Sunday, June 7, 2020

(लघुकथा) गरीब बिच्चारा!


मनोहर धावतच रेल्वेत चढला. या सामान्य डब्यात समोरासमोरच्या एका सीटवर एक फाळकूटदादा आपल्या चमच्यांसह बसला होता. आणि दुसऱ्या बाजूला एक फटका,मळका प्रवासी झोपला होता. झोपलेल्या प्रवाश्याचे पाय थोडे बाजूला सारून मनोहर तिथे जागा करून बसला. प्रवाश्याच्या पायाचे झटके सारखे सारखे त्याला बसत होते. शेवटी रागाने त्याला दम देत म्हणाला,"ए,हा काही रिझर्व्हेशनचा डबा नाही, उठून बस. झोपायचं असेल तर रिझर्वेशनच्या डब्यात रिझर्वेशन करून झोप जा."
"तुम्ही त्याला जरा मदत करा. त्या बिचाऱ्या गरिबाला बरं वाटत नसेल." फाळकूटदादा  त्याची बाजू घेत म्हणाला.
"हो का! मग तुमची जागा द्या त्याला आराम करायला." मनोहर तिडकीने म्हणाला.
फाळकूटदादा गुरगुरल्यासारखं मनोहरकडे पाहात राहिला. तेवढ्यात रेल्वे एका स्टेशनवर थांबली. झोपलेला प्रवाशी रेल्वेतून खाली उतरला आणि मनोहर ज्या खिडकीजवळ बसला होता,तिथे येऊन उभा राहिला.
"बिच्चारा!घाबरून गाडीतूनच खाली उतरला." फाळकूटदादा मनोहरकडे रागाने पहात आपल्या चमच्यांना म्हणाला.
रेल्वे हलली तशी तो फटका, गरीब प्रवाशी  खिडकीत हात घालून मनोहरच्या हातातले घड्याळ खेचू लागला. मनोहरने त्याच्या हातावर दोन जोराचे  फटके दिले. प्रवाशाने घड्याळ सोडून दिले.आता रेल्वेने वेग पकडला. घड्याळ काढून खिशात ठेवताना मनोहरने फाळकूटदादाला विचारले,"म्हणजे हा का तुमचा गरीब, बिच्चारा आणि पेशन्ट प्रवाशी, ज्याची तुम्ही बाजू घेऊन बोलता होता." फाळकूटदादाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

No comments:

Post a Comment