खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जयललिता कारापूर जंगलाजवळील खेड्यात राहत होती. लग्नानंतर ती सासरी आली. सासूने तिला मायेने जवळ घेतले. आईसारखं प्रेम दिलं, पण काही दिवसातच सासूला कळलं की सूनबाई घरातल्या कामात फारच अडाणी आहे. सासूला प्रश्न पडला, आता काय करावं? एक दिवस तिने सुनेला बोलावून सांगितलं 'जयललिता, मला विचारल्याशिवाय काहीच काम करायचं नाही, नाहीतर देवीचा शाप लागेल."
सूनने होकार दिला. आता दिवसभर घरात एकच आवाज येऊ लागला, 'आई, मी भोपळ्याची भाजी करू? पीठ किती मळू? म्हशीला चारा कधी घालू? मी माझे केस बांधू का? तांब्यानं पाणी पिऊ? असं काहीबाही.
काही दिवस सर्व काही व्यवस्थित चालू राहिलं. एक दिवस, थोडासा ताप काय आला, सासूनं अंथरुणच धरलं आणि त्यातच ती देवाघरी गेली. 'आता काय करू?' जयललिताला प्रश्न पडला. जयललिताने मग डोकं लावलं. तिने मातीची एक सुंदर मूर्ती बनवली. तिलाच सासू समजून घरातील सगळी कामे करू लागली.
कोणतीही कामं करण्यापूर्वी ती मूर्तीला विचारू लागली. तिचा नवरा मल्लाप्पा मात्र तिला कधीच काही बोलत नसे. एके दिवशी जयललिता मूर्ती घेऊन बाजारात गेली. वस्तू खरेदी करण्यापूर्वी सासूची परवानगी हवी होती ना!
तिने मूर्तीला विचारून सामान खरेदी केले. मल्लाप्पादेखील तिच्यासोबत होता. परत येताना अंधार दाटून आला. आभाळ ढगांनी भरून आलं होतं. पावसाची चिन्हं होती. पुढचं काही दिसत नव्हतं. पती-पत्नी दोघांनी एका झाडाच्या फांदीवर आश्रय घ्यायचं ठरवलं.
सुनसान रस्ता होता. आजूबाजूला घनदाट जंगल होतं . भीतीमुळे ते झाडावरुन खाली उतरलेच नाहीत. त्यांनी तिथेच रात्र काढण्याचे ठरवले.
सकाळपासून दोघेही थकले होते. झाडावरच झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास जयललिताचे डोळे उघडले. तिला आठवलं की दोघांनीही काही खाल्लेले नाही. मल्लाप्पालाही भूक लागली असेल. एका फडक्यात पाच लाडू बांधले होते.
सवयीनुसार तिने सासूला विचारले, 'खूप भूक लागली आहे. मी दोन आणि त्यांनी तीन खावे का?' त्याच झाडाखाली पाच चोर बसले होते. चोरीच्या ऐवजाची वाटणी करत होते. योगायोगाने खाली पाच चोर बसले होते. जयललिताचा आवाज ऐकून त्यांना वाटलं की नक्कीच एखादी हडळ आपल्याला खाण्याचा विचार करीत आहे. त्यांची पाचावर धारण बसली.
त्यांनी ऐवज गोळा करून पळ काढण्याची तयारी सुरू केली. तेवढ्यात मातीची मूर्ती जयललिताच्या हातून निसटून खाली पडली. हडळ आपल्यावर हल्ला करतेय, असे त्यांना वाटले. त्यांनी जीव वाचवण्यासाठी तो चोरीचा ऐवज तिथेच टाकून पळ काढला.
सकाळ उजाडल्यावर जयललिता आणि मल्लाप्पा खाली उतरले. सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन घरी आले. मातीची सासू फुटली होती. मल्लापाने पत्नीला समजावून सांगितलं की, आता आई स्वर्गात गेली आहे. त्यांना जास्त त्रास देऊ नको.
जयललिताने आपल्या पतीच्या आदेशाचे पालन केले आणि आपल्या मर्जीनुसार घर चालवायला सुरुवात केली. (कर्नाटकची लोककथा)-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment