Thursday, September 21, 2017

नवरात्रोत्सव :आदिशक्तींची आराधनेचे व्रत

शारदीय नवरात्र
हिंदू धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषिमुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे, अशी शक्यता आहे. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजाकृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्यपुराणात कथन केलेले आढळते.

नवरात्रोत्सव
 नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तींची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. पहिल्या दिवशी घटस्थापना होते.
घटस्थापना विधी
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात. त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद-कुंकू लावतात. हारवेणी-गजरा घालतात. घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात. या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते.
 देवी उपासना
नवरात्रातली देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात, कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवव्या दिवशी म्हणजे दसर्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात. या उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात.
नवरात्र व्रत
 नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीअखेर हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात, घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलिदानही करतात. नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.
नवदुर्गा : देवीची नऊ रूपे
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. 1) शैलपुत्री, 2) ब्रह्मचारिणी 3) चन्द्रघंटा 4) कूष्मांडी (कुष्मांडी) 5) स्कंदमाता 6) कात्यायनी 7) कालरात्री 8) महागौरी, 9) सिद्धिदात्री, अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
देवी माहात्म्य
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणार्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे, असे मानले जाते.



Tuesday, September 19, 2017

वाढती बेरोजगारी एक समस्या

     आपल्या देशात दर महिन्याला दहा लाख तरुण रोजगार मागण्याच्या रांगेत उभे राहत आहेत.पण नवीन रोजगार उपलब्ध होण्याचा दर वर्षाला वीस लाखाच्या आतच अडकला असेल तर मग त्याचे परिणाम काय असणार आहेत.2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दर वर्षाला एक कोटी रोजगार निर्माण करण्याचा शब्द दिला होता.गेल्या तीन वर्षात मोदींच्या सरकारने 60 लाख रोजगारदेखील उपलब्ध करून दिले नाहीत.कृषी आणि अन्य क्षेत्रात रोजगार निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाही.' मेक इन इंडिया ' लोकप्रिय बनवण्याच्या प्रयत्नानंतरही ही योजना पुढे सरकू शकली नाही.दुष्काळी परिस्थितीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती काही राज्यांनी कर्जमाफीचा खुळखुळा देऊनही काही फरक पडला नाही. गाय आणि अन्य पशूधन खरेदी-वीक्रीचा कारभार ठप्प झाला आहे.त्यामूळे पशुपालक आणि संबंधित लोकदेखील बेरोजगार झाले आहेत. मेलेल्या जनावरांच्या कातडी काढण्याच्या पारंपारिक धंद्याकडेही लोकांनी पाठ फिरवल्याने कातडी उद्योगदेखील पूर्ण बसला आहे.नोटाबंदीचा परिणाम छोट्या उद्योगांपासून ते कृषी क्षेत्रापर्यंत सगळ्याच उद्योग क्षेत्रावर झाला,त्यामूळे अर्थव्यवस्थेचा  वृद्धीदर लागोपाठ चार तिमाही  घसरताच राहिला.
     नरेंद्र मोदी यांच्यासारखाच इंदिरा गांधी यांनीदेखील 1971 मध्ये लोकसभा निवडणुकीत जबरदस्त बहुमत मिळवून सत्तारूढ झाल्या होत्या.यानंतर बांगला देश निर्मितीच्या यशाबरोबरचपाकिस्तानवरचा विजय ,यशस्वी अणूचाचणी आणि सिक्किमचे भारतात विलिनीकरण यासारख्या ऐतिहासिक घटना घडल्या असतानादेखील रोजगार निर्माण करण्यात अपयश आल्याने त्यांच्यासाठी ते एक प्रकारचे ग्रहण सिद्ध झाले.या घटनेमुळे रोजगार हा मुद्दा निर्णायक भूमिका निभावत असल्याचे दिसते.
     आपल्या देशात आजच्या घडीला दर महिन्याला दहा लाख नोकऱ्यांची मागणी आहे.पण त्यांपैकी 10 ते 20 टक्केदेखील नोकऱ्या निर्माण होताना दिसत नाहीत. सरकार उद्योगांना चालना देणारे धोरण राबवत असल्याचा प्रचार होत असला तरी तिथेही रोजगार-नोकऱ्यांच्याबाबतीत शिमगाच आहे.सरकार मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून  लघु उद्योग आणि स्वयंरोजगार क्षेत्रात पाच कोटी नवीन रोजगार निर्माण केल्याचा दावा करत आहे,मात्र याबाबतीत खरी वस्तुस्थिती पंतप्रधांनांनाच ठाऊक!त्यामूळे ते पायाभूत योजना पूर्ण करणे,नव्या योजना सुरू करणे किंवा रेल्वेमध्ये खासगी गुंतवणूक करणे आणि बुलेट ट्रेन आणि मध्यम आकाराच्या  सुरक्षा उत्पादन योजनांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
     रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीदेखील रोजगार हाच मुद्दा सध्याच्या सरकारपुढे सगळ्यात मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे.त्यांनी मूलभूत पाया,वीज आणि निर्यात यावर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.निर्यात क्षेत्रातील आपले अपयश खरे तर आपल्या पचनी पडण्यासारखे नाही.आशिया खंडातल्या अन्य देशात निर्यात वाढत असली तरी तेवढी पुरेशी नाही.कुटीर,लघु आणि लघु क्षेत्राला नोटाबंदीने जो फटका बसला आहे, त्यातून हा उद्योग भरारी कधी घेणार,असा प्रश्न आहे.
     देशात बेरोजगारीचा दर साडेचार टक्के झाला आहे.त्यातही बेरोजगारी शहरी भागात अधिक आहे.तिकडे ग्रामीण भागात दुष्काळ आणि पूर यामुळे शेतीचे तीन तेरा वाजले आहेत.त्यामुळे इथेही हाताला काम नाही.खरीप क्षेत्र यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घटले आहे.वर्षभर रोजगार उत्पन्न होण्याच्या प्रमाणात घट आणि हीच परिस्थिती पुढच्या वर्षीदेखील राहण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने व्यक्त केली आहे.देशातील  बेरोजगारांची संख्या तीन कोटीचा पल्ला गाठायला आली आहे. हे लोक नोकरी नसल्याने हताश,निराश आहेत. त्यात दरमहिन्याला आणखी भर पडत आहे.शेतकरी तर हाती काहीच लागत नसल्याने निराश होऊन आत्महत्या करत आहे. त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं आणि नवीन नोकऱ्या उपलब्ध करणं ,मोदी सरकारपुढं मोठे आव्हान आहे.

