खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक म्हातारा होता. त्याला मासे पकडण्याचा मोठा छंद होता. तो नेहमी त्याच्या घराजवळ असलेल्या मोठ्या अशा तलावात मासे पकडायला जायचा. एके दिवशी जेवण केल्यावर तो मासे पकडायला निघाला. तलावाजवळ जाताच त्याला तिथे एक नाव दिसली. तो नावेत बसला आणि तलावाच्या मध्यभागी पोहचला. तलावाच्या मध्यभागी गेल्यावर त्याने गळ लावलेली काठी पाण्यात टाकली. पण थोड्याच वेळात त्याला थकवा आल्याने झोप आली. अचानक मासे पकडण्याची त्याची काठी हलू लागली. त्यामुळे तो जागा झाला.
त्याने ती काठी ओढली. मासा गळाला लागल्याचे त्याला दिसले. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो सोनेरी मासा होता.
म्हातारा चकित झाला. कारण तो मासा त्याच्याशी बोलायलाही लागला होता. मासा म्हणाला," तू मला सोडू शकणार नाहीस का?"
तो म्हातारा म्हणाला," नाही!आता मी तुला खाणार."
मासा म्हाताऱ्याला विनवणी करू लागला," कृपा करून मला जाऊ दे. तू मला सोडलंस तर मी तुला सोन्याची दोरी देईन."
म्हाताऱ्याच्या डोळ्यांत लोभ दाटला. त्याने विचारले,"सोन्याची दोरी? पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू?"
मासा म्हणाला," तू ही मासे पकडण्याची काठी पाण्यात टाक. काही वेळातच तुला सोन्याची दोरी मिळेल."
म्हाताऱ्या माणसाने माश्याचे ऐकले आणि आपली काठी पाण्यात टाकली. काही वेळाने त्याने त्याची काठी ओढली तर त्याच्यासोबत सोन्याची दोरी होती.
म्हाताऱ्या माणसाने विचार केला,'कदाचित ही दोरी खूपच लांब असणार आहे. कारण त्याला दोरीचे दुसरे टोक दिसत नव्हते. त्याला खूप आनंद झाला. तो ती सोन्याची दोरी ओढू लागला.
मासा म्हणाला,"आता तर मला जाऊ दे. आता तुझ्या हातात सोन्याची दोरी आहे."
म्हातारा म्हणाला," नाही! मी तुला जाऊ देणार नाही. आता तर तुला बाजारात नेऊन विकिन.तुला विकल्यावर मला खूप पैसे मिळतील."
त्याने माशाला पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवले आणि दोरी ओढू लागला.
अचानक त्याची नाव पाण्यात बुडू लागली. तो इतका हावरा बनला होता की, नाव डुबत असतानाही तो दोरी ओढतच होता. शेवटी त्याची नाव पाण्यात बुडाली. आणि आणखी... आणखी मिळवण्याचा नादात त्याला आपला जीवही गमवावा लागला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment