चौपट नगरीच्या काही लोकांना एकदा फेरफटका मारून येण्याची लहर आली. ते आपल्या गावाबाहेर पडले. वाटेत एक नदी आली. याअगोदर त्यांनी नदीविषयी ऐकले होते, पण प्रत्यक्षात कधी पाहिली नव्हती. ते नदीला पाहून घाबरले. सगळे मिळून विचार करू लागले की, आता नदी पार कशी करायची? पण काही आयडिया आली नाही. हळूहळू रात्र होत आली. सगळे नदी काठच्या एका झाडाखाली झोपले. मध्यरात्री अचानक त्यातला एकजण उठला आणि म्हणाला," चला, आता मध्यरात्र झाली आहे. आपण गपचूप नदी पार करू या."
दुसऱ्या जोडीदारांना तो काय म्हणतोय कळेना. ते त्याच्याकडे पाहाताच राहिले. तेव्हा तो पहिला व्यक्ती समाजवण्याच्या सुरात म्हणाला,"मला वाटतं, मी काय म्हणालो, ते तुम्हाला समजलं नाही. रात्र वाढत चालली आहे आणि थकून-भागून आलेले पशु-पक्षी सगळे झोपले आहेत. अशा वेळेला नदी काय जागत बसली असेल का? तीसुद्धा झोपली असेल. त्यामुळे आपण गुपचूप निघून जाऊ. नदीला कळणार देखील नाही."
दुसऱ्या जोडीदारांना त्याचे म्हणणे पटले. सगळ्यांनी त्याचे कौतुक केले. पण प्रश्न असा उपस्थित झाला की, नदी झोपली आहे की नाही , हे कसे कळणार? खूप विचार केल्यावर त्यांनी ठरवलं की, त्यांच्यातल्या एकाने पुढे जायचं आणि पाहायचं की नदी झोपली आहे की नाही! नदी झोपली नसेल तर माघारी यायचे आणि झोपली असेल तर आपल्या जोडीदारांना खुणेने बोलावून घ्यायचे. सगळं ठरल्यावर सांगणारा पुढे गेला. नदीच्या पाण्यात उतरला आणि चालू लागला.
जसं जसं नदी खोल होत चालली, तसं तसं पाणी माणसाच्या शरीरावर चढू लागलं. पण अचानक तो घसरून पडला आणि हात वर करून जोडीदारांना मदतीसाठी बोलावू लागला. तोंडात पाणी गेल्यानं त्याचा आवाज निघत नव्हता. परंतु त्याचे हलणारे हात मात्र बाकीच्या सगळ्या जोडीदारांना दिसले.
त्यांनी समजून घेतले की, खरेच नदी झोपली आहे. त्यामुळेच आपला जोडीदार हात हालवून आपल्याला बोलावत आहे. सगळ्यांनी नदीत उडी घेतली आणि वेगाने पुढे पुढे सरकू लागले, कारण नदी जागी झाली तर काय करायचं? लवकरच ते सगळे खोल पाण्यात गेले आणि नदीत बुडाले.
No comments:
Post a Comment