पॉर्नच्या आहारी गेलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागात नुकतीच घडली. ग्रामीण भागातील एका कष्टकरी कुटुंबातील मुलाकडून झालेले हे कृत्य धक्कादायक असून पालक, शिक्षक यांच्यासह सर्वांनाच विचार करायला लावणारी ही घटना आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये, असा मतप्रवाह असतानाच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह जगभरात पडलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे शिक्षण पद्धतीचा नवा विचार समोर येत असताना आणि त्यात मोबाईल हा घटक अंतर्भूत केला जात असताना अशा घटना घडाव्यात, हा प्रकारच सगळ्यांना कोड्यात टाकणारा आहे.
कुणी कशाची आणि कुणाची चिंता करायची, असा प्रश्न निर्माण झाला असला तरी प्रत्येक घटकाने आपली बाजू सांभाळली तर अशा घटनांना आटोक्यात आणता येईल. कोणत्या वयात काय करायला हवं, या गोष्टी मुलांच्या मनात बिंबवण्यासाठी मूल्यांची कास धरावी लागणार का, आणि याची सुरुवात मुलांच्या घरापासून व्हायला हवी आहे.
आता शिक्षण शाळेत जाऊन घेण्यापेक्षा घरात राहून घेण्याचा काळ असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. पुढचे संभाव्य धोके लक्षात घेऊन शासनकर्ते ऑनलाईन शिक्षणावर भर देत राहतील, यात आता शंका राहिलेली नाही. त्यामुळे नव्या पद्धतीने शिक्षण देता-घेताना मोबाईल, लॅपटॉपच्या वापराचा दुरुपयोग लक्षात घेतला पाहिजे. कारण मोबाईल क्रांतीमुळे पॉर्न व्हिडिओच्या विळख्यातून मुलांना वाचवणं सोपं राहिलंलं नाही. याला कौटुंबिक परिस्थिती कारणीभूत असणार आहे. एकल पालकत्व असलेल्या कुटुंबात किंवा आई वडिलांच्या दुर्लक्षामुळेही कुमार वयात मुलं कुटुंबापासून दुरावतात. त्यातून अशा घटना घडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण हवे ,असे म्हणत असतानाच मुलाकडून त्याचा उपयोग कसा होतो, हे पाहणे पालकांचीच जबाबदारी आहे. मोबाईलवर गेम्स खेळणाऱ्या मुलांची मानसिकता हिंसक बनत असल्याचे यापूर्वीच्या अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मोबाईल गेम्समध्ये एक गती असते. त्या खेळात हिंसकता असते. गेम्सच्या आहारी जाण्यातून विध्वंसक वृत्तीस चालना मिळते. तेच पॉर्न व्हिडिओमधून होते. :मुले आणि मोबाईल' याबाबतीत आता पालकांबरोबरच शिक्षकांवरही याची जबाबदारी येऊन पडणार आहे. शालेयस्तरावरच मुलांना योग्य प्रबोधन आणि वर्तन प्रशिक्षण हवे. लैंगिक शिक्षणाकडे आजही उपेक्षेने पाहिले जाते. टाळेबंदीने मुलांना सहज मोबाईल दिला त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. एक मात्र नक्की की, प्रश्न डोंगराऐवढे आहेत आणि त्यांना सामोरे जाण्यासाठीचे प्रयत्न आणि इच्छाशक्ती तोकडी आहे.
काहींच्या मते, मुलं पॉर्नच्या आहारी जाणं म्हणजे व्यक्तिमत्त्वातला दोष आहे. पालकांचे दुर्लक्ष, शालेय स्तरावर संवादाचा अभाव यातून हा दोष तयार होतो. कुमारवयात मुलांमध्ये हार्मोन्स बदल होतात. तेव्हा मुलं एकलकोंडी होतात. भिन्न लिंगी आकर्षण असते. त्यातून मुलं तात्पुरता रिलिफ म्हणून पॉर्नकडे वळतात. ही मुलं आक्रमक होतात. स्वतःला कोंडून घेऊन मोबाईल बघतात. मोबाईल दुसऱ्याकडे देत नाहीत. काढून घ्यायचा प्रयत्न केल्यास हिंसक होतात. यावर ठोस औषधोपचार नाही. हिंसक होऊन काही मुलांनी आपल्या पालकांचाच जीव घेतला असल्याच्या घटना घडल्या आहेत. मुलं कितपत या विळख्यात सापडली आहेत हे पाहून प्रसंगी त्यांना मनोविकारविषयक संस्थेत दाखल करावे लागते. मात्र महत्त्वाचा मुद्दा असा की मानसिक उपचार तज्ज्ञ किंवा तशा संस्था यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतो. मानसिक रोगाबाबत आपल्याकडे अजून गांभीर्याने पाहिले जात नाही. याबाबत आता शासन स्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे. सध्यातरी त्यामुळे पालक, शिक्षक यांच्याकडूनच वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शास्त्रशुद्ध समुपदेशन प्रभावी ठरू शकतं. पॉर्नने अस्वस्थ न होता पालकांनी त्यावर उपाय शोधले पाहिजेत. आपल्या समाजाचा लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोनच रोगट आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षणाबाबत योग्य-अयोग्यच्या तिढ्यातच आपण अद्यापि अडकलो आहोत.
पालकांनी मुलांच्या सोशल मीडियावरील वावरावर लक्ष ठेवायला हवं. त्यातून बऱ्याच गोष्टी कळतात. तुम्ही मुलाच्या परवानगीनं फेसबुक मित्र झालात तर आपोआपच त्यावर नियंत्रण राहू शकेल. त्याच्या मित्रांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील चर्चांचाही कधी कधी धांडोळा घ्या. त्याच्याशी सतत खुलेपणाने संवाद साधा. एकतर्फी कोणतीही कृती न करता विश्वासात घेऊन सारे काही करा. बऱ्याचदा पेरेंटल कंट्रोलला बगल देण्यासाठी मुलं बहुतवेळा प्रोक्सी सर्व्हरचा वापर करतात. वयोगटनानुसार पालकांनी या समस्येला
वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे गेले पाहिजे. आवश्यक तिथे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.
तंत्रज्ञानाच्या मदतीने आज तुमच्या मुलावर वॉच ठेवला
जाऊ शकतो, मात्र त्यात धोके आहेत ते समजून घेऊन
पाऊल टाकले पाहिजे. मुलाला विश्वासात घेऊन आणि
कधी कधी त्याच्या अपरोक्षही ते करता येईल. अँड्राईड
मोबाईल असेल तर गुगल माय अॅक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये त्या मोबाईलच्या सर्व अॅक्टिव्हिटी कळतात. ' यूट्यूब'चा वापर किती आणि काय पाहिले याच्या लिंक्स कळतात. मॅप्सला जीपीएस ऑप्शन ऑन असेल तर त्याचा संचार कळू शकतो. फेसबुकच्या अॅक्टिव्हिटी लॉग ऑप्शनमध्ये गेल्यास फेसबुक वापराचा सारा इतिहास तपासता येतो. खोलीत कोंडून घेऊन टीकटॉक व्हिडिओ बनवत असेल तर ते व्हिडिओ काय आहेत, हे जाणून घेतले पाहिजेत. हे सारे तंत्रज्ञान पालक जाणून घेऊ शकतात. पाल्य पालकांना मोबाईल हाताळून देईलच याची शाश्वती नाही. त्याने जीमेलला दिलेला आयडी पासवर्ड समजला तर त्याच्या परस्पर सारे काही जाणून घेता येते. थोडक्यात मुलाची सोशल मीडिया वापराची कुंडली म्हणजेच समाज माध्यमीय व्यक्तिमत्त्व तपासून घेता येईल. त्यात काही चुकीचे असेल तर उपायोजनाही करता येईल.आता हा सल्ला झाला सुशिक्षित पालकांसाठी!मात्र अनेक पालक अशिक्षित आहेत. पोटापाण्यासाठी राबराब राबत असतात. त्यांना आपल्या मुलाने काय केलं आहे? काय करतोय, हे पाहायला वेळ नाही. यावेळी जबाबदारी येते ती शिक्षकांवर! अशा अशिक्षित पालकांसाठी शासन स्तरावर प्रशिक्षण काहीसे उपयोगाचे ठरू शकेल.
No comments:
Post a Comment