लेह-लडाखच्याबाबतीत प्रसिद्ध अभिनेता
मिलिंद सोमणचं मत एका वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्याला हा परिसर
फार आवडतो. या भागात आल्यावर त्याला नवीन जीवन मिळाल्यासारखं
वाटतं, असं त्यानं म्हटलं आहे. तो दरवर्षी
न चुकता याठिकाणी जातो, असाही उल्लेख त्याने केला आहे.
अर्थात अगदी त्याच्याप्रमाणेच अनेकांना येथील सृष्टीसौंदर्य मोहवून टाकत
असेल. निसर्गाचा विविध चमत्कार अनुभवयास इथे येतो. वास्तविक सिंधू नदीच्या काठाला वसलेलं
लेह-लडाख जम्मू आणि काश्मिर राज्यातलंच नव्हे तर भारतातलं एक सृष्टीसौंदर्यानं नटलेलं लोकप्रिय
पर्यटन ठिकाण आहे.इथली शांतता, सौंदर्य
अनेकांना आकर्षित करते. अनेकांना हे ठिकाण वेगळाच आनंद देऊन जातं.
पहाडांमध्ये वसलेली गावं, आकाशाला स्पर्श करणारी
स्तूपं आणि उंचच्या उंच मोनास्ट्रीज (मठ) पाहताना जसं की वार्याच्या झोक्यात झुलत आहेत,
असं वाटतं.चोग्लाम्सरजवळून वाहणारी सिंधू नदी एका
खुबसुरत संगीतासारखी मनाला शांतता प्रदान करते.
लेह-लडाखला पाहण्यासारखं खूप काही आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर भारताचे नंदनवन म्हणून का ओळखला जातो,
हे इथल्या प्रवासात अनुभवास येतो.हिमालयातील बर्फाच्छादित
पर्वतशिखरे,मध्येच सखल भागात दिसणारे नद्याचे खळाळणारे प्रवाह,त्याच्या भोवतीचा हिरवागार परिसर, निळेशार स्वच्छ पाणी,
सरोवर अशी अनेक दृश्य पाहताना आपण स्वर्गात असल्याचा अनुभव येत राहतो.
लेह आपल्या बौद्ध
मंदिरांसाठी म्हणजेच मठांसाठी प्रसिद्ध आहे. इथला लेह महाल आवर्जून पाहण्यासारखा आहे.याची निर्मिती सिगें नामग्याल याने 16 व्या शतकात करवली
होती. आपल्या कला आणि भगवान बुद्ध यांचे जीवन जिवंत स्वरुपात
चित्रित करण्यात आलेली येथील पेंटिंग ही याची खासियत आहे. या
प्रदेशाला आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभली आहे ती बौद्ध धर्माच्या
पगड्यांमुळे.रायसी फोर्ट,रॉयल पॅलेस लिकिर,थिक्से, स्पिटुक अशी प्राचीन बौद्ध मठं आपल्याला पाहायला
मिळतात.
लेहमधले पँगाँग
सरोवर पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. असं सांगितलं जातं की,इथे अगदी वर्षभर छान,सुंदर हवा असते.दुर्मीळ असा काळ्या मानेचा सबेरियन क्रेन
इथे पाहायला मिळतो. पुढे त्समोरिरी नावाचे आणखी एक सरोवर आहे.
अर्थात या सरोवराकडे जाणारा मार्ग खडतर आणि दुर्गम आहे. मात्र पर्यटक हा सरोवर पाहिल्याशिवाय राहत नाहीत, असा
अनुभव आहे.
लडाखला समृद्ध
अशी संस्कृती आनि इतिहास आहे. हा प्रदेश दर्याखोर्यांचा आहे.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि सर्वात प्राचीन आणि मोठी गुंफा पाहण्यासारखी
आहे. ही डिसकिट गुंफा नावाने ओळखली जाते. येथील बुद्धांचा सुवर्णपुतळा 32 मीटर उंच आहे.
तसेच या परिसरात शेय मॉनस्ट्री येथे बुद्धांचा आणखी एक पुतळा आहे.
हा उंचीच्याबाबतीत दुसर्या क्रमांकाचा पुतळा आहे.
काही भाग सपाट प्रदेशाचा आहे. इथे उंटावरची सवारी
तसेच जीपची सफारी करताना निसर्ग सौंदर्य छानपैकी न्याहाळता येतो.
लडाखला जायला जम्मू,चदीगढ,दिल्ली
आणि श्रीनगर येथून थेट हवाई मार्ग आहे. लेह शहरात आपल्याला टॅक्सी,जीप भाड्याने मिळतात. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपल्याला
जवळचे स्टेशन म्हणजे जम्मू. 690 किलोमीटर अंतरावर आहे.जम्मू रेल्वे स्टेशन देशातल्या प्रत्येक भागातून जोडला गेला आहे. रस्ता मार्ग अनुसरायचा असेल तर आपल्याला लेहपर्यंत जम्मू-श्रीनगर-लेह असा राष्ट्रीय राजमार्ग आहे.
No comments:
Post a Comment