Sunday, April 8, 2018

राज्यातली बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रशासनाच्या जागा भरायला हव्यात


     सरकारने गेल्या काही वर्षांपासून नोकरभरतील ब्रेक लावला आहे. साहजिकच त्याचा थेट परिणाम सामाजिक स्वास्थ्यवर होऊ लागला आहे. राज्यात बेरोजगारांची संख्या काही लाखात आहे. या युवकांना काम नसल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडले आहे. नोकर्या नसल्याने छोकर्या नाहीत. यातले अनेक बेरोजगार काम नसल्याने पोटासाठी अवैध कामाला लागले आहेत. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून हाणामार्या, खून, चोर्या-दरोडे यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरोगामी राज्यासाठी हे भूषणावह नाही. एकदा का समाजस्वास्थ्य बिघडले तर त्याला आवर घालणे अवघड जाणार आहे.

      राज्यातल्या विविध प्रशासन विभागात तब्बल एक लाख 70 हजार जागा रिक्त आहेत. परवा सरकारने राज्यातल्या 70 हजार जागा भरण्याची घोषणा केली आहे. पण राज्यातल्या रिक्त पदांचा आकडा पाहिल्यास या जागा भरूनही अद्याप लाखभर जागा रिक्तच राहतात. याही जागा भरल्यास बर्यापैकी बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी जम्बो भरतीचा पेटारा उघडण्याची गरज आहे. सामाजिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवायचे असेल तर सरकारने भरतीचा कार्यक्रम राबवायलाच हवा आहे.
     राज्य सरकारच्या 35 प्रशासकीय विभागात अ, , , आणि ड या गटनिहाय सरळसेवा आणि पदोन्नतीची तब्बल 1 लाख 77 हजार 259 पदे रिक्त असल्याची आकडेवारी अलिकडेच प्रसिद्ध झाली होती. सरकारने नोकरभरतीला ब्रेक देऊन ज्या ठिकाणी अधिक आवश्यकता आहे,त्याठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीच्या वाटेवर असलेला कर्मचारी जर 50 हजार पगार घेत असेल तर तेवढ्या पगारात पाच कर्मचारी राबतात असा दृष्टीकोन ठेवून कंत्राटी भरतीला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे सरकारचा पैसा तर वाचलाच शिवाय काम करायला कर्मचार्यांची संख्याही अधिक मिळाली. असे असले तरी रिक्त जागांचा कोठा अजूनही मोठा आहे. माहितीच्या अधिकारात पावणेदोन लाख जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही बाब मोठी चिंताजनकच म्हटली पाहिजे. शिवाय या रिक्त जागाम्मध्ये महापालिका, महामंडळे, विद्यापीठे, स्वायत्त संस्थांमधील आकडेवारीचा समावेश नाही, ही गोष्टदेखील लक्षात घेतली पाहिजे.
     रिक्त जागा भरल्या नसल्याने एकिकडे बेरोजगारीला खतपाणी घातले जात आहेच, शिवाय आता सध्याला प्रशासनात काम करीत असलेल्या कर्मचार्यांवर अतिरिक्त कामांचा ताण अधिक पडत आहे. त्यामुळे या कर्मचार्यांचे आरोग्यही बिघडत चालले आहे.ही नवी चिंता उदयास आली आहे. एका कर्मचार्याकडे दोन-तीन टेबलचा अधिभार, दोन-तीन गावांचा भार यामुळे लोकांची कामे तर वेळेवर होत नाहीतच शिवाय यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहनही मिळत आहे. पैसे देईल त्याच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे आणि काम का झाले नाही, अशी विचारणा करणार्यांना आपल्याकडे अनेक कामांचा चार्ज आहे. सगळी कामे कसे करू, असा उलट सवाल करत येणार्या लोकांची बोळवण केली जात आहे. यामुळे प्रशासनाविषयी लोकांचे मतही बिघडत चालले आहे.
     यामुळे वाद-विवाद,प्रसंगी कर्मचार्यांना मारहाण असे प्रकार घडत आहेत. हे चित्र राज्यासाठी धोकादायक आहे. राज्य सरकारने नोकरभरतीला प्राधान्य दिल्यास आणि बेरोजगारी कमी करण्यास मदत केल्यास समाज स्वास्थ्य बिघडण्याला आळा घालण्यास मदत होणार आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत राज्याच्या गृह विभागात 23 हजार 898 जागा रिक्त आहेत. याशिवाय सार्वजनिक आरोग्य 18 हजार 261, जलसंपदा विभागात 14 हजार 616, कृषीमध्ये 11 हजार 907, उच्च व तंत्रशिक्षण विभागात 3 हजार 236,महसूल 6 हजार 391, वन 3 हजार 548, वैद्यकीय शिक्षण 6478, वित्त 6 हजार 377, आदिवासी विकास 6 हजार 584, शालेय शिक्षण 3 हजार 280, सार्वजनिक बांधकाम 4 हजार 382 जागा रिक्त आहेत.
     सहकार आणि पणन विभागात 2 हजार 551, सामाजिक न्याय 2 हजार 447, उद्योग 1 हजार 700, कामगार विभाग 1 हजार 114, अन्न पुरवठा विभागात 2 हजार 646, कौशल्य विकास 4 हजार 688, सामान्य प्रशासन 2 हजार आणि जिल्हा परिषदांमध्ये 46 हजार 351 जागा रिक्त आहेत. याशिवाय महिला बालविकास,पाणीपुरवठा,नगरविकास,नियोजन,ग्रामविकास,पर्यटन, गृहनिर्माण अशा विभागातही मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार जागा भरण्याची घोषणा केली आहे. एवढ्या जागा भरूनही अजून एक लाख रिक्त जागा राहणार आहेत. या जागा भरण्यासाठीही प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. यातल्या काही जागा लॅप्स करण्याचे धोरणही शासनाने आखले असल्याने रिक्त जागांचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे. शासनदेखील रिक्त जागांची संख्या कमी आहे, हे यामुळे सांगू शकणार आहे. आता वर्षभरात लोकसभेच्या आणि आणखी काही महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला असला तरी ते राज्य सरकारला पूर्ण करावे लागणार आहे. सरकार लोकांचा अंत बघू शकत नाही.

Saturday, April 7, 2018

आईच्या पेन्शनसाठी त्याने आईच्या शरीराची खांडोळी केली आणि तुकडे फ्रिजमध्ये ठेवले


     पैसा किती वाईट,क्रूर काम करायला सांगतो, याच्या कहाण्या आपण वाचतच असतो. पैशांच्या आहारी गेलेला माणूस कोणत्या स्तराला जाईल, सांगता येत नाही. पैसा इथे माणुसकी पाहात नाही, नाते पाहत नाही. पश्चिम बंगालमधल्या एका युवकाने आपल्या आईची पेन्शन मिळत राहावी, यासाठी आपल्या आईचा मृतदेह तब्बल तीन वर्षे फ्रिजरमध्ये ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा क्रूरपणाचा आणि संवेदनहिनतेचा कळसच म्हटला पाहिजे. पैशासाठी माणूस माणसाच्या जीवावर उठला आहे,याची कल्पना आपल्याला आहे,पण मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयंकर प्रकार म्हणतात, त्याहीपेक्षा हा प्रकार भयंकर आहे. आईला फ्रिजरमध्ये ठेवून तिची पेन्शन मजेत खात राहिला. तिची पेन्शन विनाअडथळा मिळत राहावी,यासाठीच त्याने हा निंदनीय,क्रूर प्रकार करण्यास धजावला.
   
 पश्चिम बंगालमधल्या बेहाला प्रदेशातल्या या घटनेने लोकांना पुरते चक्रावून सोडले आहे. सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ लोकांना नियमानुसार  आपण हयात असल्याचा पुरावा संबंधित कार्यालयाला दरवर्षी सादर करावा लागतो. त्याच्या आधारावर पुढचे एक वर्ष पेन्शन दिली जाते. या आधारावरच बीना मजूमदार यांची पेन्शन त्यांना मिळत होती. त्यांचा मृत्यू 2015 ला झाला. त्यावेळी त्यांचे वय होते 84. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पीटलने त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही दिले होते. ते तिथल्या स्थानिक पोलिसांनीदेखील घरातून शोधून काढून ताब्यात घेतले आहे. सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसतो तो म्हणजे 46 वर्षांच्या सुब्रत मजूमदारने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते  आणि त्याचे 89 वर्षांचे वडिल गोपाल मजूमदारदेखील त्याच घरात त्याच्यासोबत राहत होते.
     पोलिसांना अज्ञाताकडून जर याची माहिती मिळाली नसती तर तिच्या मुलाचा हा अमानवीय क्रूर खेळ असाच काही वर्षे चालू राहिला असता. पोलिसांच्या प्रारंभीच्या चौकशीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून तो आपल्या आईची पेन्शन बँकेतून काढत होता. आणि दरवर्षी तिचा अंगठा अथोरिटी फॉर्मवर उमटवून कार्यालयाला सादर करत होता. पोलिसांच्या चैकशीत त्याचे वडील काही सांगू शकत नसले तरी ते आपल्या मुलाची बाजू घेताना दिसतात. ते सांगतात की, कदाचित त्याची आई जिवंत होईल,म्हणून तो तिच्या आईचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला असावा, असा युक्तिवाद करतात. जर असेल तर मग त्याने त्याच्या आईच्या शरीराचे तुकडे तुकडे का केला, असे विचारल्यावर मात्र त्यांना उत्तर देता येत नाही.
     बीना मजूमदार यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असला आणि पुढील तपास सुरू असला तरी या घटनेने मानवी संवेदनांना जोरजोराने हलवून सोडले आहे. काही वेळेला विश्वासच बसत नाही, की एकादा मुलगा पैशासाठी आपल्या मृत आईच्या पार्थिव शरीराशी असा क्रूर वागू शकतो. परदेशात अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, असे आपण मान्य करू शकतो,पण भारतात अशा घटनाअ अशक्य असल्याचे वाटत राहते. भारतीय संस्कृतीत आपल्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावेत, हे मुलाचे कर्तव्य मानले जाते. आपल्या घराण्याचा वंश वाढावा म्हणून घरात दीपक यावा,म्हणून अनेक वैद्यकीय इलाज आणि उपासतापास, व्रतवैकल्ये केले जातात.  मुलगा हवा म्हणून उदरी जन्माला येणार्या मुलीला बाहेरचे जग पाहण्याअगोदरच मारून टाकले जाते. अशा या कलियुगात मुलगाच पैशासाठी आईचा मृतदेह, त्याचे तुकडे करून घरातच ठेवतो. यावरून मुलासाठीचा आपल्या देशात चाललेला हट्टाहास किती चुकीचा आहे, अशा घटनांवरून स्पष्ट होतो.
     आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या मृतदेहावर धार्मिकपद्धतीने  अंत्यसंस्कार व्हावेत,यासाठी नियम घालून देण्यात आली आहेत. मुलांची कर्तव्ये सांगितली आहेत. मात्र अशा घटनांमुळे समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. आपल्यावरील संस्कार, मूल्ये, नैतिकता आणि वडिलधार्यांशी कसे वागावे, याची कर्तव्ये पार गुंडाळून टाकण्यात आल्याचे दिसते. या वेगाने बदलणार्या समाजाची संवेदना पार करपून गेली आहे. सध्या रोबोटप्रमाणे संवेदनहिन जीवन जगणे चालू आहे. ज्येष्ठ लोकांविषयीची उपेक्षा आणि त्याम्ची क्रूरता अशा घटना अलिकडच्या काळात वाढत चालल्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात,त्याला घरची संपत्ती हे एकच कारण असू शकते. आपल्याकडे आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणारी मुले काही कमी नाहीत. त्यांना एकट्याला इथे टाकून आपण तिकडे दूर सातासमुद्रापार जाऊन तिथलाच होऊन जाणार्या मुलांची संख्यादेखील कमी नाही. आपण मागेच म्हणजे काही महिन्यापूर्वीच एक बातमी वाचली आहे. तीन महिन्यांपासून मुलाचा आपल्या आईशी संपर्क होऊ शकत नव्हता. ज्यावेळेला तो परदेशातून परतला तेव्हा त्याला त्याची आई मृतावस्थेत सोफ्यावर आढळून आली. किती दिवस झाले, आई अशा अवस्थेत पडली होती, याची त्याला माहितीदेखील नव्हती.या घटनेमुळे आपल्याला ज्येष्ठ माणसांविषयीची संवेदना किती बोथट झाली आहे, याची कल्पना येते. सामाजिक संस्कार आणि मूल्ये यांच्यापासून फारकत घेत चाललो आहोत. ही गोष्ट मोठी चिंताजनक आहे, असे म्हटण्यास जागा आहे.

Thursday, April 5, 2018

सुट्टीचा सदुपयोग करा,नवं काही शिका


     एप्रिल, मे महिना म्हणजे आपल्याकडे शाळांना सुट्टीचा काळ असतो. दहावी-बारावीच्या परीक्षा झालेल्या असतात. साधारण एप्रिलच्या मध्यावर सुट्ट्या लागतात. परीक्षेला कंटाळलेली मुले सुट्टीची अगदी अतुरतेने  प्रतीक्षा करीत असतात. काहींचे प्लॅन ठरलेले असतात. कुणाला गावाला जायचं असतं, कुणाला फिरायला जायचं असतं. तर कुणाला काही नवं शिकायचं असतं. काहींना नवं काही वाचायचं असतं. एकूण काय तर सुट्टी एंजॉय करायची असते. कुणाला ती सत्कारणी लावायची असते. सुट्टीचा कालावधी आहे, मौजमजा करायला हरकत नाही. पण संपूर्ण सुट्टी अशीच वाया घालवून चालायचं नाही. आपल्याला सुट्टी असली तरी आपण विद्यार्थी आहोत. निरंतर शिकायचं असतं. आपल्याला आवडतं, भावतं, ते शिकायला घ्यायचं! शिकलेलं काही वाया जात नाहीपण काहींना शिकणं म्हणजे पाठ्यपुस्तक वाचणे, अभ्यास करणे असे वाटत राहते. त्यामुळेच आजकालच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा कल पाहिला तर तो केवळ शैक्षणिक कालावधीपुरताच दिसून येतो. एकदा का परीक्षा आटोपल्या की मग ही सुट्टी केवळ अन् केवळ या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आणि कंप्युटरवरचे गेम खेळण्यात व्यतित झालेली दिसून येते.काहींच्या हातात बॅट-बॉल येतो. काहीजण कॅरम खेळतात. त्यातल्या त्यात बैठे खेळांना पहिली पसंदी दिली जाते. अर्थात काही शिकण्यासारखं आहे. नवे खेळ, नवे उद्योग शिकायलाच हवेत. जुने खेळ, क्रीडा प्रकार आता दिसेनासे झाले आहेत. खरे तर मोठ्या लोकांनी अशा खेळ प्रकारांना पाठबळ द्यायला हवं. क्रिएटीव्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

      मुलांबरोबर पालकांनीदेखील सुट्टीचे नियोजन करायला हवे. आपल्या पाल्याला मदत करावी. अगोदरच पालक मुलांना तुला अमूक करायचे आहे, तमूक करायचे आहे, असे सांगून आपल्या पाल्यांना दडपणाखाली आणलेले असते. अगोदरच पालकांनी बजावून सांगितलेले असते परीक्षा झाल्याखेरीज मोबाईलला हात लावायचा नाही. त्यामुळे कधी एकदा परीक्षा संपतात आणि कधी एकदा मोबाईलवर गेम खेळतो असे होऊन बसलेले असते. हा मोबाईल केवळ काही मिनिटे पालकांच्या हातात नसतो तर तासन् तास ही मुले पालकांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन बसतात. यामुळे संपूर्ण वेळ, दिवस त्यातच सरून जातो. याचा परिणाम या मुलांच्या डोळयांवर तर होतोच पण त्यांचा मेंदू ही यातच गुरफटून गेल्याने या मुलांचे लक्ष कुणाच्या बोलण्याकडे जात नाही. एकीकडे मोबाईल, एकीकडे टीव्हीवरील कार्यक्रम, कार्टून्स किंवा कंप्युटरवर ही मुलं तासनतास खिळून बसलेली असतात. अशा मुलांना ना भुकेचा अंदाज येत ना त्यांना तहान लागत. मग यातूनच सुरू होतात, शारीरिकपिडा!
      पालक आज आपल्या मुलांचे लाड काही कमी करत नाहीत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,म्हणून महागड्या शाळेत पैसे, देणग्या देऊन प्रवेश मिळवतात. लोकांकडे पैसा असल्याखेरीज ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालत नाहीत. शिवाय मुलांना काय हवं, ते त्यांचे शब्द खाली पडण्याअगोदरच कुणी तरी ते उचललेले असतात. आता स्वस्तात मिळणार्या स्मार्ट फोनला अगदी गरिबातला गरीब लोकांना देखील पहिली पंसदी आहे. अगदी पहिलीपासूनच नव्हे तर तीन-चार वर्षाच्या मुलांच्या हातातही मोबाईल हे खेळणं म्हणून असतं. पहिलीपासूनचा अभ्यास हा जरी मुलांच्या शिकण्याचा पाया असला तरी मोबाईलवरील गेम्स, व्हीडिओ, गाणी, आदींच्या सान्निध्यात राहिल्याने मुलांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा निश्चितच परिणाम जाणवतो. जाहिरातबाजीचाही या मुलांवर परिणाम झालेला दिसून येतो. ऑनलाईन खरेदी करणे, मोबाईलमध्ये गुंतणे या मुलांना जडलेल्या सवयींकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
      शैक्षणिकदृष्टया पाल्य आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी असं या मुलांचं नातं घट्ट होत असताना मोबाईलच्या माध्यमातून हे विद्यार्थी दुसरीकडेच भरटकलेले दिसून येतात. सुट्टीमध्ये पालकांसोबत वेळ घालवताना ही मुलं आपल्या कुटुंबामध्ये फार कमी वेळ रमतात. जितकी ती या निर्जीव उपकरणामंध्ये रमतात. याचे परिणाम मुलांच्या स्वभावावर दिसून येतात. मग अबोल राहणं, कुणामध्ये न मिसळणं, वेळेवर जेवण न जेवणं, एकलकोंडेपणा निर्माण होणं, स्वभावात चिडचिडेपणा येणं. आदी गोष्टी या मुलांच्या जीवनावर परिणाम तर करतातच पण शैक्षणिक पातळीवर ही या मुलांच्या श्रेणीवर त्याचा परिणाम होतो. ही सुट्टी जरी मुलांना एंजॉय करायची असेल तर काहीवेळा मामाचं गाव, कुटुंबासमवेत सहली, गावी जाणे किंवा घरातच थांबणे आदी पर्याय निवडले जातात.पण फक्त सुट्टी वाया घालवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग झाला पाहिजे.
      आजकाल मुलांचं लक्ष्य मात्र एकच असतं ते म्हणजे मोबाईल, कंम्प्युटर, टीव्ही. प्रवासातही या मुलांच्या हातात मोबाईलच असतो. गेम, व्हीडिओ, गाणी ऐकणे आदी गोष्टींना ही मुलं अधिक प्राधान्य देतात. यामुळे जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा मग अचानक अभ्यास हाती घेणे, अभ्यासात मन रमवणे, टयुशन्स आदी गोष्टी या मुलांना नंतर जड जातात कारण आज वास्तव स्थिती पाहिली तर, मोबाईलचं तंत्र या मुलांच्या मेंदूवर एवढं फिट्ट बसलंय की, या मुलांना जडलेली ही सवय सुटू शकेल की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. कारण आजची मुलं ही ख-या अर्थाने आपलं बालपण विसरत चालली आहेत. स्वच्छंदी बागडण्याचे, निसर्गाचा आस्वाद घेण्याचे, सट्टीचा खरा अर्थ जाणण्याचेच विसरून गेली आहेत. त्यामुळे शरीराला व्यायाम देणारे, मन स्वच्छंदी करणारे, मैत्रीचा बंध जपणारे खेळही आज लोप पावत चालल्याचेच दिसून येतात. चित्रकला, रांगोळी, एमएससी- आयटी संगणक शिक्षण, एकादी भाषा शिकणे, मोडीलिपीसारख्या लिपीची ओळख करून घेणे, चांगली पुस्तके वाचणे, किराणा दुकानात काम करून तिथली परिस्थिती तो व्यवसाय जाणून घेणे अशा बर्याच गोष्टी करता येतात. तबला-पेटीचे शिक्षण, कागदकाम, पोहायला शिकणे, सायकल शिकणे, मेहंदी काढणे अशा किती तरी गोष्टी आहेत. त्याच्या शिकण्याने आपल्या ज्ञानात भर पडते. कौशल्य आत्मसात होते. त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात वारंवार करता येतो. ज्याला अधिक कला माहित आहेत, अभ्यास आहे,कौशल्य आहे अशा लोकांना खरे तर मोठा मान असतो. त्यामुळे विद्यार्थी या नात्याने आपण रोज काही ना काही शिकले पाहिजे.

Wednesday, April 4, 2018

'विनोद आवडे सर्वांना'


     धकाधकीच्या काळात क्षणभर विरंगुळा हवा असतो. अशा वेळी हलकेफुलके विनोद सांगितले, ऐकले की सभोवतालचे वातावरणात हास्य फुलून मनावरील ताण कमी होतो. म्हणूनच 'विनोद आवडे टवाळा' अशी स्थिती आता नसून 'विनोद आवडे सर्वांना' असे म्हटले पाहिजे. म्हणूनच मीदेखील मराठी व्यतिरिक्त हिंदीत कुठे छोटे विनोद वाचायला मिळाले तर ते मराठीत अनुवादीत करून आपल्यापर्यंत पोहचवायचे काम करतो. असेच काहीच विनोदी चुटके तुमच्यासाठी 

नाश्टा
मंगल: काय गं, तू काहीही न खाता जिवंत राहू शकतेस का?
सुमन:नाही बाई! खाल्ल्याशिवाय मी कशी जिवंत राहू गं?
मंगल:पण मी राहू शकते,बाई!
सुमन:ते कसं?
मंगल:नाश्टा करून!

चप्पल
समोरून एक माणूस लंगडत येताना पाहून दोन डॉक्टरांमध्ये जुंपली. 
पहिला डॉक्टर म्हणाला,"मला वाटतं,त्याच्या पायाचे हाड मोडले असणार. म्हणूनच तो लंगडत येतोय."
दुसरा म्हणाला,"नाही.मला वाटतं त्याचा अंगठा तुटला असणार."
 यावरून दोघांमध्ये वाद होत राहिला.कुणीच माघारी घेईना. शेवटी तिसरा डॉक्टर त्यांच्यामधे पडला. तो म्हणाला,"तुम्ही असे भांडत बसू नका. त्यापेक्षा आपण त्यालाच विचारू ,त्याला काय झालेय ते!"
तो माणूस त्या डॉक्टरांजवळ आला. तिसरा डॉक्टर म्हणाला, "ओ महाशय, तुम्ही लंगडत का चालला आहात? तुमच्या पायाचे हाडवगैरे तुटलेय का?"
तो माणूस म्हणाला," नाही हो, माझी चप्पल तुटली आहे."

लाईट
सोन्या: अरेरे, लाईट गेली!
मोना:लाईट गेली तर गेली. जरा पंखा तरी लाव.
सोन्या:मूर्खच आहेस. पंखा लावला तर मेणबत्ती विझणार नाही का ?

शेपूट 
शिक्षक : हत्तीची ओळख सांग.
नीलम :दोन शेपट्या.एक मागे एक पुढे 

होमवर्क 
विशाल: गुरुजी, काल मी जे काम केले नाही,त्यावरून मला शिक्षा करणार का?
गुरुजी:नाही,अजिबात नाहीस.
विशाल: ठीक आहे सर! काल मी होमवर्क केला नाही.

कुत्रा 
रोहित:काय रे,तुला कुत्र्याची भीती वाटते का?
सलील:नाही रे! मी त्याला उशीरपासून एस्क्यूज म्हणतोय,पण तो जागचा हलेचना.
रोहित:अरे,कुत्र्याला कोणी एस्क्यूज मी म्हणतं का ? त्याला तर कुत्र्या हाड म्हणायचं.
सलील: अरे ते ठीक आहे रे,पण आजच मॅडम म्हणाल्या की,आपल्या बोलण्याची भाषा सुधारा.जीवनात थोडे  प्रोफेशनल बना.


पानी आणि नाम फौंडेशनच्या निमित्ताने...


     'पानी फौंडेशन' आणि 'नाम फौंडेशन' यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या पाण्याबाबत चांगली जनजागृती होत आहे, ही बाब चांगली उल्लेखनिय आहे. राज्य शासनानेसुद्धा शेतशिवार, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे धोरण राबवले आहे आणि त्याला चांगले यश आल्याचेही दिसत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आणि त्यानिमित्ताने पाणी अडवले गेल्याने शिवारात अजून तरी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य शासनाला पाण्याच्या टँकरवर करावा लागणारा खर्चदेखील वाचला आहे. पानी आणि नाम फौंडेशनच्यामाध्यमातून गावेच्यागावे जलसंधारणासाठी पुढाकार घेत असल्याचे आणि त्यासाठी लोकसहभाग वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अजूनही लोकांनी पाण्यासंदर्भात जागृत व्हायला हवे. शहरातदेखील लोकांनी, सोसायट्यांनी छतावरचे पाणी अडवून ते मुरवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करायला हवे आहेत.

     पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टी अशक्य आहे. पाणी ही मानव प्राण्याला व निसर्गाला जीवन देण्याची जीवनदायी अशी प्रभावी किमयाच आहे.  पाणी हे साक्षात परमेश्वराने निर्माण केलेल्या पंचमहाभुतांपैकी एक म्हणजेपृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश यापैकी एक आहे. तसे पाहता पंचमहाभूतांची आवश्यकता प्रत्येक प्राणीमात्रला जगण्यासाठी अपिरिहार्य असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,पण तरीही पाण्याचे महत्व फारसे  कुणाच्या लक्षात येत नाही.
     पाणी मुबलक आहे.मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने लोकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, पाणी अडवा आणि जिरवा हा मंत्र जोपासला तर भारतात उपलब्ध असलेले पाणी सहज लोकांना पुरेल. पाण्यासाठी भांडणे होण्याची शक्यताही कमी होईल. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन ही आपली नैतिक जबाबदारी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्य स्तरावरुन  वापर केला तर भारताची लोकसंख्या पुढील 50 वर्षात 5 पट जरी वाढली तरीसुद्धा पाण्याचे दुर्भीक्ष कधीच भासणार नाही.
      परंतु आज मात्र पाण्यसाठीदाही दिशा- आम्हा फिरवीशी जगदिशाअशा केविलवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. याचा सर्वात मोठा फटका महिलांना बसतो. कारण पुरुष सकाळी उठून कामाला जातो. मागे राहतात महिला! त्यांना धुणी-भांडीसह अन्य गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता आणि त्याचा शोध आणि वापर त्यांनाच करावा लागतो. ही मोठी दु:खद गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर अनेक किलोमीटर दुरवरून पायपीट करून हंडाभर पाणी मिळवावे लागते, तर काही भागात टँकरद्वारे पाण्याच्या पुरवठा करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी लातूर शहराला तर रेल्वे वॅगननी पाणीपुरवठा करावा लागला होता. ही बाब इतिहासात वारंवार घडणार नाही,याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
     पाण्यासाठी शेजारीशेजारी,लोक, राज्ये आणि देश भांडताना दिसत आहेत.पाण्यावरून काही ठिकाणी सातत्याने भांडणतंटे, मारामार्या, प्रसंगी खून झालेले आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. या अतिमहत्त्वाच्या प्रश्वाबाबत अशिक्षितांबरोबर सुशिक्षितसुद्धा क्षणभर पाण्याचे महत्त्व विसरून आपसातील वाद विकोपास नेतात. वास्तविक सुशिक्षित वर्ग, तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या वस्त्यातील नागरिकांना पाण्याचे महत्व व योग्य ते नियोजन, उद्बोधन करून पटवून दिले पाहिजे. उद्बोधन करायला पाहिजे. सर्वांचे योगदान यात महत्त्वाचे आहे. पाणी ही अत्यंत मौलिक असलेली सामाजिक जीवनोपयोगी वस्तु आहे, याची सर्वांनीच जाण ठेवावयास पाहिजे, पावसाचे पाणी हे अत्यंत शुद्ध असते. अशा पाण्याचा संग्रह प्रत्येकाने करायला हवा.
पाण्याच्या अडवण्याविषयी आपण आपल्या स्वत:च्या जागेवरून करायला हरकत नाही. पाण्याचे साठवण आपल्या घराच्या गच्चीवर करायला पाहिजे.गच्चीवर जमणारे पाणी योग्य त्या उतारावरून प्लास्टीक-फायबर्स पाईप लावून आपल्या तळमजल्यावरील पटांगणात असलेल्या विहिरीत, बोरिंग, किंवा ती नसल्यास जमीनस्तरावर टाके बनवून त्यात सोडले पाहिजे. एकदा वापरलेले पाणी पुन्हा कसे वापरता येईल याचा विचार करून दर महिन्यातून एकदा कार्यशाळा घेऊन तिच्या माध्यमातून कपडे धुतलेले पाणी, आंघोळीचे पाणी संडासात, तसेच गाड्या धुण्यासाठी किंवा पटांगण व बाहेरील फुलबाग, झाडे यासाठी वापरले पाहिजे. जेवणानंतर हात धुण्यासाठी वॉश बेसीनचा नळ अत्यंत बारीक करून फक्त हातच ओले करून स्वच्छ करून वॉश बेसीनचा नळ त्वरित बंद केल्यास एक बादली पाण्याऐवजी एक मग्गाभर पाण्याचाच वापर केला पाहिजे. तसे केले तर 10 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. घरांतील बाथरुमचे नळ, शौचकुपाजवळील नळ, वॉश बेसीनचे नळ, बाहेरील बागेजवळील नळ, मोटर गॅरेजजवळील नळ यांची वरचेवर देखरेख करून सर्व नळ व्यवस्थित कार्यक्षम आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे. गळत असल्यास त्वरित त्याची दुरुस्ती केली पाहिजे किंवा नवीन नळ बसवून दिवसभर गळणार्या नळाद्वारे शेकडो लिटर पाण्याची बचत केली पाहिजे. ग्रामीण भागात फावल्या वेळात आपल्या शेतात 7 मीटर बाय 7 मीटर बाय 3 मीटर याप्रमाणे प्रत्येक शेतात शेततळे खोदावे. याचा फायदा सर्व शेतकरी व परिसरातील शेतमजूर यांना होणार असून पाण्याची खरी बचत होऊन एक उत्तम योगदान होऊ शकते.
75 टक्के पाणी निष्काळजीपणाच्या मानसिकतेमुळे वाया जाते. यासर्व प्रकाराबद्दल प्रत्येक नागरिकाने सर्वात प्रथम कर्तव्य म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब मानवी जीवनासाठी किती मौल्यवान आहे,याची जाणीव ठेवून त्या थेंबाचे योग्य ते नियोजन करून पाण्याची उपयुक्तता ही मानवतेची नव्हे तर साक्षात ईश्वरसेवाच समजली पाहिजे. सर्वांना कानमंत्र म्हणून हे सांगावे. आता पाण्यासारखा पैसा उधळला या जुन्या म्हणीत बदल करून पैशासारखे पाणी जपावे, अन्यथा डोळ्यातून निघणारी आसवे पिऊन तहान भागवावी लागेल, अशी म्हण रुढ केली पाहिजे.अन्यथा जल नाही तो कल नही! असे ओरडून सांगावे लागेल.

Tuesday, April 3, 2018

डीसीपीएस धारकांची होतेय गळचेपी


     वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्, महागडे शिक्षण यामुळे आजचे धकाकीचे जीवन असुरक्षित बनले आहे. तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर प्रचंड प्रमाणात काम करून घेण्याचे खासगी कंपन्या किंवा सरकारी यंत्रणेचे धोरण यामुळे आजचा युवक सैरभैर झाला आहे. कामाचा प्रचंड ताण अगदी युवा अवस्थेतच आजाराला निमंत्रण देत आहे. हृदयविकार, मधुमेह,कॅन्सर यासारखे आजार आताच्या तिशी-पस्तिशी असणार्या वयातल्या युवकांना आयुष्यात निरुत्साह आणत आहे. अशा दुर्दैवाने आकाली मृत्यूला बळी पडलेल्या लोकांचे संसार आर्थिक अडचणीमुळे उघड्यावर पडल्याची उदाहरणे आहेत. अशा लोकांच्या कुटुंबांना सुरक्षितता म्हणून शासन काही प्रयत्न करायला तयार नाही. अशा या असुरक्षित वातावरणात आजची पिढी जगत असून अर्थिक तंगीमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे.खरे तर शासनाने या गोष्टींकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असताना त्यांना वार्यावर सोडून आपली जबाबदारी झटकत आहे. यामुळे आजचा समाज मोठा अस्वस्थ झाला आहे. शासनाच्या विरोधात एल्गार करायला निघाला आहे. तरीही अशा लोकांची आंदोलने चिरडण्याचा किंवा फक्त आश्वासन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या जन्मात तरी आपल्याला न्याय मिळणार का, असा सवाल विविध स्तरातला माणूस करताना दिसत आहे.

     शिक्षण, आरोग्य यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन-प्रशासनाची आहे. मात्र अलिकडच्या सरकारांनी सरकारी शाळांना कुलुपे ठोकून खासगी किंवा कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आरोग्याचीही हीच अवस्था असून सरकारी दवाखाने खासगी लोकांना आणि कंपन्यांना चालवण्यास देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. याशिवाय रस्ते बांधणीसारखे मूलभूत विषय, त्याचबरोबर एसटी वाहतूक,पाणी पुरवठा,वीज वितरण यासारख्या महत्त्वाच्या आणि लोकांच्या जगण्याशी निगडीत असलेल्या प्रकल्पांचा ताबा आता खासगी यंत्रणांकडे दिले जात असल्याने सरकार म्हणून काही जबाबदारी सरकारची आहे की नाही, असा प्रश्न पडतो. उद्या राज्याचे आणि देशाचे सरकारदेखील प्रत्यक्षरित्या कंपन्या चालवतील की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. वास्तविक आपल्या देशाचे सरकार मोठे उद्योगपती लोकशाहीच्या आडमार्गाने चालवतच आहेत.  फक्त उद्या त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदवला जाईल का, अशी भिती वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकारचे आजचे वागणे तेच सांगून जाते.
     आपल्या राज्याचा विचार केला तर डीसीपीएसधारक कर्मचारी, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी, एसटी, वीज वितरण, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्रंथालय कर्मचारी असे एक ना अनेक कर्मचारी सरकारवर प्रचंड नाराज आहेत. गेल्या काही वर्षात या लोकांनी आपल्या समस्या, अडचणी सोडवून घेण्यासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र त्यांना आश्वासनाखेरीज काहीच हाताला लागताना दिसत नाही. त्यामुळे आता अनेक कर्मचार्यांच्या संघटनांनी शेवटचे हत्यार उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कर्मचार्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. अर्थात हा निर्णय जनरेट्यापुढे नमते घेत मागे घ्यावा लागला असला तरी शासनकर्ते प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा भलत्याच गोष्टींकडे लक्ष विचलित करून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे निराश झालेले आणि तितकीच संतप्त झालेले कर्मचारी शेवटचे हत्यार उतरण्याच्या तयारीत आहेत. काही संघटनांनी शेवटचा संघर्ष करण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे.
     राज्यातले डीसीपीएसधारक कर्मचारीदेखील आता शेवटचा एल्गार पुकारण्याच्या इराद्याने राज्यातल्या कानाकोपर्यात मेळावे घेऊन शासनाविरोधात रान उठवत आहे. या लोकांना आता जुन्या कर्मचार्यांसारखी पेन्शन योजना नाही. त्यांना जो पगार दिला जातो, त्यातली दहा टक्के रक्कम शासन कापून घेते. त्यात आपली तेवढीच रक्कम गुंतवते ही रक्कम व्याजासह कर्मचारी सेवानिवृत्त झाला की, व्याजासह शासन संबंधित कर्मचार्यांना देणार आहे. 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्या या लोकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. आज या योजनेला 13 वर्षे झाली आहेत, मात्र यातून मोठी निराशा या कर्मचार्यांच्या पदरी पडली आहे. कारण शासनाने या लोकांच्या पगारातून फक्त दहा टक्के रक्कम कपात करून घेतली,पण आपली रक्कम त्यात घालून ही संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे ठेवण्याची जी जबाबदारी होती, ती पाळण्यात शासन अपयशी ठरले आहे. आज तेरा वर्षात कपातीची रक्कम किती झाली? शासनाने किती रक्कम भरली आणि एवढ्या कालावधीत त्याचे व्याज किती झाले, याचा काहीच ठावठिकाणा नाही. कसलाही हिशोब नाही. गेल्या काही वर्षात या योजनेतले सुमारे दोन हजार कर्मचारी मयत झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या पैशांतला एक पैसाही मिळालेला नाही. त्यामुळे अशा कर्मचार्यांच्या कुटुंबियांना रोजंदारीवर जाऊन आपले पोट भरावे लागत आहे. खरे तर ही फार मोठी चूक शासनाकडून झाली आहे आणि अजूनही होत आहे. आपल्या कपात झालेल्या पैशांचा कसलाच हिशोब लागत नाही,याची कल्पना आल्यावर या लोकांनी याबाबत आवाज उठवला. मग कुठे थोडी फार हालचाल होऊ लागली आहे. पण अजूनही पूर्ण क्षमतेने त्यांची कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे या लोकांना आपली मोठी फसवनूक होत आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. या लोकांनी आता संघटनेच्या झेंड्याखाली येऊन शासनाविरोधात संघर्ष करण्याचा निर्णय घेऊन अलिकडच्या काही वर्षात आंदोलने उभी केली आहेत. 
     या नव्या अंशदान पेन्शन योजनेचा आपल्याला काहीच लाभ नाही, याची खात्री झाल्याने हे लोक आता आपल्याला जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी एकमुखी मागणी करत सरकारविरोधात एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. अंशदान पेन्शन योजनेमुळे कर्मचार्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार नाही. शारीरिक आणि मानसिक विकलांगतेमुळे सेवानिवृत्ती घेतल्यास किंवा झाल्यास उपदान ग्रॅज्युइटी मिळणार नाही. भविष्य निर्वाह निधीची तरतूद नाही. सेवेत मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्त्वाचा लाभ मिळणार नाही. कर्मचारी निवृत्तीवेतन धारक हयात नसल्यास त्याच्या कुटुंबाला कोणतेच संरक्षण नाही. या महत्त्वाच्या गोष्टींना या नव्या अंशदान पेन्शनमुळे मुकावे लागले आहे.
     आजचा कोणताही माणूस आपल्या मुला-बाळांसाठी,कुटुंबासाठी आर्थिक तरतूद करून ठेवताना दिसत आहे. जुन्या कर्मचार्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन आहे. मात्र या डीसीपीएस धारक कर्मचार्यांना मात्र असे कोणतेच लाभ मिळणार नाहीत. सदर कर्मचारी दुर्दैवाने मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंबच उघड्यावर पडत आहे. अशी आपल्यानंतरची कुटुंबाची होणारी ससेहोलपट कोणाही कर्मचार्यांना नको आहे. त्यामुळे ही मंडळी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. त्यांना समान काम आणि समान वेतन याची आठवण सरकारला करून द्यायची आहे. यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. शासन त्यांच्या मागण्या मान्य करते का किंवा मग इतर कर्मचार्यांप्रमाणे आश्वासन देऊन गोल करते, हे पाहावे लागणार आहे.

Sunday, April 1, 2018

देवदासी प्रथेविरोधात झटणार्‍या सितव्वा


     कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर यल्लमा देवीचे प्रस्थ मोठे आहे. सौंदत्ती,कोकटनूर, जत याठिकाणी श्री यल्लमादेवीची मंदिरे आहेत आणि याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात. आणखीही काही छोट्या गावांमध्ये यल्लमाची मंदिरे आहेत, तिथेही नित्यनेमाने उत्सव होत असतात. महत्त्वाचे म्हणजे या देवीला देवदासी सोडण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या जागृतीमुळे अशा कुप्रथेवर बंदी घालण्यात आली आहे आणि देवाला मुली सोडण्याचा प्रकारही जवळपास 99 टक्के बंद झाला आहे. अर्थात एक टक्का यासाठी म्हणायचे की, ही प्रथा समूळ नष्ट झाली आहे, असे म्हणायला जागा नाही. मात्र यासाठी काही संस्था,चळवळी काम करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यात जत,मिरज, उमराणी, कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यात हुक्केरी, अथणी,चिकोडी, रायबाग या तालुक्यांमध्ये अशा चळवळी, संस्था काम करीत आहेत. अशीच एक संस्था कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही काम करत आहे. महिला अभिवृद्धी आणि संरक्षण संस्थेच्या सचिव सितव्वा मुद्दत यांना याचवर्षी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरव केला आहे. देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या सितव्वा यांनी पुन्हा कोणती मुलगी या कुप्रथेच्या बळी जाऊ नये, यासाठी झटत असतात.त्यांची कहानी अंगावर शहारे आणणारी आहे.

     कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सितव्वा यांचे बालपण मोठे कष्टप्रद गेले आहे. त्यांच्या वाट्याला मोठी उपेक्षा आली आहे. कुटुंबात नऊ मुलीच होत्या आणि त्यांच्या आई-वडिलांना वंशाच्या दिव्याची आस होती. आपला वंश चालावा यासाठी घरात मुलगा जन्माला यावा, या प्रतिक्षेत तब्बल नऊ मुलींना त्यांनी जन्म घातला,पण तरीही त्यांच्या नशीबात वंशाचा दिवा आला नाही. मात्र खाणार्यांची एवढी तोंडे म्हटल्यावर एवढ्या अन्नाची व्यवस्था होणं अशक्यच होतं. आर्थिक अडचणीमुळे सितव्वा यांचे बालपण हिरावले गेले. कुपोषण आणि आजारपण यामुळे अगदी लहान वयातच तीन मुली दगावल्या. त्यांचे कुटुंब त्यांच्यावर उपचार आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात असमर्थ ठरले. अर्थात त्यांच्या जाण्याने कुणालाच काही फरक पडला नाही.
     सितव्वा यांच्या आईची एकच इच्छा होती की, आपल्या घरात मुलगा जन्माला यावा. तेव्हा सितव्वा सात वर्षांच्या होत्या. वय लहान असले तरी घरच्या परिस्थितीची जाण होती. कुटुंबात पोटापाण्यासाठी चाललेला संघर्ष पाहात होती. त्यांनाही वाटायचं की, आपल्या घरात भाऊ यावा, त्यामुळे आपल्या घरात आनंद, खुशी येईल. पण असे काही घडले नाही. या दरम्यान गावातल्याच एका यल्लमा देवीच्या पुजार्याने मुलीला देवाला सोड म्हणजे तुमच्या घरात सुख नांदेल. मुलीला देवदासी बनवल्यावर देवाची कृपा होऊन तुमचे घर धन-धान्य मिळेल आणि तुम्हाला वंशाचा दिवादेखील मिळेल. सुरुवातीला तिचे वडील या गोष्टीला तयार झाले नाहीत. पण नंतर त्यांचाही नाईलाज झाला आणि सितव्वा हिला अवघ्या सात वर्षांची असतानाच देवदासी बनवण्यात आले. देवाला सोडण्याच्या प्रथेनुसार त्यादिवशी सितव्वाला नवे कपडे,नव्या हिरव्या बांगड्या घालण्यात आल्या. त्यावेळी तिला आपल्याबाबतीत काय घडते आहे,याची काही कल्पनाच नव्हती. पण नवे कपडे,बांगड्या मिळाल्याने ती खूश होती. 
     मात्र प्रत्येकजण तिच्याबाबतीत चर्चा करीत होता. तिला वाटलं की, कदाचित आपल्याबाबतीत काही तरी चांगलं घडत आहे. तिला लाल आणि पांढर्या फुलांचे हार घालण्यात आले. प्रथेनुसार हा प्रकार म्हणजे त्यातला पहिला टप्पा होता. सितव्वा सांगतात, त्यावेळेला मी फार लहान होते. नवे कपडे आणि नव्या वस्तू बघून मला फार आनंद झाला होता. मला माहीत नव्हते की, मला अंधारात ढकलेले जात आहे.
सितव्वा आता कुणाची मुलगी किंवा बहीण नव्हती. ती फक्त एक देवदासी होती. हीच तिची ओळख. सगळे तिला देवदासी म्हणूनच हाक मारत. शेजारची मुलं तिच्यापासून लांब राहू लागली. अशा प्रकारे सहा-सात वर्षे उलटली. या दरम्यान तिचे वडील वारंवार आजारी राहू लागले. शेवटी ते काम करण्यास असमर्थ ठरले.घरात उपचारासाठी पैसे नव्हते. खायचे वांदे होऊ लागले. आईला आर्थिक मदतीची गरज होती. सितव्वा आता 13 वर्षांची झाली होती. आता आईने ठरवले की, आता देवदासी प्रथेचा दुसरा टप्पा उरकून टाकूया. सितव्वाला सतत नऊ दिवस हळदीचा लेप लावला जाऊ लागला आणि लिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली जाऊ लागली. तिला पहिल्यांदाच नवीन साडी मिळाली. गळ्यात पिवळ्या रंगाचा धागा घालण्यात आला. अशा प्रकारे तिला पुजेसाठी तयार करण्यात आले.गावात मोठा समारंभ घेण्यात आला. पुजेच्या,विधीच्यावेळी तिच्या अंगावर उपस्थितांनी अक्षता टाकल्या. पुजारी काही तरी मंत्र पुटपुटत होता. नवव्या दिवशी मोठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मात्र सितव्वाला वाटू लागले की, आपल्यासोबत जे काही घडत आहे, ते चांगले घडत नाही. तिने आईला सांगून पाहिले की, मी शेतात काम करेन,तुला पैसे आणून देईन,पण तिच्या आईने काही एक ऐकले नाही.
     समारंभ झाल्यानंतर सितव्वाला एका अनोळखी माणसासोबत पाठवण्यात आले.काही वर्षे ती त्याच्यासोबत राहिली. अल्पवयीन काळातच ती दोन मुलांची आई बनली. ती त्या माणसासोबत त्याच्या बायकोसारखी राहिली,पण खर्या अर्थाने म्हणजे समाजाच्यादृष्टीने तो तिचा नवरा नव्हता. ती ठेवलेली बाई म्हणूनच ओळखली जात होती. तो तिच्या आईला राशन-पाण्यासाठी नियमितपणे पैसे देत होता.पण तिची आई त्याच्याने समाधानी नव्हती. तिला अशा एका माणसाची आवश्यकता होती, जो मुलीच्या बदल्यात तिला भरपूर पैसा देईल. शेवटी तिला तसा एक माणूस मिळाला. तो सावकार होता. मग तिने सितव्वाला त्याच्याकडे सोपवले.यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. तो त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि कपड्यालत्त्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असे. त्या माणसाला अगोदरच दोन बायका होत्या. सितव्वा सांगतात की, तो आपल्या बायकांसोबत गावात राहायचा. नेहमी भेटायला यायचा. पण परंपरेनुसार मला त्याच्याशी विवाह करण्याची परवानगी नव्हती. त्याच्याकडूनही तिला एक मुलगी झाली. परंतु सामाजिकदृष्ट्या मी त्याची बायको नव्हती.
     ही 1990 ची गोष्ट आहे. बेळगावमध्ये काही महिला देवदासी प्रथा सोडून त्याच्या विरोधात चळवळ चालवत होत्या. सितव्वाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले की, एकाद्या मुलीला किंवा महिलेला देवदासी बनवणे कायद्याने गुन्हा आहे. ही प्रथा कायद्याच्या विरुद्ध आहे. त्या सांगतात, मी माझ्या आयुष्यात कधीच सुखी नव्हते. असे वाटत होते की, आपल्यावर कोणी तरी आपली मर्जी थोपवत आहे. पण मला या विरोधात बोलण्याची हिंमत होत नव्हती. महिला संस्थांशी भेटल्यावर माझ्यात एक प्रकारची मानसिक ताकद आल्याची जाणीव झाली. या दरम्यान त्यांना कर्नाटक स्टेट वीमेन डेवलपमेंट कॉरपोरेशनद्वारा चालवण्यात येत असलेल्या देवदासी पुर्नवास कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर आलेल्या टिमा निघून गेल्या. मात्र सितव्वा यांना वाटू लागले की, यासाठी अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी महिला अभिवृद्धी आणि संरक्षण संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी देवदासी प्रथेविरोधात काम करायला सुरुवात केली. 2012 मध्ये संस्थेच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी यौवन अत्याचारास बळी पडलेल्या महिला आणि मुलींसाठी संघर्ष केला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहिल्या. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी एक मोहिमच उघडली. त्यांच्या या कामामुळे त्यांची संपूर्ण राज्यात ओळख झाली. राज्य सरकारसह अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला. अलिकडेच त्यांना केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.