Saturday, April 11, 2020

लॉकडाऊनमधून बाहेर पडताना रणनीती आखायला हवी

देशाने लॉकडाऊन लवकर सुरू केल्याने कोरोना संसर्गाला काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र लॉकडाऊन दीर्घकाळ ठेवणे शक्य नाही. त्यामुळे लॉकडावूनमधून बाहेर पडताना नवी रणनीती आखणे गरजेचे आहे.महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशात पुकारण्यात आलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवले जायला हवे. लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा संसगार्चा धोका निर्माण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन सुरूच ठेवायला हवे. अनेक विकसित राष्ट्रांपेक्षाही भारताने कोरोनाच्या साथीचा उत्तमरित्या सामना केला आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतरही संसर्गाच्या दृष्टीने 'हॉटस्पॉट' असलेले परिसर सील ठेवले जावेत. 
अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी इतर भाग खुले करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊनचा निर्णय तुलनेने लवकर घेऊन आपण मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी खाली आणले आहे. अन्य देशांमध्ये हे घडले नाही. मात्र लॉकडाऊन उठविण्याबाबतही आपण नवी रणनीती ठरवायला हवी.तरच लॉक डाऊनचा उपयोग झाला असे म्हणता येईल. कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता अन्य भागांत लॉकडाऊन सुरू ठेवण्यासारखे आरोग्याच्या दृष्टीने काही कारण दिसत नाही.  सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरूठेवणे गरजेचे आहे.  मात्र त्यासाठी काय उपाययोजना करता येईल,याचा महामंडळाने विचार करायला हवा. तसेच, दुकाने सकाळपासून उशिरापर्यंत सुरू राहावीत, जेणेकरून गर्दी होणार नाही  पुढील काही आठवडे आव्हानात्मक आहेत. वेळीच लॉकडाऊन झाल्यामुळे संसगार्चे प्रमाण आटोक्यात असले तरी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील काही दिवसांची आकडेवारी विचारात घ्यावी लागेल.संसर्ग सध्याच्या हॉटस्पॉटपुरताच मर्यादित ठेवायला हवा. तिथून तो अन्यत्र फैलावता कामा नये. सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हातांची स्वच्छता हाच त्यावर उपाय आहे. ते झाले तर आपली सध्याची आरोग्य यंत्रणा परिस्थिती हाताळू शकेल. कोरोनाविरोधी लढ्यात रुग्णालयांमध्ये नव्हे तर सामाजिक पातळीवरच विजय मिळवला जाऊ शकतो. तर सोशल डिस्टन्सिंग आणि विलगीकरण व टेस्टिंग हे दोन कोरोनाला रोखण्याचे प्रभावी उपाय आहेत. पहिल्या आघाडीवर भारताने उत्तम काम केले असले तरी आयसोलेशन आणि टेस्टिंग ही आव्हाने आहेत. भारताने त्याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच, आर्थिक बाबींचा विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला हवा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चार प्रमुख उपाय सांगितले जात आहे.  65 वर्षांच्या वरील आजारी व्यक्ती व आरोग्य सेवकांना पूर्ण संरक्षण द्या, हॉटस्पॉटवरील लॉकडाऊन सुरू ठेवून इतरत्र मार्केट खुले करा, वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी क्षेत्राची मदत घ्या आणि सर्वेक्षणासह अन्य गोष्टींसाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या. या उपायांचा विचार झाला पाहिजे. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यापुढे तो प्राधान्याचा राहणार आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment