Friday, March 27, 2020

नंदाला शिकायचं होतं पण...


चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींना नाइलाज म्हणून काम करावं लागलं आहे. मीनाकुमारी, मधुबाला, नर्गीससारख्या अभिनेत्रींना आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चेहर्यावर मेकअप चढवावा लागला. कॅमेर्यासमोर उभे राहावे लागले. त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढलेच शिवाय समाजात प्रतिष्ठाही मिळवली. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नंदा. नंदाचे कुटुंब चित्रपटसृष्टीशी निगडीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे 19 ऑगस्ट 1947 रोजी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या नंदाच्या वडिलांचे म्हणजे मास्टर विनायक यांचे निधन झाले.  नंदाला शिकायचं होतं. 1947 मध्ये तिचे वडील मास्टर विनायक मंदिर नावाचा मराठी चित्रपट बनवत होते. चित्रपटात एका मुलाची भूमिका होती, ती नंदाने करावी, अशी त्यांची इच्छा होती. पण नंदाला अॅक्टिंगमध्ये रस नव्हता. तिच्या वडिलांनी तिच्यावर आपली इच्छा लादली. शेवटी रडत रडत तिने आपल्या आईला म्हणजे सुशिला यांना सांगितली. मास्टर विनायक माघार घ्यायला तयार नाहीत म्हटल्यावर त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितले की, हा तुझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल. यानंतर तू कधीच चित्रपटात काम करणार नाहीस. शेवटी या चित्रपटात नंदाने मुलाची भूमिका साकारली.

वडिलांचा मृत्यू झाल्यावर कळलं की, त्यांनी चित्रपट बनवण्यासाठी कर्ज घेतलं आहे. शेवटी कुटुंबाला ते कर्ज भरावं लागलं. यासाठी बंगला, गाडी सगळं काही विकावं लागलं. सात लेकरांना घेऊन सुशिला मुंबईच्या ताडदेव इलाक्यात आपल्या बहिणीकडे गेल्या. तिथे त्यांना राहायला आश्रय मिळाला. मात्र पुढे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नंदाला शिक्षण सोडून नाईलाजाने तोंडाला रंग फासावा लागला. शेवटी नंदाला शिकण्याच्या इच्छेवर पाणी सोडावं लागलं. 1948 मध्ये मंदिर नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुले तिला मराठी चित्रपट मिळू लागले. मास्टर विनायक यांचे बंधू व्ही. शांताराम यांनी तिला तुफान और दिया ( 1956) या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. नंतर एव्हीएमचा छोटी बहन (1957) चित्रपट मिळाला. यातील भैया मेरे राखी के बंधन को निभाना... हे गाणे खूप हिट झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ही विलक्षण घटना होती. खरे तर आपल्या आवडत्या नायक- नायिकांना रक्ताने पत्र लिहिल्याच्या घटना घडत होत्या. पण त्या काळात छोटी बहन चित्रपट पाहून देशभरातल्या अनेक चाहत्यांकडून नंदाला राख्या आल्या. नंदा आपली स्वाक्षरी करून त्या राख्या पुन्हा आपल्या चाहत्यांना पाठवत असे. आजदेखील रक्षाबंधन सणाला हे गाणे हमखास ऐकायला मिळते. नंतर नंदाचा भाभी नावाचा चित्रपटदेखील हिट झाला. यातील चली चली रे पतंग मेरी चली रे... हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. मात्र या चित्रपटांमध्ये नंदा बहीण आणि भाभी अशा भूमिकांमध्येच अडकून पडली. महत्त्वाकांक्षी नसलेल्या नंदाने धर्मेंद्र, राजेश खन्ना, मनोज कुमार, शशी कपूर, जगदीपसारख्या नवख्या कलाकारांसोबत नायिकेच्या भूमिका केल्या.  शशी कपूरसोबत तिने आठ चित्रपट केले. यातील जब जब फूल खिले हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील परदेसियों से न आंखियां मिलाना... या गाण्याने तर धुमाकूळच घातला. कानून, इत्तेफाकसारखे चित्रपट तिचे हिट ठरले. पण नंदाचे मन या फिल्मी दुनियेत रमले नाही. 1993 नंतर मजदूर चित्रपटानंतर तिने चित्रसृष्टीशी नाते तोडून टाकले. नंतर तिने संन्यासी जीवन स्वीकारले.
तिच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना आहे, जी इथे नमूद करावी लागेल. मनमोहन देसाई यांचे फॅन खूप होते,पण देसाई मात्र नंदाचे फॅन होते. ते मनोमन नंदावर प्रेम करायचे. मात्र मनमोहन देसाईंना आपले प्रेम व्यक्त करायला खूप वर्षे लागली. दोघांनी 1992 मध्ये साखरपुडा केला. पण लग्नाअगोदरच मनमोहन देसाई यांचे निधन झाले. नंदा पुन्हा आपल्या विश्वात एकाकी राहिली. नंदांचा जन्म 8 जानेवारी 1939 चा. 25 मार्च 2014 मध्ये त्यांचे निधन झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment