एकदा इजिप्तच्या बादशहाने त्याच्या एका सरदाराला एका सुब्याचा सुबेदार म्हणून नेमले. बादशहाने सरदारला बोलावून नियुक्ती पत्र देऊन आवश्यक ती माहिती व सूचना दिल्या.
सरदार कृतज्ञतेपूर्वक बादशहासमोर झुकला आणि आभार व्यक्त करणार, तेवढ्यात एक लहान मुलगा धावत धावत तिथे आला. त्याने बादशहाला सलाम केला.
बादशहाने मुलाकडे प्रेमाने पाहिले आणि वाकून त्याच्या गालाचे चुंबन घेतले. मुलाने बादशहाचे दोन्ही हात धरून गोल गोल फिरण्याचा आग्रह धरला. बादशहा हसत हसत जागच्या जागी दोनदा स्वतः भोवती फिरला. हे पाहून मुलगा मोठमोठ्याने हसू लागला.
नियुक्तीपत्र हातात धरून सरदार आश्चर्याने समोरचा सगळा प्रकार पाहत होता. तो म्हणाला, "जहांपनाह, तुम्ही मुलांशी अशाप्रकारे भेटता? मी तर मुलांना माझ्या जवळसुद्धा फिरकू देत नाही. ते मला इतके घाबरतात की नुसता माझा आवाज ऐकला की थरथर कापतात."
हे ऐकून बादशहा म्हणाला, "सरदार, तू हे नेमणूक पत्र फाडून फेकून दे. आता ते तुझ्या कामाचे राहिले नाही."
सरदारला त्याच्या बोलण्याचा पश्चाताप झाला. का म्हणून असे बोललो, असे त्याला झाले. मग नाराजीनेच त्याने नियुक्ती पत्र बादशहासमोर धरले.
पत्र घेऊन बादशहा म्हणाला, "मी तुला सुभेदारपदासाठी निवडले याचे आता मला वाईट वाटत आहे. मी अल्लाचे आभार मानतो, त्याने मला योग्यवेळी चेतावणी दिली. मुलांवर प्रेम नसताना तू प्रजेवर कसे काय प्रेम करू शकतोस? जनता तर शासकासाठी मुलांसमानच असते.शासकाचे प्रेमच प्रजेचा विश्वास जिंकू शकते. प्रजेच्या विश्वासाशिवाय राज्य चालणार नाही. "
असे बोलून बादशहाने नियुक्ती पत्राचे तुकडे तुकडे केले. सरदार पश्चाताप करत दरबारातून बाहेर पडला.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment