Monday, May 11, 2020

आनंदी राहण्यासाठी...!

जुनी कात्रणं काढून बसलो होतो. लॉकडाऊनचा काळ सदुपयोगाला लावायचं ठरवून काही वाचन, काही लेखन सुरूच आहे. मला कात्रणं काढून ठेवण्याचा छंद आहे. अर्थात आता मोबाईल, लॅपटॉपमुळे यात थोडा आळस आलाय म्हणा,पण शेवटी कात्रणं आपल्याला एकप्रकारची ऊर्जा देतात हे खरेच! सांगायचा मुद्दा असा की आज कात्रण काढून चाळत असताना 2003 मधील 'लोकप्रभा' साप्ताहिक मधील एक कात्रण सापडले. त्याचे शीर्षक होते, "आनंदी राहण्याची कला!'

म्हटलं चला, वाचून काढू. लेखकाने आनंदी राहण्याचे खूप चांगले टिप्स दिले आहेत. सध्या कोरोना संसर्गाचा कठीण काळ आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुठून येईल आणि कोरोना आपल्या घरात घुसले, याची काहीच शाश्वती राहिलेली नसल्याने बरेच लोक मानसिक तणावाखाली आहेत. तर काहींना या संसर्गाचे काहीच वाटत नाही. ही मंडळी बिनधास्त बिनाकामाचे रस्त्यांवरून भटकताना, वाहनांवरून सुसाट धावताना दिसतात. तोंडाला मास्क नाही, सुरक्षित अंतर नाही. या लोकांमुळेच कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. 'घरात राहा, सुरक्षित राहा' असे प्रेमाने,रागाने सांगूनही काही जणांवर काही परिणाम होताना दिसत नाही. पण ज्यांना काळजी आहे, त्यांनी तर घ्यावी. आणि सुरक्षित राहावे, असे काहीजणांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण काळजी करून, चिंता आळवून काही फायदा नाही. आपला दिवस आनंदी जाईल, याकडे आपण पाहिले पाहिजे. या लेखात आनंदी राहण्यासाठीच्या काही टिप्स दिल्या आहेत, त्या वाचा आणि त्याचे अनुकरण करून आनंदी राहा, असाच सल्ला मी देईन.
* आज दिवसभरात काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहावेळा मनाशी म्हणा!
*समोरच्या माणसांतील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा, स्वतः बद्दल कमी बोला.
*दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व घरात अथवा ऑफिसमध्ये त्याला योग्य स्थान द्या.
*आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा.
*चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एकादा विचार घेऊन त्यावर चिंतन, मनन करा.
*चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मानेने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वापरा.
*लहान मुलांमध्ये मिसळा व काही त्यांच्यासारखेच होऊन वावरा.
* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल,याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा.
*स्वतःचा चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला पडेल असा ठेवा.
*एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा-पंधरा मिनिटे घालावा.
*दिवसांतून दोन वेळा स्नान करा व स्नान करताना नाचण्याचा मोह आवरू नका.
*नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून, उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा.
*विनोदी सिरीयल पाहताना खळखळून हसा व शरीराची हालचाल होऊ द्या.
*चार वर्षाचे बालक दिवसांत साधारणतः 500 वेळा हसत असते. तर एव्हरेज मनुष्य जेमतेम पंधरा वेळा. यामुळे स्ट्रेस वाढत जातो. याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा. शरीरातील 83 टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात. याकरिता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.
* 'रिकामं मन सैतानाचं घर' असते. त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा.
* संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅक ग्राऊंडला चालू असू द्या.
*We are what we eat. यामुळे नैसर्गिक आहाराचा समतोल असावा. सुस्ती भरणारे, क्रोध निर्माण करणारे पदार्थ टाळा.
* चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा.
*विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मददगार ठरतो. लिंकन यांच्या टेबलावरील एका कोपऱ्यात विनोदी पुस्तकांचा संच नेहमीच असे.
*आरशासमोर उभे राहून डोळ्यांमधून हसण्याची सवय जडवा. सतत आनंदी राहिल्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या रसायनांची निर्मिती होते. ज्यामध्ये जर्जर आजारालाही उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे.
Most people are about as happy as they make up their minds to be.-Abraham Lincoln

No comments:

Post a Comment