Sunday, September 10, 2017

संस्कृत भाषेचं गाव

     
संस्कृत भाषा कित्येक भारतीय आणि युरोपीय भाषांची जननी असल्याचं मानलं जातं. अनेक भाषांची जननी असूनही आज याच भाषेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या भाषेला शाळा-कॉलेजातच तृतीय भाषा म्हणून विद्यार्थी निवडताना दिसतात. अन्यथा ही भाषा बोलाचालीतून कधीच लुप्त झाली आहे. आज आपण फक्त श्लोकांमध्येच संस्कृत भाषा ऐकतो. पण आजदेखील भारतात असं एक गाव आहे,जिथे संस्कृत केवळ मातृभाषा नाही तर औपचारिक भाषादेखील आहे.कर्नाटक राज्यातल्या शिमोगा जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या काठाला मत्तूर नावाचे गाव आहे.इथे व्यवहाराची भाषा संस्कृत आहे. इथली लहान मुलेच नाही तर तरुण आणि वृद्धदेखील संस्कृत भाषाच बोलतात.इतकेच नाही तर वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून इथे संस्कृत भाषा शिकायला लोक येतात.या गावात हॉटेल नाही,गेस्ट हाऊस नाही किंवा एखादे लॉजसुद्धा नाही. इथे आलेल्या पर्यटकांना इथले लोकच आपल्याकडे ठेऊन घेतात. मत्तूर गावात एकाद्या घरात गेला तर तुम्हाला भवत: नाम किम? (तुमचे नाव काय?) किंवा कथम अस्ति? ( तुम्ही कसे आहात?) सारखी वाक्ये ऐकायला मिळतात. याचा अर्थ असा नाही की, इथले लोक निरक्षर, आडाणी आहेत. किंवा हे लोक आदिवाशी भागातील आहेत, असेही नाही. इथल्या प्रत्येक घरातली एक व्यक्ती इंजिनिअर आहे.गावातील मुले शिक्षणातल्या प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहेत.इथे सगळ्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. इथली मुलं आधुनिक गॅझेटसचा वापर करताना दिसतात.इथे वैदिक मंत्रांच्या उच्चारणाची गुंज आपल्याला ऐकायला मिळेल आणि एकविसाव्या शतकातील सगळ्या सुविधाही पाहायला मिळतील. इतकेच नव्हे तर या गावचे वैशिष्ट्य असे की, संस्कृत शिकायला येणार्या लोकांना संस्कृत मोफत शिकवले जाते. त्याची कोणतीही फी घेतली जात नाही.या गावातले लोक संस्कृत युग अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.हे खरेच कौतुक करण्यासारखे आहे.

No comments:

Post a Comment