प्रभावशाली बोलण्याने बना,चांगला वक्ता

     स्पष्ट आणि प्रभावशाली बोलण्याची सवय एक चांगला वक्ता बनायला पुरेसे आहे.एक कुशल वक्ता बनायचे असेल तर कम्युनिकेशन स्किलवर लक्ष द्यायला हवे. तज्ज्ञांच्यामते सरावाशिवाय काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्यासदेखील कुशल वक्ता बनता येते. आवश्यकतेपेक्षा अधिक बोलणे टाळा. जास्त बोलणाऱ्याला आपल्या वक्तापणाचा गर्व असतो कारण त्याला वाटते की,लोक त्याला अगदी गंभीरपणे ऐकत असतात.वास्तविक लोक वक्त्याला फार गंभीरपणे घेत नाहीत.माणसे देखावा करत असतात आणि मनातल्या मनात वक्त्याला मूर्ख समजत असतात.
     एक चांगला,कुशल वक्ताच एक चांगला लिडर आणि एक चांगला मोटिवेटर बनू शकतो.जर तुम्हालादेखील एक चांगला वक्ता बनायचे असेल तर यासाठी संपर्क कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किलचे गुण असणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही यशाची नवीन उंचीच्या दिशेने वाटचाल करताना स्वतः ला गौरवान्वित करू शकता. वास्तविक तुम्ही स्पष्ट आणि प्रभावशाली गोष्टी किंवा स्पीचद्वाराच स्वतःसाठी यशाची भूमी तयार करू शकता. आता प्रश्न असा उपस्थित होतो की,हे कौशल्य आत्मसात कसे करायचे?प्रसिद्ध चिंतक पीटर एफ ड्रीकर यांच्या म्हणण्यानुसार कम्युनिकेशन स्किल काही योग्यता किंवा कौशल्य नाही.ही तर एक सवय आहे.ही सराव आणि शिस्तीतून येते.
     लहान पण चांगल्या प्रकारे  तयार करण्यात आलेली स्पीच नेहमीच  कौतुकास्पद ठरते.स्पीच कुठल्या तरी एका विषयावर केंद्रित असावी.यामुळे स्पीच दरम्यान कसल्याही प्रकारचा  भरकटलेलापणा येत नाही.सगळ्यात अगोदर आपल्या हावभावाने लोकांच्या डोक्यात असा प्रभाव सोडा की तुम्ही एक चांगला वक्ता आहात.यासाठी तनावमुक्त दिसायला हवे.स्वतः ला असा विश्वास देताना मेँदूला संकेत द्या की तुम्ही एक चांगला यशस्वी वक्ता आहात.कारण तुम्ही जसा विचार कराल, तसाच परिणाम समोर येईल.तुम्ही मेँदूला ज्या कृतीच्या दिशेने संकेत देता,तसेच कार्यदेखील करता.स्वतः ला कमकुवत समजू नका.आवाजातून तुमच्या ऊर्जा टपकायला हवी.मित्रवत आवाजात संवाद साधा.दुसऱ्या वक्त्यांची नक्कल करू नका.आपली स्वत:ची अशी रणनीती तयार करा.प्रत्येक स्पीचसाठी गरज आहे ती चांगल्या सुरुवातीची आणि एका निष्कर्षाची.निष्कर्ष रहीत स्पीचमुळे लोकांना लवकरच कंटाळा यायला लागतो. स्पीच ज्ञानवर्धक आणि मनोरंजक असायला हवे.चुटके आणि गोष्टी यांचा वापर तेव्हाच करा ,जेव्हा ते मोक्याला आणि टॉपिकला फिट बसतात.स्पीचदरम्यान नेहमी लोकांची आवड आणि स्पीच मकसदकडे लक्ष द्या.


Monday, September 18, 2017

भारतातील राजकीय घराणेशाही

      आपल्याकडील घराणेशाहीचा प्रतिध्वनी आता जगातल्या सगळ्यात शक्तीशाली समजल्या जाणार्‍या अमेरिकेतदेखील ऐकायला मिळू लागला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसर्‍या अनेक मुद्द्यांबरोबरच भारतीय राजकारणात घट्ट मूळ धरून राहिलेल्या घराणेशाहीवरदेखील बोलले. ते म्हणाले की, भारतात घराणेशाहीने काँग्रेसलाच  नाही तर अन्य सगळ्या राजकीय पक्षांना व्यापून टाकले आहे.अखिलेश यादवपासून एम.के.स्टालिनपर्यंतची नावे त्यांनी मोजली. अर्थात राहुल गांधी यांनी यात काही एक  खोटे बोललेले नाही. कुणी काहीही म्हणो,पण आपल्या इथल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही दिसून येते.कुठे कुठे मात्र त्याचे स्वरुप वेगवेगळे आहे इतकेच. घराणेशाहीबरोबरच आपल्या देशात  व्यक्तीवाददेखील इतका  बोकाळला आहे की, इथे लोकशाहीलादेखील लाज वाटेल. 

     अण्णाद्रुमुकच्या परवा  झालेल्या सर्वसाधारण बैठकीत दिवंगत  जयललिता यांना पक्षाच्या स्थायी महासचिव बनवण्याची घोषणा करण्यात आली. जयललिता जगातील एकमात्र अशी व्यक्ती असेल की, दिवंगत असूनदेखील त्या पक्षाचे नेतृत्व करत राहतील. हरियाणातील इंडियन लोकदलानेदेखील असाच अनोखा प्रराक्रम करून दाखवला आहे.शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पक्षाचे अध्यक्ष  ओमप्रकाश चौटाला यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. चौटाला गेल्या चार वर्षांपासून तुरुंगाची हवा खात आहेत. पण तिथे बसून ते आपला राजकीय पक्ष चालवत आहेत.जयललिता आणि चौटाला यांची उदाहरणे भारतीय राजकारणातील घराणेशाहीला अधोरेखित करत आहेतच शिवाय भारतीय मतदारांची मानसिकतादेखील प्रकाशात आणते. 
     एक काळ असा होता की, राज ठाकरे यांना शिवसेनेचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणून ओळखले जात होते.मात्र ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पुतण्याच्या जागी आपल्या मुलाला-उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची जबाबदारी दिली,तेव्हा मतदारांनी उद्धव ठाकरे यांचा स्वीकार केला.पक्षातल्या तमाम कार्यकर्त्यांनी त्यांना आपला नेता मानला. नेहरू-गांधी यांच्या घराण्याबरोबरच देवीलाल, शरद पवार, चरणसिंह,एम.करुणानिधी,प्रकाशसिंह बादल,मुलायमसिंह यादव, बीजू पटनायक आणि लालूप्रसाद यादव सारखी घराणीदेखील राजकारण करताना दिसत आहेत. साधी गोष्ट आहे, देशातल्या राजकारणाने घराणेशाहीशी आपले  घट्ट असे नाते जोडले आहे. भ्रष्टाचार आणि जातीयवाद जसा जोडला गेला आहे,तसा घराणेशाहीसुद्धा पक्का राजकारणाशी चिकटून आहे.इथे भ्रष्ट राजकारण्यांनादेखील विधानसभा,लोकसभेत बिनधास्तपणे मतदार पाठवत आहेत. जातीयवादाचे राजकारणदेखील असेच फोफावले आहे.  त्यामुळे आपल्या देशात काहीही घडू शकतं, हे काय वेगळे सांगायची गरज नाही.


स्वतः ला बदला,पण थांबू नका

      बहुतांश लोक अपयशी होतात,त्याला ते स्वतः जबाबदार असतात, कारण त्यांनी स्वतः ला बदलले नसते.त्यांना स्वतः मध्ये बदल करावासा वाटत नाही. पण खरे वास्तव असे की, परिवर्तनाशिवाय यश हाताला लागत नाही. परिवर्तनामुळे आपल्या आयुष्याला फायदा होतो. काही माणसे खड्ड्यात असतात.खड्डा खोदण्याचे काम करीत असतात. ते आपल्या कामाची पद्धत बदलत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात. काही माणसे आपल्या आपल्या म्हणण्यावर ठाम असतात.त्यांना बदल नको असतो. अशा माणसांना काळाचे वादळ संपुष्टात आणते. काही माणसांना बदलण्यापेक्षा आहे तिथेच थांबायला आवडते. अशी माणसे कुठे पोहचतच नाहीत. मग प्रगती कशी साधली जाणार? जर तुम्ही तुमच्या व्यवसाय,धंद्यात वा अन्य कोणत्या क्षेत्रात नव्या पद्धतींचा स्वीकार नाही केला तर नया समस्या आयुष्यात उभ्या राहणार आहेत . कुणी तरी म्हटले आहे, जो स्वतः ला बदलायचे थांबवतो, तो स्वतःदेखील थांबतो,संपतो.त्यामुळे थांबण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करा.जितक्या लवकर तुम्ही स्वतः बदलाल,तितक्याच लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. 
     यश अगदी जवळ असते,पण माणूस स्वतः मध्ये बदल करत नाही आणि यशाच्या मार्गावर चालायला नकार देतो.जो माणूस बदलाला,परिवर्तानाला घाबरतो, तो स्वतः च्या क्षमता पार विसरून जातो.त्यामुळे त्याच्या पदरी अपयश पडते. आणि निराश होतो. जर तुम्हाला कधी दृढ राहायचं आहे आणि कधी झुकायचं आहे,याचा अंदाज आला तर तुमचे यश निश्चित आहे.  सततच्या परीवर्तनाने तुम्ही बैचेन व्हाल,पण परिवर्तन नसेल तर मात्र तुम्ही घाबरून जाल.पुढे काय करायचे हे  ,याची तुम्हाला आयडीया येणार नाही.
     जी व्यक्ती स्वतः मध्ये बदल घडवते,मात्र आपल्या सिद्धांताशी कसल्याही प्रकारचा समझोता करता प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेते ,ती व्यक्ती चांगली समजली जाते.परिवर्तन याचा अर्थ असा की,लक्ष्य  मिळवण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घेणे. हा मार्ग असा असायला हवा,याचे कौतुक सगळ्यांनी करायला हवे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. या मार्गातून मिळालेले यश प्रामाणिक असायला हवे. सच्चे असायला हवे.


Wednesday, September 13, 2017

सवयी बदला,गॅझेट्सचे आयुष्य वाढवा

     नवीन गॅझेट चांगल्या प्रकारे काम करतात,मात्र जसजसा तो जुना होत जातो,तसतसा त्याचा परफॉर्मेंस बदलत जातो.त्यात फरक पडत जातो.गॅझेट हवा तसा चालत नसल्याने आपण नेहमी कंपनीला दोष देतो, मात्र कित्येकदा तरी गॅझेट योग्य प्रकारे काम न करण्याला आपणच दोषी असतो.या आपल्या चुकीमुळे आपल्या गॅझेट्सचे आयुष्यही कमी होते.काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपल्या किंमती गॅझेट्सचे आयुष्य वाढू शकते.

बॅटरी चार्ज करण्याची योग्य पद्धत-
     लिथियम- आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटर्या वारंवार चार्ज करण्याच्या उद्देशाने बनवल्या गेलेल्या असतात.त्यामुळे वारंवार चार्ज केल्याने त्यांच्यावर फारसा फरक पडत नाही.पण तरीही यांचेदेखील आयुष्य असते.साधारणपणे आजच्या गॅझेटसमध्ये वापरण्यात येणार्या बॅटर्या 400 ते 600 वेळा चार्ज केले जाऊ शकतात. मात्र आपल्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी बॅटरी 10-20 टक्के चार्ज उरलेली असते,त्यावेळेला चार्जिंगला लावावी.यामुळे तुमच्या गॅझेटची बॅटरी चांगली चालेल.
काही लोक गॅझेट्स चार्जिंगला लावून विसरून जातात. अशा चुकांची पुनर्रावृत्ती होऊ देऊ नका.उलट बॅटरी चार्ज 80-90 टक्क्यांरम्यान असू द्या. यामुळे तुमच्या गॅझेट्सचे आयुष्य वाढण्यास मदत होते.यातले तज्ज्ञ सांगतात की, तीन महिन्यातून एकदा बॅटरी चार्ज संपूर्ण संपू द्यावे.यानंतर पुन्हा 100 टक्के चार्जिंग करावे.
हेवी कवर्सचा वापर टाळा-
     कित्येकदा आपण आपल्या गॅझेटला धुळीपासून किंवा पडण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कवरचा वापर करतो. मात्र अशा प्रकारच्या कवरच्या वापरामुळे ओवरहिटिंगची समस्या निर्माण होऊ शकते. खासकरून ज्यावेळेला तुम्ही आपला स्मार्टफोन किंवा टॅब चार्जिंगला लावता,त्यावेळेला हेवी कवरमुळे आपले गॅझेट ओवरहिट होईल.असा प्रकार गॅझेट्ससाठी धोकादायक आहे.
लॅपटॉप गुडघ्यावर ठेवू नका-
     नेहमी काम करताना आपण लॅपटॉप आपल्या गुडघ्यावर ठेवून काम करत असतो.याशिवाय कित्येकदा आपण लॅपटॉप बेडवर ठेवून काम करत असतो. यामुळे लॅपटॉपचा वेंटिलेशन वेंट बंद होते.त्यामुळे ओवरहिट व्हायला लागते.ज्या ज्या वेळेला आपण आपल्या लॅपटॉपवर काम करत असतो,त्या त्या वेळेला त्याचे वेंटिलेशन वेंट उघडे असायला हवे.लिथियम इओन बॅटरीज ओवरहिटिंगच्या स्थितीमध्ये  गेल्यास त्याचे आयुष्य कमी होते. याशिवाय आपले गॅझेट्स थेट सूर्यप्रकाशाचे किरण किंवा अन्य गरम सोर्सपासून दूर ठेवायला हवे.
बदलत्या हवामानाचा परिणाम-
     गॅझेट्सार बदलत्या हवामानाचा थेट परिणाम होतो. हिवाळ्यात जर तुम्ही खुल्या वातावरणात आपल्या गॅझेट्सचा वापर करत असाल तर काम झाल्यावर खोली नेताना गॅझेट्स लगेच बंद करू नका. गॅझेट्सला पहिल्यांदा खोलीतील तापमानाबरोबर येऊ द्या,मग स्वीच ऑफ करा.यासाठी 30-35 मिनिटांची प्रतीक्षा करा. अशा प्रकारे आपले कोणतेही गॅझेट्स थंड वातावरणात थेट वापर करू नका. कारण कमी तापमानात तुमच्या फोनच्या बॅटरीवर थेट परिणाम होतो.त्याचबरोबर तुमचे गॅझेटस थेट सूर्य प्रकाशापासूनही दूर ठेवा.कारण सूर्याची तेज किरणे तुमच्या गॅझेट्सच्या डिस्प्लेला नुकसान पोहचवू शकतात.काही कालावधीनंतर तुमच्या गॅझेट्सचा डिस्प्ले अस्पष्ट दिसायला लागतो. असे वारंवार होत असेल तर तो लवकरच ब्लॅक आऊट होऊ शकतो. अर्थात स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर सूर्याच्या थेट प्रकाशाचा परिणाम कमी होतो.मात्र या तुलनेत लॅपटॉप,टॅब किंवा कॅमेरा यांच्या डिस्प्लेवर थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो.त्यामुळे प्रकाशाच्या संपर्कापासून दूर ठेवा.
व्होल्टेजमधील चढ-उतार-
खराब हवामान किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे व्होल्टेज कमी-जास्त होत असेल तर त्यावेळेला आपले गॅझेट्स चार्जिंगला लावू नका.यामुळे गॅझेट्सला नुकसान पोहचू शकते. तसेच वीज कडाडत असेल तरीदेखील आपले गॅझेट्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर ठेवा.असे मानले जाते की, वीज पडताना ती तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यत पोहचू शकते. तसे झाल्यास तुमच्या गॅझेट्सचे नुकसान होऊ शकते.खराब हवामानातही गॅझेट्स चार्जिंगला लावू नका.
चार्जिंगला लावताना-
कित्येकदा आपण थ्री पीन प्लग चार्जवाल्या डिवाइसला टू पीन सॉकेटमध्ये लावून चार्ज करतो.यामुळे तुमच्या डिवाइसमध्ये ओवर करंट जातो. यामुळे तुमच्या गॅझेटच्या बॅटरीशिवाय अन्य कंपोनेंट्सलादेखील नुकसान पोहचू शकते. याशिवाय धूळदेखील तुमच्या गॅझेट्सचे वय कमी करू शकते. यामुळे कित्येकदा नेटवर्क सिग्नल पकडताना समस्या निर्माण होते.किंवा अन्य एक्सेसरीज फोनशी कनेक्ट करताना अडचणी येतात. वेळोवेळी गॅझेट्समधील धूळ स्वच्छ करावी.

Tuesday, September 12, 2017

पाणी आणि जनावरे

     पाणी म्हणजे जीवन. माणूस, वृक्ष आणि प्राणी यांना पाण्याची नितांत गरज असते. शरीरातील पाण्याचा अंश कमी व्हायला लागला की, जीव धोक्यात आला म्हणून समजायचे. त्यामुळे प्राणी असो किंवा माणूस अथवा झाडे यांना पाण्याची गरज असतेच. जनावरांचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या जनावराच्या शरिरात 60 ते 70 टक्के पाणी असते. जनावरांच्या शरिरात पाण्याचा पुरवठा पिण्याचे पाणी आणि ओला चारा किंवा हिरवा चारा अशा खाद्यांमधून होत असतो. 50 टक्के प्रथिने कमी झाल्यास जनावरे जगू शकतात, मात्र शरिरातील 10 टक्के पाणी कमी झाले तर जनावर जगू शकत नाहीत. त्यामुळे जनावरांसाठी पाणी लाखमोलाचे आहे. एका जनावराला प्रतिदिनी 60 ते 110 लीटर पाण्याची गरज असते. ही गरज वयोमान, खाद्याचे प्रमाण, वातावरणाचे तापमान, दूधउत्पादनाची क्षमता, भाकड जनावर, इत्यादी बाबींवर अवलंबून असते. 

     लहान व वाढत्या जनावरांना पाणी जास्त लागते. तर प्रौढ,वयस्कर झालेल्या  जनावरांना पाणी कमी लागते. ते पाणी कमी पितात. गाभण गायी, दुभती जनावरे व कामाचे बैल यांना मात्र पाण्याची गरज अधिक लागते, तर भाकड जनावरांना पाणी कमी लागते. एकाच प्रकारचे खाद्य खाणा-या जनावरांच्या पाणी पिण्याच्या गरजेतील फरक पन्नास टक्के असू शकतो व तो फरक वैयक्तिक असतो. एका गाईला सरासरी दर दिवशी 55 ते 65 लीटर पाणी आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना पिण्याचे पाणी कमी मिळाले तर 20 ते 30 टक्के दूध उत्पादन घटते. त्याची भरपाई करण्यासाठी स्वच्छ व भरपूर पाणी दिल्यास पुढच्या 2 ते 3 धारेत कमी झालेल्या दुधाची भरपाई निघू शकते. मात्र, सतत 3 ते 4 दिवस कमी प्रमाणात पाणी मिळाल्यास दुधाची भरपाई होवू शकत नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत शेतकर्‍यांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
पाण्याच्याबाबतीत काळजी घेताना जनावरांना शक्यतो स्वच्छ, ताजे व मुबलक पाणी पाजावे. पाणी पाजण्याच्या वेळा ठरावीक असाव्यात. त्या निश्‍चित केल्यास उत्तम. आजारी, लंगड्या व लहान जनावरांना त्यांच्या जागेवरच पाणी पाजावे. पाण्यामुळे पोटात गेलेले अन्नकण विरघळण्यास मदत होते आणि पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते.पाण्यामुळे  शरिराच्या तापमानाचे संतुलन राखले जाते. रक्तातील पाण्याचा अंश टिकविण्यासाठी व रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमाद्वारे जैविक व रासायनिक प्रक्रिया योग्यरित्या होतात. आपल्या कल्पना आहे की, शरिरातील निरुपयोगी टाकाऊ पदार्थ घाम आणि मलमूत्रावाटे बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. 
     जनावरांना पाणी पाजताना काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. पाणी ताजे, स्वच्छ व थंड असावे, सर्वसाधारणपणे 0.5 टक्के क्षारयुक्त पाणी गुरे सवयीने पितात. परंतु, यापेक्षा जास्त (1 ते 1.5 टक्के ) क्षारयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असते.त्यामुळे याबाबतीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  पाण्याला वास किंवा खराब चव नसावी.आणखी एक गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये 12 ते 15 पेक्षा जास्त कोलीफार्म जीवाणू प्रति 100 मिलीलिटर  पाण्यात असल्यास हे पाणी जनावरांना अपायकारक असते. असे पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरल्यास जनावरांची पचनशक्ती बिघडते. त्याचबरोबर हे पाणी दुभत्या जनावरांची कास धुण्यास वापरल्यास त्यांना कासेचे आजार होतात. प्रत्येक जनावरांना स्वतंत्र स्वच्छ पाणी पाजण्याविषयी काळजी घ्यायला हवी. आजारी जनावरांना इतर जनावरांच्या शेवटी स्वतंत्र भांड्यामध्ये पाणी पाजावे म्हणजे लाळ्या खुरकूत, घटसर्प, बुळकांडी अशा प्रकारच्या आजारांचा प्रसार होणार नाही.
      पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही त्यातील क्षार आणि जीवाणू या गोष्टींवर अवलंबून असते. क्षारामुळे पाण्याला मृदू अगर जडपणा येतो. अशाप्रकारे जनावरांना माणसांप्रमाणेच स्वच्छ, शुद्ध, ताजे व थंड पाणी नियमित व मुबलक पाजल्यास जनावरांचे आरोग्य निरोगी व व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत योग्य ती काळजी घेतल्यास दुग्धोत्पादनामध्ये त्याचा निश्‍चितच लाभ होईल.