Tuesday, December 25, 2012

बालकथा : सल्ला देण्यापूर्वी…


     एका झाडावर पक्ष्यांची वस्ती होती. ते सगळे अनेक दिवसांपासून तिथे राहत होते. सगळ्यांचे एकमेकांशी एका कुटुंबाप्रमाणे नाते जुळले होते. कोणी एखादा संकटात सापडला, तर सगळे त्याच्या मदतीला धावून जायचे. अथवा कोणी काही खास वेचून  आणले  तर ते आपापसांत वाटून खायचे. अशा प्रकारे मोठ्या आनंदात दिवस चालले होते.
     दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याला जोमदार  सुरुवात झालेली होती. पाऊस जोराचा  पडत होता. मधेच थंडगार  वारा सुटायचा. त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास व्हायचा. एक दिवस जोराचा पाऊस सुरू होता. चिंब भिजल्यावस्थेत एक माकड झाडाखाली आले. भिजल्यानं कुडकुडत असलेल्या माकडाला पाहून एक चिमणी म्हणाली," तू तुझं स्वतःच घर का बांधत नाहीस?"  झाडातून अचानक आवाज आल्याने  माकडाने चमकून वर पाहिले. एक चिमणी आपल्या घरट्याबाहेर डोके काढून दयेने माकडाकडे पाहात होती. तो चिमणीला म्हणाला," वेडपट कुठली? आपल्या कामाशी काम राखावं. नसत्या कुणाच्या भानगडीत पडू  नये." आणि मग तो स्वतःशीच बडबडू लागला. " काय दिवस आले आहेत? ही एवढीशी चिमणी मला शहाणपणा शिकवते आहे. " त्याला तिचा भयंकर राग आला. 'याचा तिला धडा शिकवायलाच हवा. आत्ताच तिचा जीव घेतो.''
     मग तो चिमणीला म्हणाला," मला अडचणीत पाहून तुला दु:ख वाटायचं कारणच काय? ज्याला कुणाला सल्ल्याची गरज असते, त्याला सल्ला द्यावेत,  हे तुला कुणी शिकवलं नाही काय?  तू तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव आणि तुला सल्ला द्यायचाच असेल तर जे घाबरट लोकांना द्यायचे. मला नाही." असे म्हणत पटकन माकड झाडावर चढले. त्याने तिचे घरटे मोडून तोडून टाकले.    त्यामुळे म्हटल जातं की, सल्ला देण्यापूर्वी सावधानता बाळगायला हवी.  कारण मूर्ख माणूस सल्ल्यांना जुमानत तर नाहीच, शिवाय आपल्याला नुकसान पोहचवतो.

Sunday, December 23, 2012

बालकथा: कोल्हापुरी

     एक होती चप्पल. तिचे नाव होते कोल्हापुरी. कोल्हापुरी मोठी जिद्दी होती. दुकानदाराने रामरावदादाला तिला  विकल्यानंतरही ती त्याच्यासोबत गेली नाही. म्हणाली," मी इथेच राहणार. मला दिवसभर शेतात काम करायला आवडत नाही. मला थंड हवेत राहायला आवडते. इथे मस्त थंड हवा आहे."
     कोल्हापुरीच्या जिद्दीपुढे हात जोडत दुकानदार म्हणाला," अगं बया! माझी पाठ सोड. बोहनीचा टाईम आहे, मला धंदा करू दे. तू आपली रामरावदादांसोबत निघून जा." कोल्हापुरीला जायचं नव्हतं, त्यामुळे  ती गेली नाही. रामरावदादा निघून गेला. बिच्चारा दुकानदार डोके धरून बसला.
     एक दिवस तर दुकानदारला कोल्हापुरीचा भयंकर राग आला. तिच्या नकारामुळे धंद्यावर परिणाम व्हायला लागला होता. त्याने विचार केला, तिला आता विकण्यापेक्षा अशीच फेकून देऊ.  आणि खरोखरच एक दिवस त्याने रात्री दुकान बंद करताना तिला जोडीदारीणसह आपल्या दुकानाच्या पाठीमागच्या रस्त्यावर फेकून दिले आणि गपगुमानं घरी निघून गेला.
     रात्री त्याला छान झोप लागली. आपण एका मोठ्या संकटातून सुटलो, याचा त्याला आनंद झाला होता. दुसर्‍यादिवशी दुकानदार आपल्या दुकानात बसला असताना त्याचा कवी मित्र विलासराव आला. "काय रे, निवांत बसला आहेस. कसला रे तू रसहीन माणूस. काही वाचत तरी जा."
     " ये, विलास ये!  पण बाबा तुझा तो रसिकतेचा डोस तेवढा देऊन नकोस." दुकानदार
     "बरं बाबा, राहिलं..." असे म्हणून त्याने आपल्या शबनमी बॅगेतून एक जोड चपल बाहेर काढली.  त्या पाहून   दुकानदार उडालाच." काल मागच्या रस्त्याने  निघालो होतो, तर या नव्या कोर्‍या चपला दिसल्या. वाटलं, चोरांनी लांबवताना पडल्या असतील तुझ्या दुकानातून. हे घे ठेव." असे म्हणत कवी महाशयाने चपला समोर ठेवल्या आणि   उत्तरादाखल आभाराची  अपेक्षा न करताच उठून निघून गेला.
     दुकानदाराचं आता डोकं ठणकायला लागलं. त्याने कविमहाशयांना हजारदा कोसत राहिला.
     "नमस्कार, मामा" अचानक दुकानदाराचे ध्यान भंगले.
     "अरे, तू कधी आलास? ये, ये आत बस."
     " हे काय, आताच येतो आहे. सगळं काही ठीक आहे ना?" बसता बसताच भाचाने विचारलं. यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. दोन दिवस थांबल्यानंतर भाचा जायला निघाला तेव्हा दुकानदारने संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. तो एक जोड चप्पल आपल्या भाच्याला देत म्हणाला, " ही जोड घे आणि आपल्या वडिलांना दे. त्यांना माझा नमस्कार सांग."
     चपलांसह भाच्याने निरोप घेतला तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.
     एक दिवस दुकानदारचा मेहुणा त्याला भेटायला आला. थोडा वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.  जाताना मेव्हण्याने आपल्या पिशवीतून एक जोड चप्पल बाहेर काढली आणि ती देत म्हणाला," भाऊजी, ही घ्या, तुमच्यासाठी खास कोल्हापुरी आणली आहे." चपलाचे खोके पाहून त्याला फार आनंद झाला. मनातल्या मनात म्हणाला, बरं झालं, एक जोड गेली आणि एक जोड आली.आपलं काही नुकसान झालं नाही"
     मेहुणा गेल्यावर त्याने खोके उघडले तर तीच ती कोल्हापुरी. तो हादरलाच! त्याला दरदरून घाम फुटला. ती हसत म्हणाली," काय शेठ! मी म्हणत होते ना की इथून जाणार नाही. इथली थंड हवा मला आवडते. "
     "तुझा मेव्हणा तुझ्या भाच्याकडे गेला होता. त्याच्या वडिलाने मला तुझ्या मेव्हण्याकडे सुपूर्द केलं... ही ही ही "
     "कोल्हापुरी!" ओरड्त दुकानदार तिथेच बेशुद्ध पडला.                                      

Sunday, December 16, 2012

बालकथा: दानशूर कर्णाची गोष्ट

काल करे सो आज कर,
आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी,
बहुरि करोगे कब॥
     जितक्या काही महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यांनी संत कबीरदास यांचा हा दोहा आत्मसात केला असल्याचे दिसते. अशा या महान व्यक्तींमध्ये महाभारतातल्या दानशूर कर्णाचाही समावेश होतो. चला, जाणून घेऊ, या महादानी कर्णाच्या आयुष्यातला असाच एक छोटासा प्रसंग!
     एकदाची गोष्ट. कर्ण आपल्या दरबारात बसला होता. तो कसल्याशा  कामात दंग होता. इतक्यात त्याच्या दरबारात एक याचक आला. त्याने हात फैलावत कर्णाकडे दान मागितले. कामात असलेल्या कर्णाने याचकाचा आवाज ऐकला. लगेच त्याने आपल्या डावा हात वर उचलला आणि आपल्या गळ्यातला हार काढला आणि याचकाच्या हातात दिला. कर्णाची ही कृती एक दरबारी पाहात होता. तो लगेच कर्णाजवळ आला आणि प्रश्न उपस्थित करत म्हणाला,"महाराज, क्षमा असावी. पण डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, हे आपल्याला ठाऊक असतानाही आपण त्या हाताने दान दिलंत. असा हा अधर्म आपल्या हातून कसा काय घडला?"
     कर्णाने उत्तर दिलं," याचकाने मला दान मागितलं. त्यावेळेला माझ्याजवळ गळ्यातल्या हाराव्यतिरिक्त काहीही नव्हतं. माझा उजवा हात कामात गुंतलेला होता. मी माझा उजवा हात कामातून मोकळा करून दान देण्याचा विचार केला असता तर कदाचित वेगळं घडलं असतं. कदाचित माझा विचार बदलला असता आणि मी त्याला माझा हार देऊ शकलो नसतो. पलभरात काय घडेल, हे कोणाला सांगता येत का? त्यामुळे माझ्या मनात विचार आल्या आल्या, त्याची अंमलबजावणी केली आणि माझ्या डाव्या हाताने हार काढून दान दिला."
     महान व्यक्ती क्षणाक्षणाला किती महत्त्व देत होते, याचा हा एक उत्तम नमुना. विचार आला की, क्षणात त्याची अंमलबजावणी करणार्‍या व्यक्तीला जीवनातील सर्वोच्च उंची गाठणं काही अवघड नाही. म्हणूनच लक्षात ठेवा मित्रानों, कल करे सो आज कर, आज करे सो अब...। वेळच्या वेळी काम करणार्‍याला कधीच कुठला मानसिक त्रास होत नाही. कामे वेळच्या वेळी करणारा कधी सुखी असतो.

बालकथा: सन्मार्ग


     रामपूर गावात सुरेश नावाचा एक गरीब, कष्टाळू आणि अत्यंत साधाभोळा शेतकरी राहात होता. आपल्या थोड्याशा शेतात जे काही पिकायचं, त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायचा. सुरेश दयाळू होता. इतरांच्या मदतीला धावायचा. प्राणीमात्रावर प्रेम करायचा. एखादा प्राणी-पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला तर त्याच्यावर मलमपट्टी करायचा, त्याला आसरा द्यायचा. सुरेशच्या शेजारी रमेश राहात होता. तो त्याच्या अगदी उलट्या स्वभावाचा होता. तो भोळ्याभाळ्या माणसांना ठकवायचा, फायदा उपटायचा.
     एक दिवस सुरेश शेतात काम करीत असताना त्याच्या पुढ्यात एक जखमी पक्षी पडला. त्याने वर पाहिले तर घार होती. त्याने पटकन तो जखमी पक्षी उचलला. त्याला पाणी पाजले आणि घरी घेऊन आला. त्याच्या जखमेवर मलम लावले. त्याला अंथरुणात झोपवले आणि तो परत शेतात जायला निघाला. तो दरवाजाकडे वळला तोच  एक मंजुळ स्वर त्याच्या कानी पडला. त्याने वळून पाहिले तर समोर एक सुंदर स्त्री उभी होती. ती म्हणाली," सुरेश, मी वनदेवी. तुझ्या नि:पक्ष सेवेने मी फार प्रसन्न झाले आहे. तुला हवा तो वर माग, मी देईन."
     सुरेश हात जोडून म्हणाला," माते, मला काही नको. तुझे दर्शन झाले, यातच मी धन्य पावलो. वनदेवी आणखी प्रसन्न झाली. तिने सुरेशला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक थैली दिली आणि अदृश्य झाली. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. रमेशला कळले तेव्हा, त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने ती थैली चोरण्याची योजना बनवली. त्याच रात्री तो संधी साधून सुरेशच्या घरात घुसला. सुरेशच्या कुत्र्याने त्याला पाहिले तसे त्याने भुंकत जाऊन रमेशची पिंडरीच पकडली. रमेश जोरजोराने किंचाळू लागला. त्याच्या ओरडण्याने सुरेश जागा झाला. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुरेशच्या चोरीचा इरादा समजल्यावर सगळे त्याला मारायला धावले. सुरेशने त्यांना थांबवले. आणि समजावून परत पाठवले. रमेशने सुरेशचे पाय पकडले आणि माफी मागितली.
     तो म्हणाला, सुरेश, तू खरोखरीच महान आहेस. मी तुझे अहित करण्याच्या हेतूने आले होतो. पण तरीही तू मला वाचवलंस. मला माफ कर." सुरेश म्हणाला," तुला क्षमा मागायचीच असेल तर स्वत; ची माग. चोरी करून तू तुझे इमान डागाळायला निघाला होतास. अरे, प्रामाणिकपणाने जगणार्‍याच्या पाठीशी देव असतो. इथून पुढे इमान राखून जगायला शिक. तू सगळ्या संकटातून मुक्त होशील." रमेशने तसे राहण्याचे वचन दिले. आणि प्रामाणिकपणे जगू लागला.                                                                 

Friday, December 14, 2012

श्रद्धाळू बनवण्याचा बाजार

अलिकडे माणूस अंधश्रद्धाळू अधिक होत चालला आहे. आणि त्याला आणखी श्रद्धाळू बनवण्याचा बाजार अनेक क्लृप्त्या लढवून मांडला जात आहे, त्याला माणूस बळी पडत चालला आहे. एखादी दुर्मिळ योग जुळून  येणार असेल तर, तो  कोणत्या राशीतल्या लोकांना  शुभ आहे व कोणत्या राशीतल्या लोकांना   अशुभ आहे, याबाबत फलज्योतिषी सांगत असतात. त्याचे उदात्तीकरण करण्याचे काम अलिकडे मिडिया जोमात करत आहे. त्यामुळे अशा माणसांचे फावले असून ही माणसे   अशुभतेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही कर्मकांडेही सूचवत असतात. खरे तर  कोणतीही तारीख शुभ वा अशुभ असत नाही.त्यामुळे १२-१२-२0१२ही तारीखसुद्धा  शुभ असण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
     १२-१२-२0१२ याबाबत काहींनी संकेत दिल्याचा गवगवा निर्माण करण्यासाठी वर्षाचे दोन अंक गाळून १२-१२-१२ असे आकडे नजरेसमोर ठेवून शुभ व अशुभ योगाबद्दल सांगितले गेले किंवा सांगितले जाते.यातही १२ वा.१२ मि.१२ सेकंद ही वेळ शुभ कामासाठी विचारात घेतली जाते.  प्रत्येकजण आपापल्या परिने शुभ कामाचे आयोजन करतो अथवा  सुवर्ण खरेदीसारखे व्यवहार करतो.वास्तविक १२ ही तारीख  व १२ वा महिना ह्या दोनच बाबी जुळतात. वर्षाचा आकडा हा २0१२असा आहे.वेळेच्या बाबतीत उल्लेख करायचा झाल्यास जेव्हा १२ वाजतात. तेव्हा 00 लिहिण्याची पद्धत आहे.
म्हणजेच १२ वाजल्यानंतरची वेळ ही 00.१२.१२ अशी येईल.त्यामुळे पूर्णत: १२ चा योग साधत नाही व योग साधला तरी त्यात शुभ असे काहीही नसते.
ज्या सध्या प्रचलीत असलेल्या कॅलेंडरची १२-१२-२0१२ ही तारीख आहे.ते कॅलेंडर ग्रेगेरी नावाच्या पोपने 'ख्रिस्तोफर क्लॅव्हिन्स' नावाच्या खगोल शास्त्रज्ञाकडून १५८२साली करवून घेतले व त्याची अंमलबजावणी १५ ऑक्टोबर १५८२ पासून आहे.हे कॅलेंडर, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी घेण्यास लागणार्‍या कालावधीवर म्हणजेच ऋतुचक्राशी संबंधित असणार्‍या सांपत्तीक वर्षावर (ट्रॉपीकल इअर) आधारित आहे.हा कालावधी ३६५.२४२५ दिवसांचा, म्हणजेच ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनीटे ४५.५१ सेकंदाचा आहे.या कालावधीशी जुळवून घेण्यासाठी जे ग्रेगेरीयन कॅलेंडर तयार करण्यात आले त्याचा कालावधी मात्र ३६५.२४२५ दिवसांचा आहे.म्हणजे यात 0.000३ दिवसांची त्रृटी आहे.त्यामुळे या कॅलेंडरमध्ये ३000 वर्षानंतर अल्पशी दुरूस्ती करावी लागेल, असे यातले जाणकार सांगतात. तद्वतच कोणते वर्ष लिप इअर म्हणून घ्यावे अथवा कोणते शतकवर्ष लिप इअर घेऊ नये, कोणत्या दिवसाचा कालावधी सेकंदाने वाढवावा इत्यादी तरतुदी ह्या कॅलेंडरमध्ये करण्यात आलेल्या आहेत.
     मात्र दि.१२-१२-२0१२ ही तारीख किंवा वर्षातील कोणतीही विशिष्ट तारीख ही शुभ किंवा अशुभ राहील याबाबत उल्लेख नाही. अर्थातच हे मानवी मनाचे खेळ आहेत यात शंका नाही.  अशा प्रकारचा काही तरी दुर्मिळ योग सांगत लोकांना फशी पाडण्याचेच काम काही मंडळी करीत असतात. लोकांनी  कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे न लागता तारीख आणि वेळेच्या बाबतीतील शास्त्रीय बाजू समजून घ्यायला हवी.         

Wednesday, December 12, 2012

बालकथा : प्रामाणिक चोर

चंदरपूर राज्यात दुष्काळ पडला होता. चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. चोर्‍यांना अटकाव घालण्यासाठी राजाने चोराला पकडून देणार्‍याला दहा हजार मोहरांचे बक्षीस जाहीर केले होते.
     एके रात्री नगरातल्या एक श्रीमंत व्यापार्‍याच्या घरात चोरी झाली. चोराला सिपायांनी पाहिलं होतं. ते त्याचा पाठलाग करत होते. चोर चलाख आणि चतुर होता. तो नगराबाहेर पळून जात असताना त्याला धर्मशाळेजवळ एक झोपडी दिसली. त्याने दरवाजा वाजवला. तिथे एक वृद्ध महिला आपल्या तरूण नातीसह राहात होती. वाटसरू, यात्रेकरू यांना भोजन बनवून देण्याचे काम ती करत होती. त्या मिळणार्‍या मोबदल्यातूनच तिचा घरगाडा चालत होता.
     वृद्ध महिलेने दार उघडताच चोर म्हणाला," आजी, मी शहरात निघालो होतो. रात्र फारच झालीय. म्हटलं इथे भोजन करावं आणि रात्र काढावी आणि सकाळी उठून निघून जावं. आजी, यासाठी मी तुला दहा मोहरा दे ईन."
वृद्ध महिला तयार झाली. नातीला पाहिल्यावर चोराने चौकशी केली, तेव्हा ती वृद्धा म्हणाली, " माझा मुलगा आणि सून एका अपघातात दगावले. इथे आम्ही दोघीच राहतो. आता मला हिच्या लग्नाची चिंता लागली आहे. दुष्काळ पडल्यानं प्रवाशांची संख्याही कमी झालीय..."
     चोर आपल्याकडचे दागिन्याचे गाठोडे उघडून तिला देत म्हणाला," आजी, काही काळजी करू नकोस. हे घे दागिने आणि तुझ्या नातीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात करून टाक." एवढे दागिने पाहून वृद्ध महिला चकीत झाली. तिने चौकशी केल्यावर चोर म्हणाला," हे चोरीचे दागिने आहेत."
     चोरीचे दागिने घ्यायला वृद्ध महिलेने नकार दिला. चोर म्हणाला," आजी, एक तर हे दागिने घे, नाही तर मला शिपायांच्या हवाली कर. म्हणजे तुला चोराला पकडून दिल्याचे बक्षीस मिळेल आणि तुला नातीचे लग्न करता येईल."
शेवटी वृद्ध महिलेने त्याला शिपायांच्या हवाली केले. राजाने तिला दहा हजार मोहरा बक्षीस म्हणून देऊ केल्या, पण ती ते घ्यायला नम्रपणे नकार देत म्हणाली," महाराज, मोहरांच्या बदल्यात मला दुसरी भेट हवी आहे. तुम्ही या मुलाची सुटका करा."
     राजा म्हणाला," मग तुला काय फायदा?"                  
वृद्ध महिला म्हणाली," महाराज, हा मोठा भला माणूस आहे. याला इथे मी आणलं नाही, तर हा स्वत; आला आहे...." असे म्हणत तिने घडला प्रकार राजापुढे कथन केला.
     राजाने चोराला माफ केले. पण पुढे म्हणाला," पण तू पुन्हा चोरी करणार नाहीस कशावरून? मी कसा विश्वास करू?"
     चोर म्हणाला, " महाराज, मी नाईलाजाने पोटाच्या खळग्यासाठी चोरी करतो. मला काम मिळालं तर चोरी करण्याच्या प्रश्नच येत नाही." तेवढ्यात वृद्ध महिला म्हणाली," महाराज, मी  माझ्या नातीचे लग्न याच्याशी करावं म्हणते. याच्यापेक्षा योग्य जोडीदार तिला आणखी कोठे मिळणार आहे?"
     राजाने वृद्ध महिलेला बक्षीस तर दिलेच शिवाय चोराला शिपायाची नोकरीदेखील देऊन टाकली.

पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात येणार का?

अलिकडच्या काळात पत्रकारांवरील हल्ले वाढत चालले आहेत. त्यांच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. पत्रकारांना संरक्षण दिला जाणारा कायदा अस्तित्वात यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यावर भलतेच प्रश्न उभे करत राज्य सरकारातील मंडळी टोलवाटोलवी करून वेळ मारून नेण्याची भूमिका पार पाडत आहे. कोण म्हणतो,  पत्रकार कोणाला म्हणायचे? तर कोण म्हणतो,  पत्रकारांकडून होणार्‍या हल्ल्यापासून संरक्षण कसे करायचे?  असे अनेक प्रश्न उपस्थित करीत कोणी तरी मध्येच पत्रकारांचाच नव्या कायद्याला विरोध असल्याची पुडी सोअडतो.  तर कोणी चेंडू विरोधकांच्या कोर्टात टोलवत विरोधी पक्षांचाच कायद्याला विरोध असल्याचा कांगावा करून पळवाट शोधतो. कुणाला अभ्यास गट स्थापन करून कालापव्यय करायचा आहे तर कोणाला असा कायदा केंद्रानेच करावा यासाठी केंद्राकडे आग्रह धरा, असे बिनधास्त वाटते. अशा टोलवाटोलवीत दिवस ढकलले जात आहेत. 
     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे करतच आपला दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे.  अशोक चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात तत्कालीन माहिती सचिव आनंद कुळकर्णी यांना संभाव्य विधेयकाचा मसुदा तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पत्रकार व त्यांची  हल्ला विरोधी कृती समिती, तज्ज्ञ  यांच्याशी  चर्चा करून आनंद कुळकर्णी यांनी एक चांगला मसुदा तयार केला होता. दरम्यानच्या काळात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली आणि याच दरम्यान  पत्रकार जे. डे. यांची हत्या झाली. जे.डे यांच्या हत्येने राज्यातील संपूर्ण  वृत्तपत्रसृष्टी  सुन्न होऊन गेली. संतापाचा उद्रेकही झाला.
      संतापलेल्या पत्रकारांनी  थेट मंत्रालयावर मोर्चा काढला.  यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल आणि ते संमत करून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.  आनंद कुलकर्णी यांनी तयार मसुदासुद्धा आपण वाचला आहे आणि तोच मसुदा विधेयक म्हणून सभागृहात मांडण्याचा शब्द दिला. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांवरील अहल्ल्याच्या घटना घडल्या. मात्र तरीही   कायद्याचे विधेयक मात्र सभागृहात मांडले गेले नाही. या कायद्याबद्दल मात्र  हेतुत: गैरसमज पसरविण्याचे काम झाले.
     पत्रकार स्वतः च्या संरक्षणासाठी स्वतंत्र विधेयक मागतात, याचा अर्थ ते स्वतःला वेगळेच कोणी तरी व्हीआयपी मानतात. असे ते कोण लागून गेले, असा सूर उमटून लागला. मात्र, वस्तुस्थिती अशी की, पत्रकारांनी कोणत्याही स्वतंत्र कायद्याची मागणी केलेली नाही. पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा आणि पत्रकारांवरील हल्ल्याची प्रकरणे जलदगती न्यायालयाच्या मार्फत चालविली जावीत एवढीच पत्रकारांची मागणी आहे. अर्थात मागणी करण्याची वेळ पत्रकारांवर का आली, याचा विचार केल्यावर आपल्या लक्षात ये ईल की,  पत्रकारांवर हल्ला झाल्यावर पोलिसांकडून आरोपींवर दाखल करण्यात येणारे गुन्हे जामीनपात्र असतात. त्यामुळे अटक झाली तरी आरोपी काही वेळातच सुटतात आणि आपलं काय झालं म्हणत उजळ माथ्याने फिरतात. ही एकप्रकारची दहशत आहे.  दुसरे म्हणजे असे खटले वर्षानुवर्षे चालत राहतात. त्यामुळे ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना न्याय मिळणे अशक्य होऊन जाते. हल्लेखोरांवर किमान वचक बसावा याच प्रामाणिक उद्देशाने पत्रकारांनी ही मागणी लावून धरली आणि ती सार्थ असल्याचे पत्रकारांना वाटते.
      अशा प्रकारची  मागणी करून पत्रकार फार काही वेगळं मागताहेत असेही नाही. तीन वर्षांपूर्वी सरकारने डॉक्टर आणि रुग्णालयावरील हल्ल्यासाठी हा कायदा लागू केला आहे. त्यानंतर डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. डॉक्टरांना लागू असलेला कायदाच आम्हालाही लागू करा एवढीच पत्रकारांची मागणी आहे, अशाप्रकारे कायद्याचे संरक्षण लोकप्रतिनिधींना व सरकारी कर्मचार्‍यांना आहे. समाजातील अन्य काही घटकांनाही आहे. त्यामुळे विशेष काही मागताहेत असे मूळीच नाही. असे असतानाही असा कायदा करताना सरकार टोलवाटोलवी का करतात, असा प्रश्न उपस्थित होतो.
वास्तविक पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांमध्ये राजकारणी आघाडीवर आहेत. त्यांना आपल्याविरोधात कोणी लिहिलेले आवडत नाही. शिवाय या विधेयकाने पत्रकार शिरजोर होतील आणि याचा त्रास आपल्यालाच होईल, असाही गैरसमज राजकारण्यांमध्ये पसरवला जात आहे. कदाचित यामुळेच राज्य सरकार पत्रकारसंरक्षण कायद्यासंदर्भात टोलवाटोलवीची भाषा करत आहे, असे वाटत आहे. वस्तुत: राज्यात , देशात कायद्याचं राज्य आहे. सनदशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी सनदशीर मार्ग आहेत. एखादा पत्रकार चुकीचे वार्तांकन करत असेल  तर त्याला दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. काही गुन्ह्यांमध्ये वृत्तपत्राची मान्यताही रद्द हो ऊ शकते. त्यामुळे पत्रकार शिरजोर होतील, म्हणण्याचे काही कारण नाही. जिवितास मिळणार्‍या धोक्यापासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा यात करण्यात आली आहे. मसुदा खुला केला जावा, ज्यामुळे सगळ्यांनाच समजेल की, या मसुद्यात काय आहे. मात्र मात्र गुंडगिरीद्वारे पत्रकारांवर  हल्ला करून दहशत निर्माण करणार्‍यांना शिक्षा ही मिळायलाच हवी अथवा धाक  बसायलाच हवा. जिथे पत्रकारांवर हल्ले होत असतील तर सामान्य माणसांची तर काय कथा? सगळ्यांनाच सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, त्याला पत्रकार कसा अपवाद असणार आहे?