Wednesday, April 29, 2020

(बालकथा) घोड्याचा व्यवहार

शाम नावाचा एक शेतकरी होता.  तो आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असे.  आणि हा भाजीपाला दररोज जवळच्या शहरात नेऊन विकत असे. त्याच्याकडे गाढव किंवा बैलगाडी असं काही नव्हतं. तो भाजी पाटीत भरायचा आणि डोक्यावर घेऊन विकायला जायचा.  पण डोक्यावर भाजी नेऊन तो कंटाळला. शिवाय पाटीत फार जास्त काही भाजीपाला नेता येत नव्हता.
एके दिवशी त्याने हा विषय बायकोजवळ काढला, तेव्हा ती म्हणाली, "आपल्या शेजारी दयानंद भाऊजी आहेत, त्यांचे गाढव आहे. त्यांना विचारून गाढव मागून घ्या. त्यावर भाजीपाला लादून न्यायला सोपं जाईल."
 शाम लगेचच गाढवाची विचारणा करायला दयानंदकडे गेला.  दयानंद म्हणाला," "शाम अरे, सकाळपासनं  माझं गाढव कुठं गायब झालं आहे? तू रामरावचा घोडा का घेत नाहीस? त्याच्याकडे बरेच घोडे आहेत. तो तुला घोडा नक्कीच देईल."
 दयानंदच्या सल्ल्यानुसार शाम तातडीने रामरावच्या घरी पोहोचला.  त्यावेळी रामराव घोड्यांना मालिश करत होता.  शामचे म्हणणे ऐकल्यावर तो आनंदाने म्हणाला, “घोडा तू  घे, पण त्याचे भाडे पंधरा रुपये होतील. ते तुला आधी द्यावे लागतील.”
 भाडे ऐकून शामला धक्काच बसला. तो म्हणाला, "पण माझ्याकडे फक्त पाचच रुपये आहेत."
 आणि त्याने खिशातून पाच रुपये काढून दाखवले.
 रामरावने शामचे पाच रुपये  अक्षरशः हिसकावून घेतले आणि म्हणाला, "तुझे पाच रुपये आलेत. उद्या दहा रुपये आण आणि घोडा घेऊन जा."
 अशाप्रकारे पाच रुपये हिसकावून घेतल्याने रामरावला आश्चर्यच वाटले.  त्याने त्याचे पैसे परत मागितले. पण रामरावने पैसे परत करण्यास नकार दिला आणि सांगितलं, "दहा रुपये आण आणि घोडा घेऊन जा."
 शामचा चेहरा पडला. तसाच चेहरा करून तो घरी यायला लागला.  तेव्हा वाटेत त्याला त्याचा शेजारी गोपाळ भेटला.  शामला दु: खी पाहून त्याने विचारले, "शाम, काय झालंय रे? तू  असा का तोंड लटकवला आहेस ? आणि कुठून येतोयस?"
 शामने  रामरावसोबत घडलेली हकिकत सांगितली. गोपाळ म्हणाला, "काळजी करू नकोस. उद्या मला सोबत घेऊन चल. रामरावकडून नाही पाचचे पंधरा रुपये उकळले, तर माझे नाव गोपाळ सांगणार  नाही."
 दुसऱ्यादिवशी शाम गोपाळला घेऊन रामरावच्या घरी पोहोचला.  गोपाळ रामरावला म्हणाला, "रामरावजी, आम्ही घोडा न्यायला आलो आहे."
 रामराव म्हणाला, "घोडा नेण्यापूर्वी मला दहा रुपये दे."
 गोपाळ म्हणाला, “थांबा, हा घोडा आमच्यासाठी योग्य  आहे की नाही ते आधी पाहूया.”
 "योग्य! म्हणजे काय? शामने घोड्याचा व्यवहार ठरवला आहे." रामराव म्हणाला.
 गोपाळने खिशातून मीटरपट्टी काढली आणि म्हणाला, "जरा थांबा,याची पाठ किती आहे मोजतो."
 गोपाळ घोड्याच्या पाठीचे मोजमाप करू लागला. तो शामला म्हणाला, "शाम, तू मध्यभागी बस. मी तुझ्या पाठीमागे बसतो.पण आपल्या बायका कुठे बसतील?"
 गोपाळ घोड्याचे मोजमाप करताना  पाहून रामराव घाबरून म्हणाला, "तू काय करतोयस हे? घोड्यावर इतके लोक बसतात का?"
 पण गोपाळ रामरावच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, " आणि आपल्या पोरांना कुठे बसवायचे रे? हां,एक मार्ग आहे. पप्पू घोड्याच्या मानेवर आणि त्याच्या मांडीवर बबली बसेल."
 आता रामरावला घाम फुटला.  तो गोपाळला म्हणाला, "तू वेडा-बिडा आहेस का? इतके लोक घोड्यावर कसे बसू शकतात?"
 गोपाळ हसत म्हणाला, " शहरात मोठं कृषी प्रदर्शन भरलं आहे, ते पाहायला आम्हा सर्वांना जायचं आहे."
 रामराव ओरडला, "नाही, मी घोडा देणार नाही. हा घोडा तुम्हा सगळ्यांना घेऊन दोन पावलंसुद्धा चालणार नाही."
 आता रामरावची मानसिकता बिघडली होती. तो संतापून म्हणाला, "तुला घोड्याला मारायचं आहे का? घोडा म्हणजे तुला जहाज वाटला का? चला निघा इथून. घोडा मिळणार नाही. व्यवहार मोडला."
 "व्यवहार मोडला! आम्ही प्रकरण कोर्टात नेऊ." गोपाळने धमकी  दिली.
 रामरावने त्याच्या खिशातून पाच रुपये काढले आणि  त्याच्यासमोर फेकले, "ते पैसे घे आणि निघून जा."
 "हा घोडा तुम्ही पंधरा रुपयांना ठरवला आहे. आणि आता फक्त पाचच रुपये देताय. आम्हाला वेड्यात काढता का?"  गोपाळ ओरडून म्हणाला.
 "शामने मला पाचच रुपये दिले होते." रामराव म्हणाला.
 "पण तुम्ही पंधरा रुपयांना घोडा ठरवलाय. पंधरा रुपये माघारी नाही दिले तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करू."
 पोलिसांचे नाव ऐकून रामरावची घाबरगुंडीच उडाली.  त्याने त्याच्या खिशातून दहा रुपये काढले आणि त्यांच्या समोर फेकले. मग तावातावाने रामराव घोड्यावर स्वार झाला आणि तिथून निघून गेला.
 ते दोघे आपापल्या घरी निघून आले.  शामने बायकोला घडला सगळा प्रकार सांगितला. तीही हसली. शाम म्हणाला, "रामराव महा कंजुष आहे. आज आम्ही त्याला बरोबर ठकवलं. मी त्याला पाच रुपये दिले पण त्याच्याकडून पंधरा रुपये उकळले."
 असं म्हणत त्याने खिशात हात घातला, पण काय! एकाएकी त्याची वाचाच बसली. खिशात दमडीसुद्धा नव्हती.
 "काय ओ, काय झालं?"  त्याच्या बायकोनं कुतूहलाने विचारलं.
 "अगं! तो चोर गोपाळ. त्याने दहा रुपये त्याच्याचजवळ ठेवले आणि माझे पाच रुपयेही. तो बदमाश कोठे गेला?"
 पण गोपाळ तिथे कुठे होता? त्याने त्याचे घर गाठले होते. पाच रुपये गमावल्यावर शामला त्याच्या मूर्खपणाचा पश्चाताप झाला आणि निमूटपणे हात चोळत बसला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment