Saturday, January 21, 2023

चित्रपट: प्राण्यांच्या नावाचे युग पुन्हा अवतरले

आपल्या जीवनात नावाला खूप महत्त्व आहे.  या आपल्या नावाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी लोक आयुष्यभर मेहनत घेतात. नावाचे हे महत्त्व जाणून बॉलीवूडवालेदेखील आपल्या चित्रपटांची नावे विचारपूर्वक ठेवतात. एकेकाळी प्राण्यांच्या नावावर बनवलेले 'हाथी मेरे साथी', 'नागिन' हे चित्रपट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता पुन्हा प्राण्यांच्या नावाच्या चित्रपटाचे युग परत आले आहे. विशाल भारद्वाजचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कुत्ते' या चित्रपटात समाजात पसरलेल्या प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे चित्रण करण्यात आले आहे. कुत्ते या चित्रपटापूर्वी विशाल भारद्वाजचाच शाहिद कपूरची भूमिका असलेला 'कमिने' चित्रपट आला होता. त्याची कहाणी कुठेतरी अशा लोकांचे प्रतिबिंब दाखवते जे आपल्या स्वार्थाने आंधळे  झालेले असतात. याशिवाय असे अनेक चित्रपट आहेत जे प्राण्यांच्या नावांवर केंद्रित आहेत. 

विशाल भारद्वाजच्या कुत्ते या चित्रपटाव्यतिरिक्त इतरही अनेक चित्रपट आहेत जे प्राण्यांच्या नावांवर आधारलेली आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वरुण धवनचा भेडिया आणि अंशुमन झाचा लकडबग्घा हे चित्रपट देखील प्राण्यांच्या नावावर बनलेले आहेत. वरुण धवन स्टारर फिल्म भेडिया ही एका लांडग्याची कथा आहे जो माणसाला चावल्यास तो लांडगा बनतो. भेडिया चित्रपटाची कथाही कुठेतरी अशा स्वार्थी लोभी लोकांना लक्ष्य करते जे आपल्या स्वार्थासाठी घनदाट जंगले तोडून मॉल आणि हॉटेल्स बांधण्यात मग्न आहेत. त्याचप्रमाणे अंशुमन झा यांच्या ‘लकडबग्घा’ या चित्रपटाची कथा प्राण्यांच्या तस्करीवर केंद्रित आहे. सर्व चित्रपटांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे समाजातील अत्याचार संपवायचे असतील तर माणसाला एकतर प्राणी बनावे लागते किंवा प्राण्यांची मदत घ्यावी लागते. 

कुत्ते, भेडिया व लकडबग्घा प्रमाणेच प्राण्यांच्या नावांवर लक्ष केंद्रित करणारे आणखी बरेच चित्रपट येत आहेत. जसे की रणबीर कपूर स्टारर अॅनिमल, राजू हिरानी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर डोंकी, डेझी शाह आणि सुनील ग्रोव्हर स्टारर बुलबुल मेरीज, सलमान खान स्टारर टायगर 3. याशिवाय विद्युत जामवालचा 'जंगली' हाही अनेक प्राण्यांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हत्तीला वाचवण्यावर केंद्रित आहे.  या चित्रपटात महत्त्वाची भूमिका हत्तीची आहे. याशिवाय राजेश खन्ना अभिनीत 1971 साली आलेल्या हाथी मेरे साथी या चित्रपटाच्या कथेवर आधारित चित्रपट पुन्हा एकदा बनवला जात आहे.  ज्याचा अभिनेता आहे राणा तुंगा. 

यापूर्वी प्राण्यांच्या नावावर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत.   या चित्रपटाप्रमाणेच रेखा अभिनीत नागिन पहिल्यांदाच बनवण्यात आला होता. त्यानंतर श्रीदेवी अभिनीत नगिना चित्रपट तयार झाला. मिथुन चक्रवर्ती अभिनित चित्रपट चीता, विद्या बालन स्टारर शेरनी, गोरिल्ला, भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू स्टारर सांड की आँख, राजेश खन्ना स्टारर हाथी मेरे साथी, सुधीर कुचा स्टारर आणि एसएस राजामौली दिग्दर्शित मक्खी, गाय और गौरी इत्यादी चित्रपट प्राण्यांच्या नावावर बनले आहेत. 

 टफी या पोमेरेनियन कुत्र्याने सलमान खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत 'हम आपके है कौन' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. जॅकी श्रॉफ स्टारर चित्रपट तेरी मेहरबानियामध्ये मोती नावाच्या कुत्र्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले, तर राजेश खन्ना स्टारर चित्रपट हाथी मेरे साथीमध्ये हत्ती असलेल्या रामूने अप्रतिम काम केले होते. जितेंद्र आणि जयाप्रदा अभिनीत मां या चित्रपटात आपल्या मालकावरील अन्यायाचा बदला कुत्र्याने घेतला होता.जॅकी श्रॉफ स्टारर दुध का कर्ज चित्रपटाची कथा सापावर केंद्रित आहे. शोले चित्रपटात धन्नोच्या भूमिकेत असलेल्या घोडीचे काम जबरदस्त होते. अक्षय कुमार अभिनीत एंटरटेनमेंट या चित्रपटात एंटरटेनमेंट नावाचा कुत्रा होता, जो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता. अक्षय कुमार आणि कुत्रा यांच्यातील एक उत्कट नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. गोविंदा आणि चंकी पांडे स्टारर 'आँखे' चित्रपटात माकडाची मुख्य भूमिका होती, जी खूप मजेदार होती. यावरून कोणत्याही चित्रपटात इतर माणसांइतकेच महत्त्व प्राण्यांना असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.


Thursday, January 19, 2023

विद्याने साकारल्या बहुविध भूमिका

1995 मध्ये झी वाहिनीवरून 'हम पांच' नावाची एक विनोदी मालिका प्रसारित होत होती. यात बहिऱ्या आणि जाड भिंगाचा चष्मा आणि ढगळ कपडे घालणाऱ्या तिसऱ्या बहिणीची भूमिका विद्या बालनने केली होती. पाचजणींमध्ये यथातथाच दिसणारी, अजिबात ग्लॅमरस नसणारी व्यक्तिरेखा तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली. यातल्या सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, व्यक्तिरेखा कुठलीही असली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात ती व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता आहे, असा विश्वास विद्याच्या ठायी होता,हे महत्त्वाचे. त्यामुळेच ती विविध छटेच्या भूमिका करूनही ती प्रत्येक वेळी नव्या रुपात चाहत्यांसमोर येते. वेगळ्या रुपात आधीच्या भूमिकेची छाप तिच्यावर नसते.

म्हणूनच उत्तम अभिनेत्री म्हणून विद्याने आज हिंदी चित्रपट सृष्टीत आपली स्वतःची ठाशीव मोहोर उमटवली आहे.
आतापर्यंत आपल्या फिल्मी करिअरमध्ये विद्याने बहुविध अशा भूमिका साकारल्या आहेत. रेडिओ जॉकी, प्रोजेरियाने पिडित असलेल्या 12 वर्षाच्या मुलाची आई आणि याशिवाय प्रेमिका ते फिजिकली चॅलेंज्ड गर्ल अशा किती किती तरी  भूमिका तिने केल्या आहेत. आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात  ती  नव्या रुपात दिसली आहे. आपल्या अभिनयाची वैविधतता दाखवली आहे  आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळा तिचा अभिनय सहजसुंदर  आणि विश्वसनीय वाटतो. कदाचित हाच खरा अभिनय आहे, हीच कलाकारी आहे, असे म्हटले पाहिजे. या काळातल्या दुसर्‍या कुठल्याच अभिनेत्रीने इतक्या  अनेकविध भूमिका साकारल्या नाहीत.
      'हम पांच' नंतर विद्याने अभिनय हेच करिअर म्हणून निवडले. वडिलांच्या सांगण्यानुसार तिने पहिल्यांदा सेंट झेवीयर्स महाविद्यालयातून बी.ए. व मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणि या काळात ती अभिनय क्षेत्रातही धडपडत होती. या काळात तिनं गौतम गलदर दिग्दर्शित 'भालो' (2003) या बंगाली चित्रपटात काम केलं होतं.अभिनयासाठी विद्याला 'आनंदलोक' पुरस्काराने गौरविण्यात आले. काही जाहिरात केल्या.  त्याकाळात विद्याची एक स्कुटर ची जाहिरात गाजत होती. याचदरम्यान विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरदार 'परिणिता' (2005) साठी मुख्य नायिकेच्या शोधात होते. त्यांनी हा चेहरा हेरला. परिणिता' प्रचंड गाजला. करिअरच्या प्रारंभी विद्याने ऍडवरटायजिंग, सिरिअल, रीजनल चित्रपट, म्युझिक व्हिडिओ अशा विविध क्षेत्रात नशीब अजमावले आहे.  बराच स्ट्रगल केल्यावर मग  कुठे तिला बॉलिवूडमध्ये  ब्रेक मिळाला. चित्रपटातील आतापर्यंतचा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कित्येकदा तिला रिजेक्टही करण्यात आले. पण विद्याने हार मानली नाही. खरं तर विद्या चांगले काम मिळावे यासाठी प्रार्थना करायची म्हणे!  कठीण काळात मनापासून केलेल्या प्रार्थनेचा परिणाम होतो, यावर तिचा विश्वास आहे. त्यानुसार  तिला चांगले दिवस आले आहेत.  ‘परिणीता’ चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करून पदार्पणातच पुरस्कार मिळविल्यानंतर विद्या बालनने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘भूलभुलय्या’, ‘इश्किया’, ‘पा’ यांसारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. 'परिणिता' चित्रपटात ती एका  मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमानी मुलीच्या भूमिकेत होती.  विद्याने विचारसुद्धा केला नव्हता की, हा चित्रपट मोठे यश मिळवेल. आणि आपल्या कामाची प्रशंसा होईल. पण या चित्रपटात काम केल्याचा तिला खूप आनंद वाटतो. यानंतर विद्याने 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये रेडिओ जॉकी बनली. यात 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणण्याच्या तिच्या विशिष्ट अंदाजाने तर तिने प्रेक्षकांना घायाळ करून टाकले. यानंतर आलेल्या 'गुरू' मध्ये विद्याचा रोल छोटा असला तरी पायाने अपंग, आणि व्हीलचेअरवर बसलेल्या मुलीची भूमिका निभावून तिने पुन्हा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे नवे रुप दाखवले. 'सलामे इश्कः द ट्रिब्यूट ऑफ लव' , ' एकलव्यः द रॉयल गार्ड', ; हे बेबी' पासून विद्या आपली टिपिकल इंडियन ब्युटी' वाली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला.
भूलभुलैया' मध्ये मंजुलिका बनलेली विद्या 'डीसोसिएटीव आयडेंटिटी डिसऑर्डर' या एक प्रकारच्या मानसिक आजाराने पिडित होती. या चित्रपटात विद्याचा  डांस आणि ड्रामाने  पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या नव्या पैलूची ओळख देऊन गेला.
बेबी', 'किस्मत कनेक्शन', 'हल्लाबोल' चित्रपट चालले नाहीत. बालकी दिग्दर्शित 'पा' (2009) चित्रपट केला. अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणारी ही आजच्या जमान्यातील पहिली अभिनेत्री. त्यातली तिची सहजता वाखाणण्यासारखी होती. तिने 'इष्कीया'(2010) मध्ये जी अदाकारी साकारली ते पाहताना प्रेक्षक अक्षरशः खल्लास झाले. नंतर तिने यु टर्न घेत 'नो वन किल्ड जेसीका'(2011) सारखा वेगळा चित्रपट केला. या सोज्वळ, देखण्या,ग्लॅमरची नवी बाजू दाखवणाऱ्या अभिनेत्रीला आपण हिरोईन आहोत, त्यामुळे पडदयावर परफेक्टच दिसलं पाहिजे, या गोष्टीची कधीच फिकीर नव्हती. तिचा एखादा चित्रपट प्रचंड ग्लॅमरस तर दुसऱ्या त त्याचा लवलेशही नाही. कधी तिचा वावर स्वप्नवत वाटतो तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या चित्रपटात ती आपल्याच घरातील वाटते. आणि हे सगळे शक्य झालं ते तिच्या ठायी असणाऱ्या अभिनय क्षमतेमुळेच!  विद्या म्हणते की,  प्रत्येकवेळा काही तरी नवीन करण्याची मनीषा  बाळगून असते. स्वतः ला रिपीट करायला तिला आवडत नाही. कामात, भूमिकेत स्वतः ला झोकून द्यायला विद्याला आवडते.  एक ऍक्टर म्हणून माझ्यात काही नवीन करण्याची ऊर्मी आहे. कदाचित या कारणामुळेच तिला प्रत्येकवेळेला काही तरी नवीन  करण्याची संधी मिळत असावी. 
'पा' मध्ये विद्याने एका अशा मुलाच्या आईची भूमिका केली आहे, जो 12 वर्षाचा मुलगा आहे. व तो 'प्रोजेरिया' नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. अशा मुलाच्या आईची भूमिका करणं काही सोपी गोष्ट नाही. पण विद्याने या भूमिकेलासुद्धा न्याय दिला. विद्या सांगते की ही भूमिका जगण्याची प्रेरणा तिला आईकडून मिळाली. तिची आई पाच वर्षाची होती, तेव्हा  तिच्या आजीचं निधन झालं होतं. एक चांगली आई बनणं तिच्या आईचे तिच्या आयुष्यातले मिशन होते. आईने तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला. ती म्हणते की, या चित्रपटातला अभिनय पाहून एका महिलेने फोन केला होता. त्यात ती तुमच्यासारखी आई बनू इच्छिते, असे म्हणाली होती. इतक्या  चांगल्याप्रकारे  आईची भूमिका साकारायला मिळाले, हे माझे भाग्यच , असे विद्या सांगते.
'इश्किया'मध्ये विद्याने  पुन्हा एकदा जरा हट के काम केले. अपशब्द वापरण्यापासून चुंबनपर्यंतची दृश्ये या चित्रपटात होती. पण विद्या स्वतः ला यासाठी तयार केले. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी तिला 'इश्किया'ची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा ही भूमिका करू शकू की नाही, या विषयी विश्वास नव्हता. परंतु आव्हान पेलण्याची ताकद तिच्यात आहे. त्यामुळे तिने ही भूमिका सहज पेलून नेली. कामाचे प्रचंड कौतुकही झाले. विविध प्रकारच्या भूमिका करणे मला आव्हानात्मक वाटते. त्यामुळे ‘किस्मत कनेक्शन’मधील भूमिकेपेक्षा ‘इश्कियाँ’मधील भूमिका अधिक जवळची वाटते. चरित्र अभिनेत्री म्हणवून घेण्यापेक्षा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणवून घेणे मला अधिक भावते , असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.  'इश्किया' नंतर 'नो वन किल्ड जेसिका' मध्ये विद्याने सबरिना लालच्या डिग्लॅमरची भूमिका स्वीकारली. या चित्रपटातही विद्याच्या कामाचे कौतुक झाले.
आपली पूर्वीची सोज्वळ अभिनेत्रीची प्रतिमा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे आव्हान पेलून आपल्या सहजाभिनयाची उत्कृष्ट झलक विद्या बालनने आताच्या 'डर्टी पिक्चर' चित्रपटामध्ये  दाखवली आहे. तिच्या यापुढील अभिनय कारकीर्दीला वेगळे वळण देणारा हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही.  ती अभिनेत्री तर उत्कृष्ट आहेच; पण त्याशिवाय ती प्रयोगशीलही आहे. हिरोईनपणाचं ग्लॅमरही वेळप्रसंगी बाजूला ठेवत भूमिकेला न्याय द्यायचा ती शंभर टक्के प्रयत्न करते.  अलिकडे तिला डोळ्यांसमोर ठेऊन संहिता लिहिली जात आहे, यासारखे तिचे आणखी दुसरे ते यश कोणते?  भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला ती तयार आहे.
सिल्क स्मिता या बोल्ड अभिनेत्रींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'डर्टी पिक्चर्स' (2011) केला. तिच्या बोल्ड रूपाने सगळेच अचंबित झाले. त्यावर्षी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुरस्कार मिळाला. यापूर्वी तिला 'परिणिता' साठी पदार्पणाचा, 'पा'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाच होता. नंतर ही तिला 'कहानी'(2012), 'तुम्हारा सुलू'(2017) या चित्रपटांसाठीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्काराने तिच्या अभिनयाचे मोजमाप करणे चुकीचे आहे. पण तिचा स्वतःच्या अभिनय क्षमतेवर असलेला विश्वास आणि वेगळं काही तरी करण्याची धडपड यामुळे तिच्या अभिनयाचा साक्षात्कार पाहायला मिळाला.'कहानी'  (2012) या सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात तर तिने अख्खा चित्रपट आपण सहज पेलू शकतो, हे दाखवून दिले. एका अभिनेत्रींच्या बळावर चित्रपट चालू शकतो, 'कहानी' पाहताना पटतं. बऱ्याच कालावधी नंतर ती मार्च 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जलसा' द्वारे प्रेक्षकांसमोर आली. तीही हटके भूमिका घेऊनच. यातील तिच्या कामाचे कौतुक आहेच.या चित्रपटात विद्या बालनने भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. तिने महिला पत्रकाराची भूमिका साकारताना बारकावे अचूक टीपलेत. स्पष्टवक्तेपणा तिच्या देहबोलीमधूनच दिसून येतो. त्यामुळे तिच्या अभियानाचे नेहमीप्रमाणे कौतुक होत आहे. आता ती सिद्धार्थ रॉय यांच्याशी लग्न करून संसारात रममाण झाली असली तरी तिने अभिनय क्षेत्र सोडलेले नाही. अर्थात तिचे अजून चित्रपट येणार आहेत.भारत सरकारने तिला पद्मश्री (2014)  पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. 'अपयश हा यशाकडे जाण्याचा मार्ग असतो.' हा तिचा आपल्यासाठी संदेश आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

खेड्यांतील आरोग्य सेवा कधी सुधारणार?

 गावागावात आरोग्य सुविधा आणि डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी दररोज हजारो लोकांचा अकाली मृत्यू होतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे प्रत्यक्षात कुठेच दिसत नाहीत. हां, गेल्या काही वर्षांत काही सुधारणा झाल्या आहेत खऱ्या, पण समाधानकारक मानल्या जाव्यात तेवढ्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आजही देशातील सात लाख गावांमध्ये आरोग्य सुविधांची तीव्र टंचाई आहे, शिवाय डॉक्टरांची नियुक्तीही आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे. तामिळनाडू हे एकमेव राज्य आहे जिथल्या खेड्यांमध्ये आरोग्य सेवा समाधानकारक आहेत, असे म्हणता येईल. खेड्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी राज्यांनी काही वर्षांपूर्वी कठोर कायदे केले होते, पण तरीही बहुतेक नवीन डॉक्टर खेड्यात सेवा द्यायला नकार देतात. गंमत अशी आहे की, नोकरीसाठी भरलेले हमीपत्र मोडून डॉक्टर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा दंड भरतात, पण खेड्यापाड्यात सेवा देण्यास नकार देतात.

विशेष म्हणजे देशातील केवळ 20 टक्के डॉक्टर ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यामुळे गावोगावी डॉक्टरांची उपलब्धता नाममात्र राहिली आहे. याबाबतचा कोणताही नकाशा सरकारकडे नसल्याचे कारण असल्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे असेही म्हणणे आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सीएचसीमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर मंडळी गावांमध्ये जायला तयार नाहीत. खेड्यापाड्यात ऑपरेशन थिएटर, भूल देणारे डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ यांची तीव्र कमतरता आहे. याशिवाय गावोगावी आरोग्य केंद्रांवर तैनात असलेल्या डॉक्टरांसाठी निवास व आवश्यक फर्निचरची वानवा आहे. डॉक्टर खेडेगावात जात नसल्याची जी काही कारणे आहेत, ती डॉक्टरांच्या संघटनांनी दिली आहेत, मात्र याकडे राज्य सरकारे लक्ष देताना दिसत नाहीत. खेड्यापाड्यात उत्तम आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या कारणाला आम्ही जबाबदार नाही, असे डॉक्टरांच्या संघटनांचे म्हणणे आहे, उलट सरकारची धोरणेच अशी आहेत की, त्यामुळे उच्च पदव्या असलेले डॉक्टर खेड्यात सेवा देण्यास तयार नाहीत. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सरकारी धोरणांच्या विरोधात डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरताना दिसतात, पण खेड्यापाड्यातील आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची तीव्र कमतरता दूर करू शकेल असा कोणताही निर्णय राज्य सरकारे घेऊ शकत नाहीत.

आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची तर वानवाच आहे. देशातील महाराष्ट्रासह 34 पैकी 25 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण शासकीय रुग्णालयांत 70 टक्‍क्‍यांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे. या राज्यांतील ग्रामीण भागांत सर्जन, महिला, बालरोगसह तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा आहे. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल 2021-22 च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामीण आरोग्य सेवेत मध्य प्रदेशची स्थिती देशात सर्वात वाईट आहे. येथे विषयतज्ज्ञ डॉक्टरांची 95 टक्के पदे रिक्‍त आहेत. गुजरातमध्ये 90 टक्के, राजस्थानमध्ये 79 टक्के, उत्तर प्रदेशात 72 टक्के, बिहारमध्ये 70 टक्के महाराष्ट्रात 70 टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. केरळमध्ये 94.31 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 93.3 टक्के, व तामिळनाडूत 83.83 टक्के, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्‍त आहेत. मिझोराम, सिक्कीम, ग्रामीण दीव-दमण, पुद्दुचेरीत एकही तज्ज्ञ डॉक्टर नियुक्‍त नाही.

