आज पिहूच्या क्लास टीचरने सगळ्या मुलांना क्लबचे फॉर्म दिले होते. म्हणजे मुलांनी आपापल्या घरून त्यावर आपल्या पालकांची सही घेऊन येऊ शकतील.पिहूला डान्स क्लब जॉईन करायचा होता,पण पिहूच्या आईचा आग्रह होता की तिने कराटे क्लब जॉईन करावा.
ती पिहूला म्हणाली,"नाही पिहू, तुला कराटे क्लबच जॉईन करावा लागेल."
"पण आई मला डान्स शिकायचं आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी डान्स क्लब जॉईन करताहेत. तू मला कराटे क्लब का जॉईन करायला सांगतेस?" पिहूनं विचारलं.
"डान्स क्लास तर इथे खूप आहेत. मी तुला त्याही क्लासला घालेन,पण कराटे फक्त तुमच्याच शाळेत शिकवलं जातं. आजकाल आत्मरक्षण करण्यासाठी कराटे शिकण्याची गरज आहे. "सुमन पिहूला समजावत सांगत तिच्याकडून फॉर्म घेतला; त्यावर कराटेसमोर टिक केली आणि खाली आपली स्वाक्षरी केली.
पिहूनं रागातच तो फॉर्म घेतला आणि रडतच तिथून निघून गेली. पिहू मनात नसतानाही कराटे क्लबला जाऊ लागली. खरोखरच तिची एक मैत्रीण सोडली तर सगळ्याजणींनी डान्स क्लब जॉईन केला होता. त्या सगळ्या प्रशालेत होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत होत्या, हिला मात्र कराटे स्पर्धेला बाहेर जावं लागतं होतं. पहिल्या पहिल्यांदा तर तिला रागच येत होता, मात्र नंतर नंतर तिला कराटेची गोडी वाटू लागली.
पिहूच्या आनंदासाठी सुमनने त्यांच्या घराजवळच असलेल्या एका डान्स क्लासमध्ये तिचं नाव नोंदवलं. पिहू आनंदानं दोन्ही क्लासला जाऊ लागली.
एकदा पिहू आणि तिची मैत्रीण शाळा सुटल्यावर स्कूल बसमधून उतरून घरी निघाल्या होत्या. त्या गल्लीतल्या एका कोपऱ्यावर आल्या,तेवढ्यात मोटारसायकलवर बसलेले दोघेजण तिथे आले आणि पिहूला ओढून घेत गाडीवर बसवू लागले.
पिहूने एक जोराची लाथ तिला ओढणाऱ्या तरुणाच्या गुडघ्यावर हाणली आणि त्याच्या हाताचा जोराचा चावा घेतला. तिच्या मैत्रिणीनेही दुसऱ्या तरुणाच्या डोळ्यांत माती टाकली आणि त्याला गुद्दे मारू लागली. इतक्यात आरडाओरडा ऐकून लोक धावत तिथे आले.
तरुण घाबरून पळू लागले,पण तिथल्या लोकांनी त्यांना शिताफीने पकडले. सगळ्यांनी मिळून त्यांचा चांगलाच चोप काढला आणि पोलिसांच्या हवाली केले. लोकांनी दोघांचेही खूप कौतुक केले. शाबासकी दिली. घरी आल्यावर पिहूने सगळा प्रकार आईला सांगितला.
ती म्हणाली,"तुझा आग्रह आज उपयोगाला आला. तू आग्रह केला नसतास तर मी अजिबातच कराटे जॉईन केला नसता. तू बरोबर म्हणतेस , सगळ्यांना स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. थॅंकू यू आई!"
आईने पिहूला जवळ घेतलं आणि डोक्यावरून मायेनं हात फिरवला. सुमनला आज खूप आनंद झाला होता,कारण उशिरा का होईना पण पिहूला तिचे म्हणणे पटले होते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment