सावकारी, काळेधंदे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे शासकीय घटक आणि काळेधंदे करणारे यांच्यात जे 'आर्थिक संबंध'आहेत,ते जगजाहीर आहेत. यामुळे काळेधंदेवाले आणि सरकारीबाबू यांनी आपली घरे भरून घेतली आहेत. सावकार तर गोरगरिबांच्या मुंड्या पिरघळून सुखासीन जगात लोळत आहेत. दोन नंबर करून जगणाऱ्या लोकांची इथे चलती आहे. त्यांना ना 'इन्कम टॅक्स' ची भीती ना कारवाईची! दोन नंबरच्या धंदेवाल्यांना कायद्याची बाजू सांभाळणाऱ्या लोकांना हाताशी धरले की काम झाले. मग ही मंडळी कुणाला भिकच घालत नाहीत. उलट यांची दादागिरी वाढते.
गुंडगिरी करणारी चार टाळकी सांभाळले की झाले! आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात दोन नंबर आहे. खासगी सावकारीला मान्यता असली तरी त्यात दोन नंबर चालतोच. जुगार अड्डे, मटका, देहविक्री, शिकारीला किंवा तोडायला बंदी घालण्यात आलेल्या वनस्पती-प्राणी यांची तस्करी करणारे लोक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. याशिवाय बी-बियाणे,खते आणि औषधे, अन्न पदार्थ यांची बनावटगिरी करणारे लोकही मोठ्या प्रमाणात आहेत. ही एक समांतर चालणारी यंत्रणा आहे. या मंडळींना राजकीय-प्रशासकीय पाठबळ असल्याशिवाय हा धंदा उगाच बोकाळलेला नाही. या मंडळींना शेतकरी मातीत गेला काय किंवा भेसळ करून किंवा बनावट अन्न पदार्थ खाल्ल्याने कुणाचा जीव गेला काय, कशाचेच सोयरसुतक नसते. त्यामुळेच आपल्या देशात जागोजागी कायद्यांची पायमल्ली होताना दिसते. आपल्या देशातील अवैध धंदे कमी होणं किंवा समूळ नष्ट होणं कठीण आहे. या अवैध धंद्यांची बाजू घेणं किंवा समर्थन करणं उचित नाहीच. पण याला आळा घालण्यासाठी अन्य मार्गाचाही अवलंब केला जायला हवा. अवैध धंदे किंवा सावकारी चालवून गब्बर झालेल्या लोकांवर 'इन्कम टॅक्स' ची करडी नजर असायला हवी आहे. महागड्या गाड्या, महागडे गॉगल, गळ्यातल्या सोनसाखळ्या, बंगला-प्लॉट खरेदी करून समाजात रुबाबात राहणाऱ्या मंडळींना 'इन्कम टॅक्स' च्या रडारवर घेतले पाहिजे.
या लोकांवर 'टॅक्स' चा हातोडा बसल्यास सरकारला चांगलाच आर्थिक फायदा मिळणार आहे. सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून सामान्य लोकांना महागाईचे झटके देत आहे. त्यांनी अशा लोकांना आपल्या उत्पन्नाच्या वैध धारेत आणून सरकार वरील आर्थिक ताण कमी करता येईल. या लोकांना पै पैचा हिशोब देताना नक्कीच घाम फुटेल. गरजूला दिलेल्या पैशांच्या दहा पट वसुली करूनही पुन्हा मुद्दल व व्याजासाठी दहशतीचा वापर करणाऱ्या सावकारीची चौकशी होईल.फौजदारी गुन्हा परवडला पण 'इन्कम टॅक्स' ची चौकशी सावकारांना महागात पडेल.
सावकार किंवा काळेधंदेवाले काही लोक समाजात समाजसेवक म्हणूनही वावरत आहेत. मात्र प्रत्यक्षात या मंडळींचे वर्तन निर्दयी असते. तालीम, मंडळे, संस्था, संघटना, क्रीडा संघ आदींना मदत करण्याच्या माध्यमातून ते आपल्या सावकारीचा आणि काळ्या धंद्यातील कमाईचा चेहरा लपवू पाहत आहेत. अशा लोकांच्या संपत्तीची यादी खूप मोठी आहे. कोठेही राबवायला न जाता ही मंडळी निर्दयीपणे घरात बसून पैसा कमावतात. काही फुटकळ मावा-तंबाकू आणि दारू-जेवण यांवर आपलं आयुष्य जगणाऱ्या चार-दोन तरुणांना जगवलं की यांचं काम झालं. आपल्या देशात असे फुटकळ आयुष्य जगणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळेच या लोकांची दादागिरी चालते. या लोकांना कसल्याच कारवाईची भीती नाही.
आपल्या संपत्तीचा,गाड्यांचा,गळ्यातील सोनसाखळ्यांचा, रोज नव्या गॉगलचा गावभर गाजावाजा करण्याची मोठी हौस आहे. ही हौस त्यांच्या अंगलट आणायचे असेल तर त्यांना 'इन्कम टॅक्स' च्या रडारवर आणणे गरजेचे आहे. सावकारी आणि काळ्या धंद्यावर कमाई केलेल्यांची माहिती सर्वसामान्य लोकांकडून सहज मिळू शकते. फक्त ही माहिती देणाऱ्यांची नवे गुपित ठेवल्यास लोक सहज पुढे येऊ शकतील. शासनाने याचा जरूर विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment