आज पुन्हा प्रभा आणि यशमध्ये वाद झाले. कारण तेच वैचारिक मतभेद. प्रभा कोणतीही गोष्ट सावकाशीने सांगायची. यश मात्र 'एक घाव दोन तुकडे' करायचा. मूळ मुद्दा धरून आपले म्हणणे सिद्ध करून दाखवायचा. आजसुद्धा तसंच झालं.
आपला बिघडलेला मूड सावरण्यासाठी प्रभाने फेसबुक उघडले. तिची नजर एका पोस्टवर पडली. तिनं यशला विचारलं,"जर तुला मला पुन्हा प्रपोज करावं लागलं तर कसं करशील?"
यश उत्तरादाखल गाणं म्हणायला लागला," इतनी शक्ती हमें देना दाता.." प्रभाच्या चेहऱ्यावर असह्य असं हसू आलं.
तेवढ्यात एका कमेंटवर तिची दृष्टी पडली. "एकटा पडलोय मी. चला ये जिथे असेल तिथून" ती पोस्ट यशला दाखवत आणि ती कमेंट वाचून दाखवत म्हणाली,"त्रास द्यायचा आहे तितका दे आज,माझ्या नंतर तूही अशाप्रकारे एकटेपणात आठवण काढशील"
हे ऐकताच यशसमोर एकटेपणाचे चित्र उभे राहिले. जीवनाचा हा दीर्घ प्रवास त्यात हे एकाकीपण! विचार करूनच त्याचं मन व्याकूळ झालं. त्याच्या डोळ्यांत आसवं दाटली. त्यानं प्रभाचा हात आपल्या हातात घेतला आणि गुणगुणायला सुरुवात केली,"जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे."
No comments:
Post a Comment