Sunday, May 3, 2020

देशाने दिले जीव वाचवण्याला प्राधान्य

लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतरच्या  दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीस हजारांवर पोहचला आहे.  आणि हजारांवर मृत्यू पावले. इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे. अर्थात याबाबतीत अनेक कारणे सांगितली जात आहेत. परंतु देशाने योग्य वेळी आणि कडक स्वरूपात लॉक डाऊनची अंमलबजावणी केली.  भारतात मृतांची संख्या दुप्पट व्हायला जवळपास नऊ दिवस लागतात, तर न्यूयॉर्कमध्ये दोन ते तीन दिवस. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात.
भारतात चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळापासून कडकडीत लॉकडाऊन पाळला जात आहे,  याशिवाय भारत तरुणांचा देश आहे. येथील हवामान उष्ण आहे, त्यामुळे भारतात कोव्हिड-19 मुळे मृत्यूच्या संख्येवर चाप बसला आहे. अजूनही कोविड-19 च्या डायग्नोस्टिक चाचण्या आणि अँटीबॉडी चाचण्या दोन्ही मोठय़ा प्रमाणावर झाल्या पाहिजेत. डायग्नॉस्टिक चाचण्यांमधून एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, हे कळते. तर अँटीबॉडी चाचण्यातून एखाद्याला कोरोनाची बाधा होऊन तो त्यातून पूर्णपणे बरा झाला आहे का, हे कळते. कोरोनाची साथ पसरलेल्या अनेक देशांमध्ये अजाणतेपणाने कमी मृत्यू नोंदवले गेले आहेत. 12 देशांमध्ये कोविड-19 मुळे जे मृत्यू नोंदवले गेले. त्यापेक्षा 40 हजार जास्त मृत्यू झाले. या 40 हजारांमधील काही मृत्यू इतर कारणांमुळे झाले असले तरी काही कोरोनाच्या संसर्गामुळेच झाले असण्याची शक्यता आहे. भारतात मलेरिया, न्युमोनियापासून अनेक प्रकारच्या आजारांमुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू घरीच होतात. अनेकांवर वैद्यकीय उपचार होतात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अशा रुग्णांना घरी पाठवतात आणि घरीच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोविड-19 मुळे होणार्‍या मृत्यूची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी केवळ हॉस्पिटलमधील मृत्यू मोजणे पुरेसे नाही. सार्वजनिक आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठीची मजबूत यंत्रणा नाही. अशावेळी मोबाईल फोनच्या माध्यमातून मृत्यूची आकडेवारी मिळविली जाऊ शकते. भारतात जवळपास 85 कोटी जनतेकडे मोबाईल फोन आहेत. या लोकांना त्यांच्या गावात किंवा भागात झालेल्या असामान्य मृत्यूंची माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यायला सांगितले तर स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी अशा कुटुंबांना भेट देऊन त्या मृत्यूबद्दलची माहिती घेऊ शकतात. कोरोना बाबतीत सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत माहिती उपलब्ध व्हायला हवे.  शिवाय देशातील प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेताना कोरोना संसर्ग होऊ नये,याची काळजी घेताना पुढील काही महिने सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर अनिवार्य करायला हवा आहे. लॉक डाऊन तोडण्याऱ्या लोकांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे. विनाकारण भटकणाऱ्या आणि पान-तंबाखू, मावा,गुटखा खाऊन रस्त्यावर कुठेही थुंकणाऱयांवरही कारवाई व्हायला हवी. देशाने फार मोठे आर्थिक नुकसान सोसून लोकांचा जीव वाचवण्यासाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत 65 हजारांच्यावर कोरोनाग्रस्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि काही लाखांवर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही तिथल्या लोकांना आणि प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. इथल्या सत्ताधाऱयांना महासत्ता अबाधित राहण्यासाठी लॉक डावूनकडे फार लक्ष देण्यात आले नाही. आपल्या देशात मात्र पैसे काय नंतर कमावता येतात,पण जीव वाचवले पाहिजे, याला प्राधान्य देण्यात आले. याची जाणीव विनाकारण रस्त्यांवर व गर्दीत फिरणाऱयांनी ठेवायला हवी आहे.

No comments:

Post a Comment