Wednesday, May 13, 2020

(बालकथा) हे खरे नाही

रामरावला गोष्टी ऐकण्याचा भारी नाद होता. पण त्याला एक वाईट खोड होती. एखादा गोष्ट सांगायला लागला की, तो मधेच उठून म्हणायचा,'हे खरे नाही.' यामुळे त्याचे मित्र किंवा आणखी कोणी नाराज व्हायचे. नंतर नंतर तर त्याला गोष्टी सांगण्याच्या भानगडीतच कुणी पडत नसे.
एके दिवशी रामराव आपल्या घरासमोर असाच उभा होता. अचानक त्याला त्याचा शिक्षक मित्र तिथून जाताना दिसला. रामरावने त्याला अडवलं आणि गोष्ट सांगायची विनंती केली. शिक्षक मित्र म्हणाला,"मी तुला गोष्ट सांगेन पण एका अटीवर! तू मधेच 'हे खरे नाही' असं काही म्हणायचं नाही."

रामराव म्हणाला,"नाही म्हणणार!"
" असं म्हणालास की तू मला एक गव्हाचं पोतं द्यायचं. हे कबूल असेल तरच मी गोष्ट सांगेन." शिक्षक मित्र म्हणाला.
"हो!कबूल." रामरावने गव्हाचे पोते देण्याचे मान्य केले.
शिक्षकाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट एका श्रीमंत माणसाची होती. एक दिवस तो राजाला भेटायला आपल्या घोडागाडीत बसून निघाला. वाटेत त्याने एका चिमणीचे रडणे ऐकले. चिमणी का रडतेय म्हणून पाहायला तो बाहेर आला. तेवढ्यात चिमणीने त्याचे कपडे खराब केले. श्रीमंत माणसाने लगेच आपल्या नोकराला पाठवून घरून दुसरे वस्त्र आणायला सांगितले. नवीन वस्त्रे आल्यावर त्याने जुने कपडे फेकून दिले आणि पुढच्या प्रवासाला निघाला.
थोड्या वेळाने चिमणी पुन्हा रडू लागली. तो श्रीमंत पुन्हा बाहेर आला. चिमणीने आता त्याची तलवार घाण केली. त्याने लगेच नोकराला पाठवून दुसरी तलवार मागवली आणि जुनी तलवार नोकराला दिली. आता त्याने विचार केला की, यापुढे काहीही झाले तरी घोडागाडीतून बाहेर जायचे नाही.
आणखी थोडा वेळ पुढे गेल्यावर पुन्हा चिमणीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आता चिमणी फारच जोराने रडत होती. शेवटी त्या श्रीमंत माणसाला राहवले नाही. त्याने घोडागाडीतून आपले डोके बाहेर काढले. तितक्यात चिमणीने त्याच्या डोक्यावर घाण केली. श्रीमंत माणसाने नोकराला पाठवून आणखी एक डोके मागवले. आपले आपले जुने डोके तलवारीने छाटून...
एवढे ऐकताच रामराव मधेच बोलला," अरे ...अरे ... हे  काही खरे नाही."
शिक्षक मित्र हसला आणि म्हणाला," हो, मलाही माहीत आहे,हे खरे नाही. पण मित्रा तू शर्यत हारला आहेस. आता तुला मला गव्हाचं पोतं द्यावं लागेल."
रामरावने शिक्षक मित्राला गव्हाचे पोतं दिलं,पण तेव्हापासून त्याची ही वाईट खोड मोडली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment