Monday, November 19, 2012

कथा हजारो वर्षे आणि एक दिर्घ रात्र

     ऐकणारे त्याच्या गोष्टी अगदी तन्मयतेने ऐकत होते. सांगणारा सगळ्यांच्यामधे पहुडला होता. आडवा आणि उताणा पडूनच तो गोष्टी सांगत होता. ऐकणारेही काही अर्धवट पहुडलेले होते. काही दात टोकरत बसून ऐकत होते. त्याच्या गोष्टी मोठ्या विक्षिप्त होत्या. पण सातत्य मात्र अजिबात नव्हतं. वाट चुकलेला मुसाफिर जसा रस्ता चुकून दुसर्‍या मार्गाला लागायचा, तद्वत  बोलता बोलताच स्वतः भटकायचा. सांगत असलेली गोष्ट अर्धवट टाकून दुसर्‍या गोष्टीचा पदर पकडायचा. अशा प्रकारे हळूहळू रात्र सरत होती.
     ते सगळे एका रेल्वे स्टेशनला जाणार्‍या  रस्त्याच्या एका बंद दुकानाच्या अंगणात रात्र घालवण्यासाठी लवंडले होते. थोड्या वेळाने त्यातल्या एका वृद्ध माणसाने आपणहून एका राजाची गोष्ट सांगायला सुरूवात केली. त्याच्याभोवतीने ऐसपैस पसरलेले हुंकार भरू लागले. आणि ''पुढं काय झालं, बाबा?'' असे मधे मधे बोलू लागले.
मग काय! गोष्ट चालत राहिली...
     "एक बादशहा होता. त्याला सात राण्या होत्या. बादशहाने त्यांच्यासाठी स्वतंत्र महाल बांधले होते. एक लाकडाचादुसरा मातीचा, तिसरा संगमरवरी दगडाचा, चौथा तांब्याचा, पाचवा चांदीचा, सहावा सोन्याचा आणि सातवा हिर्‍या-माणक्यांचा महाल बांधला होता.
     "हूं! मग..." कुणी तरी हुंकार भरला.
     इतकी धनसंपत्ती तरीही बादशहा दु:खी कष्टी होता. कारण त्याला मूलबाळ नव्हतं. बादशहाला कुणी तरी सल्ला दिला. अमूक एका जंगलात एक विशिष्ठ झाडं आहे. त्याला सात फळं लागली आहेत. जर बादशहाने ती तोडून आणून आपल्या राण्यांना खाऊ घातलं तर राण्यांना मूलबाळं होतील. पण त्यातली मोठी अडचण अशी की, तिथंपर्यंत जाणंच मुळात मोठं दिव्य होतं. वाटेत मोठ्या सात डोंगरदर्‍या होत्या. शिवाय सात देवांशी सामना करावा लागणार होता. झाड्याच्या अवती-भोवती भल्या मोठ्या सात सर्पांचा जबरदस्त पहारा होता. त्यांच्या तावडीतून स्वतःला वाचवून फळं आणणं, मोठं कर्मकठीण होतं. बादशहासुद्धा काही कमी किंवा नव्हता. त्याने झाडून सारी फौज या कामाला लावली....
     अचानक म्हातार्‍याला खोकल्याची उबळ आली. उबळ थांबली तेव्हा म्हातारा भटकला. त्याने दुसरी गोष्ट सांगायला सुरूवात केली.
     गोष्ट फार जुनी आहे. एका कारागिराने एक भली-मोठी काठी बनवली होती. त्यात एक पुरुष माणूस आरामशीर बसू शकत होता. असाप्रकारे ती काठी माणसांप्रमाणे बोलत होती. चालत होती आणि खात-पितही होती.
लोकांना इंटरनेस्ट वाटला. ते "हू" म्हणत राहिले.
     मग अचानक तिथे एक रिक्षा आली. त्यापाठोपाठ टांगे. त्यांचा आवाज. ते सगळे स्टेशनकडे निघाले होते. कदाचित  स्टेशनवर एखादी गाडी आली असेल. थोडावेळ म्हातारा गप्प बसला. मग त्याने एका माशाची गोष्ट सांगायला सुरूवात केली. तो मासा इतका प्रचंड होता की, त्याव्या पाठीवर एक शहर वसले होते. तिथे असंख्य घरे होती. किती तरी शेतमळे होते. समुद्रात जिकडे मासा जायचा, तिकडे शहर असायचे.
     "हूं" लोकांनी हुंकार भरला.
     अशा प्रकारे रात्र सरत होती, पण एखाद्या कासवाच्या पाठीवर बसल्यासारखी फारच सावकाशीने सरत होती. म्हातारा बोलत होता, बाकीचे ऐकत होते. आता पुन्हा तो म्हातारा भटकला. तो दुसरीच कुठली गोष्ट सांगू लागला.
     " हजारो वर्षांपूर्वीचे गोष्ट आहे. एका बादशाहने अर्धे जग जिंकले होते. त्या आनंदोत्साहात बादशहाने भली-मोठी दावत दिली होती.
    मग पुढे....!"
     " मग काय... इतकं भोजन बनवलं गेलं ... इतकं भोजन बनवलं गेल की ... त्यासाठी शहरातल्या घराघरातल्या चुली पेटल्या होत्या.
     पुढं काय झाल?"
     म्हातारा सांगू लागला, " सगळ्यात प्रथम बादशाहा आणि त्याच्या नातेवाईकांनी भोजन केलं."
     "पुढे..." 
     "नंतर बादशहाच्या शेकडो मंत्र्या-संत्र्यांनी भोजन केलं."
     "पुढे..."
     " मंतर बादशहाच्या हजारो-लाखो सैनिकांनी आणि काही निवडक शहरवासियांनी भोजन केलं."
     "मग पुढे..."
     "या सगळ्यांची भोजनं उरकायला रात्र सरली."
     "हूं"
     "... आणि मग या सगळ्यांच्यानंतर लाखो गरीब फकिरांनी भोजन केलं. ते अगदी पोटभर जेवले."
     "गलत... एकदम गलत" सगळेच ओरडले आणि उठून उभे राहिले. त्यातला एकजण म्हणाला," म्हातारड्या, तुला   खोट्या गोष्टी सांगताना लाज नाही वाटत. जर आम्ही पोटभर जेवण केलं असतं तर आतापर्यंत डाराडुर झोपलो असतो. तुझी बडबड ऐकत बसलो नसतो."
     "अरे बाबा, असम नाराज हो ऊ नकोस." म्हातारा काहीशी नरमाई घेत शांतपणे म्हणाला, मीसुद्धा तुमच्यासारखाच भुकेलेला आहे. मला झोप येत असती तर बोलत कशाला पडलो असतो? मीदेखील झोपलोच असतो ना?" (उर्दू कथेच्या हिंदी अनुवादावरून)                                       

No comments:

Post a Comment