Sunday, June 7, 2020

(बालकथा) दिवूचा विचित्र आजार

दिवू खारुटी उदास बसली होती. तिचा मित्र मक्कू उंदराने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली,"मला कधी कधी दिसायचंच बंद होतं. काहीच दिसत नाही त्यावेळेला.."
" हो का!" मक्कू काळजीच्या स्वरात म्हणाला.  "चल आज संध्याकाळीच तुला डॉक्टरकडे घेऊन जातो."
संध्याकाळी दोघेही डोळ्यांचे डॉक्टर मटरू हत्तीच्या क्लिनिकमध्ये पोहचले. मटरू डॉक्टरने दिवूचे डोळे तपासले. अक्षरंदेखील वाचायला सांगितली. त्यांना दोष काही आढळला नाही.

डॉक्टर मक्कूला म्हणाले," ही खारुटी तर सगळं व्यवस्थित वाचते आहे आणि डोळ्यांतही काही दोष नाहीए. बरं ठीक आहे! मी काही औषधं लिहून देतो. ती घे. आणखी काही वाटलं तर महिन्याभराने पुन्हा दाखवायला ये."
मक्कूनं औषधं खरेदी केली. एक आय ड्रॉप होता आणि दुसऱ्या टॅबलेटस. दोन्हीही डोळ्यांसाठीच होते. दिवूने महिनाभर औषधं डोळ्यांत टाकली आणि खाल्ली. दुसऱ्या महिन्यात मक्कूने विचारले ,तेव्हा तिनं सांगितलं की, काहीच फरक पडला नाही. जसंच्या तसं आहे."
मक्कू पुन्हा तिला घेऊन डॉक्टरकडे गेला. या खेपेला मटरू डॉक्टरने डोळ्यांत ड्रॉप टाकले आणि मोठ्या मशीनने तपासले. यावेळीही काही दोष आढळला नाही. शेवटी नाईलाजाने मटरू डॉक्टरने डोळ्यांना आराम वाटणारा नॉर्मल चष्मा दिला आणि काही नवीन टॉनिक लिहून दिले.
मटरू आपले डोके धरून म्हणाला," अरे उंदरा, तुझ्या मैत्रिणीचे डोळे तर एकदम ठीक आहेत. मला हेच कळत नाही की, हिला असं का होतं आहे."
मक्कू दिवूसोबत चष्मा आणि औषधं घेऊन घरी आला.
पंधरा दिवस डोळ्यांना चष्मा लावून आणि औषधं खाऊन दिवू कंटाळली होती. एवढासा चेहरा करून बसली असतानाच मक्कू तिथे आला आणि म्हणाला," आता कसं वाटतंय तुला?"
दिवूला एकदम रडूच कोसळलं. "काहीच फायदा झाला नाही. ... समस्या जशीच्या तशी आहे."
"अगं, तुला तपासता तपासता तो मटरू डॉक्टर वेडा झाला. ...इतकी औषधं घेतलीस... चष्मा घालून बसली आहेस तरीही तुला गुण आला नाही.काय भानगड आहे?"
"मला काय माहीत!मला माहित असतं मग प्रश्नच नव्हता. मीच किती काळजीत आहे आणि तू मलाच विचारतो आहेस." खारुटी रागानं म्हणाली.
तिला शांत करत मक्कूनं विचारलं,"ठीक आहे!मला सांग तुला अचानक दिसायचं कधी बंद होतं. सकाळी, संध्याकाळी की रात्री?"
"कधीही होतं." दिवू मक्कूला हळूच चापट मारत म्हणाली,"मी ज्यावेळेला डोळे बंद करते, त्यावेळेला दिसायचंच बंद होतं. गडद अंधारातही दिसत नाही. आणि रात्री झोपल्यानंतर  तर काही म्हणजे काहीच दिसत नाही."
"काय?" मक्कूने तर 'आ'च वासला. तो म्हणाला, "म्हणजे ही भानगड आहे तर...?"
"हो!" दिवू तोंडाचा चंबू करून म्हणाली. मक्कू उंदीर डोकं धरून बसला.
"अरे अरे!आता तुला काय झालं?" दिवू खारुटीनं विचारलं. मक्कूला  मात्र हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.

No comments:

Post a Comment