Tuesday, March 31, 2020

भारतातील आरोग्य यंत्रणेची काय परिस्थिती आहे?


कोरोना संक्रमण तिसर्या स्तरावर (सामुदायिक संक्रमण) जाण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. संचार बंदी आणि सामाजिक अंतरचा परिणाम दिसू लागला आहे. पण अशा अनेक दाव्यांमध्येच एक प्रश्न उपस्थित होत आहेत.तो म्हणजे कोरोना संक्रमण निपटण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य सेवा यंत्रणा सक्षम आहे का? आपल्यापेक्षा अधिक मजबूत अशी आरोग्य सेवा यंत्रणा इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये आहे. मात्र तेथील यंत्रणा पार आता हडबडून गेली आहे. वेंटिलेटर आणि आयसीयू कमी पडू लागल्या आहेत. इटलीमधील परिस्थिती तर मोठी विदारक आहे. तिथे कुणाचा जीव वाचवायचा आणि कुणाचा नाही, हेच कळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत भारत कुठे आहे? आज मोठ्या संख्येने मजूर, कामगार लोक आपापल्या गावाक़डे झुंडीने जाताना दिसत आहेत.अनेक मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

भारतात मोठी अडचण अशी निर्माण झाली आहे की, प्रशासनाला अजून कोरोना बाधित लोकांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना शोधता आलेले नाही. काही विदेशातून आले, मात्र त्यांचाही शोध घेता येईना. संक्रमण झाल्यावरच ते समोर येत आहेत. ज्यांना संशय आहे, असेही रुग्णालयाशी संपर्क साधताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू करून किंवा स्वत:ला वेगळे ठेवून काय उपयोग होणार आहे? आपल्या देशात शहरांमध्ये प्रचंड गर्दी आहे. एकेका झोपडीत आठ-दहा माणसं सहज राहतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात मधुमेह आणि हृदयसंबंधी आजार असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मधुमेहाचे पाच कोटी आणि हृदयसंबंधी आजाराचे साडेपाच कोटी रुग्ण आहेत. ट्यूबरकुलोसिस म्हणजेच टीबीचे 28 लाख रुग्ण आहेत. टीबीने आपल्या देशात दररोज 1400 मृत्यू होतात. कोरोना व्हायरस सर्वाधिक आजार असलेल्या या रुग्णांसाठी धोकादायक आहे.
सरकार जीडीपीच्या फक्त एक टक्क्यापेक्षा थोडं अधिक आरोग्य सेवेसाठी खर्च करते. ही रक्कम अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. देशात टेस्टिंग किट, आरोग्य कर्मचार्यांसाठी टेस्टिंग गियर म्हणजेच सुरक्षा साधने, वेंटिलेटर, आयसीयू आणि रुग्णालयातील खाटांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. कोरोना संक्रमणानंतर आता आदेश दिले जात आहेत. मात्र नेमकी काय परिस्थिती आहे? सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचा विचार करू. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 12.6 कोटी लोकसंख्या आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये एकूण 450 वेंटिलेटर आहेत आणि 502 आयसीयू युनिट. देशात जवळपास 26 हजार सरकारी रुग्णालये आहेत. रुग्ण आणि उपलब्ध खाटांची संख्या चिंताजनक आहे. एक हजार सातशे रुग्णांमागे 1 खाट (बेड) आहे. ग्रामीण भागात एका खाटेमागे 3 हजार 100 रुग्ण आहेत. बिहारची अवस्था याहून भयावह आहे. बिहारमध्ये एका खाटेमागे 16 हजार रुग्ण अशी भयानक परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये तशी चांगली परिस्थिती आहे म्हणावे लागेल. तिथे 800 रुग्णांमागे एक खाट (बेड) आहे.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार देशात आयसीएएमआरची मंजुरी असलेल्या एकूण 116 सरकारी प्रयोगशाळा आहेत. कोविड-19 च्या तपासणीसाठी 89 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. 27 अजून होण्याच्या स्थितीत आहेत. 84 हजार लोकांसाठी एक पृथक खाट ( आयसोलेशन बेड) आहे. ग्रामीण भागात रोज 26 हजार लोकांवर अॅलोपॅथिक डॉक्टर उपलब्ध आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्लूएचओ) नियमानुसार एक हजार रुग्णांमागे एक डॉक्टर असायला हवा आहे. राज्यांच्या मेडिकल काउंसिल आणि मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया (एमसीआय) कडे नोंदणी झालेल्या अॅलोपॅथिक डॉक्टरांची संख्या जवळपास 1.1 कोटी आहे.  
कोरोना संक्रमण बचावासाठी जगातल्या काही देशांनी काही विशेष (दिलासा) पॅकेज जाहीर केले आहेत. भारत सरकारनेही गरिबांसाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे दिलासा पॅकेज जाहीर केले आहे. भारताचे आर्थिक पॅकेज अन्य देशाच्या तुलनेने थोडे वेगळे आहे. डॉलरमध्ये पाहिले तर भारताचे पॅकेज 22.5 अब्ज डॉलर होते.प्रत्येक व्यक्तीमागे 19 डॉलर येतात. विकसित देशांच्या तुलनेत भारताचे पॅकेज खूपच कमी आहे. जर्मनीत 610 अब्ज डॉलरचे पॅकेज देण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीमागे 7281 डॉलर येतात. ब्रिटनमध्ये 424 अब्ज डॉलरचे पॅकेज देण्यात आले आहे. इथे प्रत्येक व्यक्तीमागे 6246 डॉलर येतात. अमेरिकेने तर खूप मोठे पॅकेज जाहीर केले आहे. तिथे प्रत्येक व्यक्तीमागे 6042 डॉलर येतात. फ्रान्सने 335 अब्ज डॉलर जाहीर केले आहेत, त्यातले प्रत्येक व्यक्तीच्यामागे 5 हजार 132 डॉलर येतात. स्पेनने 218 अब्ज डॉलर दिले आहेत, तिथे प्रत्येक व्यक्तिमागे 4668 डॉलर येतात.-मच्छिंद्र ऐनापुरे



No comments:

Post a Comment