Monday, May 11, 2020

कोरोना सोबतच जगण्याची हवी मानसिकता

कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. मात्र कोरोनाला घाबरून चालणार नाही तर कोरोनाशी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आरोग्य यंत्रणेने सांगितलेल्या उपाययोजना, 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोर पालन करून आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहून आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्यासोबतच शारीरिक, मानसिक, आर्थिक संकटही उभे ठाकले आहे. कोरोनाचा संसर्ग मानवापासून मानवाला होत आहे. यावर अद्याप लस किंवा औषध तयार झाली नसल्याने सामाजिक अंतर ठेवणे (सोशल डिस्टन्सिंग), स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे, वारंवार हात धुणे, स्वच्छता राखणे हा एकमेव उपाय आहे.
कालांतराने यावर लसही उपलब्ध होईल. मात्र, आता आपल्याला येथून पुढे जगण्याचे नवीन मापदंड आत्मसात करावेच लागणार आहेत. एकंदरीत कोरोना सोबतच जगण्याची मानसिकता तयार ठेवावी लागेल. कोरोनाचा प्रकोप वाढता आहे.कोरोना हा सुक्ष्म विषाणू असून युरोपियन देशात या विषाणूने चांगलेच थैमान घातले. यानंतर त्याचा भारतात सर्वप्रथम पुण्यात प्रवेश झाला व येथून तो संपूर्ण भारतात पसरला. मानवाच्या थुंकी, श्‍वास, खोकला, शिंकेतून या विषाणूचा प्रसार होतो. त्यासोबतच तो आपल्या हाताच्या माध्यमातून नाक, तोंड डोळय़ातूनही मानवी शरिरात प्रवेश करीत असतो. त्यामुळे हात वारंवार धुवा, स्वच्छता बाळगा, असा सल्ला सातत्याने दिला जात आहे. कोरोनाचा हा विषाणू सजीव आहे. त्याला जगण्यासाठी मानवी शरीर आवश्यक आहे. यासंदर्भात सखोल अभ्यास
होत आहे. येत्या काळात निश्‍चितच यावर लस शोधली जाईल. दररोज नवनवीन भागातून रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्याच्या उंबरठय़ावर उभे आहोत. ब्लड प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जात आहे. प्लाझ्म्याने काही रुग्ण बरे झाल्याचा दावा केला जात असून आयसीएमआरने या थेरपीसाठी परवानगी दिली होती.युरोपियन देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर हा फार कमी आहे. परंतू आपण स्वत:सोबतच वृद्ध, लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी.
वैद्यकीय आपत्ती लक्षात घेता आरोग्य विमा काढा .
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथून पुढे येणार्‍या दिवसांमध्ये मानवाला तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. यामध्ये समाजाला साक्षर करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य दक्ष व्हावे लागेल व अर्थकारण कळणे महत्त्वाचे राहील. आपण आजारी पडलो की, आपल्या अर्थकारणाची घडी मोडते म्हणून अर्थकारण समृध्द करणे व अर्थसक्षम होणे गरजेचे झाले आहे. यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपला कुटुंबीयांसह आरोग्य विमा काढणे आजघडीला महत्त्वाचे झाले आहे.
सकस आहारानेच वाढेल रोगप्रतिकारशक्ती.
लॉकडाऊन उघडल्यानंतरही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचा आपल्या जीवनात अंमल करावाच लागणार आहे. यासोबतच आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे होणार आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या, चांगली झोप घ्या, चांगला शिजविलेला सकस आहार घ्या. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. गोळय़ा घेऊन प्रतिकारशक्ती वाढत नाही. रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार असणार्‍यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यासोबतच वृध्द व लहान मुलांची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यांची काळजी घ्या. चांगले विचार करा, मन शांत ठेवा. आरोग्य दक्ष व्हा; गाफिल राहू नका.
सर्दी, खोकला, ताप असल्यास घरगुती पारंपारिक औषधांवर निर्भर राहू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा काळामध्ये गर्दीचे ठिकाण टाळा तसेच घरातील व्यक्तीपासूनही सामाजिक अंतर पाळा . सातत्याने हाताळण्यात येणार्‍या पेन, मोबाईल, चष्मा, चावी, पर्स या गोष्टी बाहेरुन घरी गेल्यावर सर्वप्रथम सॅनिटाईज करुन घ्या. फळ भाजी स्वच्छ धुण्यासोबतच ते उन्हात काही काळासाठी ठेवा. घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. घरात प्रकाश येऊ द्या. जेणेकरुन स्वच्छ हवा घरात येऊन काही प्रमाणात घरात असलेल्या जंतुचा नाश होण्यास मदत होईल.नेहमी मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा अती वापर हा धोकादायक आहे. त्यामुळे आवश्यक तेवढाच वापर करा, अधिकाधिक हात धुण्यावरच  भर द्या. कोमट किंवा गरम पाण्यात कपडे धुवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment