सीतारामचं वय 55 वर्षांपेक्षा अधिक झालं होतं. शेती करून आपलं आणि कुटुंबाचं कसं तरी पोट भरत होता. कमाई काही फारशी होत नव्हती. पण उपाशी कधी राहावं लागलं नव्हतं. त्याचा नशिबापेक्षा आपल्या कष्टावर अधिक विश्वास होता.
यावेळेला त्याला वाटलं होतं की, धान्य विकून येणाऱ्या पैशांतून एकुलत्या एक मुलीचं चांगल्या प्रकारे लग्न करावं. लक्ष्मी पाच वर्षांची होती,तेव्हापासून त्याची बायको शेवंता तिच्या लग्नासाठी बारीक-सारीक गोष्टी जमा करून ठेवत होती. शेवटी ती वेळ आली होती, तिचा विवाह पांडुरंगाशी होणार होता.
पण नशिबाच्या पुढं चालतं कुणाचं? यावर्षी सीतारामचं सगळं पीक खराब झालं. दुष्काळ पाचवीला पूजलेल्या या भागात कितीतरी वर्षांनं पहिल्यांदा पुष्कळ पाऊस झाला. आणि पिकं सारी पाणी लागून खराब झाली. त्याच्या कष्टावर आणि मुलीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. शेताची अवस्था पाहून सीतारामनं तर डोकं धरलं.त्याला भीती होती की,ही गोष्ट मुलाकडच्या लोकांना कळली तर ते लग्नच मोडतील. पण ही गोष्ट कुठवर लपून राहणार! त्याच्या शेजाऱ्याकडून मुलाच्या घरच्यांना कळलंच. दुसऱ्या दिवशी सीतारामला काही न कळवताच पांडुरंग आणि त्याचे सगळे कुटुंब येऊन थडकले.सोबत त्यांनी साखरपुड्याचे सगळे समान आणले होते. त्यांना अचानक समोर पाहून सीतारामचे तर हातापायच गळाले. पांडुरंग म्हणाला,"तुमची चिंता आम्हा सगळ्यांना माहीत आहे. पण यात तुमचा काहीच दोष नाही. मी अजूनही तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. जास्त खर्च यायला नको म्हणून आम्ही सगळ्यांनी मंदिरात काही मोजक्या माणसांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." हे ऐकून सीतारामला मोठा धीर आला.
No comments:
Post a Comment