्याय- अत्याचार,धार्मिक तेढ वाढत चालले आहेत, ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. धार्मिक अस्मितेच्या भूमिकेतून एकमेकांचे गळे घोटण्याचे आणि अमानुष कृत्यांद्वारे हिंसाचार, रक्तपात आदी प्रकार पुनः पुन्हा घडू लागल्याचे पाहून गेल्या पाच हजार वर्षांपासून जगाच्या पाठीवर भक्कमपणे उभ्या असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा खरा आधार ‘सहिष्णुता’ अथवा सर्वधर्मसमभाव आणि आचार-विचार स्वतंत्र्य ही आपली मूल्ये आहेत, याचा विसर पडत चालला आहे की, अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे. भारतीय संस्कृतीची आदर्श मूल्ये अलीकडच्या काळात पायदळी तुडविली जात आहेत. कायद्याच्या राज्याची पर्वा न करता मस्तवालपणे आक्रमक झुंडशाहीच्या मार्गाने धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सलोख्याच्या, सामंजस्याच्या सुसंस्कृत आणि सभ्य, प्रगल्भ वैचारिकतेवर हल्ले सुरू आहेत. प्रसंगी स्वतःच्या राजकीय उद्दिष्टांच्या आड येणार्‍या अडथळ्यांचा ‘कोणत्याही’ मार्गाने निः पात करण्याच्या आडदांड घोषणाही देशाच्या विविध भागातून एव्हाना बिनधास्तपणे केल्या जात आहेत. आणि तशी कृती प्रत्यक्षातही आणली जात आहे. विरोधात लिहिणार्‍या-बोलणार्‍या पत्रकारांना घरी पाठवले जात आहेत.वृत्तपत्रांवर यान त्या कारणाने बंधने आणली जात आहेत. त्यांच्या जाहीराती बंद केल्या जात आहेत.
 देशात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले आयुष्य वेचलेल्या  नरेंद्र दाभोळकर, निर्भिड लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी, पानसरे आणि परवाच कर्नाटकातल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या बेधडक विचार मांडणार्‍यांच्या दिवसा-ढवळ्या हत्या केल्या जात आहेत. माणसे मारली जात असली तरी विचार मरत नाही. मात्र अशा प्रकारे माणसे संपवून दहशत निर्माण केली जात आहे. ही बाब मोठी चिंताजनक आहे. 
      आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिलांवरील वाढते अत्याचार तर फारच वाढले आहेत. त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा सर्व अभद्र वातावरणात संपूर्ण देशाची सुरक्षितता आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण यासारखी मूलभूत जबाबदारी सांभाळणार्‍या राज्यकर्त्या पक्षांचे कर्तव्य मुख्यतः सेवाव्रती असण्याऐवजी सत्ताव्रती बनल्याचे अनुभवास यावे, हे भारतीय लोकशाहीचे खरोखर दुर्दैव आहे. 
एखादा उपद्रवी पक्ष केवळ राजकीय सत्तेसाठी आवश्यक ठरणारे बहुमत कायम टिकविण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, या धोरणी भूमिकेतून त्या पक्षाकडून होणारी लोकशाही आणि कायद्याच्या राज्याची बेमुर्वतखोरपणे होणारी पायमल्ली दुर्लक्षित करण्याचे प्रकारही देशाच्या काही राज्यात उद्भवत आहेत; परंतु देशाची सार्वभौम व सर्वोच्च सत्ता ताब्यात असूनही केंद्र सरकारचे ज्येष्ठ जबाबदार नेतेच अशा वाढत्या झुंडसाहीची गांभीर्याने आणि कठोरपणे दखल न घेता ‘राजा हरिश्‍चंद्रा’प्रमाणे जबाबदारी ढकलण्याची भूमिका घेत आहेत. आता तर याच दूषित सार्वजनिक वातावरणात काही राज्यांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमधील लोकशाहीला पूरक आणि उदारमतवादी विचाराशी निगडित थोर व्यक्तींचे धडे योजनाबद्धरीतीने वगळून टाकण्याचा प्रयत्न जो हाती घेण्यात आला आहे. तो तर वाढत्या ‘असहिष्णुते’च्या धोकादायक वर्तनाचा ढळढळीत पुरावा ठरला आहे. म्हणूनच दसर्‍याचा सण साजरा करताना ‘सहिष्णु’ वातावरण निर्माण करण्यासाठी देशाला वेढा घालू पाहत असलेल्या विषारी असलेल्या ‘असहिष्णु रावण वृत्ती’ची राखरांगोळी निर्माण करण्यासाठी आजच्या मुहूर्तावर सर्वांनीच मानसिक तयारी करणे अपेक्षित आहे.