Tuesday, September 12, 2017

पाणी आणि जनावरे

     पाणी म्हणजे जीवन. माणूस, वृक्ष आणि प्राणी यांना पाण्याची नितांत गरज असते. शरीरातील पाण्याचा अंश कमी व्हायला लागला की, जीव धोक्यात आला म्हणून समजायचे. त्यामुळे प्राणी असो किंवा माणूस अथवा झाडे यांना पाण्याची गरज असतेच. जनावरांचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या जनावराच्या शरिरात 60 ते 70 टक्के पाणी असते. जनावरांच्या शरिरात पाण्याचा पुरवठा पिण्याचे पाणी आणि ओला चारा किंवा हिरवा चारा अशा खाद्यांमधून होत असतो. 50 टक्के प्रथिने कमी झाल्यास जनावरे जगू शकतात, मात्र शरिरातील 10 टक्के पाणी कमी झाले तर जनावर जगू शकत नाहीत. त्यामुळे जनावरांसाठी पाणी लाखमोलाचे आहे. एका जनावराला प्रतिदिनी 60 ते 110 लीटर पाण्याची गरज असते. ही गरज वयोमान, खाद्याचे प्रमाण, वातावरणाचे तापमान, दूधउत्पादनाची क्षमता, भाकड जनावर, इत्यादी बाबींवर अवलंबून असते. 

     लहान व वाढत्या जनावरांना पाणी जास्त लागते. तर प्रौढ,वयस्कर झालेल्या  जनावरांना पाणी कमी लागते. ते पाणी कमी पितात. गाभण गायी, दुभती जनावरे व कामाचे बैल यांना मात्र पाण्याची गरज अधिक लागते, तर भाकड जनावरांना पाणी कमी लागते. एकाच प्रकारचे खाद्य खाणा-या जनावरांच्या पाणी पिण्याच्या गरजेतील फरक पन्नास टक्के असू शकतो व तो फरक वैयक्तिक असतो. एका गाईला सरासरी दर दिवशी 55 ते 65 लीटर पाणी आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना पिण्याचे पाणी कमी मिळाले तर 20 ते 30 टक्के दूध उत्पादन घटते. त्याची भरपाई करण्यासाठी स्वच्छ व भरपूर पाणी दिल्यास पुढच्या 2 ते 3 धारेत कमी झालेल्या दुधाची भरपाई निघू शकते. मात्र, सतत 3 ते 4 दिवस कमी प्रमाणात पाणी मिळाल्यास दुधाची भरपाई होवू शकत नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत शेतकर्‍यांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
पाण्याच्याबाबतीत काळजी घेताना जनावरांना शक्यतो स्वच्छ, ताजे व मुबलक पाणी पाजावे. पाणी पाजण्याच्या वेळा ठरावीक असाव्यात. त्या निश्‍चित केल्यास उत्तम. आजारी, लंगड्या व लहान जनावरांना त्यांच्या जागेवरच पाणी पाजावे. पाण्यामुळे पोटात गेलेले अन्नकण विरघळण्यास मदत होते आणि पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते.पाण्यामुळे  शरिराच्या तापमानाचे संतुलन राखले जाते. रक्तातील पाण्याचा अंश टिकविण्यासाठी व रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमाद्वारे जैविक व रासायनिक प्रक्रिया योग्यरित्या होतात. आपल्या कल्पना आहे की, शरिरातील निरुपयोगी टाकाऊ पदार्थ घाम आणि मलमूत्रावाटे बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. 
     जनावरांना पाणी पाजताना काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. पाणी ताजे, स्वच्छ व थंड असावे, सर्वसाधारणपणे 0.5 टक्के क्षारयुक्त पाणी गुरे सवयीने पितात. परंतु, यापेक्षा जास्त (1 ते 1.5 टक्के ) क्षारयुक्त पाणी पिण्यास अयोग्य असते.त्यामुळे याबाबतीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  पाण्याला वास किंवा खराब चव नसावी.आणखी एक गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये 12 ते 15 पेक्षा जास्त कोलीफार्म जीवाणू प्रति 100 मिलीलिटर  पाण्यात असल्यास हे पाणी जनावरांना अपायकारक असते. असे पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरल्यास जनावरांची पचनशक्ती बिघडते. त्याचबरोबर हे पाणी दुभत्या जनावरांची कास धुण्यास वापरल्यास त्यांना कासेचे आजार होतात. प्रत्येक जनावरांना स्वतंत्र स्वच्छ पाणी पाजण्याविषयी काळजी घ्यायला हवी. आजारी जनावरांना इतर जनावरांच्या शेवटी स्वतंत्र भांड्यामध्ये पाणी पाजावे म्हणजे लाळ्या खुरकूत, घटसर्प, बुळकांडी अशा प्रकारच्या आजारांचा प्रसार होणार नाही.
      पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही त्यातील क्षार आणि जीवाणू या गोष्टींवर अवलंबून असते. क्षारामुळे पाण्याला मृदू अगर जडपणा येतो. अशाप्रकारे जनावरांना माणसांप्रमाणेच स्वच्छ, शुद्ध, ताजे व थंड पाणी नियमित व मुबलक पाजल्यास जनावरांचे आरोग्य निरोगी व व्यवस्थित राहण्यास मदत होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत योग्य ती काळजी घेतल्यास दुग्धोत्पादनामध्ये त्याचा निश्‍चितच लाभ होईल.


No comments:

Post a Comment