एकदा शेजारील देशाचा एक दूत विजयनगरमध्ये आला. येताना त्याने राजा कृष्णदेवरायसाठी अनेक अनमोल असा नजराणा आणला होता.
शेजारील देशाच्या दूताचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याचा यथायोग्य असा पाहुणचार करण्यात आला. तिसर्या दिवशी तो जाऊ लागला, तेव्हा राजा कृष्णदेवराय यांनीही शेजारच्या राजाला अनमोल अशा भेटवस्तू दिल्या. राजा दूताला म्हणाला, " तुलाही काही देण्याची आमची इच्छा आहे. सोने, चांदी, रत्ने इत्यादी जे हवे ते माग."
दूत म्हणाला, "महाराज, तुम्हाला द्यायचे असेल तर मला काहीतरी वेगळे द्या."राजाने विचारल्यावर तो म्हणाला, "महाराज, मला अशी भेटवस्तू द्या, जी माझ्या सुखात, दु: खात आयुष्यभर सोबत राहील आणि कुणीही माझ्याकडून ती हिरावून घेणार नाही."
ऐकून राजा कृष्णदेवराय चकित झाला. त्याने दरबारी मंडळींकडे पाहिले.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. अशी भेटवस्तू काय असू शकते हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते.
राजाने तेनालीरामला विचारले, "तू ही गोष्ट आणू शकतोस का?"
"नक्की महाराज! ती भेट हे जेव्हा दुपारी निघतील तेव्हा त्यांच्यासोबत असेल."
ठरलेल्या वेळी, दूत जायला निघाला. शेजारील राजाला देण्यात आलेले सर्व उपहार त्याच्या रथात ठेवण्यात आले. राजा कृष्णदेवराय दूताला निरोप देऊ लागले, तेव्हा तो म्हणाला, "महाराज, तुम्ही मला दिलेला उपहार अजून मला मिळाला नाही."
राजा कृष्णदेवरायांनी तेनालीरामकडे पाहिले, "तू ती वस्तू आणलीस ना?"
तेनालीराम हसला आणि म्हणाला, "महाराज, ती भेटवस्तू त्यांच्यासोबतच आहे. पण ते त्याकडे पाहात नाहीत. त्यांना सांगा, जरा मागे वळून पाहायला."
दूताने मागे वळून पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही. म्हणाला, "कुठाय? मला तर ती दिसत नाही."
तेनालीराम म्हणाला, " जरा लक्षपूर्वक पहा, तुमच्या मागेच आहे. तुमची सावली. ती सुखात आणि दु: खात आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. कोणीही तुमच्याकडून ती हिरावून घेणार नाही."
हे ऐकताच राजा कृष्णदेवरायला हसू फुटले. दूतदेखील हसला आणि म्हणाला, "महाराज, मी तेनालीरामच्या बुद्धिमत्तेचे खूप कौतुक ऐकले होते. आज त्याचा पुरावा मिळाला."-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012
👌👌👌
ReplyDelete