डॉ.अरुणोदय मंडल
सुंदरबन, आपल्या खारफुटी आणि वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच एका डॉक्टरांच्या औदार्य आणि गरिबांची सेवा करण्यामुळे पुन्हा एकदा देश आणि जगातील वृत्तपत्रांचे मथळे भरून वाहिले. त्या डॉक्टरांचे नाव आहे- अरुणोदय मंडल. सुंदरबनमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेले अरुणोदय हे सध्या कोलकाताच्या लेक टाउनमध्ये सध्या राहतात, परंतु त्यांचे 66 वर्षांचे जीवन अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या आपणा सर्वांसाठी एक प्रेरणादायक आहे.
सामान्य गरीब मुलांप्रमाणेच अरुणोदय यांचे बालपणही मोठ्या विवंचनेत गेले. तेदेखील अशा दुर्गम भागाचे बालपण जिथे पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता, वीज नव्हती आणि शाळेसारख्या मूलभूत सुविधाही नव्हत्या. पण नियतीने अरुणोदयसाठी उच्च स्थान निश्चित केले होते. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांचा मार्ग सुलभ केला. ज्या कुटुंबांचा संपूर्ण संघर्ष दोन वेळच्या भाकरीपुरता मर्यादित होता, त्यांच्यासाठी शिक्षण आणि उच्च शिक्षणाला कसा वाव असणार? अरुणोदय यांना स्वतःच्या पोटासाठी संघर्ष करावा लागला. परिसरात अधूनमधून येणाऱ्या डॉक्टरांची सेवाभाव वृत्ती आणि त्यांची समाजातली प्रतिष्ठा पाहून त्यांच्या मनात या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी आपणही डॉक्टर बनायचे असा चंग बांधला.
ध्येय मोठे होते, त्यामुळे संघर्षही चौपट करावा लागला. पोटापाण्याचा प्रश्न मिटवावा लागणार होता. आणि शहरात खोली भाडे व शिक्षणासाठी पैसेही जमा करावे लागणार होते. पण त्यांनी हार मानली नाही. अरुणोदय कोलकात्याला आले. शहरांमधील एक सुंदर गोष्ट म्हणजे ती माणसाला अधिक संधी प्रदान करून देते. अरुणोदय यांनी त्यांच्या गरजेनुसार मुलांची शिकवणी घेऊ लागले. पडेल ती कामे करू लागले. त्याच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. कोलकाता येथील नॅशनल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये त्यांना 'एमबीबीएस' साठी ऍडमिशन मिळाले.
डॉ. अरुणोदय यांनी 'एमबीबीएस' पदवी मिळविल्यानंतर त्यांच्यापुढे एक एक उत्तम करिअर होते, परंतु त्यांच्या मातीपासूनची नाळ कधी तुटली नव्हती. त्यांना हवे असते तर सहजपणे सरकारी नोकरी मिळू शकली असती, परंतु त्यांनी तसे केले नाही.
डॉ. अरुणोदय म्हणतात, वैद्यकीय अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच एका विचारानं मला सतत दुर्लक्षित असलेल्यांची सेवा करण्याची प्रेरणा दिली. या विचारसरणीने प्रेरित होऊन ते मिशनरीज ऑफ चॅरिटी, रामकृष्ण मिशन आणि इतर ब-याच सामाजिक संस्थांशी जोडले गेले. या संस्था गरिबांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करीत असत, डॉ अरुणोदय यांना गरिबांना मोफत औषधोपचार करून त्यांचे जीवन सुसह्य करायचे होते.
सन 2000 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भीषण पूर आला. राज्यातील लाखो लोकांवर याचा विपरीत परिणाम झाला. खासकरुन बहरामपूर आणि उत्तर 24 परगणा यासारख्या दुर्गम भागाचे पूरामुळे मोठे नुकसान झाले. . जेव्हा अरुणोदय यांनी वृत्तपत्रे आणि दूरदर्शन मध्ये हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांना स्वतःला रोखता आले नाही. औषधे आणि इतर मदत साहित्य घेऊन ते तिथल्या लोकांना पुरवण्यासाठी त्या भागात पोहचले. सुमारे एक महिना, ते सातत्याने भागात फिरले आणि विनामूल्य औषधे आणि उपचारांद्वारे त्यांनी तिथल्या गरीब लोकांची खूप सेवा केली.
तो काळ दुर्गापूजनाचा होता. लोकांचे खायचे वांदे होते. पोटाची आग विझवण्यासाठी पैसे नव्हते, तर उपचार आणि सण-उत्सवांसाठी कुठून पैसे आणणार? या एका महिन्यात डॉ अरुणोदय यांना इथल्या बऱ्याच गोष्टी कळल्या. त्यांचे प्रश्न समजले. तात्पुरत्या आरोग्य शिबिरांपेक्षा या लोकांना काय हवं आहे,याची जाणीव झाली. जिथे त्यांचे बालपण गेले तिथल्या मातीचे कर्ज चुकवणे भाग होते. आणि त्यांनी तिथेच आपली प्रॅक्टिस सुरू केली.
त्याच वर्षी त्यांनी चंदनपूर येथील आपल्या वडिलोपार्जित घरापासून चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केले. रोज ते सहा तास प्रवास करीत आणि खेड्यातल्या लोकांवर मोफत उपचार करीत. यामुळे त्यांना कधी बस, कधी बोटीने, किंवा कधी टेम्पो-रिक्षाने प्रवास करावा लागे. पण ते गावांमध्ये नियमित जात असत. अरुणोदय यांच्या या सेवेमुळे 'एमआर'लोकही त्यांना विनामूल्य औषधे देत असत, परंतु तेथीलकाही लोकांना त्यांच्या या गोष्टी आवडायच्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना त्रास दिला जात असे. पण शेवटी त्यांच्यावर डॉ. अरुणोदय यांच्या सेवावृत्तीने मात केली.
त्यानंतर डॉ. अरुणोदय यांनी गावात थोडी जागा खरेदी केली. आणि त्यावर एक दोन मजली रूग्णालय बांधले. आणि अशा प्रकारे, ऑगस्ट 2006 पासून त्यांच्या खऱ्या सेवेला सुरुवात झाली. या दवाखान्यात तेव्हापासून दरवर्षी हजारो स्थानिक रूग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जात आहे. अरुणोदय यांना सन्मान आणि प्रतिष्ठेच्या आकर्षणांनी मानवी सेवेच्या मार्गावर आणले, पण त्याहीपेक्षा आता ते आदरयुक्त व्यक्ति बनले आहेत. त्यांच्या निस्वार्थी मानवी सेवेची दखल भारत सरकारने घेतली. त्यांना यावर्षी प्रतिष्ठित नागरी सन्मान 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले. सन्मान मिळाल्यानंतर डॉ. अरुणोदय यांचे शब्द होते- 'आता लोकांच्या अपेक्षा वाढतील, कारण माझी निवड 'पद्मश्री'साठी झाली आहे. आता माझ्याकडे आणखी बरेच रुग्ण वाढतील, मात्र मी माझ्या क्षमतेनुसार त्या सर्वांना मदत करत राहीन'
No comments:
Post a Comment