आज 3 सप्टेंबर प्रसिद्ध अभिनेता शक्ती
कपूर याचा जन्म दिवस. 1958 मध्ये त्याचा दिल्लीतल्या एका पंजाबी
कुटुंबात जन्म झाला. त्याचं खरं नाव सुनील कपूर,पण चित्रपट सृष्टीत आल्यावर त्याच्या नावाचं शक्ती कपूर, असं नामकरण झालं.त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचे खरे
आयुष्यदेखील अस्सल फिल्मी आहे. त्याच्या वडिलांचे दिल्लीत टेलरिंगचे
दुकान होते. तो त्यांच्या मदतीला दुकानात जायचा. त्यांच्या टेलरिंगच्या दुकानात हिंदी चित्रपटातले नट-नट्या यांचा राबता होता.याच काळात सुनील दत्त रॉकी चित्रपटाची
निर्मिती करत होते. शक्तीला पाहिल्यावर त्यांनी त्याला आपल्या
चित्रपटात खलनायकाची भूमिका देऊ केली. परंतु,सुनील दत्त यांना सुनील हे नाव शक्तीसाठी सुटेबल वाटले नाही. त्यांनी सुनील कपूरच्या जागी शक्ती कपूर असे नामकरण केले आणि तेव्हापासून त्याची
ओळख शक्ती कपूर अशी झाली.
शक्ती कपूरने आपल्या
वेगळ्या अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी अशी छाप सोडली. त्याच्यावर आतापर्यंत शंभरपेक्षा
अधिक चित्रपटांमध्ये गाणी चित्रित करण्यात आली आहेत. वास्तविक
तो अगदी अभिनेत्यासारखा दिसत असल्याने संजय दत्त,मिथुन चक्रवर्ती
आणि गोविंदा यांच्याबरोबरच्या चित्रपटांमध्ये त्याच्यावरही एकादे गाणे चित्रित केले
जात होते. रॉकी मध्ये तो संजय दत्तसोबत एका डान्स कॉम्पिटीशनमध्ये
भाग घेतल्याचे दाखवण्यात आले आहे. मिथुनच्या डान्स डान्स चित्रपटातही
त्याला डान्सर दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे चित्रपटातल्या
डान्सच्या अतिरेकामुळे अमजदखान यांनी त्याचे डिस्को क्विन असे नामकरण केले होते.
हास्य अभिनेता
अशी खरी ओळख असलेल्या कादर खान यांच्यासोबत त्याची खास अशी जोडी जमली होती.ती तितकीच लोकप्रिय झाली.दोघांनी मिळून जवळपास शंभरावर चित्रपट केले असतील. एक
काळ तर असा होता की, प्रत्येक चित्रपटात त्याची हजेरी होती.
नायक कोणही असो, खलनायक शक्ती कपूरच, असे समिकरणच होऊन गेले होते. त्या काळात त्याला बटाटा
( आलू) असे संबोधले जाई.कारण
बटाटा कुठल्याही भाजीत (चित्रपटात) मिसळून
जातो आणि चवीची मजा वाढून जाते,तसा तो कुठल्याही चित्रपटात मॅच
होऊन जाई.
शक्ती कपूर प्रसिद्ध
अभिनेता मिथून चक्रवर्ती यांचा खूप आदर करतो. इतकेच नव्हे तर आजही तो आपल्या महत्त्वाच्या कामात त्यांचाच सल्ला
घेतो.सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या दरम्यान त्याला आपण कॉमेडी
करू शकतो, याची जाणीव झाली. आत्मविश्वास आला.नंतर त्याने अनेक कॉमिक भूमिका केल्या.
खलनायकाच्या भूमिकाही तो कॉमिक अंदाजात केल्या. त्यामुळे चित्रपटात वेगळ्या कॉमिडियनची गरज भासली नाही.
आऊ ललिता, मैं एक छोटासा नन्हा सा प्यारा
बच्चा हूं, नंदू सब का बंदू सारखे असे अनेक गाजलेले डायलॉग आजदेखील
आठवले जातात.आतापर्यंत त्याने सातशेच्यावर चित्रपट केले आहेत,
त्यातल्या बहुतांश चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे.1995
मध्ये त्याला राजा बाबू चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ हास्य कलाकार फिल्म
फेअर अॅवार्ड मिळाले आहे. आजही तो चित्रपटांमध्ये
व्यस्त आहे. आता त्याची कन्यादेखील चित्रपटांमध्ये काम करत आहे.
No comments:
Post a Comment