Monday, April 27, 2020

(बालकथा) अन्न तुमचे,पुण्य तुमचे आणि ...

एकदा राजा कृष्णदेव रायला तेनालीरामची मस्करी करायची लहर आली.  त्याने तेनालीरामला दरबारी मंडळींना  मेजवानी देण्यास सांगितले.  पण तेनालीरामला समजले की यात काहीतरी काळेबेरे आहे. पण त्याने तसे आपल्या चेहऱ्यावर दाखवले नाही. तो म्हणाला, "महाराज, उद्या सकाळी सर्व दरबारी मंडळीसमवेत तुम्हीही माझ्या घरी जेवायला या. आताच सगळ्यांना भोजनाचे आमंत्रण."
आमंत्रण दिल्यावर काही तासातच तो पुन्हा महाराजांकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, माझ्या घरात शेकडो दरबारी मंडळींना जेवायला घालता येतील , अशी भांडी नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरून भांडी आणली तर उपकार होतील." राजाने ते मान्य केले.
 दुसर्‍या दिवशी राजा कृष्णदेव दरबारी मंडळीसमवेत तेनालीरामच्या घरी पोहोचले.  प्रत्येकजण आपल्या घरून सोन्याचांदीची मौल्यवान भांडी आणली होती.
 सगळ्यांनी जेवण सुरू केले, तेव्हा तेनालीराम आणि त्याची पत्नी कमला सर्वांना पंख्याने वारा घालू लागले.
 सर्वांनी तेनालीरामच्या भोजनाचे तोंड भरून कौतुक केले.  यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, अन्न तुमचे, पुण्य तुमचे, मी फक्त वारा घालतोय.  ”असे बोलून तेनालीराम पुन्हा हातातल्या पंख्याने सर्वांना वारा घालू लागला.
 सगळे जेवण करून  उठू लागले, तेव्हा तेनालीराम म्हणाला," तुमची खरकटी भांडी इथेच ठेवा. उद्या स्वच्छ करून आपापल्या घरी पोहोच केली जातील.  आंधळ्याला काय हवे, दोन डोळे.  लोकांनाही हेच हवे होते.  ते सर्वजण खुशीने आपापली भांडी सोडून निघून गेले.  लोकांनी काही दिवस वाट पाहिली. पण  तेनालीराम  काही भांडी देण्याचे नाव काढेना. यात संपूर्ण आठवडा निघून गेला. शेवटी राजाने भांड्यांबाबत विचारणा केली.
 तेनालीराम अतिशय गंभीरपणे म्हणाला", महाराज, तुम्हा सर्वांची भांडी गावातल्या शेठजीकडे पोहचती झाली आहेत. तुम्हाला भांडी हवी असतील तर त्याला पैसे द्या आणि घेऊन जा. मी त्याच दुकानातून मेजवानीसाठी लागणारा किराणा माल विकत आणला होता. "
 हे ऐकताच सर्व दरबारी मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली. राजाने मोठ्या आश्चर्याने विचारले, "का?"
 तेनालीराम हसत म्हणाला, "महाराज, मी अगोदरच सांगितलं होतं , अन्न तुमचे, पुण्य तुमचं, मी फक्त तुम्हाला वारा घालणार. "
 या वाक्याचा खरा अर्थ राजाला समजला. त्यानंतर राजाने कधी तेनालीरामची मस्करी करण्याचा प्रयत्न केला नाही.

No comments:

Post a Comment