Monday, September 18, 2017

भारतातील राजकीय घराणेशाही

      आपल्याकडील घराणेशाहीचा प्रतिध्वनी आता जगातल्या सगळ्यात शक्तीशाली समजल्या जाणार्‍या अमेरिकेतदेखील ऐकायला मिळू लागला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसर्‍या अनेक मुद्द्यांबरोबरच भारतीय राजकारणात घट्ट मूळ धरून राहिलेल्या घराणेशाहीवरदेखील बोलले. ते म्हणाले की, भारतात घराणेशाहीने काँग्रेसलाच  नाही तर अन्य सगळ्या राजकीय पक्षांना व्यापून टाकले आहे.अखिलेश यादवपासून एम.के.स्टालिनपर्यंतची नावे त्यांनी मोजली. अर्थात राहुल गांधी यांनी यात काही एक  खोटे बोललेले नाही. कुणी काहीही म्हणो,पण आपल्या इथल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही दिसून येते.कुठे कुठे मात्र त्याचे स्वरुप वेगवेगळे आहे इतकेच. घराणेशाहीबरोबरच आपल्या देशात  व्यक्तीवाददेखील इतका  बोकाळला आहे की, इथे लोकशाहीलादेखील लाज वाटेल. 

     अण्णाद्रुमुकच्या परवा  झालेल्या सर्वसाधारण बैठकीत दिवंगत  जयललिता यांना पक्षाच्या स्थायी महासचिव बनवण्याची घोषणा करण्यात आली. जयललिता जगातील एकमात्र अशी व्यक्ती असेल की, दिवंगत असूनदेखील त्या पक्षाचे नेतृत्व करत राहतील. हरियाणातील इंडियन लोकदलानेदेखील असाच अनोखा प्रराक्रम करून दाखवला आहे.शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पक्षाचे अध्यक्ष  ओमप्रकाश चौटाला यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. चौटाला गेल्या चार वर्षांपासून तुरुंगाची हवा खात आहेत. पण तिथे बसून ते आपला राजकीय पक्ष चालवत आहेत.जयललिता आणि चौटाला यांची उदाहरणे भारतीय राजकारणातील घराणेशाहीला अधोरेखित करत आहेतच शिवाय भारतीय मतदारांची मानसिकतादेखील प्रकाशात आणते. 
     एक काळ असा होता की, राज ठाकरे यांना शिवसेनेचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणून ओळखले जात होते.मात्र ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पुतण्याच्या जागी आपल्या मुलाला-उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची जबाबदारी दिली,तेव्हा मतदारांनी उद्धव ठाकरे यांचा स्वीकार केला.पक्षातल्या तमाम कार्यकर्त्यांनी त्यांना आपला नेता मानला. नेहरू-गांधी यांच्या घराण्याबरोबरच देवीलाल, शरद पवार, चरणसिंह,एम.करुणानिधी,प्रकाशसिंह बादल,मुलायमसिंह यादव, बीजू पटनायक आणि लालूप्रसाद यादव सारखी घराणीदेखील राजकारण करताना दिसत आहेत. साधी गोष्ट आहे, देशातल्या राजकारणाने घराणेशाहीशी आपले  घट्ट असे नाते जोडले आहे. भ्रष्टाचार आणि जातीयवाद जसा जोडला गेला आहे,तसा घराणेशाहीसुद्धा पक्का राजकारणाशी चिकटून आहे.इथे भ्रष्ट राजकारण्यांनादेखील विधानसभा,लोकसभेत बिनधास्तपणे मतदार पाठवत आहेत. जातीयवादाचे राजकारणदेखील असेच फोफावले आहे.  त्यामुळे आपल्या देशात काहीही घडू शकतं, हे काय वेगळे सांगायची गरज नाही.


No comments:

Post a Comment