शारदीय नवरात्र
हिंदू धर्मात भगवती देवीची
विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय
नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र
हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे
शरद ऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषिमुनींनी बल संवर्धनार्थ
हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे, अशी शक्यता आहे.
भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे
कमी-अधिक स्वरूपात पूजाकृत्य घडते. दुर्गोत्सव
हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून
येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्यपुराणात कथन केलेले आढळते.
नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तींची
आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली
असतात आणि शेतकरी खुशीत असतो. पहिल्या दिवशी घटस्थापना होते.
घटस्थापना विधी
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक
परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात.
त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा
सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात.
त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच
देवीचा मुखवटा मानून हळद-कुंकू लावतात. हारवेणी-गजरा घालतात. घटाखालच्या
काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात. या घटाजवळच अखंड नंदादीप
लावतात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे
पूजा केली जाते.
देवी उपासना
नवरात्रातली देवी उपासना प्रामुख्याने
रात्री करतात, कारण रात्रीची वेळ ही उपासनेला
उत्तम असते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची
सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवव्या दिवशी म्हणजे दसर्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे
होम करतात. या उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात.
नवरात्र व्रत
नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.
पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या
वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास
नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची
व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास
किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीअखेर हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस
सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात, घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित
होमहवन व बलिदानही करतात. नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला
भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.
नवदुर्गा : देवीची नऊ रूपे
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या
शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी
लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया
किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे
पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या
सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी,
भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
1) शैलपुत्री, 2) ब्रह्मचारिणी 3) चन्द्रघंटा 4) कूष्मांडी (कुष्मांडी)
5) स्कंदमाता 6) कात्यायनी 7) कालरात्री 8) महागौरी, 9) सिद्धिदात्री,
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
देवी माहात्म्य
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा
काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणार्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.
ब्रह्मचर्य, संयम, उपासना,
यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक
शुद्धतेचा काल आहे, असे मानले जाते.
No comments:
Post a Comment