चिंतामणी आणि त्याची पत्नी -सरला रोज चिमणी आपलं घरटं बांधताना पाहत होते. हॉलमध्येच तिनं घरटं बांधायला घेतलं होतं. काही दिवसांनी घरटं बांधून पूर्ण झालं. तिने अंडीही घातली. पिल्लं चिव-चिव करत बाहेरही आली.
बघता बघता चिमणीची पिल्लं मोठी झाली. ते उडायलाही शिकले. एक दिवस अचानक सरलाने पाहिलं की, चिमणी आपल्या पिलांना बाहेर हुसकावून लावत आहे.
सरलाने याविषयी चिंतामणीला विचारलं. चिंतामणी म्हणाला,"चिमणी आता आपल्या पिलांना तिच्यासोबत ठेवणार नाही. तिने आपल्या पिलांना स्वतः ची काळजी घेण्याइतपत त्यांना आत्मनिर्भर बनवलं आहे. पिलांनी आता त्यांच्यावर अवलंबून राहू नये. सरलाच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात राहिली.
दिवस जात राहिले. चिंतामणीची मुलं मोठी झाली. कमवू लागली. त्यांची लग्नं झाली. एक दिवस त्यांच्या मुलांनी त्यांना घरातून हाकलून लावलं.
आपल्याला आई-वडीलांचा सांभाळ करणं आता त्यांना ओझं वाटू लागलं. आता त्यांना वाटू लागलं की, मुलं कमवायला लागली, त्याच वेळी त्यांना घराबाहेर हाकलून काढायला हवं होतं.
कदाचित हाच फरक आहे माणसांत आणि पक्ष्यांमध्ये! चिमणीने आपल्या पिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना आपल्या घरट्याबाहेर काढले होते. आणि आमच्या मुलांनी ओझं समजून आम्हालाच बाहेर काढलं.
No comments:
Post a Comment