कोरोनाचा आपल्या देशात भडका उडाला आहे. रोजचे लागण होण्याचे प्रमाण कमालीचे झपाट्याने आणि चिंताजनाकरित्या वाढत असल्याने स्वतःची काळजी स्वतः घेणं क्रमप्राप्त आहे. सुरक्षित अंतर ,तोंडाला मास्क आणि स्वच्छता या त्रिसूत्रीच्या आधारावर कोरोना संसर्गात जगावं लागणार आहे. अशात शाळा सुरू करण्याच्याबाबतीत शासकीय पातळीसह विविध स्तरावर उलटसुलट बोललं जातं आहे. आपल्या देशात कुठलीही एक गोष्ट ठामपणे होत नाही.किंवा करता येत नाही. त्याला टोकाच्या दोन दिशा आहेत. लॉकडाऊनसारखा कमालीचा टोकाचा निर्णय घेताना जरी त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी घेतली नसली तरी लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, याची जी अपेक्षा केली होती, तीही पूर्ण झाली नाही. या काळात जरी संसर्गाला काही प्रमाणात अटकाव घातला तरीही ,त्याला पूर्णतः नष्ट करण्यात आपल्याला यश आले नाही.
शहरात कोरोना वाढत असतानाच ग्रामीण भागातही त्याचा वेग वाढत चालला आहे. ग्रामीण भागात साक्षरतेचे आणि जागृतीचे प्रमाण कमी आहे. साहजिकच खेड्यात म्हणावी अशी स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि मास्क त्रिसूत्रीचा वापर केला जात नाही. आपल्या देशात कमालीची गरीब-श्रीमंतीची दरी आहे. साक्षर-निरक्षरता यातही कमालीची भिन्नता आहे. शिक्षणातही अशीच दोन टोके आहेत. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी सर्वच शाळांवर उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्या मोठी असल्याने एकीकडे एकेका वर्गात 80 ते 100 विद्यार्थी आहेत तर दुसरीकडे काही शाळांमध्ये एका वर्गात फक्त दोनच विद्यार्थी आहेत. म्हणजे कुठलीच गोष्ट एकसंध सर्वत्र राबवता येत नाही. शहरात शाळा मोठमोठ्या इमारतींमध्ये भरतात तर दुसऱ्या बाजूला अजूनही शाळा मंदिर किंवा झाडाखाली भरतात. डिझिजल शिक्षणाचा विचार केला तर अशीच तऱ्हा आपल्या देशात, राज्यांमध्ये आहे. 70 टक्के शाळांमध्ये डिझिटल शिक्षणाची सोय नाही. त्यातच शासनाला 100 टक्के शाळांना वीज देता आली नाही, हे आणखी एक दुर्दैव आहे. महाराष्ट्र शासनाला सवलतीत वीज पुरवठा करण्याची मागणी करून शिक्षक वैतागले. त्याचा कपाळमोक्ष झाला, पण ही एक साधी गोष्ट शासन स्तरावर करता आली नाही. परिणाम काय तर अजून 60 टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये वीज नाही. मग डिजिटल शिक्षण कसे साध्य होणार?
ऑनलाईन शिक्षणाची तऱ्हा याहीपेक्षा बिकट आहे. स्मार्ट फोन जवळपास 75 टक्के विद्यार्थ्याच्या पालकांकडे नाहीत. आज 30 ते 45 वयोगटातील पालकांना अजूनही मोबाईल ऑपरेट करता नाही. काहींना त्यात उत्साह नाही. फोन घेता आला की काम संपले, असे म्हणणारा गट मोठा असल्याने त्यांना स्मार्ट मोबाईलची आवश्यकता नाही. काहींना मोबाईलवर खर्च करायला आवडत नाही , काहींना त्यात रस नाही. काहींच्या आयुष्याची पुंजी या लॉकडावूनमध्ये लयाला गेली. त्यामुळे आपल्या पाल्याला स्मार्ट फोन घेऊन द्यावे, अशी परिस्थिती अनेकांची राहिलेली नाही. ऑनलाईन शिक्षणाचा घाट हा सर्वांना उपयोगाचा राहिला नाही. मागास, भटक्या, स्थलांतर केलेल्या लोकांच्या अनेक मुलांचे शिक्षण यावर्षी अखेरचे होण्याची भीती आहे. निवासी शिक्षण घेणारी मुले आज कोठे आहेत, हे त्यांच्या शिक्षकांनासुद्धा माहीत नाही. दुपारच्या पोषण आहाराची, आश्रमशाळेची अनेक मुलांना गरज आहे. कित्येक मुलं शाळेतल्या आहारासाठी शाळेत येत असल्याची परिस्थिती आहे. मात्र मार्च महिन्यानंतर या मुलांची शाळा सुटली आणि त्यांच्या आई-वडिलांपुढे आपल्याबरोबरच मुलांच्या पोटापाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला.
कित्येकांना वाटतं की, कोरोनाचा संसर्ग वेगाने येऊन जायला हवा. संसर्गाच्या या सध्याच्या गतीमुळे अनेकांची अवस्था 'इकडे आड,तिकडे विहीर' झाली आहे. धड कामाला जाता येईना, ना घरात बसवेना. घरात बसून खायचं काय, हा मोठा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मुलांच्या शिक्षणाची काळजी पालकांना सतावू लागली आहे. शाळेत पाठवावं तर संसर्गाची भीती आहेच. मुलं किती काळ सांगितलेल्या सूचनेनुसार शिस्तीत राहतील का, असा प्रश्न आहे. लहान मुलांची शाळा घेणं तर अशक्यच आहे. कारण त्यांना शिक्षकांनी जवळ बसवून घेतल्याशिवाय शिक्षणच होत नाही. चंचल मुलं एका जागेला बसतच नाहीत. एकत्र प्रार्थना, एकत्रित बैठक व्यवस्था, आणि एकत्रित भोजन यामुळे ही मुलं सुरक्षित अंतर पाळायचा प्रश्नच येत नाही. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे, शौचालये, पाण्याची व्यवस्था नाही. खेळायला मैदाने नाहीत. इथे मास्क, सोशल डिस्टन आणि स्वच्छता या गोष्टी पाळल्या जाणं कठीण आहे.
आता मग शाळा सुरू करायच्या कधी? हा प्रश्न शिल्लक राहतोच. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार आणि वेग पाहता अजून काही महिने शाळा सुरू करणे कठीण आहे. खरे तर आता खऱ्या अर्थानं संसर्ग प्रसार होऊ लागला आहे. याची साखळी तुटली नसल्याने एकेका गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा विचार हा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी व्हायला लागल्यावरच करता येईल. म्हणजे अजून तीन-चार महिने शाळा सुरू करता येणार नाहीत. कोरोनवर औषध किंवा लस उपलब्ध झाल्यावरच खऱ्या अर्थाने निर्धोकपणे शाळा सुरू करता येतील. तोपर्यंत त्याचा विचारच सोडून द्यायला हवा. या काळात शिक्षकांच्या बदल्याही थांबवायला हव्यात. कसल्याच प्रकारच्या बदल्यांचा घाट घालता कामा नये.
मग अभ्यासक्रमाचे काय? चार महिने अभ्यासक्रम बुडाला म्हणून काही फरक पडत नाही. अभ्यासक्रम कमी करून मूल्यमापन घेता येईल. पण इथे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ते शासन नक्कीच घेईल. फक्त आता शासनाने शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळी वक्तव्य करण्यापेक्षा काय तो एकच निर्णय घेऊन जाहीर करावा आणि आपल्याबरोबरच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा पावलोपावली होणारा गोंधळ थांबवावा.
No comments:
Post a Comment