एक साधू आजारी पडला. आपला शेवटचा दिवस जवळ आला आहे, हे त्यानं ओळखलं. आपल्या तीन प्रिय शिष्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. तो विचार करू लागला,'यांना ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या योग्य अशा गुरुची आवश्यकता आहे. पण तो कुठे आणि कसा भेटेल?'
साधू काही योग्य अशा विद्वानांना जाणत होता. पण त्याला वाटत होतं की, शिष्यांनीच आपल्यासाठी योग्य गुरू शोधावा. यासाठी त्याने एक उपाय शोधला आणि आपल्या तिन्ही शिष्यांना बोलावून घेत म्हणाला, "आपल्या आश्रमात 17 उंट आहेत. मला यांची वाटणी करायची आहे. तुम्ही तिघांनी उंटांची अशा प्रकारे वाटणी करा की, सर्वात मोठ्या शिष्याला निम्मे, मधल्याला एक तृतीयांश आणि सर्वात लहान शिष्याला नव्वा भाग यायला हवा."
तिघेही गुरूच्या या विचित्र वाटणीने गोंधळात पडले.तिघांनी खूप डोकं लावलं, पण काहीच उपयोग झाला नाही. मग त्यांनी आपापला अंदाज लावायला सुरुवात केली.
एक म्हणाला,"गुरुजींना वाटत असावं की, वाटणीच होऊ नये. त्यामुळे आपण तिघेही या उंटांचे मालक राहू. वाटणी करण्याची गरज नाही."
दुसरा म्हणाला,"गुरुजींनी जी वाटणी केली आहे, त्याच्या थोडे जवळ जाऊ आणि जे शक्य आहे,ते करू.एक कमी झाला किंवा एकादा जास्त झाला म्हणून काय फरक पडणार आहे?" पण ही वाटणी तिघांच्या गळी उतरली नाही. त्यामुळे त्यांची समस्या तशीच राहिली. हळूहळू ही समस्या आश्रमाबाहेर गेली.
एका विद्वानाने ही समस्या ऐकली आणि तिन्ही शिष्यांना बोलावून घेतले. विद्वान म्हणाला," तुम्ही माझा एक उंट घ्या. यामुळे तुमच्याजवळ अठरा उंट होतील. आता तुमच्या गुरुजींनुसार सर्वात मोठ्या शिष्याला निम्मे म्हणजे नऊ उंट येतील. मधल्याला एक तृतीयांश अर्थात सहा उंट येतील. सगळ्यात लहानग्याला नववा हिस्सा म्हणजे दोन उंट येतील. आता उरला एक उंट. तो माझा मला मिळाला. झालं ना, तुमच्या गुरुजींच्या मनासारखी वाटणी?"
शिष्यांना खूप आनंद झाला. या वाटणीच्या निमित्ताने त्यांना त्यांचा नवा गुरू मिळाला. कारण गुरू शिष्यांच्या समस्येत स्वतःही सामील झाला होता. आता साधू चिंतामुक्त झाला.
No comments:
Post a Comment