Monday, April 27, 2020

(बालकथा) मूर्ख निलम्मा

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गंगावती नगरचा राजा एकदा शिकार करायला बाहेर पडला. शिकारच्या शोधात  संध्याकाळ झाली.  पण एकही शिकार मिळाली नाही. शेवटी माघारी फिरणार तोच त्याला रानडुक्कर दिसले. राजाने घोड्याला टाच मारली आणि डुक्कराचा पाठलाग सुरु केला.  थोड्या वेळातच सूर्य मावळला आणि दाट अंधार पसरू लागला. डुक्करही दाट झाडीत  गायब झाले. राजाने  आजूबाजूला पाहिले.
त्याच्याजवळ  कोणीच नव्हते. शिकारीच्या नादात तो एकटाच जंगलात भरकटला होता. शिपाई मागेच राहिले होते.
राजाला  आता तहानभूक लागली होती. थंडीचे दिवस होते.  काही अंतरावर त्याला आग दिसली.  एक महिला  शेकोटी पेटवून शेकत बसली होती.  तिने राजाला ओळखले नाही. म्हणाली," तुम्ही वाटसरू आहात का?तुम्हाला भूक लागलेली दिसतेय."
 राजाने मानेनेच होकार दिला.
त्या महिलेचे नाव नीलम्मा होते. तिने भात आणि भाजी खायला आणली.  जेवण स्वादिष्ट होतं.  रात्रीचे जेवण झाल्यावर राजाने विचारले, ''या घनदाट जंगलात तू एकटीच राहतेस?''
 ''नाही, माझा नवरा आणि मी राहतो. तो बाजारात गेलाय. येईल इतक्यात!" नीलम्माने उत्तर दिले.
ते दोघे कोळशाचा व्यापार करत होते.  थोड्याच वेळात नीलम्माचा पतीही आला. राजेशाही पोशाख पाहून राजाला लवून मुजरा केला.  नीलम्माला  मग कळले की आपण समजतो तो वाटसरू नसून राजा आहे. तिनेही वाकून नमस्कार केला.
राजाने खूश  होऊन त्यांना चंदनवन भेट दिले. काही वेळात सैनिकही राजाच्या शोधात तेथे आले आणि राजा माघारी निघून गेला.
यानंतर बरीच वर्षे लोटली. एके दिवशी राजा पुन्हा शिकारीसाठी चंदनवनात पोहचला. त्याला नीलम्मा आणि तिच्या नवऱ्याची आठवण झाली. आता त्या दोघांची परिस्थिती सुधारली असेल आणि ते  चांगल्या प्रकारे  जीवन जगत असतील, असे त्याला वाटले.
 राजा त्यांच्या झोपडीजवळ गेला. एक म्हातारी लाकडं गोळा करत होती. त्याला पाहिल्यावर तिने वाकून नमस्कार केला.
 नीलम्माची दीनदशा पाहून राजा चकित झाला. त्याने विचारले," तुझा नवरा तुला सोडून गेला का?"
 ''नाही, महाराज! आम्ही अजूनही त्याच मार्गाने आनंदाने जगतो  आहे. लाकडं जाळून कोळशा बनवतो आणि विकतो. ''
 ''काय?''  नीलम्माचे ऐकल्यावर राजाने डोक्यावर हात मारून घेतला.
दोघांनीही लाकडाचा कोळसा बनवून चंदनाची सर्व झाडे नष्ट केली होती. राजाने नीलम्माच्या नवऱ्याला लाकडाचे काही तुकडे दिले आणि बाजारात जाऊन विकून यायला सांगितले.
चंदनाचे तुकडे बाजारात हातोहात विकले गेले आणि पैसाही चांगला आला. मग त्याला कळले की त्याने किती मूर्खपणा केला आहे.  पण त्याच्या अज्ञानामुळे मौल्यवान चंदनाचे वन नष्ट झाले होते. (कर्नाटकची लोककथा) -मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment