दंडक वनात टिकू गरुड, चिकू ससा, मस्तानी खारूटी, सुवर्ण हरीण, मस्तू अस्वल आणि गब्रू सिंह असे अनेक प्राणी आनंदाने राहत होते. इथल्या उंच डोंगरावर बरीच औषधी वनस्पती होती. एखादा प्राणी आजारी पडला की, प्राणी मोहक हत्ती काकांचा सल्ला घेत आणि डोंगरावरून वनौषधी आणून खात आणि ठणठणीत बरे होत.
एके दिवशी दंडक वनाशेजारील मंडकारण्यात गब्बर महाराजांच्या मुलाचे लग्न होते. देशातील आणि परदेशातील जंगलांमधील बऱ्याच प्राण्यांना आमंत्रणं धाडण्यात आली होती. दंडकारण्यातील तर सगळ्याच प्राण्यांना आमंत्रित केले होते. प्रत्येकजण निघण्याच्या तयारीत होता, पण अचानक मस्तू अस्वलाच्या पोटात दुखू लागलं. आता काय करायाचं, असा प्रश्न प्राण्यांना पडला. सगळे काळजीत पडले. संध्याकाळी संगीताचा बहारदार कार्यक्रम होणार होता आणि सर्व प्राणी एकत्र नाच-गाणी करणार होते. पण आता असं वाटत होतं की मस्तू अस्वलाच्या पोटदुखीमुळे सगळे कार्यक्रमाला मुकणार!
मग चिकू ससा म्हणाला, “हत्तीकाकांनी पोटदुखीची औषधी वनस्पती सांगितल्यास मी ती आणून देईन. मग ते बरे झाल्यावर आपण सर्वजण निघू. "
टिकू गरुड म्हणाला, "चिकू, जर आपण आता निघालो नाही तर संध्याकाळच्या संगीत कार्यक्रमात पोहचू शकणार नाही. मग मंडकारण्यातील प्राण्यांना वाईट वाटेल. "
गब्रू सिंहाला गरुडाचे म्हणणे पटले. तो म्हणाला, "एक काम करा, तुम्ही सर्वजण पुढे निघा. मी औषधी वनस्पती आणून त्याला खायला घालीन. तो बरा झाला की आम्ही पार्टीला येऊ. "
हुशार कोल्हा म्हणाला," महाराज, तुम्ही आमचे राजे आहात. तुम्हाला पुढे जाणे महत्वाचे आहे. तुम्ही पुढे जा. मी मस्तूसोबत येईन. ”
मग मस्तानी खारुटी म्हणाली, "नाही! तुम्हालाही पुढे जाणे महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहात. तुम्ही सर्वांसोबत जा . मी इथे थांबतो "
या बोलण्याच्या नादात वेळ निघून जात होता. सगळे प्राणी आता एकमेकांशी वाद घालू लागले होते. तिकडे दूरवर मस्तू आरामात झोपला होता.
थोड्या वेळाने चिकू ससा गब्रू सिंहाजवळ आला आणि म्हणाला, "आता आपण सगळे प्राणी एकत्र जाऊ, कारण मस्तू अस्वल ठीक आहे."
वास्तविक, जेव्हा सगळे प्राणी आपापसात वाद घालत होते, तेव्हा चिकू सश्याने मोहक हत्तीला विचारून डोंगरावरून औषधी वनस्पती आणून मस्तूला खायला दिली होती. औषधी वनस्पतींच्या परिणामामुळे मस्तू अस्वल झोपी गेला.
चिकूच्या या समजूतदारपणामुळे गब्रू खूप खूश झाला आणि सर्वांसमोर त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, "चिकू आपल्या सगळ्यांबरोबर चर्चेत सामील झाला असता तर अस्वल बरा झाला नसता." यावरून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे की संकटाच्या वेळी व्यर्थ कामात अडकू नये आणि काळजीपूर्वक विचार करून ते काम पुढे नेले पाहिजे. "
यानंतर सगळ्यांनी चिकूचे खूप खूप कौतुक केले. आणि मग ते आनंदात मस्तू अस्वलासह लग्नाला निघाले.
No comments:
Post a Comment