Wednesday, October 25, 2017

अँटीबायोटिक्सचे महत्त्व जाणून घ्या

     परवा माझ्या डॉक्टरमित्राकडे गेलो होतो. खरे ते आमच्या फॅमिली डॉक्टरसारखेच आहेत.गेली सतरा-अठरा वर्षे, आमच्या कुटुंबातले सर्वच सदस्य उपचारासाठी त्यांच्याकडेच जात असतो.आमच्या गप्पा चाललेल्या असताना एक व्यक्ती आपल्या आजारी मुलाला घेऊन दाखवायला आला. अर्थात आजार सर्दी,खोकला,ताप असाच होता. तपासून झाल्यावर त्याने डॉक्टरांना विनंती केली की, मुलाला  अँटीबायोटिक्स द्या. डॉक्टरांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला,पण त्याने आग्रह धरताना त्याशिवाय मुलगा लवकर बरा होत नाही, असे सांगितले. नाईलाजाने डॉक्टरांनी अँटीबायोटिक्सची औषधे लिहून दिली. त्यांनी असे काही पेशंट आहेत की, सांगून-समजावूनही अँटीबायोटिक्स औषधे देण्याचा आग्रहच करतात. शेवटी त्यांचा आग्रह मोडता येत नाही, हा त्यांचा व्यावसायिक अनुभव स्पष्ट केला. रुग्णांना अर्थातच अँटीबायोटिक्स का हवी असतात, याची आपल्याला कल्पना आहे. त्यांना लवकर बरे व्हायचे असल्याने वारंवार असा आग्रह रुग्णांकडून डॉक्टरांना केला जातो, मात्र वारंवार अँटीबायोटिक्स घेतल्याने त्याचे धोके आहेत, याबाबत खरे तर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. कारण एका डॉ़क्टराने अँटीबायोटिक्सचा डोस नाही दिला तर दुसरा देणार नाही कशावरून? त्यामुळे याची जबाबदारी डॉक्टरांवर सोपवण्यापेक्षा जनजागृतीच्या माध्यमातून अँटीबायोटिक्सचा आग्रह कमी करता येऊ शकतो.

     जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली असून यावर्षीचे घोषवाक्यच त्यांनी ङ्ग अँटीबायोटिक्सचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या ङ्ग असा निश्‍चित केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसह सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी याबाबत अधिक जागरूक राहून अँटीबायोटिक्सच्या अतिसेवनाचे तोटे लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अँटीबायोटिक्स अर्थात दुधारी तलवारीसारखे असल्याचे म्हटले जाते. त्याची उपयुक्तता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच दुष्परिणामही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जितका वाईट,तितकाच  नव्हे त्याहून अधिक तोटा याचा अतिवापराचा आहे,हे खरे तर समजून घेतले पाहिजे.
     मागच्या शतकाच्या प्रारंभी एका अपघाताच्या घटनेच्यानिमित्ताने डॉ. अलेक्झांडर यांना पेनिसिलीनचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारक ठरला. यामुळे जंतूमुळे होणारे आजार पूर्ण बरे होतात, हे दिसून आल्याने जगभरातच या औषधाला मागणी वाढायला लागली. औषध कंपन्यांनी यावर अधिक लक्षकेंद्रित करून नवनवीन अँटीबायोटिक्स औषध निर्मितीवर भर दिला. मात्र याचा चांगला फायदा असा झाला की, जंतूमुळे होणारे क्षय,न्यूमोनिया,मलेरिया,कुष्ठरोग,एड्स यांसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.विशेष म्हणजे रुग्णाला गरजेनुसार  शस्त्रक्रिया करताना जंतूसंसर्गाचा धोका टाळता येऊ लागला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संरक्षणाला कवच मिळाले.
मात्र, आता याचा वापर अप्रमाणात वाढला आहे. लवकर बरे होण्याच्या नावाखाली अनियंत्रित औषधांचा मारा आपलाच घात करणारा आहे, याची खरे तर कल्पना येण्याची गरज आहे. या औषधांमुळे आपण जंतूंवर विजय मिळवला असला तरी जंतूदेखील आपल्या अस्तित्वासाठी प्रयत्नशील असतातच! ते आपल्या गुणसूत्रात सातत्याने बदल करत असतात. त्यामुळे ते नव्या स्वरुपात आपल्या शरीरावर मारा करत असतात. त्यामुळे आपण जी औषधे वापरतो, त्यांचा परिणाम हळूहळू होईनासा होतो. शेवटी काय तर ज्या जंतूसाठी आपण त्यांच्यावर प्रभावी ठरणारी औषधे घेतो,तीच औषधे प्रभावहीन ठरतात.आणि जंतू आपला मारा करतात आणि आपल्या शरीरावर कब्जा करतात. जर ती औषधे कुचकामी ठरत असतील, तर मग आपण फार मोठ्या धोक्याला सामोरे जाणार असू. आज किरकोळ आजार गंभीर ठरत आहेत, याला कारणही तेच आहे. विशेष म्हणजे अँटीबायोटिक्सची आणखी प्रभावी औषध निर्मिती व्हायला वेळ लागणार आहे. अलिकडच्या काही वर्षात याबाबत अद्याप प्रगती दिसून आलेली नाही. यासाठी संशोधन, औषधनिर्मितीसाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.यासाठी सर्वच देशांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
     काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अँटीबायोटिक्स औषधे ही विषाणूपासून होणार्‍या आजारांना उपयुक्त नाहीत. ती जंतूपासून होणार्‍या आजारासाठी उपयुक्त आहेत. डॉक्टरी सल्ल्याने घेतलेली औषधे ही जितक्या कालावधीसाठी घ्यायवयाची आहेत, तितकी ती घ्यायला हवीत. म्हणजे त्याचा कोर्स पूर्ण करायला हवा. अँटीबायोटिक्स औषधांचा परिणामच आजारावर होत नसेल तर आजार वाढून त्यातून पुढे धोके वाढणार आहे. शेवटी मृत्यूशीच गाठ आहे.त्यामुळे सामान्य औषधाने आजार बरा होत नसेल तरच शेवटच्या टप्प्यात अँटीबायोटिक्सचा वापर करायला हरकत नाही. कोणत्याही आजाराचा प्रभाव हा दोन तीन दिवस राहत असतो, याकालावधीत आजार बरा झाला नाही तर डॉक्टरी सल्ल्याने उपचार घ्यायला हवेत. सध्याच्या घडीला तर अँटीबायोटिक्स संजिवनी मंत्र आहे, त्याचे महत्त्व आबाधित ठेवणे,ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

Tuesday, October 24, 2017

महिलांवरील वाढलेल्या अत्याचारामुळे राज्याची बदनामी


      राज्यागेल्या काही दिवसांत मुंबईतल्या विक्रोळी आणि कुर्ला भागात अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्या. या घटना ताज्या असतानाच परवा मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या महिला डब्यात शिरलेल्या नराधमाच्या हातून सुटका करून घेण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने धावत्या गाडीतून उडी मारली. त्याचबरोबर वर्सोवा भागात भररस्त्यात तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. गेल्या काही दिवसांतल्या मुंबईतल्या या घटना आहेत. राज्यात इतरत्र तर कुठे ना कुठे महिला,तरुणींवर सतत अत्याचाराच्या घटना घडत आहेत.विशेष म्हणजे महाराष्ट्राची व संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा सर्वाधिक महिलांवरील अत्याचाराच्या घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये घडत आहेत.त्यामुळे पुरोगामी राज्य म्हणून मिरवणारे राज्य बिहारकडे वाटचाल करीत असल्याचेच दिसत आहे. हे राज्याला, शासनाला आणि कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते पोलिस खात्याला भूषणावह नाही. कायद्याचे राज्य कधी येणार आहे, राज्याचे गृहखाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे.

     महिलांना माता,देवी,भगिनी अशा उपमा देऊन आपली संस्कृती महिलांचा सन्मान करते. मात्र प्रत्यक्षात आपण तिच्यावर अत्याचार, मानसिक व शारीरिक छळ करतो. आज लिंगपिसाट वृत्ती कमालीची फोफावली आहे. जाता-येता भरगर्दीत, रस्त्यावर महिलांवर अत्याचार केले जात आहेत.मग एकादी महिला एकटी सापडली असेल, तर तिची काय अवस्था ही पिसाळलेली माणसे करत असतील,याची कल्पना करूनच अंगावर शहारे येतात. अशा पिसाळलेल्या माणसांना आवर घालणार कोण, असा गहन प्रश्‍न तुम्हा- आम्हांपुढे आहे. गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यात आईवर रुसून संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या तरुणीचा सकाळी मृतदेह पाहायला मिळाला. तिच्यावर अत्याचार करून नराधमांनी तिला मारून टाकले. अशा कित्येक घटना सातत्याने राज्यात कुठे ना कुठे घडत आहेत. त्यामुळे अन्य राज्यांपेक्षा बरी अवस्था महाराष्ट्राची आहे, असे म्हणायचे म्हणजे धाडस होत नाही. उलट आपण बिहारलाही मागे टाकलो आहे, असेच म्हणावे लागेल.
     गेल्या अडीच वर्षात तब्बल दहा हजार 496 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. 29 हजार 58 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत,यावरून आपल्या राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, याचा अंदाज यायला हरकत नाही. वास्तविक हे आकडे संताप आणि चीड आणणारे आहेत. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर बलात्कार करणार्‍या आरोपीला फाशी ठोठावण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला आहे. तरीही या शिक्षेचा धाक अशा पिसाळालेल्या नराधमांना राहिलेला नाही.राज्यात खैरलांजी किंवा कोपर्डी गावात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य महिलादेखील सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. पिसाळलेल्या नराधमांची पिलावळ गावात काय शहरात काय सर्वत्रच तितक्याच जोमाने भटक्या कुत्र्यांसारखी गल्लीबोळात वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांचे आयुष्यच धोक्यात आले आहे. याला आवर घालण्यात पोलिस यंत्रणेला येत असलेले अपयश मोठा चिंतेचा विषय आहे, असेच म्हणायला हवे. याला आवर घालण्यासाठी पोलिस यंत्रणेत अमुलाग्र बदल आवश्यक आहे.
      गेल्या अडीच वर्षाचा राज्यातल्या यासंबंधीचा परिस्थितीचा विचार केला तर संतापाशिवाय कोणतीच प्रतिक्रिया आपल्या तोंडून येत नाही. 2015 मध्ये विनयभंगाच्या तब्बल 11 हजार 388 घटना घडल्या तर बलात्काराच्या 4 हजार 144 घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये विनयभंगाच्या 11 हजार 388 तर बलात्काराच्या 4 हजार 209 घटना घडल्या. 2017 मध्ये गेल्या सहा महिन्यात 5 हजार 957 विनयभंगाच्या तर बलात्काराच्या 2 हजार 143 घटना घडल्या आहेत. एवढे मोठे आकडे हे सरकारी नोंदीचे आहेत. कित्येक महिला, तरुणी आब्रुच्या भितीखातर पोलिसांचा दरवाजा ठोठावायला तयार नसतात. अशा घटना तर फारच असतील. अशा घटनांना आवर घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असली तरी त्यांच्याही काही समस्या आहेत. त्या समस्या राज्य शासनाने सोडवण्याची आवश्यकता आहे. सध्या सर्व पोलिस ठाणी इंटरनेटशी जोडली गेली आहेत. फेसबूक,व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, पोलिसांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली आदी गोष्टी राबवण्यात आल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियानही राबवले जात आहे. मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने राजाच्यादृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. मात्र अजूनही पोलिस यंत्रणा सक्षम नाही, हेच आपल्याला यावरून दिसते. महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकसंख्येच्यामानाने पोलिसांची संख्या असायला हवी, ती अजूनही पूर्ण झालेली नाही. दहा-बारा गावांसाठी ज्या औटपोस्ट आहेत,तिथे यंत्रणा सक्षम नाही. तिथेही जलद यंत्रणा राबवण्याची गरज आहे. अनेक औटपोस्टची अवस्था अशी असते की, त्यांना चोवीस तास कुलूप असते. पोलिस कर्मचारी कुठे तरी चिरीमिरी गोळा करायला गेलेला असतो. काही ठिकाणी ही पोलिस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची तिथे दादच घेतली जात नाही. हा सगळा प्रकार थांबायला हवा. ग्रामीण स्तरावरदेखील यंत्रणा सक्षम असायला हवी आहे.गर्दीच्या ठिकाणी,रात्रीच्यावेळी पोलिस गस्ती वाढायला हव्यात आहेत. तरच अशा अत्याचारांना आळा बसणार आहे. अन्यथा बिहार आणि महाराष्ट्रात यांच्यात फरक तो काय राहिला?

Monday, October 23, 2017

(करिअर वाटा) समुद्राच्या तळाशी शोधा तुमचे भविष्य

     जर तुम्हाला समुद्र आवडत असेल, त्यातल्या जीव-जंतू,प्राण्यांविषयी, समुद्राच्या तळाविषयी माहिती जाणून घेण्याची उत्कट इच्छा असेल,उत्सुकता असेल तर तुमच्यात मरीन बायोलॉजिस्ट बनण्याचे सगळे गुण आहेत, असे म्हणायला हरकत नाही.मरीन बायोलॉजिस्ट समुद्राच्या तळाची माहिती गोळा करतो, पण याचे कार्यक्षेत्र समुद्राची व्यापकता शोधणे आहे. यात समुद्री जीवांचे आयुष्य जवळून जाणून घेणं, रोप आणि मायक्रो ऑर्गेनिज्मच्या विविध प्रकारच्या जातींची ओळख करून घेणे,तिथे वाढत असलेल्या आजारांचा शोध घेणे, समुद्री जिवांचे आचरण आणि व्यवहार जाणून घेणे, त्याचबरोबर मानवाच्या व्यवहारांमुळे समुद्री जीवनावर परिणाम होतो, समुद्रातील नवीन प्रजातींचा शोध घेणे,या शोधांना सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्धी देणे,समुद्रातील नमुने घेणे, टेस्टिंग आणि समुद्री जनसंख्येची माहिती गोळा करणे आदींचा समावेश आहे.
     मरीन बायोलॉजिस्ट अनेक प्रकारच्या पदांवर काम करतात, जसे- वाइल्ड बायोलॉजिस्ट,जुलोजिस्ट, फिश आणि वाइल्डलाइफ बायोलॉजिस्ट, फिशरीज बायोलॉजिस्ट,एक्वेटिक बायोलॉजिस्ट, कंजर्वेशन बायोलॉजिस्ट आणि बायोलॉजिस्ट टेक्निशियन. काही मरीन बायोलॉजिस्ट या क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. यामुळे ते बायोटेक कंपन्यांना समुद्रातील जीव-जंतूंची माहिती उपलब्ध करून देतात. यामुळे ते इंडस्ट्रियल प्रॉसेसमध्ये कारागिर सिद्ध होतात.
      मरीन बायोलॉजिस्टचे क्षेत्र फारच मोठे आणि विस्तृत आहे. यात समुद्रातील खोली ते यातील जीव-जंतूंच्याबाबतीत अभ्यास करावा लागतो. भारतात आता या क्षेत्रात प्रगतीला प्रारंभ झाला आहे.आज देशात असे काही तरुण आहेत, जे या रोमांचकारी करिअरचा स्वीकार करत नाहीत तर यात जोरदार यशदेखील मिळवत आहेत. समुद्राच्याखाली जीव, तेल आणि गॅसची माहिती मिळवण्यासाठीदेखील मरीन बायोलॉजिस्टची मदत घेतली जात आहे. सध्याच्या काळात काही देशी-विदेशी कंपन्या मरीन बायोलॉजिस्टची सेवा घेत आहेत.
     मरीन बायोलॉजिस्ट बनण्यासाठी कमीत कमी सायन्समध्ये ग्रॅज्युएट ( स्पेशिलायजेशन इन मरीन बायोलॉजी) असणं आवश्यक आहे. काही शिक्षण संस्था या विषयात पदवी शिक्षण देत आहेत. शोध-संशोधन आणि विद्यापीठांमध्ये  बायोलॉजीमध्ये पीएचडी मान्य करण्यात आली आहे.मरीन बायोलॉजी शिक्षणात इकोलॉजी,एनाटोमी, फिजियालॉजी, बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी,रिप्रॉडक्शन अँड डेवलपमेंट, ओशियन फार्मिंग,पॉल्यूशन बायोलॉजी, एनर्जी रिसोर्सेज अ‍ॅन्ड कंजर्वेशन आदींचा समावेश आहे. परदेशात काही मरीन बायोलॉजिस्ट लोकांना मोठ्या एक्वेरियम आणि थीम पार्कांमध्ये नोकर्‍या दिल्या जात आहेत. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी समुद्रकाठाला पर्यावरण देखभालीसाठीदेखील परदेशात काही हॉटेलमध्ये मरीन बायोलॉजिस्ट यांची सेवा घेतली जात आहे.भारतात दक्षिण राज्यांमध्ये याबाबतीत मोहिम सुरू झाली आहे,कारण देशाचा समुद्री सीमाभाग बहुतांश या राज्यांमध्ये आहे.
     समुद्रातील जीव-जंतूंच्या अभ्यासात आवड असण्याबरोबरच एका मरीन बायोलॉजिस्टमध्ये काही खास गुण असायला हवेत. विचार करण्याची दुरगामी शक्ती,हुशारी, कॉम्प्युटरमध्ये प्राविण्यता, शोध-संशोधन करण्याची वृत्ती,लिहिण्या-बोलण्याची आवड आणि टीमसोबत काम करण्याची योग्यता असायला हवी.मरीन बायोलॉजिस्टला बहुतांश वेळी घराबाहेरच शोध-संशोधनाच्यानिमित्ताने घालवावे लागणार, हे उघड आहे. पाण्यात बुडालेल्या जहाजांचा शोध घेणे,समुद्री जीव-जंतूंवर बारीक नजर ठेवणे, नमुने गोळा करणे आदी गोष्टींचा समावेश असल्याने बहुतांश वेळ हा घराबाहेरच जाणार आहे. यांना सरकारी आणि कंजर्वेशन एजन्सीज,एनवायरमेंट लॅबोरेटरीज, मॅरीन लॅबोरेटरीज, वॉटर इंडस्ट्री, कोस्टल अर्थॉरिटिज, फिशरीज टुरिझ्ममध्ये काम करण्याबरोबरच लॅब टेक्नीशियनची नोकरी, विद्यापीठात ओशियनोग्राफिक्स लॅबोरेटरीज प्रायवेट सेक्टरमध्येदेखील काम करता येते.एवढेच नव्हे तर प्राणी संग्रहालय, म्युझियम, स्कूल सायन्स टीचर, विद्यापीठ प्राध्यापक पेशासुद्धा स्वीकारता येतो.त्याचबरोबर फ्रिलान्स कामाच्या सुविधादेखील उपलब्ध आहेत. प्रारंभी 15 ते 20 हजार रुपये वेतन मिळू शकते.नंतर त्यात वाढ होत जाते.
प्रमुख शिक्षण संस्था
1)   डिपार्टमेंट ऑफ कोस्टल डिजास्टर मॅनेजमेंट, पुडुचेरी युनिवर्सिटी,पोर्ट ब्लेयर
2)   वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिवर्सिटी, सुरत(गुजरात)
3)   अन्नामलाई युनिवर्सिटी, अन्नामलाईनगर (तामिळनाडू)
4)   कोचीन युनिवर्सिटी ऑफ सायन्स एंड टेक्नॉलॉजी, कोच्ची(केरळ)
5)   डिपार्टमेंट ऑफ फिजिकल ओशियनोग्राफी,कोच्ची
6)   पुडुचेरी युनिवर्सिटी,पुडुचेरी  

Sunday, October 22, 2017

'अंतर्नाद'च्यानिमित्ताने...

     'अंतर्नाद' हे निव्वळ साहित्याला वाहिलेले नियतकालिक बंद करण्याचा निर्णय त्याच्या संपादकांनी घेतला असल्याची बातमी वाचनात आली. आणि हे नियतकालिक बंद होणार म्हणून हळहळ व्यक्त करणार्‍या प्रतिक्रियाही वाचायला मिळत आहेत. अर्थात हे नियतकालिक आर्थिक अडचणीमुळे बंद होत नाही तर, त्याला चांगले लेखक आणि लेखन न मिळणे हे असल्याचे वाचल्यावर मला थोडा धक्काच बसला. अंतर्नादचे एक-दोन दिवाळी अंक मी विकत घेऊन वाचले आहेत. त्यात लिहिणारे लेखक काही नवे तर काही जुने आहेत. असे असले तरी नव्या पिढीतल्या वाचकाला आणि लेखकांना हे नियतकालिक कितीसे माहित आहे? बरे या नियतकालिकेसाठी कोण कोण लिहितात,त्यांनी तरी आपल्या वाचकाला हे मासिक वाच, असे सांगितले आहे का? कुणा साहित्यिकाने यातल्या प्रकाशित साहित्यावर कुठे लिहिले अथवा बोलले आहे का? ठराविक लेखकांनी लिहायचे आणि ठराविक लोकांनीच वाचायचे का? खरे तर अंतर्नादच्या संपादकांना भानू काळे यांना दर्जेदार लिखाण आणि साहित्य मिळाले नाहीत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आज चांगलं लिहिणारी खूप लेखक आहेत. मात्र त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला नाही. वृत्तपत्रांनी तर कथा,कविता आपल्या रविवारच्या पुरवणीत छापायचेच बंद केले आहे.त्यामुळे अशा साहित्यिकांची कोंडी झाली आहे.

     वृत्तपत्रांचे दिवाळी याशिवाय लिहिणार्‍या साहित्यिकाला अन्य मार्ग नाहीत. काही अंतर्नादसारखे नियतकालिक आहेत.ते तळागाळापर्यंत पोहचले नाहीत. त्यामुले त्यांना चांगले साहित्यिक आणि लिखाण भेटले नाहीत, यात दोष कोणाचा? या नियतकालिकांना चांगले साहित्यिक अथवा लिखाण हवे असेल तर त्यांनी का विशेष प्रयत्न केले नाहीत. का त्यांनी नवोदित लेखकांना शोधून त्यांचे साहित्य मागवले नाही? ठराविक लेखकांच्या भरवशावर आपले दुकान चालवणार्‍या या नियतकालिकांनी का दर्जेदार साहित्यिक तयार करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? का त्यांनी आपले नियतकालिक सर्वदूर जावे म्हणून प्रयत्न केले नाहीत? नवोदितांना खरे तर मार्गदर्शांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी कार्यशाळा वेगैरे का ठेवल्या गेल्या नाहीत. आजचे प्रकाशक किती नव्या साहित्यिकांना संधी देतात? आज तर प्रकाशकांनी अनुवादावर अधिक जोर दिला आहे. त्यामुळे अनुवादकांचे दिवस चांगले आले आहेत. अर्थात तीही एक कला आहे. शिवाय आज वाचकाची रुची बदलली आहे. त्यानुसार प्रकाशक पुस्तकांचा बाजार मांडत आहेत. स्पर्धा परीक्षा, अनुवाद साहित्य, प्रेरणा देणार्‍या लिखाणाला मागणी वाढत आहे. साहजिकच कथा, कादंबर्‍या आणि कविता कोण वाचणार? वाचक निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न व्हायला नको का?
     आज फेसबूक, वॅट्स अप वर येणारे काही काही लिखाण अगदी भन्नाट असतात. सोशल मिडियावरचे लिखाण टाकाऊ, उथळ आहे, असे म्हणता येत नाही. यातल्या चांगल्या लिखाणाचा शोध घ्यायला हवा, संबंधित लेखकाला लिहिते करायला हवे. असे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग अंतर्नादसारखी नियतकालिके वाचणार कोण आणि त्याला लेखक कसा भेटणार? आज सगळे व्यावसायिक झाले आहे.त्यामुळे अशा नियतकालिकांनी आपले जुनेच धरून चालणार कसे? त्यांनासुद्धा या क्षेत्रात येऊन आपली जाहिरातबाजी करावी लागणार आहे. आज झीटीव्हीने दिवाळी अंक काढला. त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा हातोहात खपली. मग झीटीव्हीने ज्या लेखकांना घेऊन दिवाळी अंक काढला, ते लेखक अथवा त्यांचे लिखाण चांगले नाही का? इतकी वर्षे झाली तरी आवाज,जत्रा,मेनकासारखी दिवाळी अंक चालतात. वाचक वाचतात. असे असताना नियतकालिक लोक वाचत नाहीत कशावरून म्हणायचे किंवा त्यांना लिखाण मिळत नाही, कशावरून म्हणायचे? धनंजयसारख्या रहस्यकथांनी भरलेला अंकदेखील लोक शोधून काढून विकत घेतात.वाचतात. शेवटी आर्थिक अडचणी या सगळ्यांना आहेतच.त्यातूनही प्रयत्न करून सर्वांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे. एकादे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचवायचे असेल तर जाहिरातबाजी करणे ओघाने आलेच. आजच्या काळात जाहिरातबाजी महत्त्वाची आहे.
     आज जग फास्ट झाले आहे. हातात मोबाईल नव्हे स्मार्ट फोन आला आहे.अनेकजण ई- आवृत्त्या काढत आहेत. ग्राहकांपर्यत पोहचण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा आहे.खरे भानू काळे यांनी थोडा काळ विश्रांती घ्यावी आणि पुन्हा मोठ्या जोमाने, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नियतकालिकेला सुरुवात करावी. खरे तर आज नवीन लेखकाला मार्गदर्शनाची गरज आहे.संपादकाची जाणीव करून द्यायची गरज त्याशिवाय दर्जेदार साहित्य येणार कसे? आज जी पिढी लिहित आहे, ती जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लिखाणाची उंची गाठू शकली आहे.त्यामुळे अंतर्नादसारखी नियतकालिके प्रकाशित होत राहणे,काळाची गरज आहे. मोठमोठी इंग्रजी आणि हिंदी नियतकालिके ई-पुस्तक स्वरुपात येत आहेत. मराठीतल्या अशा नियतकालिकांनीही याचा स्वीकार करायला हवा.   मुलांसाठी लिहिणारी काही मासिके आहेत,तीही अजून आपलीच पाठ थोपटत कोशात अडकून पडली आहेत, त्यांनीही आता बाहेर येण्याची गरज आहे. आपल्या नियतकालिकांमध्ये बदलत्या जगाबरोबर बदलत राहिले पाहिजे. साहित्यात काही नवे प्रकार येत आहेत. लघुकथा वाचकाला भावत आहेत. थोडक्यात पण गहन विषय मांडणारे लिखाण आज स्वीकारले जात आहे. अशा लिखाणाचा मराठी साहित्यात अंतर्भाव व्हायला हवा आहे. फक्त चांगले लेखक आणि लिखाण मिळत नाही,म्हणून नियतकालिक बंद करणे हा खरे तर लेखकांचा अपमान आहे. असे कुणावर तरी खापर फोडून पळून जाता येणार नाही. अंतर्नादच्या संपादकांना आपण साहित्यिक निर्माण करण्यासाठी, त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि वाचक,लेखकांपर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न केले, हे सांगावे लागणार आहे.

Saturday, October 21, 2017

भूकबळीला तोंड देण्याचे आव्हान

     जगातल्या 8.1 अब्ज लोकसंख्येपैकी 80 कोटी म्हणजे 12 टक्के लोक भूकबळीचे शिकार आहेत. 20 कोटी भूकबळीचे शिकार असलेल्या लोकसंख्येसोबत भारत यात पहिल्या क्रमांकावर आहे.ही अवस्था त्या वेळेस आहे, ज्यावेळेस जगभरात भरपूर अन्नधान्य आणि अन्य खाद्यपदार्थांचे उत्पादन होत आहे. जगभरात कुठे गृहयुद्ध तर कुठे नैसर्गिक आपत्ती यामुळे लोक आपले घरदार, आपला देश सोडून दरवेशी जीवन जगत आहेत. आपल्या आयुष्यातूनच उठलेले हे लोक द्रारिद्ˆय आणि भूकबळीमध्ये जगण्याचा अभिशाप घेऊन जन्माला आले आहेत.यापैकी बहुतांश लोक गरीब देशाच्या दिशेने स्थलांतर करत आहेत,त्यामुळे अन्नसंकट आणखी गडद होत आहे.

     अन्न आणि कृषी संघटनच्या 2017 च्या अहवालानुसार भारतात कुपोषित लोकांची संख्या 19.07 कोटी आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे.देशात 15 ते 49 वर्षांच्या 51.4 टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 38.4 टक्के मुले आपल्या वयाच्या मानाने कमी उंचीची आहेत.21 टक्के मुलांचे वजन फारच कमी आहे. भोजन कमतरतेच्या आजारामुळे देशात दरवर्षी तीन हजार मुले आपल्या जीवाला मुकत आहेत.2016 च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 118 देशांमध्ये भारताला 97 वे स्थान मिळाले आहे. देशात 2015-16 मध्ये एकूण अन्नधान्य उत्पादन 25.22 कोटी टन होते. हा आकडा 1950-51 सालच्या पाच कोटी टनापेक्षा पाचपटपेक्षा अधिक होता.तरीही आपल्या देशात बहुसंख्य लोक भूकबळीच्या परीघात आहेत. असे नाही की, उत्पादित पीकपाणी आपल्या देशाच्या लोकसंख्येला कमी पडत आहे. खरी समस्या आहे ती, अन्नाच्या  नासाडीची! देशातल्या अन्नधान्यापैकी 40 टक्के अन्नधान्य उत्पादन आणि पुरवठ्याच्या विविध घटकांमध्येच खराब होते.देशातल्या एकूण गव्हाच्या उत्पन्नापैकी जवळपास 2.1 कोटी टन गहू सडून जातो.भारतीय कृषी संशोधन परिषद 2013 च्या अभ्यासानुसार प्रमुख कृषी उत्पादनाच्या नासाडीमुळे देशाला 92.651 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
     जगाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे,त्या हिशोबाने अन्नधान्याचे उत्पादन वाढताना दिसत नाही.कित्येक खाद्यान्न उत्पादन आणि अन्य धान्य पदार्थ आपला सर्वाधिक उत्पादनाचा स्तर ओलांढून आता उतरंडीला लागला आहे. म्हणजे त्यांचे उत्पादन कमी होत चालले आहे मात्र, इकडे लोकसंख्या लगातार वाढत आहे. यात अंडी ,   मांस, भाजीपाला, सोयाबीन,गहू आणि तांदूळसह 21 खाद्य पदार्थांचा समावेश आहे. या जगात खाद्य नासाडीला  सुरक्षेदृष्टीने एक मोठे संकट म्हणून  पाहिले जात आहे.2006 मध्ये सर्वाधिक उच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर चिकनचे उत्पादन कमी होत चालले आहे.दूध आणि गव्हाने आपला सर्वाधिक उत्पादनाचा आकडा 2004 मध्ये ओलांडला होता.तांदाळाने याअगोदर 1988 मध्येच सर्वाधिक उत्पादनाचा विक्रम पार केला होता, आता तो पुन्हा उतरणीला लागला आहे. अशा परिस्थितीत इतक्या कमी कालावधी दरम्यान कित्येक महत्त्वाच्या अन्नधान्य उत्पादनात घसरण जगासमोर मोठ्या चिंतेचा विषय आहे. असा अंदाज आहे की,जगाची लोकसंख्या 2050 मध्ये नऊ अब्जावर पोहोचेल.तेव्हा सध्याच्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा दुप्पट अन्नाची गरज पडणार आहे.भारतासारख्या देशात तर आतापासूनच नवनवे उपाय शोधावे लागणार आहेत.शिवाय आपल्या लोकसंख्येलादेखील आवर घालावा लागणार आहे.
     येल युनिवर्सिटी,मिशीगन स्टेट युनिवर्सिटी आणि जर्मनीच्या हेमहोल्ज सेंटर फॉर एनवायर्नमेंट रिसर्चच्या ताजा संयुक्त अभ्यासानुसार परीक्षण करण्यात आलेल्या 21 अन्नधान्यांपैकी 16 अन्नधान्यांनी 1988 ते 2008 दरम्यान आपले सर्वाधिक उत्पादन दिले आहे. एक खाद्य स्त्रोत नष्ट झाला तर दुसर्‍या खाद्यावर अवलंबून राहण्याची गोष्ट केली जाते. पण एकाचवेळेला अनेक खाद्यस्त्रोत नष्ट झाले तर कोणता पर्याय निवडणार? त्यामुळे ही परिस्थिती मोठे संकट म्हणून उभे राहणार आहे.
     वेगाने वाढणारी लोकसंख्या, निवारा, शेती,व्यवसाय आणि इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी जमिनीचा वापर केला जात आहे.कृषी आणि अन्य अन्नाच्या अन्य स्त्रोतांसाठी जमीन कमी होत चालली आहे.शिवाय अधिक अन्न उत्पादन निर्मितीसाठी जमीन आणि पाण्याचा अधिकाधिक वापर केला जाऊ लागला आहे.त्यामुळे ही संसाधने कमी झाल्याने भविष्यात खाद्यान्न उत्पादन वृद्धीला मोठा झटका बसू शकतो.
     शेतजमिनीचा कस आणि पोत याबाबतीतही बरेच संशोधन झाले आहे. पण पहिल्यांदाच अहमदाबादच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरच्या सतरा अन्य एजन्सींच्या मदतीने संपूर्ण देशातील कृषी जमिनीची सध्याची आवस्था सादर करण्यात आली आहे. यानुसार देशातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र वाळवंटात रुपांतरित होत आहे. एकूण 32 टक्के जमिनीची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यातच देशातील 69 टक्के जमीन शुष्क क्षेत्रात समाविष्ट होत आहे. जमिनीचा कस वाचण्यासाठी लवकरच आपल्याला मोठे अभियान चालवावे लागणार आहे. असे केले नाही तर देशातल्या लोकसंख्येच्या मोठ्या हिश्यात फक्त आजीविका संकट आणखी गडद होणार नाही तर जैव-विविधतेचेही जबरदस्त नुकसान होणार आहे. आतापर्यंत राजस्थान आणि काही प्रमाणात गुजरात वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो. पण हा अभ्यास सांगतो की, वाळवंटी प्रक्रिया बर्फाळ प्रदेश आणि जंगलांसाठी प्रसिद्ध जम्मू-काश्मिरपर्यत सुरू झाली आहे. राजस्थानचा 21.77 टक्के , जम्मू आणि काश्मिर 12.79 टक्के आणि गुजरातचा 12.72 टक्के प्रदेश वाळवंटी बनला आहे.
     गुजरात सरकारने काही ठोस उअपाययोजना केल्या आहेत, याचा लाभ अन्य राज्ये उठवू शकतात. अलिकडेच  आंतरराष्ट्रीय खाद्यनीती शोध संस्थेच्या एक शोधपत्रिकेत सांगितले गेले आहे की, गुजरातमध्ये 2000 सालापासून कृषी मूल्यवर्धन 9.6 टक्के दराने दरवर्षी वाढत आहे. हा आकडा भारताच्या विकास दराच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक आहे आणि पंजाबमध्ये हरितक्रांतीदरम्यान मिळवलेल्या विकास दरापेक्षाही अधिक आहे.याशिवाय हजारोंच्या सख्येने धरणे बांधण्यात आली आहेत आणि ठिबक सिंचन योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे उभे करण्यात आले आहे. सिंचन क्षेत्रात दरवर्षी 4.4 टक्के दराने वाढ होत आहे.करार शेतीमुळे वाणिज्य क्षेत्रालाही मोठी मदत होत आहे.
     आगामी चाळीस वर्षात देशाची लोकसंख्या 160 कोटीपेक्षा अधिक होईल. त्याचबरोबर अन्नधान्याची मागणीदेखील जवळपास दुप्पट वाढेल. पण कृषी विस्तारासाठी आपल्याकडे फारच मर्यादित शक्यता आहेत. गेल्या 25 वर्षात कृषीक्षेत्रातली गुंतवणूक कमी होत चालली आहे. जेनेटिकली मॉडीफाइड (जीएम) पिकांशिवाय कृषीक्षेत्रात संशोधनदेखील अधिक होताना दिसत नाही. हरितक्रांतीदरम्यान आम्ही पिकांचे उत्पन्न प्रमाण तीन ते सहा टक्क्यांपर्यंत वाढवले होते. आता मात्र, 1 टक्क्याच्या वेगाने वाढत आहे. काही ठिकाणी तर यावर पूर्णविराम आला आहे.तज्ज्ञानुसार मागणीच्या तुलनेत सध्याच्या अन्नधान्य उत्पादनाच्या दुप्पट लक्ष्य मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याबरोबरच उपासतपासाचे मार्ग स्वीकारावे लागतील.


अपमान का बदला... खून?

     आजच्या माणसात सहनशीलता कमी व्हायला लागली आहे.लोकसंख्येच्या गर्दीत,वेगाच्या मागे धावणार्‍या माणसाला पदोपदी अपमानाला सामोरे जावे लागत आहे. जाणत्या- अजाणतेने होणार्‍या चुका त्याला अपमानाकडे घेऊन जात आहेत.पण हा अपमान सहन करण्याची वृत्ती कमी झाल्याने भांड्याला भांडे लागल्यावर वाजते, तसे तोंडाला तोंड लागून शिवीगाळ, वाट्टेल तसे बोलणे, अशा ठिणग्या पडायला लागतात. कधी कधी त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन मोठा स्फोट होतो. यातून नवीनच काही तरी निपजतं. आजच्या तरुणपिढी विषयी बोलायची सोय राहिलेली नाही. त्यांना अपमान काळात कसं वागावं, याचं शिक्षणचं कुणी देत नाही. आई-वडीलसुद्धा कशाला कुणाचं ऐकून घेतो? हाणायची नाही का थोबाडीत, असे सांगून त्याला भडकावून सोडतात.साहजिकच शाळा-कॉलेजात पोरं शिक्षकांसमक्षच हाणामारी करताना दिसतात. इतकेच काय परीक्षेत बघू दिले नाही, म्हणून शिक्षकांवरच हल्ला करायला मागे पुढे पाहात नाहीत.
     आज या मुलांना कुणी समजावून सांगायचं कुणी धाडस करीत नाही. कारण सांगण्यापेक्षा त्याच्या वाट्याला अपमानच येतो.त्यामुळे आजची तरुणपिढी भरकटत चालली आहे.त्यामुळे अशा मुलांना चांगल्या-वाईटाच्या चार गोष्टी सांगायच्या कोणी, असा प्रश्‍न आहे. चांगली पुस्तके वाचली तर निदान त्यातून तरी काही समजून घेतली असती ही मुले, पण पाठ्यक्रमाची पुस्तकेच न वाचणारी ही पुस्तके कुठली वाचणार? आई-बाप अडाणी,त्यांना काय माहीत वाचनाचा लाभ ? शाळा-कॉलेजमध्येही वाचनालये समृद्ध आहेत. पण तिकडे कुणी फिरकत नाही. आज तर मुलांच्या,युवकांच्या हातात स्मार्टफोन आहे. पाच-दहा हजाराचा स्मार्टफोन घेऊन द्यायला पालकांकडे पैसा आहे,पण एखादे चांगले पुस्तक घेऊन द्यायला या लोकांकडे पैसा नाही. आई-बापांनाही आपल्या मुलाचे हित कशात आहे, हे शोधायला, विचार करायला वेळ नाही. इतकेच काय आपला मुलगा,मुलगी दिवसभर काय करतात, याची फिकीर करायलासुद्धा यांच्याकडे वेळ नाही.त्यामुळे त्यांच्यावर चांगल्या-वाईटाचे संस्कार कसे होणार?
     चांगला शिकून-सवरून चांगला ऑफिसर होण्याची स्वप्नं काही मुलं, त्यांचे आई-बाप पाहात असतात. काहींच्या कष्टाला खरेच यश येते. खरे तर आजकाल पैसा महत्त्वाचा नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. आज पैसे कमवायला अक्कल लागत नाही. तसे असते लोक राजकारण्यांचे, सावकारांचे गुलाम म्हणून जगले नसते. छौ.. म्हटले अंगावर जाणारी पिढी आज तयार होत आहे. अशा लोकांकडे कुठे स्वत:ची अक्कल आहे? ऐशआरामात राहायला,चैनी करायला मिळत असेल तर आणखी काय हवंय? त्यामुळे खरे तर समाजातली शांतता भंग झाली आहे, त्याचे काय? हाणामारी,खून केल्यावर काहींच्या घरी पैसा पोहोच होत आहे.यात काही दिवस सुखात जातात. आजच्या पिढीच्यादृष्टीने हे सुखच! कारण फारसे माणसे मारायला आता फारसे कष्ट पडतच नाहीत. बिगरपरवाना हत्यारांचा बाजार वाढला आहे.तस्करी वाढली आहे. परवाच सांगलीच्या पोलिसांनी 26 पिस्तूलं जप्त केली. उत्तर प्रदेशात जाऊन तिथला बेकायदा पिस्तूल निर्मितीचा कारखाना उदवस्त केला. काय चाललंय काय समाजात? याच्याने कुणाच्या डोक्यात शांती वसणार आहे? शिवाय किती दिवस चालणार हे? कुणा विरोधी गुंडांच्या तडाक्यात किंवा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्येच जाणार. हे असले आयुष्य जगून हा बहुमोल माणसाचा जीव परत जाणार? माणसात आणि पशु-पक्ष्यात फरक तो काय मग?
     आजकाल संस्कार महत्त्वाचे आहेत. अर्थात या संस्कारांची शिकवण घरातून, शाळेतून मिळते. पण ही संस्कारगृहे राहिलेली नाहीत. त्यामुळेच एक छोटा अपमान कुणाच्या आयुष्याला अधोगतीकडे नेतो, कुणाला प्रगतीकडे. ज्याने अपमान गिळला, ज्याने तो विसरला, समोरच्याला माफ केला तो साहजिकच चांगल्या ठिकाणीच पोहचेल. इथे कुणाची उदाहरणे द्यायची नाहीत.पण साधासोपा व्यवहार आहे.जो दुसर्‍याला माफ करतो,त्याचं चित्त स्थीर असणार आहे. त्याच्यावर,त्याच्या मनावर त्या अपमानाचा परिणाम झाला नाही. मात्र ज्याने अपमान मनावर घेतला,त्याचे आयुष्य मात्र उदवस्त होणार! कारण तो अपमान आपल्या पाठीवरून वाहून नेत असतो. समोरच्याला माफ करून पुढे जाता,तेव्हा किंवा त्याचक्षणी पाठीवरून त्याला उतरवता. आणि तेव्हाच माणूस जीवनात पुढे सरकू शकतो.

Friday, October 20, 2017

(कथा) दोन थेंब अश्रू

     तो कैदी होता.त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती.एक दिवस संधी साधून तो तुरुंगातून पळाला. जोरजोराने तो धावत होता. आपली सगळी शक्ती एकवटून तो धावत होता.धावून धावून तो इतका थकून गेला की, वारंवार रस्त्यावर कोसळू लागला. पुन्हा धडपडत उठायचा आणि धावायला लागायचा. समोर एक रुंद नदी होती. नदी खूप खोलगट नव्हती.पण त्याला पोहायला अजिबात येत नव्हते.लाकडाचा एक चौरस तुकडा नदीच्या काठाला तरंगत होता.पोलिस शिपायांच्या भितीने भांबावून गेलेला तो कैदी आपला एक पाय लाकडावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तेवढ्यात नदीकाठाला दोन माणसे आली. त्यातला एक त्याचा मित्र होता आणि दुसरा शत्रू. जो शत्रू होता, तो काही न बोलता गपचिप उभा राहिला.पण त्याचा मित्र आपली संपूर्ण ताकद लावून जोरजोराने ओरडू लागला, “ हे काय करतोयस? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? दिसत नाही का, हा लाकडी तुकडा पार कुजलेला आहे तो? तुझं वजन पेलणार नाही त्याला. हा मध्येच तुटून जाईल. मग तू मेलासच समज!”

“पण नदी पार करायला दुसरा पर्यायच नाही. दिसत नाही का, शिपाई माझा पाठलाग करत आहे ते?” असे म्हणत त्या दुर्दैवी माणूस लाकड्याच्या तुकड्याच्या दिशेने चालू लागला.
“ परंतु, मी असा तुझा सर्वनाश होऊ देणार नाही!” त्याचा मित्र मोठ्याने ओरडला आणि लाकडी तुकडा त्याने लांब भिरकावून दिला.प्राणाच्या भितीने गारवटून गेलेल्या कैदीला तो लाकडाचा तुकडा मिळवणं भाग होतं- स्वत:ला वाचवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. त्याने त्या तुकड्यासाठी पाण्यात उडी मारली. एकदा...दोनदा... तो वर आला आणि मग त्याने कायमची जलसमाधी घेतली.
त्याचा शत्रू जोरजोराने काही-बाही बोलून निघून गेला, मात्र त्याचा मित्र मात्र स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
त्याच्या डोक्यात एक क्षणदेखील असा विचार आला नाही की, त्याच्या मित्राच्या मृत्यूला तो स्वत: जबाबदार आहे.
तो रडून रडून सांगत होता- “ त्याने माझे ऐकले नाही.माझी एकही गोष्ट ऐकली नाही.”  ज्यावेळेला लोकांनी त्याला खूप समजावलं,त्यावेळी त्याने स्वत:चे सांत्वन करण्याचा मार्ग शोधून काढला. “ जर तो जिवंत असता तरीही त्याला तुरुंगात सडून मरावे लागले असते. आता कमीतकमी त्याच्या यातना तरी कमी झाल्या.” तरीही लोकांमध्ये त्या कैद्याची चर्चा चालायची,तेव्हा त्याचे  डोळे डबडबून यायचे. आपल्या दुर्दैवी मित्रासाठी तो माणूस नेहमी दोन थेंब अश्रू वाहायचा.( मूळकथा-इयान तुर्गनेव )
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे