Monday, September 11, 2017

पशुजन्य आजार मानवापुढील आव्हान


   माणसाला प्राणी -पक्षी सांभाळायला, पाळायला आवडतात. कुत्रा,मांजर किंवा पक्षी शहारातले लोक छंद म्हणूनही पाळतात. खेड्यात मात्र अशा प्राणी पक्षांचा उपयोग होतो. याशिवाय गाय,म्हैस,शेळी,बैल पाळले जातात.यातून त्यांना अर्थार्जन होत असते.मात्र या पशु पक्षी यांची योग्य ती काळजी घेतली नाही किंवा आपणही त्यांच्या संपर्कातूनबाहेर आल्यावर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर त्यांच्यामुळे माणसांना आजार होतात. या आजारांचे प्रमाण चिंताजनक आहे. झुनोटिक (पशुजन्य) म्हणजे प्राण्यांपासून मनुष्याला होणारे आजार. मानवाला होणाऱ्या 60 टक्के संसर्गजन्य आजारांपैकी 75 टक्के आजारांचा उगम प्राण्यांपासून होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे पशुजन्य आजार मानवापुढे आव्हान ठरत आहेत. या पशुजन्य आजारांचा सामाजिक व आर्थिक प्रभाव पडतो. या आजारांचे व्यवस्थापन व उच्चाटन करणे गरजेचे आहे. शहरीकरण, नैसर्गिक वसाहतींवर अतिक्रमण व वातावरणातील बदलाचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. यामुळे जिवाणू व विषाणू स्वतःचा परजीवाश्रय (होस्ट) बदलवत असतात. जनुकीय उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती साथ देत नाही. अशा आजारांच्या संभाव्य धोक्‍याबाबत निश्‍चित अनुमान काढता येत नाही.
      बऱ्याच शहरांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येते.मोकाट कुत्र्यांचा त्रास बहुतेकांना होतो. त्यांनी चावा घेतल्यामुळे रॅबीज हा आजार होतो. रॅबीजमुळे दरवर्षी जगात 55 हजार जणांचा बळी जातो. वास्तविक प्राणी मानवाचा मित्र आहे,शत्रू नाही.परंतु अलिकडील मानवाचे वागणे पाहता याच प्राण्यापासून  त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसे पाहिले गेले तर प्राण्यांचा मानवाशी अनादिकाळापासून संबंध आहे. गायी, म्हशी, शेळ्यांपासून दूध मिळते. प्राण्यांचे मांसही खाल्ले जाते. शेणामुळे जमीन सुपीक होते. गोवऱ्या तयार करता येतात. गांडूळखतासाठीही शेणाचा वापर केला जातो. यामुळे सेंद्रिय अन्नधान्य मिळण्यास मदत होते. देशी गायीचे मूत्र (युरिन) अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. प्राण्यांपासून होणारे आजार टाळायचे असेल तर काहीच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कुत्रा फिरवून आणल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

     पशुपक्षी हाताळताना हातमोजे, मास्क वापरले पाहिजेत. प्राण्यांच्या संपर्कात येताना आपले सर्वांग झाकणारे कपडे घातले पाहिजेत. मच्छरदाणी वापरा करायला हवा. शिवाय प्राण्यांची जागा फिनाईलने निर्जंतुकीकरण करा. पशुपक्ष्यांच्या विष्ठेची योग्य ती  विल्हेवाट लावली पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास पशूजन्य आजारापासून आपली सुटका होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment