Saturday, November 17, 2012

आजची पत्रकारिता समाजाला मागासलेली ठेवणारी!


राष्ट्रीय मुद्यांऐवजी बॉलीवूड, क्रि़केट किंवा अंधश्रद्धा पसरवणार्‍या आणि भिकार कल्पनांवर आधारित कार्यक्रम दाखविणार्‍या आजच्या पत्रकारितेचा प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्केडेय काटजू यांनी समाचार घेतला तो बरेच झाले. आणि पत्रकारितेमुळे जनतेच्या जगण्याचा दर्जा खालावत असेल किंवा जनता मागे खेचली जात असेल तर अशा वृत्तपत्र स्वातंत्र्याला मर्यादा घातलेल्या बर्‍या म्हणत आपल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उदोउदो करणार्‍या पत्रकारितेला चांगलीच लगावली आहे. आजच्या पत्रकारितेला चार उपदेशाचे डोस देण्याची आवश्यकता होती. ती श्री. काटजू यांनी दिली आहे. मात्र यातूनही सुधारणा होत नसेल तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे मर्यादा घालाव्याच लागतील. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो म्हणतात, पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे.
     बातम्या संकलन आणि प्रकाशित करण्याच्या या क्षेत्रात एक दूरदर्शन सोडल्यास अन्य खासगी वाहिन्यांचा यात शिरकाव नव्हता, तोपर्यंत वृत्तपत्रांकडे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जात होते. वृत्तक्षेत्रात खासगी वाहिन्यांचा प्रवेश आणि वृत्तक्षेत्रात झालेला आमूलाग्र बदल पाहता वृत्तपत्र आणि वाहिन्या यांनी ज्ञानापेक्षा  माहिती आणि रंजक गोष्टींवर अधिक भर दिला. बातम्यांना रंजकपणा आणला. त्यामुळे बातम्या वाचनीय अथवा देखण्या, उठावदार  झाल्या असल्या तरी त्याच्याने मूळचा उद्देश, गांभिर्य  हरवत चालले, हे त्यामागचे दु:ख आहे. वृत्तपत्र अथवा वाहिन्यांनी जागल्याची भूमिका पार पाडायची असते. मात्र आज ते बातमीसाठी वाट्टेल ते करत शहानिशा न करता बातम्यांचा पाऊस पाडत आहेत आणि त्यातून त्यांनी हकनाक कुणाकुणाच्या झोपा उडविण्याचे काम करीत आहेत. बातमीची शहानिशा न करता आरोप करणार्‍या आणि त्याने केलेल्या आरोपांना अधिक प्रसिद्धी दिली जात आहे.
     वृत्तपत्र किंवा वाहिन्यांनी तटस्थपणे आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे. चूक कोणाची अथवा चुकीचे कोण हे ठरविण्याची जबाबदारी त्यांनी वाचक अथवा श्रोत्यांवर सोपवायला हवी. कोणत्याही गोष्टीतील आरोप सिद्ध होणे ही प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे अगोदरच एकाद्याला आरोपाच्या पिंजर्‍यात उभे करणे सर्वथा: चुकीचे आहे. आणखी एक म्हणजे भ्रष्टाचार हा काही आजचा नाही. आणि तो एका दिवसात जादुची कांडी फिरवल्यासारखा तो लगेच न संपणारा आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार होईल, इतका तो समाजमान्यता पावलेला आहे. त्यामुळे कोणीही उठतो आणि मी भ्रष्टाचार संपवतो, म्हणणार्‍याकडून तो संपणे अशक्य नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. किंवा एका माणसाने भ्रष्टाचार संपत नाही. शिवाय तो एका दिवसात संपणाराही नाही. त्यामुळे उगाच कोणाला तरी मोठे करायचे आणि देशाला वेठीस धरायचे हा प्रकारच मूळी निंदनीय आहे.
     आज पेड न्यूजचे स्तोम माजले आहे. ग्रामीण भागात काम करणारा पत्रकार छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये पैसे घेऊन आपले पोट चालवतो आहे. पत्रकारांना त्यांचा प्रपंच चालावा, यासाठी पुरेसे मानधन दिले जात नाही. मग त्याने आपले पोट भरण्यासाठी काय केले पाहिजे? नैतिकता वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्येही राहिलेली नाही. मग त्यांनी निव्वळ भ्रष्टाचार... भ्रष्टाचार म्हणून ओरडणार्‍यांच्या बातम्या देऊन कांगावा करण्याचा काय अर्थ आहे. आज निवडी, पुरस्कार मिळालेल्या लोकांच्या बातम्या चापण्यासाठीही पैसा घेतला जात आहे. निवडणुका आल्या की, वार्ताहरला डावलून मालक किंवा त्यांची माणसे थेट पैसा घ्यायला उमेदवारांपर्यंत जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पेड न्यूज संदर्भात पेड न्यूजचा बराच गाजावाजा झाला आहे. स्थानिक वृत्तपत्रांपासून मोठ्या वृत्तपत्रांपर्यंत पेड न्यूज संदर्भातली साखळी वाढत आहे. त्यामुळे शेवटी केंद्र सरकारने काही धोरण  आखले आहे. परवा काही धोरण जाहीरही  केले आहे. सरकार त्यावर अजूनही विचार करत आहे.
     मागे म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्र अथवा वाहिन्यांनी तटस्थपणे दोन्ही बाजू मांडणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे. त्याच्याने इतरांना प्रोत्साहन मिळत असते, मार्गदर्शन मिळत असते. प्रसारमाध्यमांनी विरोधकाची भूमिका पार पाडत असताना चांगल्या गोष्टी, निर्णयाचेही स्वागत करायला हवे. विरोधकाला सत्ताधार्‍यांच्या सगळ्या गोष्टी पिवळ्या दिसत असतात. कारण ते त्याच चष्म्यातून पाहत असतात. मात्र वृत्तपत्रांना-वाहिन्यांना तसे करून चालणार नाही. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायला हवे.
     ही झाली एक गोष्ट. आता दुसरी म्हणजे आपल्या देशाची मान जगात उंचावली पाहिजे. समाजाचे राहणीमान, बौद्धिक, सामाजिक पातळी उंचावली पाहिजे. त्यांच्यात जगण्याचे नैतिकबळ वाढले, रुजले पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.यातच पत्रकारितेची मोठी कसोटी आहे. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कडेय काटजू यांच्या म्हणण्यानुसार आपल्या कार्यातून जनतेच्या जगण्याचा दर्जा वाढण्यास मदत होते का, हे पाहिले पाहिजे. त्याला रोजगार मिळतो की नाही? त्याचे सध्याचे राहणीमान कसे आहेत्याला आरोग्याच्या- शिक्षणाच्या सुविधा मिळतात की नाही त्या पुरेशा आहेत का/ याची शहानिशा करून त्या गोष्टी मिळवून देण्याच्यादृष्टीकोनातून प्रयत्न झाला पाहिजे. परिघाबाहेर जाणार्‍या वृत्तपत्र स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही.
     पत्रकारितेतून समाजातील अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. पत्रकारांनी वैज्ञानिक संकल्पना रुजवाव्यात  आणि अंधश्रद्धेला थारा देता कामा नये. मात्र घडते आहे, उलटेच बरेच पत्रकार काडीचा वैज्ञानिक आधार नसलेल्या भविष्याचे कार्यक्रम बिनदिक्कत दाखवले जातात. किंवा त्याला मोथ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते. या अशा कार्यक्रमांमधून लोकांना मागासले ठेवण्यात काय अर्थ आहे. अशा वृत्तपत्र स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही.  श्री. काटजू यांनी म्हटल्याप्रमाणे जनता रामासारखी आहे. हनुमान बनून जनतेची सेवा करणे पत्रकारांचे कर्तव्य आहे. देशात प्रचंद दारिद्र्य आहे. बेरोजगारी आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर पत्रकारांनी नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचविणे अपेक्षित आहे.
     अलिकडच्या काही काळात पत्रकार भलत्याच विषयांचा पाठलाग करताना दिसतात. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना कापसाचे कपडे घालणार्‍या मॉडेल कार्यक्रमांना शेकडो पत्रकार गर्दी करतात.तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे खरे वृत्तसंकलन फक्त स्थानिक पत्रकार करतो. पण त्यालाही अर्धपोटीच राहावे लागतो. वृत्तपत्रे किंवा वाहिन्या त्यांना  म्हणावे असे, राहणीमान उंचावेल असे  मानधन देत नाहीत. आपल्या इकडे वेगळीच तर्‍हा आहे. शिक्षण क्षेत्रात मातीच्या गोळ्याला आकार देऊन सक्षम बनवण्याचे काम प्राथमिक शिक्षक करीत असतो, मात्र त्याला पगार किंव वेतन कमी दिले जाते आणि जो आयत्या पिठावर रेघोट्या ओढतो, दिवसातले फक्त दोन-चार तास घेतो, त्याला मात्र भरमासठ पगार दिला जातो. तसाच प्रकार पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. स्थानिक पातळीवर काम करणार्‍याला अगदीच तुटपुंजे मानधन दिले जाते आणि वातानुकुलित खोलीत बसून लिहिणार्‍याला मात्र अधिक मेहनताना दिला जातो. ही विसंगती कधी मिटणार? पोटाला पुरेसे मिळत असेल तर त्याच्याकडून चांगल्या प्रकारची पत्रकारिता हो ऊ शकते. त्याचा उपयोग समाजाला होतो. पण हे लक्षात घेतो कोण? आता कौन्सिलच्या श्री. काटजू यांनी अशा वृत्तपत्रकारितेचा चांगलाच समाचार घेतला आहे. यातून संबंधित काय बोध घेतील ते पाहायला हवे. 

3 comments:

  1. Journalists are busy in paid journalism. Funniest thing is Times of India has given guidelines to their journalist to accept gifts which are costing not more than Rs. 500/-
    Funny .. isnt it??

    ReplyDelete
  2. अगदी योग्य विचार आहेत
    आजकालच्या वृत्त वाहिन्या हे वृत्त देत नसून वृत्त बनवत आहेत , व जनतेच्या माथी हाणत आहेत.

    ReplyDelete
  3. हार्दिक अभिनंदन.. आपल्या लेखनाने प्रभावित होऊन आम्ही आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर केला आहे.
    अधिक माहितीसाठी भेट द्या.

    www.Facebook.com/MarathiWvishv
    www.MWvishv.Tk
    www.Twitter.com/MarathiWvishv


    धन्यवाद..!!
    मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
    आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल समस्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


    टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

    ReplyDelete