एका गावातील एक शाकारलेलं मातीचं घर. आई घराच्या भिंती मातीने लिंपित होती. तिचं लिंपणे बहुतांश उरकत आलं होतं. आता फक्त एकच भिंत उरली होती. तिने पुन्हा शेण आणि माती कालवायला घेतली. ती घाई करत होती. थोड्या वेळातच तिचा मुलगा शाळेतून येणार होता. त्याला भूक लागेल, तो आल्या आल्या जेवण मागेल ,म्हणून तिची काम आटोपण्याची घाई चालली होती. काम चालू असल्याने तिचे हात शेणामातीने कोपरापर्यंत माखले होते.
एवढ्यात तिचा मुलगा आला. आल्या आल्या त्याने ""आई मला जेवायला वाढ. मला भूक लागली आहे." म्हणू लागला.
आई म्हणाली," देतो ओ बाळा, जरा एवढी भिंत सारवून होऊ दे. मग देते."
"नाही, तू अगोदर मला जेवायला दे."
"अरे बाळा, हे बघ एवढंच काम उरलंय."
"ते काही मला सांगू नकोस, आधी मला जेवायला दे."
"अरे माझ्या सोन्या, थांब ना जरा."
"जेवायला देणार आहेस की नाही?" आता तो दरडावून म्हणाला.
"हे बघ, आता माझे हात शेणामातीने माखले आहेत. थोडं थांब! एवढं झालं की पुन्हा शेणामातीत हात घालायला नको." आई काकुळतीला येऊन म्हणाली.
"थोडे-बीडे असले काही सांगू नको मला."
बराच वेळ असं माय-लेकराचे चालले होते. आई मात्र आपल्या कामात दंग होती.
मुलगा जोरात ओरडून म्हणाला,"मला नको जेवायला. जातो मी."
"जा तर जा, पुन्हा मला विचारायला येऊ नको." आईही जोरात ओरडली.
मुलगा घरात गेला. एका कोपऱ्यात दप्तर टाकलं. आणि बाहेर गेला.
आईचं काम आटोपलं. गावात जाऊन मुलाचा शोध घेतला. तो काही तिला दिसला नाही. परत माघारी आली. बराच वेळ तो काही आला नाही. शेवटी तिने दाराला कडी लावली आणि दुसऱ्या कामाला निघून गेली.
मुलगा थोड्या वेळाने आला. कडी काढून आत गेला. दप्तरातला खडू काढला आणि तो भिंतीवर लिहू लागला. 'अजून एकदा आग्रह कर, मग मी जेवेन.' मग त्याने सगळ्या भिंतीवर हेच लिहिले.'अजून एकदा आग्रह कर, मग मी जेवेन.'
शेवटी तो दाराच्या पायरीवर बसून आईची वाट पाहू लागला. (पश्चिम बंगालची लोककथा)
No comments:
Post a Comment