एक दिवस देव आपण बनवलेले हे जग पाहण्यासाठी पृथ्वीवर अवतरला. त्याने पाहिलं की, लोक शेतात काम करत आहेत. एका माणसाला त्याने विचारलं,"तू या शेतात नांगर कधी चालवलं होतंस?"
"आज!" माणसाने उत्तर दिले.
देवाने पुन्हा विचारले,"हा खड्डा कधी खोदलास?"
उत्तर आलं,"आज."
"आणि ही बाग कधी बनवलीस?"
माणसाने आश्चर्याने सांगितलं,"आजच!या विश्वात फक्त आजच तर आहे. जे काही होतं, ते आजच होतं."
देवाने एका महिलेला एका मुलासह पाहिलं आणि विचारलं,"या मुलाचा जन्म कधी झाला?"
महिलेने उत्तर दिले,"आज."
तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, लोकांना काळ- वेळेचा आभास यासाठी होत नाही,कारण रात्र-दिवसांसारखी कोणती गोष्टच नाही. वेळेचे कसले विभाजन नाही.
देवाने सूर्याला बोलावून घेतलं. आणि म्हणाला,"मी सांगेन तेव्हा तू अस्ताला जायचं आणि मी सांगेन तेव्हा उगवायचं. "
सूर्याने देवाचे म्हणणे मान्य केले. तो देवाच्या सांगण्यावरून अस्ताला गेला. अंधार दाटला. लोकं सैरभैर झाली. त्यांना काहीच कळेना, हे काय चाललं आहे. लोकं घाबरून सैरावैरा इकडे तिकडे धावू लागली. काहीजण खड्ड्यात पडले. काहीजण कशा कशाला धडकून कोसळू लागले. सगळीकडे पुरता गोंधळ माजला. कुणालाच काही कळत नव्हतं, काय करावं?
शेवटी गावातल्या प्रमुखाने सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं," आता सगळे झोपी जा. या गडद अंधारात कोणीच कसलं काम करू शकणार नाही."
तेव्हापासून रात्र होऊ लागली. आणि ही वेळ आराम करण्याची ठरली.
सूर्याने आपली किरणे सर्वदूर सोडली आणि दिवस उगवला तेव्हा लोक उठले. आता लोक आनंदी होते. आता पूर्ण थकेपर्यंत काम करत नव्हते. रात्र झाल्यावर त्यांना आराम करायला वेळ मिळाला.
आता एकच अडचण होती. अंधार झाल्यावर माणसे काहीच करू शकत नव्हती. कुठे खड्ड्यात पडायची तर कशाला तरी जाऊन धडकायची. त्यामुळे माणसे जायबंदी व्हायचे. गोंधळ उडायचा. हे पाहून देव पुन्हा त्यांच्याकडे आला. लोकांनी त्याला सांगितलं,"सकाळी उठल्यावर आम्हाला खूप ताजंतवानं वाटतं आहे. पण अंधार झाल्यावर आम्हाला काहीच दिसत नाही. त्यामुळे रात्री थोड्या वेळासाठी सूर्य प्रकाश मिळणार नाही का?"
देव म्हणाला,"नाही!पण मी तुम्हाला असे काही देईन की ,त्यामुळे प्रकाश मिळेल. परंतु तो कमी असेल. या प्रकाशात तुम्ही पाहू शकाल. पण काम करू शकणार नाही. त्याच्या मदतीने दुर्घटना घडणार नाहीत."
मग देवाने चंद्राची निर्मिती केली. चंद्र आकाशात अवतरला आणि शीतल प्रकाश देऊ लागला. आता जीवन आणखी सुकर झालं. सगळीकडे आनंदी आनंद ओसंडून वाहू लागला. तेव्हापासून दिवसा सूर्याचा प्रखर प्रकाश आणि रात्री चंद्राचा शीतल प्रकाश मिळू लागला.
No comments:
Post a Comment