Wednesday, May 6, 2020

(छोटीशी गोष्ट) कायमचा पत्ता

आईच्या मृत्यूची बातमी मिळाल्या मिळाल्या सुजाता गावाकडे यायला निघाली होती. पण शहरातून इथंपर्यंत येण्याअगोदरच तिच्या भावांनी पावसाचं वातावरण बघून आईच्या मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करून टाकले. तिला जाणवलं की, आईच्या मृत्यूचा घरातल्या कुणावरच काहीच भावनिक परिणाम झाला नाही.  काही दिवसानंतर तिला तिच्या लहान भावाच्या घरातली एक घटना आठवली. यामुळे तिच्या आईच्या  आयुष्याची दिशा आणि दशाच बदलली.
बाबांच्या वडिलांच्या मृत्यूच्या बाराव्या दिवसांनंतर तिच्या चारही भावांमध्ये आईला कुठे आणि कोणाकडे ठेवायचे,यावर चर्चा चालली होती. कुठलाच मुलगा तिला आपल्याकडे ठेवायला तयार नव्हता. ती आईला आपल्यासोबत न्यायला तयार होती. याबाबतीत कोणाचीच तक्रार नव्हती,पण आईच यायला तयार नव्हती. शेवटी भावांनी निर्णय घेतला की आई प्रत्येकाकडे तीन तीन महिने राहील. हे ऐकून आईच्या डोळ्यांमधले अश्रू थांबायला तयार नव्हते. पण स्वत: ला राहायला आसरा नसल्याने ती असहाय होती.आई तीन तीन महिने एकेका मुलाकडे राहून आपले उर्वरित आयुष्य कसे तरी काढत होती.
कुठल्याही मुलाला किंवा त्यांच्या बायकांना आईच्या मनस्थितीशी काही देणे-घेणे नव्हते. अचानक मोठ्या भावाचा आवाज ऐकून ती भानावर आली. आईच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी भावाने आईचे मृत्यू प्रमाणपत्र आणले होते. तिने पाहिले की ,भावाने आईचा पत्ता आपल्या घरचा दिला होता. हे वाचून तिच्या डोळ्यांतून आपोआप अश्रू टपकले. आई जिवंत असताना तिचा कायमचा असा पत्ता नव्हताच. ती प्रत्येक तीन महिन्यांनी आपले ठिकाण बदलत होती. मग कसा असणार तिला कायमचा पत्ता! पण मेल्यानंतर का होईना तिला तिचा कायमचा पत्ता मिळाला होता.

No comments:

Post a Comment