चीनच्या तुलनेत भारतामध्ये ग्रामीण भागातील 3,100 रुग्णांमागे फक्त एक बेड आहे. बिहारमध्ये 18,000 गावकऱ्यांसाठी एक बेड, उत्तर प्रदेशमध्ये 3,900 रुग्णांसाठी एक बेड आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात दर 26,000 लोकसंख्येमागे एक अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की दर 1,000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर असावा. सुमारे दहा हजार लोकसंख्येसाठी भारतात सात डॉक्टर्स आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मध्ये नोंदणीकृत अॅलोपॅथिक डॉक्टरांची एकूण संख्या सुमारे एक कोटी आहे. डॉक्टरांच्या उपलब्धतेच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये  अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात वाईट परिस्थिती आहे. नॅशनल हेल्थ प्रोफाईलनुसार, पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात फक्त 900 डॉक्टर आहेत. लोकसंख्येनुसार, 70,000 लोकांमागे एक डॉक्टर आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 50,000 लोकसंख्येमागे एकच डॉक्टर आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आरोग्य सेवेचा पाया प्राथमिक आरोग्य केंद्रांवर टिकून आहे, पण हा पायाच खूप कमकुवत आहे.

आज देशात केवळ सात लाख एमबीबीएस डॉक्टर सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत.अशा स्थितीत पाच लाख डॉक्टर आणि पाच लाख तज्ज्ञांची कमतरता कशी भरून काढायची हा मोठा प्रश्न आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 'ई-संजीवनी मेडिसिन' सेवेने तीन कोटी टेलि-कन्सल्टेशनचा आकडा पार केला आहे. यासह 'ई-संजीवनी टेलिमेडिसिन'ने एका दिवसात 1.7 लाख सल्लामसलत करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वेळी प्रत्येक गावात उपचारासाठी फिरती दवाखाना व्हॅन उपलब्ध करून दिली होती. याचा देशाच्या ग्रामीण भागातील लोकांना मोठा फायदा झाला. आयुष्मान भारत योजनेमुळे अत्यंत गरीब असलेल्या लोकांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे, पण आरोग्य सेवा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करता येतील का, हा प्रश्नच आहे.

डॉक्टरांच्या कमतरतेमुळे गावकऱ्यांना बनावट डॉक्टरांची सेवा घ्यावी लागत आहे. यामुळे हजारो लोक चांगल्या उपचाराअभावी अकाली मृत्यूमुखी पडतात. अ‍ॅलोपॅथीशिवाय खेड्यापाड्यात होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची कमतरता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आयुर्वेद आणि योगाच्या प्रचारासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देते. मात्र सेवा देण्यासाठी पात्र डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे एमबीबीएस व्यतिरिक्त बीएमएस आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची गरज आहे. गावपातळीवर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांच्या अभावावर तातडीने पावले उचलली, तर खेड्यात डॉक्टरांची कमतरता असतानाही लोकांचे प्राण वाचू शकतात.

देशातील एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तज्ञांनी काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये 'फॅमिली मेडिसिन', 'डिप्लोमा इन जनरल मेडिसिन' आणि ग्रामीण आरोग्य सेवेतील पदवीचा समावेश आहे. या तीन सूचनांवर प्रभावीपणे पुढे गेल्यास खेड्यापाड्यातील डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर दूर करता येईल. परंतु डॉक्टरांना चांगले पगार आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास शिक्षण पूर्ण करून परदेशात जाणाऱ्या डॉक्टरांना आपोआप अटकाव येऊ शकेल.केंद्रीय आरोग्य मंत्रालय वर्षानुवर्षे गावांमध्ये आरोग्य सेवांच्या अभावाची समस्या सोडवण्यासाठी व्यावहारिक पाऊल उचलण्याची सातत्याने चर्चा करत आली आहे. हे सूत्र आहे, 'एमबीबीएस'चा पाच वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना एक वर्षाचा स्पेशलायझेशन कोर्स द्यायला हवा, जेणेकरुन ग्रामीण भागात त्यांच्या तैनातीनंतर अशा डॉक्टरांना बिनदिक्कतपणे ग्रामीण भागात त्यांची चांगली सेवा देता येईल, पण यावर पुढे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

त्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा फॉर्म्युला तयार केला आहे. या अंतर्गत, एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांना मास्टर्स म्हणजेच एमएस किंवा एमडीमध्ये प्रवेश  तेव्हाच मिळेल जेव्हा ते गावांमध्ये पोस्टिंगच्या अनिवार्य कालावधीसाठी शपथपत्र लिहून देतील. त्यात सरकारने आणखी एक गोष्ट जोडली आहे की, जे एमबीबीएस पदवीधर विद्यार्थी प्रतिज्ञापत्र देतील, त्यांचे गुण कमी असले तरी त्यांना एमएस किंवा एमडीला प्रवेश दिला जाईल. मात्र केंद्र सरकारच्या या भुरळ पाडणाऱ्या फॉर्म्युल्यानंतरही गावोगावी सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये विशेष आस्था दिसून येत नाही. अशा स्थितीत आता प्रश्न असा पडतो की, एवढ्या कसरती करूनही एमबीबीएस डॉक्टरांना खेड्यापाड्यात सेवा देण्यात स्वारस्य नसताना, ग्रामीण भागातील दुरवस्था असलेल्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणते सूत्र अवलंबले जाणार? ‘फॅमिली मेडिसिन’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गावागावांतील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यात केंद्र सरकार कितपत यशस्वी ठरते, हे सांगणे कठीण आहे. मात्र हे सूत्र प्रभावी ठरले तर खेड्यापाड्यातील आरोग्य सेवेतील डॉक्टरांची कमतरता बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते. पण एवढी सर्व सूत्रे घेऊनही खेड्यापाड्यातील आरोग्य सेवा सुधारली नाही, तर काय करणार? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday, January 17, 2023

स्वच्छ उर्जेचे नवे युग अवतरेल?

भारतात सध्या विजेचे मोठे संकट नाही, परंतु भविष्यातील गरजा आणि स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्याच्या संकल्पांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या अभियानांतर्गत, भारताला ऊर्जा-स्वतंत्र बनवण्याची, अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांचे डीकार्बोनाइज (कार्बन मुक्त) करण्याची आणि पर्यायी इंधनाचे उत्पादन, वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याची योजना आहे. या मोहिमेअंतर्गत भारत 2030 पर्यंत 50 लाख टन हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा आहे. विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करू पाहणाऱ्या भारतासारख्या देशांसाठी ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवणे ही सर्वात मोठी गरज आहे, यात शंकाच नाही. आपल्याला आणखीही कारखाने काढायचे आहेत, उत्पादन वाढवायचे आहे, लाखो तरुणांना रोजगार निर्माण करायचा आहे. यासाठी स्वच्छ ऊर्जा लागते.  आजचे वास्तव हे आहे की भारत उर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण नाही.

जीवाश्म इंधन (पेट्रोल-डिझेल) च्या रूपाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दरवर्षी सुमारे बारा लाख कोटी रुपये आयातीवर खर्च करावे लागतात. त्याचबरोबर जनतेला माफक दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे लागते आणि आर्थिक संकटामुळे ते देण्यात अडचणी येत आहेत. सौरऊर्जेचा एक पैलू जो अलिकडच्या वर्षांत चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे सौर पॅनेल आणि संबंधित नवीन तंत्रज्ञानासाठी आपले परदेशावरील अवलंबित्व. तथापि, तरीही काही ठोस योजना सावधपणे अंमलात आणल्यास जनतेला दिलासा देऊन ऊर्जा स्वावलंबन साध्य करता येईल. विशेषत: हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे आणि एकदा कार्यक्षम झाले की ते अनंतकाळासाठी अमर्यादित ऊर्जा प्रदान करू शकते. पण यात काही समस्याही आहेत. यासाठीची एक मोठी अडचण म्हणजे त्याची दाबाखाली साठवणूक करणे, कारण ते अत्यंत स्फोटक आहे आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. 

मात्र राष्ट्रीय हायड्रोजन मिशनमध्ये यासंबंधीच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायड्रोजन इंधन स्वस्त करणे. यालाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोळशापासून मिळणारी वीज महाग होत चालली असून  कोळशाचा तुटवडाही कधी कधी जाणवतो आहे. सध्या तसे हे मोठे संकट नाही. परंतु वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे कोळशाचे भविष्य अंधकारमय दिसून येते. अशा परिस्थितीत, एकतर अणुऊर्जेकडे वाटचाल करणे किंवा हायड्रोजन इंधनासह स्वच्छ उर्जेचे इतर पर्याय वापरणे चांगले होईल. हायड्रोजनचा पर्याय मिळाल्यावर आपल्या देशात कच्चे तेल, कोळसा इत्यादी जीवाश्म इंधनांच्या आयातीत एक लाख कोटी रुपयांपर्यंत घट येऊ शकते. एक अप्रत्यक्ष फायदा असा आहे की यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन 5 कोटी टन कमी होऊ शकते. पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व काढून टाकून देशाला स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे केंद्र बनवणे हा राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. 

हे खरे आहे की हायड्रोजन हे सध्या आपल्या ग्रहावर उपलब्ध असलेले सर्वात स्वच्छ इंधन आहे. परंतु समस्या अशी आहे की पृथ्वीवरील सर्व हायड्रोजन इतर घटकांमध्ये (जसे की पाणी आणि इतर हायड्रोकार्बन्स) बांधलेला आहे. अशा परिस्थितीत तो वेगळे करण्याच्या प्रक्रियेत प्रदूषण होते.  म्हणूनच त्याला स्वच्छ किंवा हिरवा हायड्रोजन म्हणता येणार नाही. अशा समस्यांवर उपाय म्हणजे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. हे उल्लेखनीय आहे की इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे इंधन तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त आहे. सध्या हायड्रोजन इंधन तयार करण्याचे दोन मार्ग आहेत.  पहिली पद्धत म्हणजे हायड्रोजन इंधन इलेक्ट्रोलिसिसद्वारे म्हणजे पाण्यामधून वीज पार करून मिळवणे. दुसरा मार्ग म्हणजे इंधन तयार करण्यासाठी नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन आणि कार्बन वेगळा करणे. इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे उत्पादित हायड्रोजन इंधनामध्ये स्वच्छ ऊर्जा वापरली जाते. 

सौर किंवा पवन ऊर्जा केंद्रातून मिळणारी वीज वापरून इलेक्ट्रोलायझिंग पाण्याने हायड्रोजन वेगळे केले जाते. अशा इंधनाला 'ग्रीन' हायड्रोजन किंवा (जीएच) GH-2 किंवा हिरवे इंधन म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जेबद्दल असा दावा केला जात आहे की त्याचा सर्वात मोठा फायदा तेल शुद्धीकरण, खत निर्मिती, सिमेंट, स्टील आणि अवजड उद्योगांना होईल, कारण तेथे सीएनजी आणि पीएनजी मिश्रित हायड्रोजन इंधन वापरल्यास हे अवजड उद्योग कार्बनमुक्त होतील. सध्या जगातील ग्रीन हायड्रोजनच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, त्याचा स्रोत काय आहे, बाजारातील परिस्थिती काय आहे आणि व्यवहार केलेल्या चलनाचे दर काय आहेत. सध्या जगात ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी सरासरी 300 रुपये प्रति किलो खर्च येतो. नैसर्गिक वायूपासून बनवलेला तो प्रतिकिलो 130 रुपयांपर्यंत असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे ही सरासरीही 250 रुपयांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत या स्वच्छ इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन मिशन खूप पुढे जाऊ शकते. केवळ भारतच नाही तर सध्या जगातील पंचवीस देश ग्रीन हायड्रोजन निर्मितीच्या दिशेने वेगाने काम करत आहेत. 

 स्वच्छ इंधनाला आणखीही काही पर्याय आहेत.  हिरव्या हायड्रोजन व्यतिरिक्त, उसाच्या मोलॅसिसमधून काढलेले इथेनॉल देखील एक स्वच्छ इंधन आहे. ती जाळून निर्माण होणारी वीज ही अनेक अर्थांनी इतर पर्यायांपेक्षा सुलभ आणि चांगली मानली जाते. भारतातही इथेनॉलपासून ऊर्जा मिळवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर बस आणि ट्रेनही चालवल्या जात आहेत. स्वच्छ विजेचा आणखी एक प्रकार आहे. स्वच्छ ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेकडे घेऊन जाते. या संदर्भात भारताचे महत्त्व त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवरून स्पष्ट होते. 2015 मध्ये, पॅरिसमधील हवामान बदल परिषदेत एक उल्लेखनीय पुढाकार घेऊन, भारताने 100 देशांची सौर युती स्थापन करण्याची घोषणा केली. या युती अंतर्गत भारताने 2030 पर्यंत 450 गीगावाट (GW) ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.  यापैकी 100 गीगावाट (GW) चे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. 

याचा अर्थ देशाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश बनवण्याचा मार्ग फारसा अवघड नाही. दरवर्षी सुमारे सहा अब्ज टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखण्यासाठी सौर तंत्रज्ञान 2050 पर्यंत पुरेशी वीज निर्माण करू शकेल. उत्सर्जनाचे हे प्रमाण सध्या संपूर्ण जगाच्या वाहतूक क्षेत्राद्वारे सोडल्या जात असलेल्या कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात आहे. प्रदूषण टाळण्यासाठी अणुऊर्जा हादेखील एक चांगला पर्याय आहे. आता अणुऊर्जा प्रकल्पही पूर्वीपेक्षा खूपच सुरक्षित मानले जातात. पण सध्या भारत आपल्या अणुऊर्जा केंद्रांमध्ये केवळ दोन ते तीन टक्के अणुऊर्जा निर्माण करू शकतो.  अणुऊर्जा प्रकल्प उभारणे तसे खूप महाग आहे आणि  त्याचे मुख्य इंधन असलेले युरेनियम आयात करण्यासाठी ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांवर अवलंबून राहणे हे एक वेगळे संकट आहे. 

पर्यावरणीय कारणांमुळे या प्रकल्पांना प्रचंड विरोध होतो.  याशिवाय पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) येथील थ्री माईल आयलंड, चेरनोबिल (रशिया) आणि फुकुशिमा अणुभट्टीच्या गळतीच्या घटना, जुने आणि जीर्ण अणु प्रकल्प, किरणोत्सर्गी कचऱ्याची विल्हेवाट आणि युरेनियमची कमतरता या समस्या अणुऊर्जेच्या मार्गात अडथळा ठरत आहेत. सौर आणि पवन ऊर्जा हे स्वच्छ इंधनासाठी चांगले पर्याय आहेत, परंतु सौर पॅनेलची देखभाल करणे एक त्रासदायक आहे आणि पवन ऊर्जा अनियमित, व्यापक स्वरूपात पसरलेली आहे आणि निश्चित स्वरूपात पकडणे कठीण आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली 

छोट्या पडद्याची गरज बड्या स्टार मंडळींना

चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा कोणतीही नवीन घोषणा असो, चित्रपटातील कलाकारांना छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागत आहे. रिअॅलिटी शोपासून ते फिक्शन शोपर्यंत, मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. इतकंच नाही तर अमिताभ बच्चनपासून सलमान खानपर्यंत आणि रेखापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांनाच छोट्या पडद्याशी जोडल्याचा आनंद वाटतोय. कोविड-19 दरम्यान ओटीटीचा डंका वाजला. चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांनी ओटीटीला पसंदी देत त्यावरील सिनेमा, वेबसिरीजची मजा लुटली. आता छोटा पडदा मागे पडेल असे लोकांना वाटले, पण त्याने लोकांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले आहे की टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो आजही लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.आता 2023 मध्येही छोट्या पडदा मोठा धमाका करणार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हिट मालिकांच्या आमूलाग्र बदलाची बातमी आली आहे. 2023 मध्ये अनेक नवीन चॅनेल्स सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत.

2023 मध्ये प्रसिद्ध मालिकांमध्येही काही नवे बदल आणि नवा अंदाज दिसून येणार  आहे. निर्माता असित मोदी यांच्या मते यावर्षी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. ही मालिका गेली कित्येक वर्षे पेक्षाकपसंदीच्या टॉप 10 मध्ये आहे. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची जागा लवकरच नवे कलाकार घेतील. यासाठी असित मोदी खास पत्रकार परिषद घेऊन नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत. 2023 मध्ये पोपटलालचे लग्न आणि दयाबेनची एंट्री  होण्याची शक्यता आहे. मात्र दयाबेन दिशा वाकानी आहे की नवीन अभिनेत्री, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगला टीआरपी  असलेल्या 'अनुपमा' मालिकेमध्येही बरेच काही नवीन बदल दिसणार आहे.  'अनुपमा'मध्ये नवीन रोमँटिक ट्रॅक देखील पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी 2023 मध्ये 4000 भाग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका नवीन नात्याची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर 'भाभी जी घर पर है' या अँड टीव्हीवरील  सर्वात हिटमालिके मध्ये नवीन पात्रांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.  त्याचे शूटिंग दुबईत नवीन ठिकाणी केले जाऊ शकते.  यामध्ये हॉरर कॉमेडीही दाखवण्यात येणार आहे. 

2023 मध्ये अनेक नवीन शो प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अनेक सुरुही झाले आहेत. जसं की, 'वागले की दुनिया' (ही मालिका 1988 मध्ये आली होती.) ही मालिका 2023 मध्ये नवीन पद्धतीने सादर केली जात आहे. याशिवाय बॅरिस्टर बाबू भाग 2, दुर्गा आणि चारू याआधीपासूनच प्रसारित होऊ लागले आहेत. 'धर्मपत्नी'चेही प्रसारण होत आहे. देव जोशी अभिनीत सब चॅनलचा प्रसिद्ध शो बालवीर सीझन 3 नव्या वर्षात 2 जानेवारीपासून प्रसारित होऊ लागला आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर ब्युटी अँड द बीस्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित मालिका घेऊन येत आहे ज्यात कुशल टंडन मुख्य भूमिकेत आहे. करण कुंद्रा, गश्मीर महाजनी आणि रिम शेख यांचा हॉरर रोमँटिक शो 'भेडिया' लवकरच कलर्स वाहिनीवर येणार आहे. स्टार प्लसवर 'तेरी मेरी डोरिया', झी टीव्हीवर 'मैत्री', सोनी सबवर 'ध्रुव तारा' लवकरच येणार आहेत. सुष्मिता मुखर्जी आणि काजल चौहान अभिनीत 'मेरी सास भूत है' रिलीजसाठी सज्ज आहे.

अग्निसाक्षी एक समझौता आणि त्रिकोणी प्रेमकथा इश्क में घायलं लवकरच कलर्स वाहिनीवर दिसणार आहे. मास्टर शेफ सीजन 7 स्टार प्लसवर शरारत 2 आणि थोड़ा जादू थोड़ी नजाकत, स्टार भारतवर मन की आवाज प्रतिज्ञा 2, स्टार प्लसवर रुद्रकाल, जी टीवी वर रब से दुआ, शेमारू उमंग चॅनलवर राजमहल दाकिन्न का रहस्य, सोनी टीवीवर कथा अनकही, सब टीवीवर दिल दिया गल्ला ,स्टार भारतवर आशाओं का सवेरा धीरे-धीरे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.जुनून चित्रपटावर आधारित बाघीन या मालिकेव्यतिरिक्त मोलकी सीझन 2 रिलीजसाठी सज्ज आहे. या व्यतिरिक्त 2023 मध्ये प्रसिद्ध रियलिटी शो कपिल शर्मा शो, बिग बास 17, डांस दीवाने, झलक दिखला जा, डांस प्लस इत्यादी रियलिटी आणि डांस शोदेखील नव्या अंदाजात प्रदर्शित होणार आहेत. छोट्या पडद्याची ही नवीन तयारी आणि त्याची प्रचंड लोकप्रियता बघता असा निष्कर्ष निघतो की मोठ्या पडद्याचा दबदबा असो की ओटीटीचा, परंतु प्रत्येक घराघरात पोहोचलेला छोटा पडदा, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची क्रेझ कधीच संपणार नाही. छोटा पडदा लहान असला तरी त्याचा प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड आहे.

Thursday, January 12, 2023

ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा यंदाही कायम

हिंदी सिनेमाची सुरुवात पौराणिक, धार्मिक बरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूकपटाने झाली होती.याचं कारण हे की जनमानसात यांच्याशी जुडलेल्या गोष्टी, किस्से,कथा-कहाण्या आणि घटना माहीत होत्या,लक्षात होत्या आणि भाषेशिवाय सिनेमा समजून घ्यायला सोपे पडत होते. नंतर सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनण्याचा काळ सुरू झाला. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमे प्रत्येक दशकात बनू लागले. आजदेखील सिनेनिर्मात्यांना त्यात स्वारस्य असल्याचे आगामी चित्रपटांच्या घोषणांवरून दिसून येत आहे. मूकपटाच्या काळात लोकप्रिय पौराणिक कथांवर सिनेमे बनवण्याचा एकप्रकारे पूरच आला होता. रामायण आणि महाभारत संबंधित सिनेमे मोठ्या प्रमाणात बनले. 'कंस वध', 'लव कुश', 'कृष्ण सुदामा', 'महाभारत', 'वीर अभिमन्यू', 'राम रावण युद्ध', 'सीता वनवास' सारखे सिनेमे मोठ्या प्रमाणात पसंद केले गेले. याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनलेल्या ‘सम्राट अशोक’, ‘कालिदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रपति संभाजी’, ‘राणा प्रताप’ आदी  मूकपटांना सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नंतर सामाजिक सिनेमांचा काळ आला. 

मूकपट लोक मोठ्या चवीने पाहत होते कारण, लोकांसाठी पडदयावरच्या हालत्या-डुलत्या सावल्या त्यांच्यासाठी आश्चर्याचा विषय होता. ऐतिहासिक सिनेमांना लोकांनी पसंद केल्याने मोठ्या संख्येने अशा सिनेमांची निर्मिती व्हायला लागली. बहुतांश सिनेमे राजा-महाराजा,प्रसिध्द योद्धे आणि संतांच्या जीवनावर बनत होते. ऐतिहासिक सिनेमे प्रत्येक काळात बनले आणि आजदेखील बनत आहेत. स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचा जोर वाढला. या काळात सशक्त दावेदार होते सोहराब मोदी आणि त्यांची कंपनी मिनर्वा मूविटोन.त्यांनी 'पुकार', 'सिकंदर', 'पृथ्वीवल्लभ', 'मिर्झागालिब' सारखे सिनेमांची निर्मिती केली. 1952 मध्ये त्यांनी 'झांशी की रानी' चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात झांशीच्या राणीची भूमिका त्यांची पत्नी मेहताब यांनी साकारली.

यानंतर दोन वर्षांनी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली,ज्याचे लेखन राजेंद्र सिंह आणि सआदत हसन मंटो यांनी केले. या काळात कोणी मुगल सम्राटांच्या जीवनावर आधारित तर  कुणी शिवाजी महाराज आणि मराठा शासकांवर चित्रपट बनवत होते. स्वातंत्र्यानंतर एका बाजूला ‘सलीम अनारकली’ ‘मुगले आजम’, ‘जहांगीर’, ‘ताजमहल’ सारखे काही भव्य चित्रपट बनले, तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीवर आधारित ‘हकीकत’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘शहीद’ सारखे काही यशस्वी पीरियड चित्रपटदेखील पाहायला मिळाले. हिंदी सिनेमा क्षेत्रातील त्रिमूर्ती- राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद-यांच्या दशकांनंतर जेव्हा बॉलीवुडमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान या तिकडीचा दबदबा वाढला तेव्हाही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. अलीकडेच काही वर्षांत बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये  कंगना रानौत अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मणिकर्णिका’, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह अभिनीत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पदमावत’, ऋत्विक रोशन अभिनीत ‘मोहेनजोदड़ो’ आणि ‘जोधा अकबर’.आमिर खान अभिनीत ‘मंगल पांडे’ आणि शाहरूख खानचा ‘अशोका’ आदी चित्रपटांनी हिंदी सिनेमा क्षेत्रात आपले स्थान बनवले.

ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करणं जितकं कठीण तितकंच रिलीज दरम्यान विवादावरून टीकाकारांना सामोरं जाणं कठीण असतं. खासकरून भारतात चित्रपटांच्या रिलीज दरम्यान दुखावलेल्या भावनांना वाट मोकळी केली जाते. खरं तर प्रत्येक दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाला वाद विवादाचा सामना करावा लागतो. संजय लीला भसांळी यांच्या ‘पद््मावत’ चित्रपटाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतकंच काय या वादामुळे चित्रपटाच्या नावात बदल करावा लागला. त्यानंतर  ‘मणिकर्णिका’, 'सम्राट पृथ्वीराज' दरम्यानदेखील  अनेक वाद समोर आले. आमिर खानच्या ‘मंगल पांडे’ मधील एक चुंबन दृश्य आणि काही अन्य दृश्यांबाबत चित्रपटावर विवाद उभा राहिला. अशाच प्रकारे संजय लीला भंसाळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘जोधा अकबर’ मध्ये ऐतिहासिक भूमिकांमध्ये  छेडछाड केल्याप्रकारणावरून विवाद उभा राहिला. अशा चित्रपटांसाठी 200 ते 300 कोटी रुपये लागलेले असतात,त्यामुळे निर्मात्यांवर मोठा ताण येतो.

गेल्या वर्षभरात आलेल्या बहुचर्चित चित्रपटांवर नजर टाकल्यास वेगवेगळ्या बायोपिक आणि इतिहासपटांचंही त्यात नाव दिसतं. पण सत्य इतिहास आहे तसा मांडण्याऐवजी या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा कल वास्तव घडामोडींना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिरंजित कल्पकतेने मांडण्याकडे दिसून आला. त्यातून बरीचशी राजकीय, सामाजिक आणि पर्यायाने आर्थिक गणितही साधली गेली.  गेल्या वर्षी अशा धाटणीचे बरेच सिनेमे  आले, त्यातल्या काहींना चांगलं यश मिळालं तर काही दणकून आपटले. त्यातल्या फ्लॉप सिनेमांची यादी करायची तर यशराज फिल्म्सच्या 'सम्राट पृथ्वीराज' चं नाव आधी घ्यावं लागेल. अक्षय कुमारने यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती. आशुतोष राणा, संजय दत्त, साक्षी तन्वर, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा चालला नाही. त्यानंतर ब्रिटिश सत्तेच्या कालखंडातील गोष्ट घेऊन आलेल्या 'समशेरा' लाही अपयशाचं तोंड पाहावं लागलं. 2015 ला घडलेल्या दोहा- कोची विमान दुर्घटनेवर आधारित 'रनवे 34' हा सिनेमाही फारसा चालला नाही. 

एकीकडे बॉत्लीवूड यशापयशाच्यया  गर्तेत गटांगळ्या खात असताना, प्रादेशिक सिनेमांनी मात्र वेगवेगळ्या इतीहासपटांच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखण्यात यश मिंळ्ठवलं.  यातलं  सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘आरआरआर’ हा तेलुगू सिनेमा. या सिनेमात अल्लूरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोखद्ध्यांच्या जीवनातल्या एका कालखंडाचं कल्पकतेने सादरीकरण केलं गेलं होतं. दिग्दर्शक मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा 'पे पेन्नीयीन सेल्वनप 1 "ही याच वर्षी रिलीज झाला. चोल राजवटीवर आधारित असलेल्या या सिनेमाने 500 कोटींहून अधिक कमाई करत तिकीटनबारीवर आपलं वर्चस्व राखलं. एप्रिल 2023 मध्ये या सिनेमाचा दुसरा भागही येतोय. 

या वर्षात ऐतिहासिक सिनेमांचीही मोठी लाट उसळणार आहे.  दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने दिल्लीतल्या मुघल राजवटीवर आधारित 'तख्त'  या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलही यावर्षी 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलुगू सिनेमात औरंगजेबाचं पात्र रंगवताना दिसणार आहे. कुतुबशाहीतल्या एका अनाम वीराची शोर्यगाथा सांगणार्‍या या सिनेमात “पॉवर स्टार' पवन कल्याण प्रमुख भूमिका साकारणार आहे. 1818 मध्ये लढली गेलेली भीमा - कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. या लढाईत महार 'योद्ध्यांच्या मदतीने इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. पेशवाईत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं लढवय्या स्वरूप या लढाईमुळे समोर आलं. यावर आधारित 'द बॅटल ऑफ भीमाकोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या ऐतिहासिक लढाईच्या नायकाची म्हणजेच सिदनाक इनामदाराची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल साकारतोय. गेल्या काही वर्षांत देशाच्या वैचारिक वर्तुळात गांधी विरुद्ध गोडसे आणि गांधी विरुद्ध सावरकर या राजकीय वादांनी थैमान घातलंय. त्याचे पडसाद वेळोवेळी साहित्यातून, नाटकांमधून उमटलेत. आता पुन्हा मोठ्या पडद्यावरही हा वाद नव्याने जिवंत केला जाणार असून, त्यांच्या निर्मिती आणि तिकीटबारीवरच्या व्यवसायात होणारा राजकीय हस्तक्षेप हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुडा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे सप्टेंबर 2022 मधे रणदीपने मांजरेकरांच्या ऐवजी आपण हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. 'गांधी गोडसे - एक युद्ध' हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमा या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होतोय. महाभारतातील कर्ण याच्या जीवनावर आधारित ‘महावीर कर्ण’, ज्यात अभिनेता विक्रम आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी दिसणार आहेत. हा पौराणिक चित्रपट कन्नड़, हिंदी, मल्याळम, तामिळमध्ये रिलीज होणार आहे.500 कोटी रुपये खर्च झालेला 'आदिपुरुष' चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आहे आणि जून 2023 मध्ये रिलीज होणार आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, January 9, 2023

पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय पक्ष्यांसाठी जीवघेणा

देशाच्या अनेक भागांतील लोक अनेक प्रसंगी आणि विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याच्या राजस्थान, गुजरातेतला खेळ आता महाराष्ट्रातही लोकप्रिय जोर धरू लागला आहे. पण, पतंग उडवण्यामुळे दरवषीर् अनेक पक्ष्यांना प्राणाला मुकावे लागते, याकडे आपले दुर्लक्षच होते. याचे कारण आहे, ग्लास कोटेड मांजा. या काचऱ्या मांज्यामुळे दिवसा आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. हा मांजा त्यांच्या गळ्यात, पायात किंवा पंखांमध्ये अडकला जाऊन कापल्याने त्यांचा हकनाक बळी जातो. अनेकदा, पतंग मांज्यासहीत झाडाला लटकतात. मांजा सहजासहजी डोळ्यांना दिसत नसल्याने मांज्याच्या गुंत्यामध्ये पक्षी अडकले जातात आणि त्यांना जखमा होऊन प्राण गमवावे लागते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्लास कोटेड मांज्यांवर बंदी आणण्यासाठी 'पेटा' (पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेण्ट ऑफ अॅनिमल्स) ने प्रयत्न केले होते पण, त्याला यश मिळू शकले नाही. या मांज्यामुळे केवळ पक्षीच नाही, तर दुचाकीचालकांचाही मृत्यू ओढावतात.  बंदी असूनही हा दोरा बाजारात कसा उपलब्ध होता, हा एक गहन प्रश्नच आहे. 

बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे नागपुरातील एका 5 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी  घडली. तिच्या गळ्याला 26 टाके पडले. ही मुलगी मरता मरता बचावली आहे. पुण्यात मकरसंक्रांतीच्या दरम्यान दरवर्षी सरासरी 80 पक्षी जखमी होतात तर 20 पेक्षा अधिक पक्ष्यांचा मांज्यात अडकून तडफडून मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे.या जीवघेण्या मांज्यामुळे नाशिक आणि नागपूरमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यातच आता मुंबईतही एका पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा कापल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. मांज्यामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

वास्तविक, आपल्या आनंदासोबतच आपण मुक्या पक्ष्यांबद्दलही संवेदनशील असायला हवे. आपला तो आनंद सर्वात बेढब असतो, जो दुसऱ्यासाठी जीवघेणा किंवा वेदनादायक ठरतो. आपला जीव गमावलेला कोणी  मुका प्राणी किंवा पक्षी असेल, ज्याला आपल्या वेदना व्यक्तही करता येत नसेल, तर ही शोकांतिका आणखीनच भयानक होते. गेल्या काही वर्षांपासून विविध सणांच्या दिवशी पतंग उडवल्याने हजारो निष्पाप पक्ष्यांचा बळी जातो. गेल्या वर्षी एकट्या अहमदाबाद शहरात 141 आणि 15 जानेवारी 2022 म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पतंग उडवताना 500 हून अधिक पक्षी जखमी झाले होते, अनेकांचा तात्काळ मृत्यूही झाला होता. 

समाधानाची बाब म्हणजे अहमदाबादमध्ये पतंगाच्या दोरींमुळे जखमी झालेले बहुतांश जखमी पक्षी वाचले, कारण केवळ अहमदाबादमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात गुजरात सरकारने 'संवाद पक्षी आणि प्राणी' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 'करुणा अभियान कार्यक्रम' सुरू केला होता. हेल्पलाइन चालवली होती. या मोहिमेअंतर्गत मकर संक्रांती आणि दुसऱ्या दिवशी राज्यभरात 600 हून अधिक पक्षी निदान केंद्रे उभारण्यात आली, ज्यामध्ये 620 हून अधिक डॉक्टर आणि 6,000 हून अधिक स्वयंसेवकांनी आपली सेवा दिली. एकट्या अहमदाबाद शहरात 11 आणि 15 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या एका मोठ्या शिबिरात 12 डॉक्टर आणि 85 स्वयंसेवकांनी रात्रंदिवस आपली सेवा दिली.  अशा उपक्रमाचे  कौतुक कराल तितकं कमीच आहे. 

या प्रकरणातील खेदाची बाब म्हणजे देशातील बहुतांश भागात पक्ष्यांबाबत लोकांमध्ये संवेदनशीलता दिवून येत नाही. कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीसह इतर प्रसंगी पतंगबाजीमुळे हजारो मुके पक्षी जखमी होतात आणि शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे कायद्याने बंदी असतानाही चीनमधून आयात केलेल्या काच मिश्रित पतंगाचा दोरा म्हणजेच मांझा पक्ष्यांचा सर्वाधिक बळी घेतो आहे. पक्षीच  नाही, तर हा धोकादायक मांजा दरवर्षी अनेक माणसांचाही बळी घेत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये राजधानी दिल्लीतील बदरपूर भागात एका डिलिव्हरी बॉयचा वेदनादायक मृत्यू झाला होता. ही काही वेगळी घटना नाही.  गेल्या काही वर्षांत राजधानीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार या चायनीज मांजामुळे अर्धा डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

धोकादायक मांजासह केली जाणारी पतंगबाजी मुक्यासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतही पतंगबाजीमुळे हजाराहून अधिक पक्षी जखमी झाले होते, त्यात 90 टक्क्यांहून अधिक पक्ष्यांना खोल जखमा झाल्या होत्या. अनेकांची मान पूर्णपणे कापण्यात आली होती. यावरून पक्ष्यांसाठी किती हे धोकादायक आहे याचा अंदाज येतो. हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2017 मध्ये चायनीज आणि धातूच्या मांजावर बंदी घातली होती, पण ना मांजा विकणारे दुकानदार आणि ना तो खरेदी करून पतंग उडवण्याचा आनंद लुटणारे लोक या कायद्याचे पालन करताहेत. याचा परिणाम असा होतो की,इकडे आपण सण साजरा करत असतो, तेव्हा तिकडे आपल्या निष्काळजी कृत्यांमुळे हजारो पक्ष्यांचा जीव धोक्यात येतो. गेल्या वर्षी गुजरात सरकारने लोकांना संक्रांतीच्या दिवशी पतंग न उडवण्याचे आवाहन केले होते आणि पतंग उडवलेच तरी बंदी असलेला चीनी आणि मॅटेलिक धागा वापरू नये. पण सर्व लोकांमध्ये संवेदनशीलता जागृत झाली नाही आणि हजारो पक्षी मारले गेले. आणि आता अशी वेळ आली आहे की, या घटनांमधून धडा घ्यावा आणि काही तासांच्या आनंदासाठी पक्ष्यांचे आयुष्य संपवू नये. म्हणूनच या वेळी मकर संक्रांत किंवा इतर कोणत्याही प्रसंगी पतंग उडवण्याचा आनंद घेताना, या मुक्या पक्ष्यांच्या जीवनाचा जरा विचार करा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली