Tuesday, June 30, 2020

लॉकडावूनला पर्याय आपणच!

महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्र सरकारपुढे याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हताच. जर अशाप्रकारे कोविड-19 चा संसर्ग वाढत राहिला तर आपण 'अनलॉक' ची अपेक्षाच करू शकणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडावूनच्या काळात टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला शिक्षण संस्था सोडल्या तर जवळपास सर्वच गोष्टींना पूर्ववत मुभा दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली अर्थव्यवस्था मार्गावर आणणं खूप जरुरीचं होतं. आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे, ही समाधानकारक बाब असली तरी दुसरीकडे कोविड-19 चा संसर्ग मात्र कमी होताना दिसत नाही.
हीच मोठी चिंतेची गोष्ट असून त्याशिवाय महाराष्ट्रच काय संपूर्ण देश मोकळा श्वास घेऊ शकणार नाही. सर्वसामान्य जनजीवन आणि अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत, ते सरकारांकडून होत आहेत. हे करतानाच जनतेलाही 'काळजी घ्या, सुरक्षित राहा' हे कळकळीने सांगितले जात आहे. संसर्गापासून दूर राहण्यासाठी जे जे करायला हवं, ते ते विविध माध्यमाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, जर बाहेर पडलाच तर तोंडाला मास्क घाला आणि सुरक्षित अंतर ठेवा या गोष्टी सांगितल्या जात आहेतच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता राखा ,हेदेखील आवर्जून सांगितलं जातं आहे. बाहेरून घरी गेल्यावर किंवा कामावर गेल्यावर स्वच्छ साबणाने हात धुवा. पण किती लोकं याची काळजी घेतात? आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहतो,बाजारात वगैरे उसळलेली गर्दी. अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा 'सोशल डिस्टन्स' पाळला जात नाही. सध्या तर कोविड-19 ने ग्रामीण भागात थैमान घालायला सुरुवात केली आहे. रोजचा लागणचा आकडा वाढत चालला आहे. वैद्यकीय सेवादेखील अपुरी पडत असल्याच्या बातम्या वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. सरकार ते प्रयत्न करत असले तरी संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी लोकांचीही मोठी जबाबदारी आहे. स्वतः काळजी घेतल्यास सर्वांचाच ताण कमी होणार आहे.
महाराष्ट्रात कोविड-19 च्या संक्रमणाची संख्या देशात सर्वाधिक आहे. राज्यात संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दीड लाख पार करून दोन लाखाच्या दिशेने आगेकूच करत आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील साडेसात हजारांवर पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारसमोर दोन मोठी आव्हानं आहेत. एक म्हणजे कोरोना (कोविड-19) चा संसर्ग कमी करणे आणि दुसरे- अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांना सामान्य स्तरापर्यंत आणणे. या दोन्ही आव्हानांदरम्यान संतुलन ठेवून मार्ग काढणं, हेही एक मोठं आव्हान आहे. आणि हे लोकांच्या मदतीशिवाय अशक्य आहे. त्यांनी साथ दिली तरच या आव्हानांना तोंड देणं शक्य होणार आहे. कोविड-19 वर अद्याप इलाज सापडलेला नाही. आपल्या देशासह जगभरात मोठ्या संख्येने आणि वेगाने या रोगाच्या इलाजावर संशोधन सुरू आहे. कोरोनवर लस आणि औषध या दोन्हीसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण अद्याप ठोस असे उपाय हाती आलेले नाहीत. तोपर्यंत आपल्यालाच आपली काळजी करावी लागणार आहे. घ्यावी लागणार आहे. सुरक्षित अंतर, मास्क आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करत कोरोनासह आपल्याला जगावं लागणार आहे. या रोगाला नियंत्रित ठेवण्यासाठी या त्रिसूत्रीचाच एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊन असेच काही महिने ठेवले तरी संसर्गाचा समूळ नायनाट होईल की नाही, याची गॅरंटी नाही. जोपर्यंत 'परफेक्ट' इलाज सापडत नाही,तोपर्यंत आपल्याला त्याच्यासोबत त्रिसूत्रीचा अवलंब करीत आपलं सामान्य जगावं लागणार आहे. म्हणजे लॉकडावूनला पर्याय आपणच आहोत. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याही काही मर्यादा आहेत. अर्थव्यवस्था सामान्य होण्यासाठी त्यांना अशा परिस्थितीत मार्ग काढत वाटचाल करावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खुल्या केलेल्या अर्थव्यवस्थेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांची बचत संपली आहे. काहींना निम्म्या पगारावर दिवस काढावे लागत आहेत. या सगळ्यांचे जीवन सामान्य होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपल्याला या कोरोनाशीही दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यावी लागणार आहे. 'काळजी घ्या, आणि सुरक्षित राहा' हा मंत्र सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवा.

No comments:

Post a Comment