Thursday, March 26, 2020

आजची फोटोग्राफी सामान्यांसाठी वरदानच


आज आपण एकाद्या सुंदर ठिकाणी गेलो नसलो तरी ती दृश्ये कुठली आहेत, हे आपण पटकन सांगू शकतो. कारण अशी सौंदर्यपूर्ण दृश्ये, छायाचित्रे आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर पाहायला मिळतात. ही दृश्ये पाहिली की, आपल्याला तिथले सौंदर्य लक्षात येते आणि आपल्यालाही त्याठिकाणी जावं, अशी अनावर इच्छा होते. पण आपण जिथे आहोत,तिथली छायाचित्रेही आपल्याला पाहिजे तशी काढता आणि बनवता येतात. कारण ते सगळं आता आपल्या हातात आहे. आज फोटोग्राफीचं विश्वच पार बदलून गेलं आहे. मोबाईलवरच्या फोटोंचे मोबाइलवरील विविध अॅपद्वारा शेडस बदलू शकतो. मोबाईलमधील उपलब्ध फिल्टरच्या माध्यमातून आपण छायाचित्रांचे रंग बदलू शकतो. रंगीत छायाचित्रांना जुन्या फोटोंसारखा लूक देऊ शकतो. किंवा विविध पृष्ठभूमिशी जोडू शकतो. छायाचित्रांना जुन्या जमान्यातील ब्लॅक अँड व्हाइट फोटोसारखे एडिटसुद्धा करू शकतो. वास्तविक , छायाचित्रांच्या दुनियेत मोठा बदल अगदी ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यापासून होत आला आहे.

आज टीव्ही चॅनेलच्या माध्यामातून युद्धपरिस्थिती कशी असते, याचे चित्र पाहायला मिळत आहे. युद्ध ठिकाणी काय चाललं आहे याचे चित्रण अगदी स्पष्ट पाहायला मिळते, मात्र चॅनेल नव्हते तेव्हा युद्ध क्षेत्रात होत असलेल्या घटना नागरिकांना कळत नव्हत्या. आज सैनिक ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यावरून देशभक्ती जागृत होताना दिसत आहे. त्यावर कविता, कथा रचल्या जात आहेत. स्केच बनवले जात आहेत. कारण सैनिकाची युद्ध स्थळावरील चित्रे आपल्यापर्यंत विविध माध्यमाच्या मदतीने पोहचत आहेत.त्यांचे शौर्य, कष्ट पाहायला मिळत आहे. युद्ध काळातील पहिली छायाचित्रे फोटो पत्रकारिता या नात्याने मॅथ्यू ब्रॉडीने काढली होती. ही छायाचित्रे न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर छापली होती. या छायाचित्रांनी युद्ध क्षेत्रातील वास्तव परिस्थिती अमेरिकेतील नागरिकांपर्यंत पोहचवली होती. पहिल्या महायुद्धाच्यादरम्यान भारतीय सैनिकांची काढलेली काही दुर्लभ छायाचित्रे युद्धाचे ठोस वास्तव आणि सैनिकांचे हाल चित्रण करत होते. सैनिकांचे होत असलेले हाल त्याकाळी पहिल्यांदा समोर आले होते. भोजनाची वाट पाहणारे सैनिक, फिलस्तीन नदीवर आंघोळ करणारे सैनिक, बगदादच्या एका रेल्वे स्टेशनवर सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक, गॅस मास्क ड्रीलच्या दरम्यानची काढलेली छायाचित्रे यामुळे भारतीय सैनिकांचा उत्साह आणि समर्पण ठळकपणे जगापुढे आले.
छायाचित्रांच्या विश्वात रघू रॉय यांचेही मोठे नाव आहे. त्यांनी भारतातील फोटोग्राफी पार बदलून टाकली. इंदिरा गांधींपासून मदर तेरेसा आणि नंतर 1971 मधल्या युद्धादरम्यान शरणार्थी कँपमध्ये राहणार्या विवश अशा हजारो लोकांचे हाल त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. रिकाम्या सीवेज पाइपमध्ये राहणार्या लोकांचे फोटो, अन्नटंचाई काळातील दिवस ही भयाण परिस्थिती जगाला समजली, जेव्हा रघू रॉय यांनी काढलेली छायाचित्रे समोर आली.
नंतर लवकरच छायाचित्रांनी रंगांची शाई लपेटली. छायाचित्रे या रंगांमध्ये हसू लागली. आकर्षक वाटू लागली, हवीहवीशी होऊ लागली. यादरम्यान ग्लॅमर इंडस्ट्रीचा रंग लोकांवर हळूहळू चढू लागला होता. हिरो-हिरॉइन यांची छायाचित्रे वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागली होती. लोक ती छायाचित्रे पाहून त्यांचासारखा पेहराव, स्टाइल अंगिकारण्याचा प्रयत्न करू लागले होते. याच दरम्यान छायाचित्रांनी  जाहिरात क्षेत्रातही पाऊल टाकायला सुरुवात केली. मिलिंद सोमन आणि मधू सप्रे यांचा तो ब्लॅक अँड व्हाइट फोटो आजही लोकांच्या लक्षात आहे.खरे तर या फोटोमुळे हे दोघे तुरुंगात जाता जाता बचावले. या जाहिरातीच्या छायाचित्रात मधू आणि मिलिंदने फक्त पायात बूट घातले होते आणि गळ्याभोवती अजगर गुंडाळला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हासुद्धा दाखल केली होता. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जाहिरात एजन्सीवरदेखील गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या काळात लग्नाच्या अल्बममध्येदेखील काही प्रकारचे प्रयोग होऊ लागले होते. वधूला अनेक प्रकारचे आदेश दिले जात होते. तिने काय घालावं, काय नाही हा ट्रेंड इथूनच सुरू झाला. तिला आकर्षक करण्यात छायाचित्रांचाही मोठा वाटा आहे. याच काळात डिजिटल कॅमेरादेखील लॉन्च झाला होता. वाढदिवसासारख्या छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये त्याचा वापर वाढू लागला होता. पूर्वी छायाचित्रांचा अल्बम बनवून घरी ठेवला जात होता, पण जसा डिजिटल कॅमेरा आला तसा तो अल्बमपेक्षा कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मेलमध्ये सेव करून ठेवण्याचा प्रकार वाढला. एक प्रकारे अल्नमला उतरती कळा लागू लागली. छायाचित्रांच्या रुपाने साठवून ठेवू लागलेला आठवणींचा अल्बम घरोघरी कमीच दिसू लागला. कॅमेराची वाढती मागणी लक्षात घेऊन याशिका नावाच्या कंपनीने स्वस्तात कॅमेरा द्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी डिजिटल कॅमेर्यांच्या किंमती खूपच जास्त होत्या.
कॅमेरानंतर आली मोबाईल क्रांती. याने तर छायाचित्र क्षेत्रात धूमाकूळच घालायला सुरुवात केली. या मोबाईल क्रांतीने कॅमेराला विस्मृतीतच पाठवला. याच दरम्यान विज्ञानाच्या जगातही एक मोठी क्रांती आली. अमेरिकी स्पेस एजन्सी नासाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल टाकणार्या माणसाची छायाचित्रे प्रसिद्ध केली.सोशल मिडिया साइट्सवर अपलोड करण्यात आलेली जवळपास 12 हजार छायाचित्रे लोकांसाठी खुली झाली. यात चंद्रावर उतरलेल्या अंतरिक्ष प्रवाशांची चंद्रावर उतरताना, त्यांची दिनचर्या, चंद्रावरची पृष्ठभूमि, तिथून पृथ्वीवरची छायाचित्रे अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. यात 1969 मधील नील आर्मस्ट्रांगची अपोलो-11 चीही छायाचित्रे होती. विज्ञान विश्वातील आणखी खास असा महिना आहे, जो 2014 मधील सप्टेंबरचा. भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानने मंग़ळ ग्रहाचे पहिले छायाचित्र पाठवले होते. इस्रोच्या मार्स ऑर्बिटरच्या ट्विटर हँडलने लाल ग्रहाचे पहिले छायाचित्र पाठवले होते. याच दरम्यान मोबाइल कॅमेर्याने जगाला वेड लावले होते.
आता मोबाइलमधून रोजच छायाचित्रे काढली जातात. मात्र आता लोक या छायाचित्रांची प्रिंट काढण्याचेच विसरले आहेत. फोनमधला उपलब्ध फिल्टर छायाचित्रांना पाहिजे तसे रूप द्यायला माहीर आहे. इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोवर्स असणार्या जैसन एम पीटरसनने गेल्या 25 वर्षात फक्त ब्लॅक अँड व्हाइटच छायाचित्रे काढली आहेत. ये हैं मोहब्बतेंसह अनेक मालिकांमध्ये दिसणार्या राजसिंह आरोरा या टीव्ही अॅक्टरच्या छायाचित्रांना पसंदी दर्शवणार्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक युजर्सची संख्या भरपूर आहे. राजला छायाचित्रे काढण्याचा छंद आहे. हिमाचलपासून न्यूयॉर्क, लेह-लडाख आणि मुंबईपर्यंतची खूप सुंदर छायाचित्रे त्याच्याजवळ आहेत. त्याची इन्स्टाग्राम व फेसबूकवरची छायाचित्रे खरोखरच खास आहेत. ती छायाचित्रे पाहणार्यांना त्या ठिकाणांचे वेड तर लागतेच पण आपणही तिथे जाऊन यावं, असं मनोमन वाटून जातं.
सोशल नेटवर्कचे विश्व असेल किंवा सामान्य कॅमेर्याची दुनिया. फोटोग्राफीने लोकांना नवी दृष्टी दिली आहे. लंडनमध्ये राहणार्या आणि काही अॅवार्ड जिंकलेल्या मेक्सिकन फोटोग्राफर एंटोनियो ऑलमोसने एके ठिकाणी म्हटले आहे की, माणसे हॉटेलात खायला जातात, पण खाण्यापूर्वी ते अन्नपदार्थांसोबत फोटो काढतात. मला तुम्ही चुकीचे समजू नका. मलाही आयफोन आणि इन्स्टाग्राम पसंद आहे,परंतु तुम्ही आयफोनवर सुंदर फोटो काढून तो प्रिंट तर करून पाहा. माझ्यासाठी फोटोग्राफीचा अल्टीमेट एक्सप्रेशन प्रिंट आहे.ज्याप्रकारे जीवन धावून जगलं जाऊ शकत नाही, त्याप्रकारे छायाचित्रे फक्त घेण्यासाठी नाही तर बनवण्यासाठीही असतात , हे लक्षात घेतले पाहिजे. ऑलमोस म्हणतो ते काही प्रमाणात बरोबरच आहे. मात्र एक गोष्ट नाकारता येत नाही. फोटोग्राफीने सामान्य लोकांसाठी एका नव्या विश्वाचा शोध लावला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment